विजय मल्ल्या यांनी आपला वाढदिवस फटाक्यांची आतषबाजी करून साजरा करावा ही गोष्ट त्यांचा कोडगेपणा आणि मस्तवालपणा दाखवणारी आहे. हा ४३०० कोटींचा मालक असावा असा अंदाज आहे आणि यावर ७००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. ७००० कोटी रुपये देशाचे थकवून हा माणूस इतर देशांत बाहेर फिरताना दिसला असता काय? बँकांचे कर्ज फेडायला यांच्याकडे पैसे नाहीत. मग बँडवाल्यांवर, घोडय़ांवर उधळायला हा पसे कुठून आणतो? सामान्य माणसाने कर्जाचे काही हप्ते चुकवले की त्यांच्या घरांवर, वाहनांवर लगेच जप्ती आणली जाते. यांच्याकडे प्रचंड थकबाकी असताना बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना त्याचा एवढा पुळका कशासाठी? पडून उठण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हा माणूस ‘मिया गिरे तो भी टांग ऊपर’ असा आव आणतो आहे. अवदसा आठवल्यावर आणखी काय होणार?
– प्रवीण धोत्रे, गिरगाव (मुंबई)

चमत्कारामुळे संतपद ही अंधश्रद्धाच
‘मदर टेरेसा यांना संतपद देण्याचा मार्ग मोकळा’ ही बातमी (१९ डिसें.) वाचली. व्हॅटिकन चर्चने मदर टेरेसा यांचा दुसरा चमत्कार मान्य केला व त्यांना संतपद देण्यात येईल असे सांगितले. बंगालमधील पहिला चमत्कार व आता ब्राझीलमधील दुसरा असे दोन चमत्कार मदर टेरेसा यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत. आजच्या विज्ञान युगात अशा प्रकारे चमत्कारांना मान्यता देणे कितपत योग्य आहे? आज नाताळ जवळ आला असताना ख्रिस्ती मिशनरींद्वारा चालवल्या जाणाऱ्या धर्मातराच्या षड्यंत्राचा हा भाग नाही ना? माझ्या मते चमत्कारामुळे संतपद ही अंधश्रद्धाच आहे.
– किरण दामले, कुर्ला (मुंबई)

अपवाद स्पष्ट करावेत..
दिल्ली बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका ही बातमी (२० डिसें.) वाचून ‘अल्पवयीन व्याख्येत सतानही बसतो’ हे नराश्यपूर्ण सत्य जाणवलं.
वय १७ वर्षांचं खरं, पण त्याला ही जाण आलेली होती ना की एक मादी आपलं सावज होऊन आलंय आणि आपण नरपशू आहोत! एक व्याख्या म्हणून प्रौढाची १८ वष्रे वयाची मर्यादा ठरवली गेली असली तरी कुठल्याही कायद्यामध्ये जशा अपवाद अधोरेखित करणाऱ्या तरतुदी असतात तशा अपवादात्मक घटना बालगुन्हेगारीच्या व्याख्येतही का घालता येणार नाहीत?
जाणीवपूर्वक केलेल्या िहसेला बाल्य चिकटलेलं असतं हे म्हणणं म्हणजे या जगातल्या निरागसतेचा चोळामोळाच आहे. आधीच आपल्याकडे मनोरुग्ण / अल्पवयीन म्हणून कुठल्याही गुन्हेगाराला सुधारायला वाव देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक बघितलं जातं. एक गुन्हा अशा तऱ्हेनं ‘पचला’ की गुन्हेगाराला ते व्यसनच जडू शकतं. म्हणून अपवादात्मक केसेसमध्ये कठोरात कठोर शिक्षा करून गुन्हेगारी प्रवृत्तीचा रोग मुळासकट दूर केला पाहिजे. शेवटी एक तर नाकारता येणारच नाही की गुन्हेगारी प्रवृत्तीला वयाचं बंधन असू शकत नाही.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</strong>

बँक परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांना मिळावी
आता बँक, एलआयसी, तसेच काही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ज्या स्पर्धापरीक्षा होतात, त्या सर्व ऑनलाइन घेण्यात येतात. ऑनलाइन परीक्षा असल्याने निकाल लवकर लागतात. जे निश्चितच चांगले आहे. परंतु होऊन गेलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका आणि कार्बन कॉपी उमेदवारांना दिली जात नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर ज्याप्रमाणे त्यांच्या होऊन गेलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका उपलब्ध असतात, त्याप्रमाणे बॅँकेची परीक्षा घेणारी संस्था त्यांच्या वेबसाइटवर अशी कोणतीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका उपलब्ध करून देत नाही. तसेच उमेदवाराला, त्याने संगणकावर स्वत: सोडवलेल्या पेपरची प्रत (ूं१ुल्ल ूस्र्८) कधीच दिली जात नाही. त्यामुळे त्याला त्याचे कोणते उत्तर बरोबर आले, कोणते चुकले हे कळण्याचा कोणताच मार्ग नाही. संघ लोकसेवा आयोगही उमेदवारांना प्रश्नपत्रिका घरी नेण्याची मुभा देते. म्हणून बॅंँकेची स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थेने या पर्यायांचा गांभीर्याने विचार करावा. जेणेकरून परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक होईल आणि उमेदवारांनासुद्धा याचा खूप फायदा होईल.
– राहुल पाटील, बदलापूर

