– सुनिता कुलकर्णी

उत्तराखंडमध्ये भारत चीन सीमेवरच्या माना गावात गावाबाहेरच्या लोकांना येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. नाही, नाही ही मनाई भारत चीन संबंधांमधल्या ताणतणावामुळे नाहीये तर माना गावाजवळ असलेल्या बद्रीनाथमुळे आहे. माना हे भारत चीन सीमेवरचं शेवटचं सुंदर गाव आहे. तिथून ४५ किलोमीटरवर चीनची सीमा आहे. तर बद्रीनाथ अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. ब्रदीनाथला येणारे भक्त, पर्यटक माना गावाला हमखास भेट देतात. कारण माना गावाला असलेला पौराणिक संदर्भ.

‘माना’मध्ये दोन गुंफा आहेत, व्यासगुंफा आणि गणेशगुंफा. या गुंफेत बसून व्यासांनी महाभारत लिहिलं असं मानलं जातं. त्याशिवाय माना गावात सरस्वती नदीचा उगम होतो. पांडव स्वर्गात निघाले होते तेव्हाची आख्यायिका सांगितली जाते की या खळाखत वाहणाऱ्या, शुभ्र फेसाळत्या नदीचा प्रवाह पाहून द्रौपती घाबरली. तिला तो प्रवाह ओलांडता येणार नाही हे लक्षात आल्यावर भीमाने दोन प्रचंड शिळा त्या प्रवाहात आणून टाकल्या. त्यावरून ओलांडून द्रौपती पलीकडे गेली असं सांगितलं जातं. या शिळांना भीमपूल म्हणतात. या तीन गोष्टी पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून माना गावाला भेट देतात.

‘माना’मध्ये आल्यावर समोर दिसणारं एक चहाचं दुकान असं आहे की त्या दुकानदाराच्या कल्पकतेमुळे तुम्ही तिथे चहा पिणं टाळूच शकत नाही. कारण त्या दुकानावर पाटी आहे, ‘हिंदुस्तान की आखरी चाय की दुकान’. मानाच्या पुढे गावच नाही, आहे ती थेट चीनची सीमाच. त्यामुळे मानाच्या पुढे फारसे पर्यटक जात नाहीत. तेव्हा माना गावातलं चहाचं दुकान हे झालं त्या भागातलं भारतामधलं चहाचं शेवटचं दुकान. दुकानदाराच्या या मार्केटिंगला दाद देत लोक तिथे आवर्जून चहा पितात.

आता बद्रीनाथच्या यात्रेला परवानगी मिळाली असल्यामुळे यात्रेकरूंची ये जा सुरू झाली आहे. हे यात्रेकरू माना गावातही यायला लागले आहेत. त्यामुळे करोना संसर्गाच्या भीतीने गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाबाहेरच्या लोकांना यायला बंदी घातली आहे. एकूण करोनामुळे ‘हिंदुस्तान ही चाय की आखरी चाय की दुकान’वालादेखील बेकार झाला आहे.