कधी-कधी माझ्याच आईची
व्हावं वाटतं मी आई
सासरच्या माझ्या दारात
वाट पहात मी उभी
गरम, गरम भाकरीला
तूप खोपून भरवावं वाटतं
भाकरी माझी तव्यावर पडता
डोळा पाणी तिच्या होतं
सांभाळ गं बये
‘चटका बसेल हाताला’
म्हणून ओठात मार्दव होतं
आपण आजी झालो तरी
कोड-कौतुक आपलं संपत नाही
तिच्या मात्र माहेरपणाची
साधी चौकशीही कुणी करत नाही
दर वेळी आपण गेलो की
हक्काने साडीचोळी भरून होतो
तिचा ही तो हक्क आहे
हे मात्र विसरून जातो
माहेरी आलोय या तोऱ्यात
उन्हं अंगावर घेत पडतो
तिलाही कधी लोळावं वाटतं
हेच ध्यानात कुणी न घेतं
तिलाही माहेरपण
कधी तरी आपण द्यावं
गोड-धोड करून
तिलाही आपण खाऊ घालावं

भारतीय संस्कृतीत स्त्रीच्या माहेरपणाला खूप महत्त्व आहे. एक तर माहेरी ती आपले बालपण सोडून देते. तसेच ज्या परिसरात, ज्या गोतावळ्यात ती लहानाची मोठी होते ते सारे पाश सोडून जाते. जन्मदात्या आईवडिलांना कायमची जरी पारखी होत नसली तरी लग्नाआधी जो हक्क घरादारावर असतो तो नाही म्हटला तरी कमीच होतो. पहिल्यांदा घरातली काडीही इकडची तिकडे हलवताना तिला कुणाचा सल्ला घ्यायची गरज वाटत नव्हती, परंतु लग्नानंतर तिला विचार करावा लागतो. भाऊ काय म्हणतील? वहिनीला काय वाटेल? इकडचा हक्क सोडला तरी सासरच्या घरात मात्र आता ती पूर्ण हक्काने वावरू लागते. माहेर सारखेच आता तिला प्रत्येक गोष्टीसाठी कुणाला विचारावे लागतेच असे नाही. याला काही अपवाद असणारच.

मुलगी सासरी गेली की आईवडिलांसाठी मात्र एक कोपरा कायमचा हळवा होऊन जातो. मुलींसाठी माहेरपण ही खूप नाजूक गोष्ट असते. माहेर कसेही असू देत, बाप दारुडा असू दे किंवा भाऊ, वहिनी बहिणीला काडीची किंमत देत नसतील तीसुद्धा या साऱ्याबाबतीत मनातून नाराज असेल, परंतु सासरच्याकडील कुणी तरी माहेराबद्दल अपशब्द उच्चारला किंवा नवऱ्याने माहेरावरून थट्टेत जरी हिला काही बोलले तरी हिच्या रागाचा पारा चढलाच म्हणून समजा. स्त्री नुकतीच लग्न होऊन सासरी गेलेली असो किंवा प्रौढ स्वत: आजी झालेली असो ती मात्र माहेरचा विषय निघाला की हळवीच होते.

आज माझी आई वय वर्षे ७८ आहे. आज तिचे आईवडील, भाऊ हयात नाहीत. म्हणजे तिचे माहेरपण पूर्णपणे संपलेले आहे. परंतु तिच्या मनातील ही माहेरची उणीव, हा कोपरा मात्र अतिशय संवेदनशील आहे. याची जाणीव मी स्त्री म्हणून मला आहेच, कारण तिच्या भावना या माझ्याच भावना आहेत. आज मी जरी पन्नाशीत आले असले तरी माझ्या आईवडिलांच्या रूपाने माझे माहेर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आज आर्थिक किंवा कुठल्याही बाबतीत मला कुणाकडून काहीही अपेक्षा नसल्या तरी भावनिक आधार जो आईवडिलांकडूनच मिळू शकतो. ती कमतरता मात्र मला जाणवत नाही. आणि ते जे समाधान आहे ते कशानेच पूर्ण होऊ शकत नाही. माहेराकडून पूर्ण होणाऱ्या या मानसिक गरजेचा विचार करीत असताना, अक्षरश: तव्यावर भाकरी टाकत असताना माझ्या मनात विचार आला-

अरे, आपण फक्त ‘मी’पणातच संपूर्ण गुरफटलेलो आहोत. आपल्याला जसं अजूनही वाटत आहे, माहेरी आलोय् जरा आराम करू. लवकर उठायची झंझट नको. आपण सर्व पदार्थ तयार करू शकत असलो, करून खाऊ शकत असलो तरी माहेरी गेल्यावर आपल्या आईने आपल्याला आवडीनिवडी लक्षात ठेवून आपल्याच खास आवडीचं काही तरी करून खाऊ घालावं अशी अपेक्षा ठेवतोच. हजारो रुपयांच्या साडय़ा जरी आपण घेत असलो तरी माहेरहून निघताना साध्याशा का होईना पण साडीची ओढ मनात असतेच. त्या साडीची ऊब आपल्या कपाटभर साडय़ांना कधीच येत नाही. या साऱ्या गोष्टी जेव्हा मनात आल्या तेव्हा कधीही मनातल्या ह्य़ा गोष्टी ना बोललेल्या आईच्या भावनांशी मी नकळत जोडले गेले आणि वरील कविता प्रसूत झाली.
मधुलिका महाजन – response.lokprabha@expressindia.com