चित्रपटाला विरोध चुकीचा
‘बाजीराव- मस्तानी’ला विरोध करणाऱ्या किती लोकांनी खरा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय? ज्या गाण्यावरून इतका गोंधळ चालू आहे त्या गाण्यात नाचणाऱ्या काशीबाई किती लोकांना ज्ञात होत्या? मुळातच बाजीरावबद्दल किती लोकांना आधी माहिती होती हाच मोठा प्रश्न आहे. आपल्याकडे चित्रपटात काय दाखवायचं आणि काय नाही हे ठरविण्यासाठी सेन्सॉर बोर्ड नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे. एकदा त्यांनी चित्रपट पारित केल्यावर त्यातील विषयावरून त्याला विरोध करण्याला काहीच अर्थ उरत नाही. कथा एखाद्या विशिष्ट समाजाची आहे म्हणून विरोध करणे अयोग्य आहे.
-विनोद थोरात, जुन्नर

इतिहास जागृत ठेवणे हे आव्हान
बाजीराव मस्तानी या सिनेमातील वादग्रस्त गाण्याभोवती प्रसारमाध्यमांनी आणि अभ्यासकांनी यथेच्छ िपगा घालूनदेखील सिनेमा प्रदíशत झाला. प्रेक्षकांनी तुफान गर्दी करून गाण्यांचा आनंद लुटला. खरं पाहता सर्वसामान्य लोकांना इतिहास याविषयी फारसं सोयरसुतक नसतं. ऐतिहासिक व्यक्तीविषयी आदराची भावना जरूर असते, परंतु त्याविषयीचं कडवेपण मनात रुजत नाही. त्या प्रखर स्वाभिमानातून तीव्र लढा करण्याची इच्छा नसते. त्यामुळे चारित्र्यहननाच्या विरोधात केली जाणारी आंदोलनं व्यापक जनाधार नसल्याने दुबळी ठरतात.
इतिहासाची अस्मिता ही अनेक पिढय़ांमधून अखंडपणे जागृत ठेवावी लागते. त्या संदर्भातील अभिमानाचा अंगार सतत फुलत ठेवावा लागतो. आपल्याला शिवाजी महाराजदेखील महाराष्ट्राबाहेर योग्य आणि नीटसे पोहोचवता आले नाहीत, तिथं बाजीराव तर दूर की बात! जिथं राष्ट्रगीत चालू असताना उभे राहावे की बसावे अथवा बाहेर जावे याविषयी मतांतरे आणि वाद असतात तिथं इतिहासाचा अंगार आणि अहंकार जागृत ठेवणे हे मोठे आव्हान आहे.
– रविराज गंधे, गोरेगाव (मुंबई)

आता ‘जयप्रभा’कडे दुर्लक्ष नको!
‘जयप्रभा स्टुडिओ पुरातन वास्तूंच्या यादीतच’ ही बातमी (१६ डिसें.) वाचली. आता खरा प्रश्न पुढे आहे. कोणतीही वास्तू हेरिटेज म्हणून जाहीर झाल्यानंतर तिच्या देखभालीसाठी शासनाने कामयस्वरूपी निधीची सोय करणे आवश्यक असते. राज्यात अशा अनेक संरक्षित वास्तू व किल्ले आहेत ज्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा पैसा नाही, असे सरकारच म्हणत असते. सध्या जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रीकरणाच्या अनेक सोयी नसल्याने तिथे पुण्या-मुंबईचे निर्माते फिरकतही नाहीत. त्यामुळे पडून राहिलेल्या या स्टुडिओच्या विक्रीचा लता मंगेशकर यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता, पण स्टुडिओच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगणाऱ्या ज्या कोल्हापूरकरांनी या निर्णयात मोडता घातला. आता स्टुडिओकडे दुर्लक्ष होणार नाही,याची सरकारने काळजी घेतली पाहिजे.
– दादासाहेब उल्हास येंधे, काळाचौकी, (मुंबई)