lp23वेगवेगळ्या चित्रकारांनी काढलेली चित्र असोत की वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे असोत आज त्या सगळ्याकडे पाहताना वाटते की आपल्यासमोर उभी असलेली ही मयसभाच आहे.
कुणीतरी म्हटलंच आहे, ‘जे न देखे रवि ते देखे कवि!’ खरोखरच जे सूर्य किरणही पाहू शकत नाहीत, ते कवीच्या प्रतिभेतून त्याच्या मन:चक्षूंपुढे साकारते अन् ही आभासी प्रतिमा खऱ्या प्रतिमेहून खरी असते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस कॅमेऱ्याचा शोध लागला. अन् हुबेहूब प्रतिमा कागदावर साकारू लागल्या. पण त्याआधी देवांची, देवदूतांची, इतिहास पुरुषांची, पुराणपुरुषांची प्रतिमा काव्यातून उभी केली ती शाहीर, भाट, कीर्तनकारांनी. हे भाषाप्रभू त्या त्या भाषेतून म्हणजे मराठी कीर्तनकार, शाहीर, राजस्थानातले वा उत्तर हिंदुस्थानातले भाट, कवी! प्रथम काव्यातून, कथांतून यांची वर्णने लोकांसमोर आली ती पाठांतराच्या माध्यमातून. या मुखातून त्या मुखाकडे मौखिक परंपरेतून. त्यानंतर कधीतरी लेखन सुरू झाले अन् भूर्जपत्रे, दगडी शीळा यावर चित्रे चितारली जाऊ लागली, त्या त्या भाषेत मजकूर कोरला जाऊ लागला. पुढे कित्येक वर्षांनी कागदाचा शोध लागला अन् हस्तलिखितातून वा कागदावर चित्रे काढून, त्या त्या काळचे देवी-देवता, देवदूत, राजपुरुष/ स्त्रिया कागदावर चित्ररूपात अवतरू लागले. द्राविडी काळात संस्कृतमधून वा बोलीभाषांतून ही वर्णने शब्दबद्ध होऊन लोकांपुढे आली. नंतर त्या त्या राजांची वा सामान्य माणसांची चित्रे, शस्त्रे, अंगरखे, जिरेटोप, कालमापनाची साधने, दैनंदिन वापरातील वस्तू कधी एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे तर कधी अस्तंगत झालेल्या संस्कृतीच्या खुणा उत्खननातून लोकांपुढे आल्या. त्यातून बखरीसारखे वाङ्मय वा हस्तलिखिते यांची भर पडत गेली.
उदाहरणादाखल छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती येते आपल्यापर्यंत ती बखरी, तत्कालीन पत्रे अशा दस्तावेजातून. तसे त्यांचे आयुष्य दगदगीचे, धकाधकीचे होते. पण राज्याभिषेकानिमित्ताने एक ब्रिटिश चित्रकार वकीलासोबत गेला होता. त्याने महाराजांना पाहून, निरीक्षणातून त्यांचे चित्र तयार केले. हे छत्रपती शिवरायांचे पहिले चित्र. त्यामानाने सम्राट अकबरांनंतर ते शहाजहानपर्यंतच्या बादशहांना भरपूर ऐशोआरामात राहाण्याची संधी मिळाली त्यामुळे वेळोवेळी दरबारात त्या त्या काळच्या चित्रकारांनी त्यांची चित्रे काढली कागदावर. तशीच रजपूत राजांचीही चित्रे चितारली गेली. जी आजही कला संग्रहालयातून पहावयास मिळतात. अन् तरीही ज्याला लाइफ साइझ पोट्र्रेट्स म्हणता येतील ती चितारण्याचा पहिला मान केरळ येथील प्रख्यात राजा रविवर्मा यांच्याकडे जातो. त्यांनी त्याकाळी १८९० ते १९१६ पर्यंत भारतातील बऱ्याच राजांना, राजघराण्यातील व्यक्तींना समोर मॉडेल म्हणून बसवून त्यांची चित्रे आपल्या शैलीत कॅन्व्हासवर चितारली. ती आजही औंधच्या म्युझियममध्ये, तिरुअनंतपूरम्च्या श्री चित्रा आर्ट गॅलरीमध्ये तसेच जयपूर, म्हैसूर, जोधपूर येथील संग्रहालयात पहावयास मिळतात. त्याचबरोबर राजा रविवर्माने आणखी एक मोठे काम केले ते म्हणजे विष्णू गणपती, कृष्ण या देवादिकांचे चेहरे व त्यांची वस्त्रसंगती यांना एक मूर्त रूप दिले. त्याची गाजलेली चित्रे म्हणजे विश्वमित्र-मेनका, कृष्ण गोपींची रासलीला इत्यादी.
