‘‘अरे, तुम्ही छायाचित्रकार म्हणून माझे नावदेखील न देता माझे फोटो छापता? आता तुम्हाला नुकसानभरपाईची नोटीसच पाठवतो.’’ काही महिन्यांपूर्वीच गोपाळ बोधे बिभास आमोणकरांच्या ऑफिसमध्ये एका पत्रकाराला ऐकवत होते. थोडय़ा वेळाने ज्या विषयासाठी तो फोटो वापरला होता त्या विषयाकडे त्यांची गाडी वळली. म्हणाले, तुम्ही विषय नीट मांडला आहे ना, मग माझे नाव महत्त्वाचे नाही, विषय महत्त्वाचा मग आता पुढे काय लिहिणार म्हणत लगेच ते ती गोष्ट विसरूनदेखील गेले.
भारतातले प्रसिद्ध हवाई छायाचित्रकार म्हणून गोपाळ बोधे इतक्या उंचीवर होते की, त्यांचा फोटो क्रेडिट लाइन न देता वापरल्याबद्दल ते खरं तर त्याला कितीही दंड करू शकले असते; पण त्यांना विषय महत्त्वाचा वाटला. खरे तर हा विषय थेट ते ज्या सरकारी समितीवर काम करत होते त्यासंबंधीच होता, पण त्यांनी त्या विषयासाठी थेट सरकारवरच टीका केली होती. त्यासाठी त्यांनी त्याला अधिकृत भाष्यदेखील दिला होता आणि पुरावा म्हणून छायाचित्रदेखील. गडबडीत तो पत्रकार छायाचित्रकाराचे नाव द्यायचे विसरला होता. बोधेंनी सुरुवातीस जरी त्याला ऐकवले असले तरी नंतर मात्र त्याच्या विषयाला प्रोत्साहनच दिले होते. सारा प्रसंग घडताना त्यांच्याशी झालेली पहिली भेट आठवली.
त्यांची पहिली भेट झाली ती गिरिमित्र संमेलनात. मी आमच्या ट्रेक क्षितिज संस्थेचे छोटेसे सादरीकरण केले होते. व्यासपीठावरून उतरल्यावर पहिली हाक मारली ती गोपाळ बोधे यांनी. त्यांनी व्हिजिटिंग कार्ड देऊन भेटायला बोलावले. तेव्हा आम्ही किल्ल्यांच्या मोठय़ा प्रतिकृती तयार करत होतो. त्यासाठी आम्हाला किल्ल्यांची हवाई छायाचित्रे हवी होती. तेव्हा त्यांनी छायाचित्रे पाहायला मिळतील, पण सॉफ्ट कॉपी मिळणार नाही असे थेट सांगितले. वर म्हणाले, हवी तर छोटी प्रिंट मिळेल. खरे तर आम्ही काही व्यावसायिक वापर करणार नव्हतो, पण त्यांनी छायाचित्रे नाकारली होती. कदाचित त्यांच्यापर्यंत ते नीटसे पोहोचले नसावे. तसेच कॉपी राइटबद्दलची त्यांची जागरूकता खूप असल्यामुळे असेल कदाचित. पण आज त्यांनीच त्यांची सारी माहिती, छायाचित्रे आमच्यासाठी खुली केली होती, कारण एकच आम्ही जे मांडत होतो, लिहीत होतो ते त्यांना महत्त्वाचे वाटत होते.
त्यांना सतत काही तरी सांगायचे असायचे. डोक्यात नवीन काही ना काही तरी सुरू असायचे. ते पुरातत्त्व खात्याच्या समितीवर काम करताना तेथे जाणवणारा विस्कळीतपणा त्यांनी मांडला. राज्याच्या वन्यजीव मंडळावर ते काम करत होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत त्यांनी महाराष्ट्रातील बरीच जंगलं पालथी घातली होती. त्यांना असे भटकायला आवडायचे. नवे विषय नवी माणसं जोडत ते पुढे जात राहिले.
