एॅक्मिया, बिल्बर्जिया, गुझमनिया, टिल्लँडसिया आणि रायेशिया इत्यादी वनस्पती अननस कुळातील आहेत. परंतु, वरील वनस्पती अननसाप्रमाणे जमिनीवरील मातीत न वाढता, त्या इतर वृक्षांच्या खोडावर किंवा उंचच उंच फांद्यांवर वाढत असतात. या वनस्पतींचे मूळ स्थान दक्षिण अमेरिका आहे. उपरोक्त वनस्पती जरी दुसऱ्या वृक्षांवर वास्तव्य करीत असल्या तरी त्या बांडगुळे नाहीत. त्या वृक्षांबरोबर सहयोगाने राहत असतात; त्या बांडगुळांप्रमाणे आपल्यास आसरा देणाऱ्या वृक्षांचे शोषण करत नाहीत. त्या स्वत:चे अन्न स्वत:च तयार करत असतात. या वनस्पतींना एकतर सुंदर फुलोरे धरतात किंवा त्यांना शोभिवंत पाने असतात. वृक्षांच्या खोडांवरा त्यांची तंतूमय मुळे उघडीच असतात; त्यांवर कसलेही आवरण नसते. या मुळांचे कार्य पाणी पिणे नसून आधाराला जखडून राहणे हे असते. पाणी पिण्याची क्षमता या मुळांत असली तरीही पानांच्या छत्राकार व भरघोस वाढीमुळे ही मुळे पाण्यापासून जवळजवळ वंचितच राहतात.
आपल्यास नवल वाटेल की, ह्य वनस्पतींच्या मुळांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असते, तर यांना जगण्यासाठी पाणी कुठून मिळते? त्याचे उत्तर असे आहे की, छत्राकार पानांच्या घेरामधोमध पेल्यासारखे कोंदण असते. या कोंदणात पडणारे दवाचे आणि पावसाचे पाणी साठवले जाते. प्रत्येक पानाच्या बुंध्याला जवळील भागात मांसल पेशी असतात. असल्या पेशीच पाणी शोषून त्या या वनस्पतींना जगवतात. आपल्यास या वनस्पती आपल्या बागेत वाढवायच्या असतील तर हे वास्तव लक्षात ठेवूनच त्यांच्या कोंदणात नेहमी पाणी साठलेले राहील हे पाहिले पाहिजे. मात्र त्या साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. म्हणूनच कोंदणातील पाण्यात थेंबभर कीटकनाशक आठवडय़ातून एकदा टाकावे. या कोंदणास इंग्रजीमध्ये vase असे म्हणतात.
या वनस्पतींना त्यांच्या आयुष्यात एकदाच फुले येतात. असे असले तरी फुले गेल्यानंतर मूळ झाड मरत असले तरी त्याची अनेक नवी रोपे मूळ झाडासभोवती उगवतात. त्यामुळे एकदा एक झाड आणले की नंतर  आपल्यास त्याची अनेक रोपेही तयार करता येतात. ही झाडे कुंडीत लावायची असल्यास मातीत न लावता ती फक्त वीट व कोळशाचे तुकडे आणि नारळाच्या सोढणाचे तुकडे असल्याच माध्यमात लावावी लागतात. झाडांच्या खोडावर, लाकडाच्या ओंडक्यावर किंवा सच्छिद्र दगडावरही ही लावू शकतो; मात्र असे करताना त्यांच्या मुळांना आधारावर दोरीने बांधावे लागते. त्या वेळेस त्याच्या मुळांनाही पाणी द्यावे लागते. एकदा नवी मुळे आधारावर जाम पकडली की नंतर मुळांजवळ पाणी देण्याची गरज नसते. कोंदणातील पाणी जास्त झाल्यास तेही ओघळून मुळांना मिळतच असते.