खरेतर रविवर्माच्या घराण्यात वेगवेगळे वनस्पतीजन्य रंग व त्यांची मिश्रणे तयार करीत होते. फुले, पाने यांचे अर्क काढून त्यातून विविध रंग ते बनवीत. राजघराण्याशी संबंध असल्याने त्यावेळी युरोपात नुकत्याच शोध लागलेल्या कृत्रिम रंगांच्या टय़ुब्स, पॅलेट, ब्रश, कॅन्व्हास, आयझल (कॅनव्हासचे स्टँट) या गोष्टी राजे लोकांकडे उपलब्ध होऊ लागल्या. पेन्सिलचा शोधही याच काळातील. रविवर्मानी मात्र आपली चित्रकला दगडावर कोळशाने रेघा मारून सुरू केली. त्याचबरोबर मोठेपणी त्यांनी हेही जाणले की, ‘कृत्रिम रंग कागदावर, कापडावर वापरल्याने कालांतराने त्याला पोपडे धरतात. रविवर्मा पॅलेटऐवजी छोटी दगडी पात्रे रंग ठेवण्यासाठी वापरत, तर घोडय़ांच्या केसांपासून तयार केलेला ब्रश वापरीत, असे त्यांच्या चरित्रात उल्लेख आहेत. श्री चित्रआर्ट गॅलरीमध्ये त्यांनी स्वत:साठी आयझल् कसा तयार करून घेतला ते पाहाण्यास मिळते. आयझल हव्या त्या दिशेने फिरवता यावा यासाठी तळाशी दातरे असलेले चक्र स्टँडच्या रॉडला जोडले आहे. नाव झाल्यावर ते त्रिवेंद्रम (तिरुअनंतपुरम्) हून मुंबईस आले व तेथील धनिकांसाठी, राज घराण्यांतील लोकांसाठी त्यांनी पोट्रेट्रस करून दिलीच, पण सुंदर स्त्रियांना मॉडेल म्हणून बसवून त्यांची विविध कोनांतून वेगवेगळय़ा वेशभूषेतून रंगचित्रे तयार केली. यांतूनच विविध देवादिकांच्या प्रतिमा साकारून त्यांनी देवादिकांना चेहरे दिले. ही चित्रे पाहिल्यावर त्याकाळी शिष्टसंमत असलेले पोषाखांचे नियम कसोशीने पाळले.