पहिल्या भेटीनंतर काही वर्षे त्यांचा फारसा संपर्क नव्हता, पण रौप्यमहोत्सवी पक्षिमित्र संमेलनाच्या निमित्ताने त्यांची मैत्रीच झाली. खरे तर त्यांचा आणि पक्षिमित्र संमेलनाच्या आयोजनाचा तसा फारसा संबंध आजवर आला नव्हता, पण आपल्या मित्रांनी आयोजित केलेले संमेलन म्हणून मग ते स्वत:चे संमेलन. बिभास आमोणकरने पुढाकार घेतल्यावर त्यांनी ते संमेलन स्वत:चे मानले. एकदा का मित्रांचे काम म्हटले की, मग मागेपुढे काहीच नाही. संमेलनाच्या पहिल्या बैठकीपासून ते संमेलनाचे सूप वाजेपर्यंत हा माणूस पक्षिमित्रमय झाला होता. संमेलनासाठी बाहेरून येणाऱ्या दोनअडीचशे सहभागींना राहण्याची सोय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशेजारीच करायची होती. मग यांनी आपले सारे वजन वापरून वनखात्याला पटवून थेट राष्ट्रीय उद्यानातील कॅम्पिंग साइट मिळवून दिली. संमेलनाच्या प्रत्येक साप्ताहिक बैठकीला ते हजर असायचे. सरकारी मदत हवी असेल तर लगेच फोन करायचे. छायाचित्रांची स्पर्धा घ्यायची म्हटल्यावर आपलं सारं वजन वापरून त्यांनी स्पर्धेसाठी तब्बल सव्वा लाख रुपये जमा केले, त्यामुळेच पक्षिमित्र संमेलनातील छायाचित्रं स्पर्धेतील विजेत्यांना घसघशीत रोख रकमेची पारितोषिकं देणं शक्य झालं. स्पर्धेतील फोटो प्रिंट करून हवे तर त्यांनी ओळखीच्या फोटो लॅबमधून सगळे फोटो विनामूल्य प्रिंट करून दिले.
ते काहीसे जुन्या वळणाचे होते, म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी छायाचित्रीकरणात पुरेपूर केला होता. पण त्यांना संगणकावरील आकडेमोडीपेक्षा कागदावर आकडेमोड करणे पसंत होते. संमेलनाचं बरंचसं काम संगणकावर सुरू होतं. पण त्यांच्यासाठी मग कागद पेन घेऊन बसायला लागे. कागदावर सगळे आकडे मांडले की मग त्यांचे समाधान व्हायचे. गरज पडलीच तर निधी कोठूनही आणू याची त्यांना खात्री होती. काहीच नाही तर अडीनडीला असावे म्हणून त्यांनी स्वत:च्या खासगी खात्यातून ५० हजार रुपये काढून संमेलनात बरोबर ठेवले होते.
रौप्य महोत्सवी पक्षिमित्र संमेलन हे नेहमीच्या संमेलनापेक्षा बरेच वेगळे होते. खूप मोठी टीम तयार झाली होती. बोधेंचा उत्साह दांडगा होता. संपूर्ण संमेलन ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहिले. स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी छायाचित्रणाचे वर्कशॉपदेखील भरवले. राज्यभरातून आलेल्या गावोगावच्या पक्षिमित्रांना नव्या नव्या तंत्राची ओळख करून दिली. संमेलनासाठी सरकारदरबारी असलेले सारे संपर्क वापरले. खरं तर तसे ते रिझव्‍‌र्ह. पण विषय पटला, माणूस समजला की बोधे त्याच्यासाठी मग आपली सारी व्यवस्था कामाला लावत.
महाराष्ट्र राज्याच्या वन्य जीव मंडळाचे सदस्य होते. हेरिटेज कमिटी, किल्ले दत्तक समितीवर देखील काम करत होते. सेवानिवृत्तीनंतर ते हवाई छायाचित्रणापेक्षा या इतर कामातच गढून गेले होते. नवोदितांना प्रोत्साहन हा त्यांचा स्थायीभाव होता. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तरुणांना त्यांचा पाठिंबा असायचा. काही होतकरू तरुणांना प्रकल्पावर मदत म्हणून त्यांनी वाहनसुविधादेखील उपलब्ध करून दिली होती.
कोणाला कॅमेरा घ्यायचा असेल तर त्यांची मदत ठरलेली. लगेच आपल्या वितरकाला फोन करून चार पैसे कमी करून देणार. मला कॅमेरा घ्यायचा होता. बोधे कॅननचे चाहते. मी माझ्या बजेटमधील निवडक मॉॅडेल घेऊ न बोधे आणि बिभास या दोघांसमोर बसायचो. खरे तर माझ्या कॅमेऱ्याची किंमत या दोघांकडील एका लेन्स इतकीदेखील नव्हती. पण माझ्या बजेटनुसार काय चांगले असावे यावर या दोघांनी केवढा वाद घातला. मी निकॉन कॅमेरा घेतला तरीदेखील पहिला फोन यांचाच होता, ‘वेलकम टू फोटोग्राफर फॅमिली.’
हवाई छायाचित्रणात त्यांनी खूप मोठी मजल मारली होती. त्याबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. नौदलातील त्यांच्या कामाचे स्वरूप हे एकदम टिपिकल होते. पण त्यांनी स्वत:च्या हिकमतीवर अनेक प्रकल्प राबविले, यशस्वी केले. ते कायम सांगत छायाचित्रणाच्या माध्यमातून दस्तावेजीकरण होणे गरजेचे आहे. आपण त्यातच कमी पडतो. त्यांनी नौदलाच्या सुविधांचा चांगला वापर केला. उद्धव ठाकरे यांनी किल्लय़ांचे हवाई छायाचित्रण करण्याआधीच त्यांनी अनेक किल्ले चित्रित करून ठेवले होते. केवळ किल्लेच नाही तर दीपगृह, भारताचा संपूर्ण सागरकिनारा, लडाख, गोवा, मुंबई असे खूप काही हवाई छायाचित्रण केले होते. त्यातील बहुतांश त्यांनी प्रकाशित केले, काही अजून बाकी आहे. त्यांचं अंदमानवरचं पुस्तक देखील पुरं होत आलं होतं.
