सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे कामातील उत्साह वाढेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अडचणींवर मात कराल. नोकरी-व्यवसायात कामाला गती मिळेल. वरिष्ठांच्या सल्ला लाभदायक होईल. सहकारी वर्गाने सुचवलेल्या कल्पनांवर विचारविनिमय कराल. जोडीदारासह विविध विषयांवर मनमोकळ्या चर्चा कराल. त्याच्या बौद्धिक पातळीची प्रशंसा करण्याजोगी असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आरोग्य चांगले राहील. नियमित व्यायाम आवश्यक!

वृषभ चंद्र आणि शुक्र या  स्त्री ग्रहांच्या समसप्तम योगामुळे कामाच्या व्यापातून वेळ काढून आनंद निर्माण कराल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाच्या समस्या, अडचणी वरिष्ठांपुढे मांडाल. जोडीदाराचा मूड सांभाळून महत्त्वाच्या विषयांवर बोला. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवणे आपल्या हातात आहे . रक्ताभिसरण संस्थेचे कार्य बिघडू देऊ नका. श्वासाचे व्यायाम करा.

मिथुन चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे कामातील उत्साह वाढेल. आपल्या छंदातून गरजवंतांना साहाय्य होईल असे उपक्रम राबवाल. नोकरी-व्यवसायात स्थैर्य येईल. सहकारी वर्गासह तार्किक वाद टाळा. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. त्याच्या कार्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक वातावरण प्रेमयुक्त शिस्तीचे राहील. नातेवाईकांमध्ये गैरसमज पसरतील. उष्णतेचे विकार, उत्सर्जनसंस्थेचे त्रास वाढण्याची शक्यता. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कर्क रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे प्रयत्नांना यश मिळेल. मोठय़ांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठबळामुळे नव्या कार्यक्षेत्रात पदार्पण कराल. सहकारी वर्गाला योग्य सल्ला द्याल. त्यांना मोलाची मदत कराल. जोडीदाराची रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागेल. आपला मानसिक आधार त्याला गरजेचा ठरेल. कुटुंब सदस्यांसह बौद्धिक चर्चा रंगतील. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे.

सिंह  चंद्र-शुक्राच्या प्रतियोगामुळे कामातील आखीवरेखीवपणा वाखाणण्यासारखा असेल. लेखन, वाचन, सादरीकरण यात आघाडी माराल. वरिष्ठांच्या मदतीने गरजवंतांच्या उपयोगी पडाल. सहकारी वर्ग अपेक्षित काम वेळेत पूर्ण करून देईल. जोडीदार त्याच्या शारीरिक तक्रारींनी बेजार होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ व ऊर्जा खर्च करावी लागेल. कुटुंबातील एकमेकांच्या समस्या मोकळेपणाने मांडा. मणक्याचे आजार बळावतील.

कन्या चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे भावना व व्यवहार यांचा समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात व्यावसायिक नातेसंबंध जपाल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाकडून कामे करवून घ्यावी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. परिस्थितीशी जुळवून घ्याल.  खर्चावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराच्या कामांना गती मिळेल. त्याच्या मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे राहील. नातेवाईकांकडून आनंदवार्ता समजतील. आरोग्य चांगले राहील.

तूळ शनी-चंद्राच्या युतीयोगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला शनीच्या मेहनतीची आणि चिकाटीची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात आपला मुद्दा योग्य पद्धतीने मांडाल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांमधील दुवा बनाल. खटकणाऱ्या लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदारासह जुळवून घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी करणे आवश्यक! कुटुंब सदस्यांसह मोकळेपणाने चर्चा करावी. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक शनी व मंगळ या पापग्रहांच्या केंद्रयोगामुळे मार्गातील अडचणी, अडथळे पार करत पुढे जावे लागेल. यात आपली अतिरिक्त शक्ती खर्ची पडेल. मानसिक दमणूक होईल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाची पाहिजे तशी साथ मात्र मिळणार नाही. काम आणि वेळेचे योग्य नियोजन करावे. जोडीदाराचा उत्कर्ष होईल. त्याच्या कामाचा व्याप वाढेल. कुटुंब सदस्यांना यशाच्या नव्या वाटा खुल्या होतील. उष्णतेचे विकार दुर्लक्षित करू नका. आहारात बदल करा.

धनू गुरू-चंद्राच्या युतीयोगामुळे महत्त्वाचे निर्णय योग्य वेळी घ्याल. ओळखींमुळे वैयक्तिक कामांना गती मिळेल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचा उपयोग चांगल्या प्रकारे कराल. समयसूचकतेमुळे मोठे नुकसान टळेल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या समस्यांबाबत एकमेकांशी केलेल्या चर्चामुळे मनावरील भार कमी होईल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. घशाची काळजी घ्यावी. डोळे दुखणे, चुरचुरणे असे त्रास संभवतात.

मकर बुध-मंगळाच्या प्रतियोगामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. तत्त्वाला धरून वागाल. नोकरी-व्यवसायात अडचणींवर मात करून स्वत:ला सिद्ध कराल. इतरांची उणीधुणी मात्र काढू नका. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. एकमेकांच्या विचारांती नातेवाईकांच्या बाबतीत योग्य असे निर्णय घ्याल. कौटुंबिक वातावरण तणावग्रस्त राहील. श्वसनाच्या तक्रारींकडे विशेष लक्ष द्या. कंबर व मांडीची शीर दबली जाईल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे सर्जनशीलतेत उत्स्फूर्तता येईल. व्यवहारापेक्षा भावनांना अधिक प्राधान्य द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या कडक नियमांचे कसोशीने पालन करावे लागेल. सहकारी वर्गाकडून चांगली साथ मिळेल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात बढती मिळेल. तो त्याच्या अधिकाराचा समजून उमजून उपयोग करेल. कुटुंब सदस्यांच्या धडाडीच्या कृत्याचा सर्वाना अभिमान वाटेल. मनोबल वाढवाल व अडचणींवर मात कराल.

मीन शुक्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे कला आणि साहस यांचा अनोखा मिलाप दिसून येईल. मित्रमंडळींची मदत मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आपले म्हणणे त्यांना प्रभावीपणे समजावून सांगाल. सहकारी वर्गाच्या संशोधन कार्याला यश येईल. जोडीदाराच्या कामातील अडचणींवर चर्चा करून मार्ग सुचवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. उष्णतेमुळे मूत्रविकार सतावतील.