lp24तोवर कॅमेऱ्याचा शोध भारतापर्यंत पोहोचला व १९१३ पासून प्रथम दादासाहेब फाळकेंनी व त्यानंतर साताठ वर्षांत बाबुराव पेंटर व आनंदराव पेंटर या कोल्हापूरच्या बंधूंनी बेल अँड हॉवेल कंपनीचा कॅमेरा खोलून, रिव्हर्स इंजिनीयरिंग पद्धतीने स्वत: मुव्ही कॅमेरा बनवून ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ द्वारे चित्रपटनिर्मिती सुरू केली. पण त्याआधी दोघानींही थिएटरसाठी पडदे रंगवणे सुरू केले होते, अन् दोघानांही चित्रकलेत गती होती, तीही कुठलेही रीतसर चित्रकलेचे, शरीररचना शास्त्राचे शिक्षण न घेता. आनंदराव १९१७ मध्ये वारले. पण बाबुरावांनी चित्रपटनिर्मिती करतानाच लक्ष्मी, सरस्वती, दत्तात्रय, राधाकृष्ण या देवीदेवतांची चित्रे केली. त्यांच्या कुंचल्याचे सामथ्र्य एवढे होते की, ना. ह. आपटे या कादंबरीकाराने ते प्रत्यक्ष अनुभवल्यावर त्यांना कळकळीने सांगितले होते की, ‘चित्रकलेच्या सामर्थ्यांतून राजा रविवर्मा किंवा धुरंधर यांच्यासारखी प्रसिद्धी तुम्ही मिळवाल जर रामायण, भागवतसारख्या ग्रंथांच्या आधारे निवडक पौराणिक चित्रे ऑफसेट लिथोने काढून घरोघरी ती पोहोचतील याची व्यवस्था केलीत तर!’ पण बाबुरावांनी हा सल्ला न मानता पुढे १९३३ पर्यंत ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ तर्फे विविध मूक चित्रपटनिर्मिती केली ज्यात सैरंध्री, वत्सलाहरण, दामाजी, मायाबाजार, सतीसावित्री, भक्त प्रल्हाद, गजगौरी, मुरलीवाला, लंका यांसारखे पौराणिक पट तर नेताजी पालकर, कल्याण खजिना, सरदार बाजीप्रभू देशपांडे, राणा हमीर, शहाला शह यांसारखे ऐतिहासिक चित्रपट निर्माण केले. ‘सावकारी पाश’ हा मात्र सामाजिक चित्रपट होता.
अगदी ‘वत्सलाहरण’ या पहिल्या चित्रपटापासून ते अखेरच्या चित्रपटापर्यंत या चित्रपटातील प्रत्येक पात्रांचीच नव्हे तर जो सेट चित्रीकरणासाठी लावायचा त्याचेही स्केच आधी बाबुराव काढीत व त्यानुसार ‘सेट’ मांडला जाई. कलादिग्दर्शक वेगळा नव्हता, तर दिग्दर्शकच कलादिग्दर्शक असल्याने आधी चित्र मग सेट व मग चित्रीकरण तेही भरपूर तालमीनंतर असा चित्रपट निर्मितीचा प्रवास होता. ‘सैरंध्री’ सिनेमासाठी आखाडय़ात सावळय़ा, पिळदार देहाच्या, भरगच्च शरीरयष्टीच्या बाळासाहेब यादवांना भीम केले. तर तसाच दुसरा तरुण मल्ल दत्तोबा पवारांना ‘कीचक’ केले. सैरंध्री (द्रौपदी)साठी गुलाबबाईंना तर सुदेष्णा राणीचे काम अनसूयाबाईंना दिले. पुरुषपात्रांना दाढीमिशा चिकटवायच्या त्या गम नसल्याने राळ, स्पिरीट याच्या मिश्रणाने चिकटवल्या तर गंगावने, कृत्रिम दाढीची उणीव बकऱ्याचे केस वापरून दूर केली. एखाद्या पात्राच्या अंगावर शेला, उपरणे कसे घातले तर ते जास्त रुबाबदार दिसेल अन् कमरेच्या शेल्याची गाठ कशी मारावी हे lp25सर्व बाबुरावांनी आपल्या कलात्मक दृष्टीने केले ते आजवर तसेच चालत आले आहे. अगदी ‘महाभारत’ ही बी.