07 April 2020

News Flash

बालकविता : स्वप्नात आली मेरी कोम

स्वप्नामध्ये माझ्या एकदा आली मेरी कोम थकलेल्या मुठीत माझ्या आला नवा जोम ।।१।।

| November 14, 2014 01:25 am

lp35स्वप्नामध्ये माझ्या एकदा
आली मेरी कोम
थकलेल्या मुठीत माझ्या
आला नवा जोम ।।१।।

मीही चढवले बिनधास्त
हातात बॉक्सिंग ग्लोव्हज
रस्ता, घर, इथे तिथे
लढावेच लागते रोज ।।२।।

‘ही म्हणे मेरी कोम
नखाएवढी ठमी !’
दादाला मी फटकारले,
‘मला समजू नको कमी.!’ ।।३।।
दादा, बाबा, काका, मामा
यांचेच घरात चालते राज
भांडी घास नि फरशी धू
कसलाच नाही आम्हाला आवाज।।४।।

घरीदारी एकच मंत्र
गुपचूप बसा आणि निमूट सोसा
छळणाऱ्याला आता देईन
मेरी कोमचा जोरकस ठोसा ।।५।।

शेजारीपाजारी म्हणतात मला
चांगली पोर बिघडली
मेरीला मी म्हणाली हसत
बरे झाले, तुझी गाठ पडली! ।।६।।

माझ्याकडे पाहून आता
आईलाही आला हुरूप
घर झाले शहाणे आता
पाहून आमचे नवे प्रताप! ।।७।।

रडायला नको, लढायला हवं
लढलं तर नवा इतिहास घडेल
चमचमतं गोल्ड मेडल
तुमच्या गळ्यात पडेल.! ।।८।।

lp34थंडी

थंडीला मी का आवडते?
मला सारखी बिलगून बसते..
घरात बाहेर जिकडे तिकडे
माझ्या मागे मागे येते !

कोठुनी येते, मला कवळते
गालावरती पापा देते,
थंडगार बर्फाचे हात ते
मी बर्फाचा गोळा होते..!

पोटामध्ये जणू शेकोटी
तोंडामधुनी निघतो धूर
थंडी बघते गम्मत माझी
उभी राहुनी थोडी दूर..!
कोवळे कोवळे पिवळे पिवळे
अंगणात मग येते ऊन
मी घेता ऊन पांघरून
थंडी जाते दूर पळून .!

ऊन म्हणते थंडीला
‘‘मला कशी गं घाबरतेस?
मी अंगणात येता क्षणी
कोपऱ्यात कशी दडून बसतेस?’’

थंडी काहीच बोलत नाही
मनीसारखी राहते लपून
ऊन कधी जाईल म्हणून
नजर ठेवून बसते टपून.!

घातला स्वेटर, कानटोपी
तरी थंडी काही हटत नाही
शेकोटीसमोर बसले तरी
तिची मिठी सुटत नाही.!

मारल्या उडय़ा, घातल्या फेऱ्या
कुठून कशी पण आली उब
मीच म्हणाले, मला खुशीत,
‘‘थंडी पळाली, बहोत खूब!’’

रात्री पुन्हा घरात शिरते
पांघरूणातून आतही येते
मी आईच्या कुशीत शिरता
लबाड कुठली, गायब होते !

आईच्या कुशीत, कधी कसे
ऊन कोवळे, येऊनी दडले..
थंडी बोचरी घट्ट बिलगता
मला आज ते सापडले.!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2014 1:25 am

Web Title: bal kavita
Next Stories
1 बाल दिन विशेष : चिनू आणि सोनू
2 बाल दिन विशेष : सत्यजित रेंचा ‘फेलुदा’
3 क्रीडा : ‘प्लेइंग इट माय वे’च्या निमित्तानं..
Just Now!
X