इतक्या उच्च स्थानी पोहचल्यावरदेखील ते सच्चे मित्र होते. वयाने मोठे असले तरी हक्काने हाक मारण्याचे ठिकाण होते. कोणताही फोटो हवा असेल तर फोन करायचा आणि मागायचा असा साधा सरळ हिशोब होता. मानधनाचा तर मुद्दाच निघायचा नाही.
विभव मांजरेकर त्यांच्या फोटोचे काम पाहायचा. बोधेंनी त्याला सांगितले की आम्हाला लगेच पूर्ण उपलब्धी. त्यांचे मूळ गाव सांगली. माझ्या गावापासून जवळचे. एकदा ‘लोकसत्ता’मधील नदीजोड प्रकल्पावरील सुरेश प्रभू यांच्या लेखात कृष्णा आणि पंचगंगा संगमाचे हवाई छायाचित्र वापरले होते. ते माझ्या गावाच्या जवळच्या होते. मी छायाचित्र पाहून त्यांना फोन केला. मी कुरुंदवाडचा आहे म्हटल्यावर त्यांना आनंद झाला होता. एकदा घरी ये, तुझे सारे गाव वरून दाखवतो, हवे ते फोटो घेऊन जा. एकदम खुले आमंत्रण होते.
कधीकधी त्यांचे वागणे हट्टी हेकेखोरदेखील वाटत असे. पण ते स्वत:पुरतेच. पण संस्थात्मक कामात मात्र ते कायमच सामूहिक निर्णयाचा सन्मान करत. गिरिमित्र संमेलनात त्यांना एकदा एक विषय मांडायचा होता. संमेलनात कोणालाही निव्वळ भाषण देण्यासाठी व्यासपीठ वापरू दिले जाणार नव्हते, तसे त्यांना स्पष्ट सांगितले, भाषणाऐवजी सादरीकरण करायला सांगितले. वेळेअभावी त्यांना सादरीकरण ते शक्य नव्हते. त्यांनी संस्थात्मक निर्णय मान्य केला. संमेलनास येत राहिले. कित्येक वर्षे गिरिमित्र संमेलनातील छायाचित्र स्पर्धेची पारितोषके त्यांच्याच हस्ते दिली जात.
मागच्याच शनिवारी दादरला ते भेटले होते. दुसऱ्या दिवशीच्या जिम कॉर्बेट सफरीची तयारी सुरू होती, म्हणाले, ‘‘मी विश्रांतीसाठी जातोय. सिद्धिविनायकच्या पुस्तकाने खूप दमछाक झाली. आता लॅपटॉप नको वाटतोय, पाठीला ओझं खूप होतंय.’’ नवीनच घेतलेले नोटपॅड दाखवले. बराच वेळा गप्पा झाल्या. एका स्टोरीसाठी त्यांची मदत हवी होती, म्हटले तुम्ही तिकडे जंगलात, फोन बंद असणार, मी कसा फोन करू? त्यावर त्यांचे उत्तर तयारच होते, तू केव्हाही फोन कर तुझ्यासाठी फोन कायम सुरू असेल.’’
त्यांना विश्रांती हवी होती, ती अशी कायमची मिळेल याची कसलीच कल्पना नव्हती. कॉर्बेटच्या निसर्गरम्य परिसरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आराम करण्यासाठी गेलेला हा माणूस कायमचा आराम कसा काय करू शकतो? पटत नव्हते. त्यांना अजून खूप काही करायचे होते. नुकतेच ते सातारा परिसरात हवाई छायाचित्रण करून आले होते. सरकारी काम होते, पण सरकारने पाहायच्या आधीच खूप आत्मीयतेने त्यांनी सारे फोटो आम्हाला दाखवले होते.
सेवानिवृत्त झाल्यावर माणूस आराम करतो असे म्हणतात, पण हे तर आणखीनच भटकत होते. आज काय पूर्वाचल, कधी अंदमान, कधी लक्षद्वीप, कधी कच्छच्या रणात. सतत भटकंती आणि फोटोग्राफी सुरूच. दहाव्या वर्षी जडलेल्या छायाचित्रणाच्या छंदाने ते पुरते नादावले होते. हवाई छायाचित्रीकरणाच्या करामतीने त्यांत असंख्य रंग भरले. कदाचित परमेश्वरालादेखील धरित्रीचे अनोखे रंग त्यांच्या कॅमेऱ्यातून पाहण्याची इच्छा झाली असावी. म्हणूनच आयुष्यभर हवेत फिरणाऱ्या, तरीदेखील जमिनीवर असणाऱ्या या अवलियाला त्याने स्वत:कडे बोलावले असावे.