आर. चोप्रांची सिरिअलही त्याला अपवाद नाही. महाभारतातील सर्व पात्रांची अगदी दास दासीसकट त्यांनी आपल्या कल्पनेतून स्केचेस तयार केली. भीम, दुयरेधन, कीचक, इतर पांडव व सैरंध्री (द्रौपदी) यांची अर्धी स्केचेस व मग पात्रनिवडी त्यानुसार केल्या. त्यासाठीची भरजरी वस्त्रे गायिका तानीबाई कागलकरांनी दिलीच शिवाय मोहरमच्या पिराला अर्पण केलेली जी वस्त्रे किशाबापू बकरे यांच्याकडे येत ती वापरली. ‘सिंहगड’ हा ऐतिहासिक चित्रपट निर्माण करताना ‘तानाजी’ बाळासाहेब यादव झाले तर ‘उदयभानू’- दत्तात्रय पोवार (झुंझार राव), ‘शेलारमामा’ होते व्ही. शांताराम तर स्वत: बाबुरावांनी ‘छत्रपती शिवाजी साकारले. आता ‘शिवाजी महाराज’ कसे होते याचे वर्णन कीर्तनकारांनी, इतिहासकारांनी करून ठेवले होते. गरुडासारखे डोळे, गरुडासारखे नाक, कपाळाला गंध, डौलदार दाढी, गालावर कल्ले, डोक्याला मंदिल, कमरेला भवानी तलवार, छातीवर मोत्यांची माळ या वर्णनात बाबुराव बरेचसे फिट बसत होते. त्याचेही ‘स्केच’ करून मग त्यानुसार ड्रेपरी केली गेली. हे काम त्यांचे मित्र कारागीर अन् कलाकारही श्रीपती काकडेंनी केले. जिरेटोपाचे अनेक नमुने करून शेवटी एक नक्की करण्यात आला. अन् मग छत्रपती साकारले. पुढे १९४६ च्या सुमारास बाबुराव शिल्पकलेत रमल्यावर कोल्हापुरात मंडईत मधोमध असलेला गव्हर्नर विल्सनचा पुतळा क्रांतिकारकांनी विद्रूप केल्यावर तिथे दुसऱ्या ब्रिटिशाचा पुतळा उभारण्याची कुणकुण शिवभक्त भालजी पेंढारकरांना लागली. त्यांनी संबंधित मंत्र्यांची, बागवेंची भेट घेऊन तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे ठरवले. बाबुरावांनी मॉडेल तयार करण्यात वेळ घालवू नये म्हणून भालजींनी चंद्रकांत मांडरेंना महाराजांची ड्रेपरी घालून बाबुरावांपुढे उभे केले. त्यानंतर महिन्याभरात छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या मधोमध बसवण्यातही आला. तसाच बस्ट साइजचा पुतळा वरुणतीर्थ वेस येथे बसवला तोही बाबुरावांनी तयार केलेला होता. इतिहासकारांनी अधिकृत मानलेले व शासनदरबारी असलेले जी. कांबळे या कोल्हापूरच्याच कलाकाराने केलेले शिवरायांचे चित्र अन् बाबुरावांनी कल्पनेतून साकारलेले शिल्प यात खूपच साधम्र्य आहे.
पुढे ‘नेताजी पालकर’ काढताना बाबुरावांनी नेताजीची भूमिका सरदार बाळासाहेब यादवांनाच दिली. ‘सरदार बाजीप्रभू देशपांडे’तील बाजीप्रभू पुन्हा बाळासाहेब यादवांनीच साकारला होता. बाबुरावांनी बाजीप्रभूचे स्केच करताना ब्राह्मणी गोटा (शेंडीसह), कायस्थी पगडी, पायघोळ अंगरखा व तुमान, चेहऱ्याला शोभेशा भरघोस मिशा आणि भुवया व लढवय्या म्हणून दोन्ही हातात शस्त्रे, तलवार व पट्टा अशी ड्रेपरी बाळासाहेबांना दिली. यावरूनच पुढे पन्हाळगडावर बाबुरावांचे चिरंजीव रवींद्र मेस्त्रींनी बाजीप्रभूंचा या वेषातील पुतळा तयार केला. तर वीर शिवा काशीद यांचे महाराजांशी असलेले साम्य (चेहेऱ्यातील) लक्षात घेऊन तोही पुतळा रवींद्र मेस्त्रींनीच साकारला. छत्रपती ताराराणी कशा होत्या याच्या वर्णनातून रवींद्र मेस्त्रींनी स्केच तयार केले. घोडय़ावर बसलेल्या ताराराणींचे शिल्प तयार करण्यासाठी उद्ममनगरातील धर्माबाई शिंदेंना त्यांनी ताराराणीचे ‘मॉडेल’ म्हणून निवडले. कोल्हापूरच्या ताराराणी चौकातील छत्रपती ताराराणींचा पुतळा तयार केला. इतिहासवर्णनातून अन् या दोन चित्रकार पिता-पुत्रांच्या कल्पनेच्या कुंचल्यातून या ऐतिहासिक व्यक्तिरेखांना मूर्तरूप आले.
इथे जाता जाता महाराष्ट्रातील संगीत नाटक किंवा गद्य नाटक या प्रकाराचा उल्लेख करावयास हवा. कारण १८४३ मध्ये विष्णुदास भावेंनी प्रथम ‘शाकुंतल’ नाटक रंगभूमीवर आणले अन् त्यानंतर अण्णासाहेब किलरेस्कर, कृ. प्र. खाडिलकर, गो. ब. देवल यांनी एक नाटय़परंपरा सुरू केली. त्यांच्या नायिका शकुंतला, रुक्मिणी, द्रौपदी तसेच काही ऐतिहासिक नाटकांतून आग्य्राहून सुटका, बेबंदशाही, करीन ती पूर्व, शहाशिवाजी यातील ऐतिहासिक पात्रे ही त्या त्या नाटककारांच्या कल्पनेतून साकारली. अन् त्यांना त्या त्या कालानुरूप विशिष्ठ पोषाख देण्यात त्या नाटककारांचा मोठा हात होता अन् त्यांच्या कल्पनाशक्तीने त्या नायिका त्यांनी लोकांसमोर आणल्या. त्या साकारल्या. त्या साकारणारा बालगंधर्वासारखा देखणा पुरुष त्या नाटककारांना लाभला, जे त्याकाळचे ‘फॅशन आयकॉन’ होते.
‘बाबुराव पेंटर स्कूल’ मधूनच पुढे ‘प्रभात’ कंपनी काढणारे दामले, फत्तेलाल व व्ही. शांताराम.. तिघात फत्तेलाल ऊर्फ साहेबमामा हे चित्रकलेत माहीर होते. ते खऱ्या अर्थाने बाबुरावांची परंपरा पुढे नेणारे ठरले. ‘प्रभात’चे चित्रपट काढताना ते बाबुरावांप्रमाणेच त्या त्या शॉटची स्केचिस काढायचे. त्याप्रमाणे सेट लावायचे व मग चित्रीकरण करायचे. पहिल्या काही चित्रपटांनंतर त्यांनी प्रथम ‘संत तुकाराम’ काढला. त्यासाठी साहेबमामांनी (फत्तेलाल) विष्णुपंत पागनीसांची निवड केली. त्या त्या काळात राजेलोकांची चित्रे काढली गेली हे समजू शकते, पण अभंग रचणाऱ्या कवीचे चित्र कोण, कशासाठी काढील? पण फत्तेलालनी देहू येथील खेडुताचा पोशाख, अंगरखा, धोतर व डोक्याला त्या भागात बांधत तसे मुंडासे हे कल्पनेतून चित्रात उतरवून त्याप्रमाणे पागनीसांना सजवले. चित्रपटाने अफाट यश मिळवले. पागनीसांचे तुकारामाच्या वेशातील फोटो प्रसिद्ध झाले. लोक त्यांना रस्त्यात तुकाराम म्हणून वाकून नमस्कार करत. तीच गोष्ट ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटाच्या बाबतीत. एक तर या चारी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून समाजाने वाळीत टाकल्याने त्यांची मुंज झाली नाही. केस वाढलेलेच राहिले. ज्ञानेश्वरांनी अवघ्या सोळाव्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ तर लिहिलीच, पण एकविसाव्या वर्षी त्यांनी आळंदीस समाधी घेतली. त्यांना पडद्यावर आणण्याआधी कागदावर चितारण्याचे काम साहेबमामांच्या कल्पक कुंचल्याने केले. जन्माने ख्रिश्चन असलेल्या शाहू मोडकांना ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी निवडून, तसे केस वाढवून, धोतर नेसवून त्यांना तब्येत घटवण्यास सांगून चेहेऱ्यावर तसे तेज दिसावे म्हणून उपवास करण्यास सांगितले. त्यांच्या या भूमिके तील फोटोंवरून ज्ञानेश्वरांचे फोटो निघाले. जसे तुकाराम म्हणजे पागनीस तसे ज्ञानेश्वर म्हणजे शाहू मोडक इतके स्थान दोघांनी लोकांच्या हृदयात निर्माण केले.
एकीकडे चित्रपटांमधून चित्रकलेचा हा प्रवास सुरू असताना त्याच काळात एस. एम. पंडीत केतकर, त्रिंदाद, परब, रघुवीर मुळगांवकर व दीनानाथ दलाल तसेच एम्. आर. आचरेकरसारख्या चित्रकारांनी आपली चित्रकला बहरत ठेवली. आचरेकर आर. के. फिल्म्सचे कलादिग्दर्शक झाले तर धुरंधर, केतकर व मुळगावकरांनी राजा रविवर्मा यांचे देवादिकांची चित्रे चितारणे सुरू ठेवले. यात मुळगांवकर आघाडीवर होते. किंबहुना राजा रविवर्मानंतर देवादिकाला विशिष्ठ वेशभूषेसह चितारले ते मुळगावकरांनी असे म्हटले तर वावगे ठरू नये. आता देवादिकांची वर्णने कुठून आली- तर कीर्तनकार, तसेच सभासद, रामदास यांच्या आरत्यांमधून दिसणारी ‘देवी’ म्हणजे ‘दुर्गे दुर्घट भारी’ या वर्णनातून लक्ष्मी, सरस्वती साकारल्या. तर ‘सर्वागीसुंदर ओटी सेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ताफळाची। रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुमकेशरा, हीरेजडित मुकूट शोभतो बरा, रुणझुणती नूपुरे चरणे घागरिया। ‘लंबोदर पीतांबर फणीवरवंदना, सरळ शुंड वक्रतुंड त्रिवयेना’ या रामदासांनी रचलेल्या आरतीतून गणपती हे दैवत साकारले ते प्रथम चित्ररूपाने अन् नंतर शिल्पांद्वारे वा मातीच्या शाडूंच्या, प्लॅस्टरच्या मूर्तीतून. ज्यात म्हात्रे, तालीम, डोंगरसाने, र. कृ. फडके, बाबुराव पेंटर, रवींद्र पेंटर, खेडकर ही मंडळी आघाडीवर होती. अन् तरीही सर्वाधिक काम केले मुळगावकरांनी. त्यांची शिवपार्वती, राम-सीता, शिवतांडव, राधा-कृष्ण या चित्रांनी दिवाळी अंकांची मुखपृष्ठे सजली. देवादिकांना चेहरे देणारे चित्रकार म्हणून ते प्रसिद्ध पावले.
आज जे देवदेवतांचे चेहरे फोटोतून, शिल्पातून, चित्रांतून पहातो त्यामागे कवीची कल्पना अन् त्याला आपल्या कल्पनेच्या कुंचल्याने मूर्तरूप देणारी ही चित्रकार, शिल्पकार मंडळीच आहेत. म्हणूनच त्या ‘विश्वकर्मा’ना स्मरणे, त्यांना दाद देणे हे आपले कर्तव्य ठरते.
संदर्भ-
१) विश्वकर्मा- सूर्यकांत मांडरे
२) श्रद्धांजली- बाबुराव पेंटर
३) चित्रदिवाळी- विनायक परब
प्रा. प्रभाकर तांबट – response.lokprabha@expressindia.com