कॅन्सर म्हटला की आपल्या उरात धडकीच भरते. मात्र ज्या व्यक्तीच्या बाबतीत कॅन्सरचे निदान होते, तेव्हा त्या व्यक्तीची अवस्था काय होत असेल? त्याची कल्पना न केलेली बरी.
कॅन्सर म्हणजे मृत्यूच्या दारात नेऊन सोडणारा आजार, असं समीकरण तर सर्वाच्याच मनात असतं. शिवाय कॅन्सर आहे ना, मग आता माझं काही खरं नाही, हा विचार मन व्यापूनच राहतो.
परंतु नेहमी असे नसते. प्रत्येक कॅन्सरचा एक विशिष्ट स्वभाव असतो. शांत स्वभावाच्या माणसापासून चिडक्या, क्रोधिष्ट स्वभावाच्या माणसापर्यंत जशा आपण स्वभावांच्या विविधता पाहतो, तसे हे कॅन्सरही काही अतिजलद वाढणारे असतात तर काही संथगतीने सावकाश वाढत जाणारे असतात. इतके सावकाश की, त्यानंतर २५-३० वर्षांपर्यंत लोकांना काही त्रास होत नाही.
एक बँक ऑफिसर माझ्याकडे १९८६ साली प्रथम एका स्तनात कॅन्सरची गाठ घेऊन आली. शस्त्रक्रियेने ती गाठ काढून टाकली. पुन्हा पुढे २००३ साली ती दुसऱ्या स्तनात पुन्हा कॅन्सरची गाठ उद्भवली म्हणून आली, तेव्हा पुन्हा शस्त्रक्रिया करायला लागली. ती पूर्णपणे बरी झाली. आजपर्यंत २९ वर्षे ब्रेस्ट कॅन्सर होऊन ती पूर्णपणे नॉर्मल आहे, व्यवस्थित आयुष्य जगत आहे. याउलट तिचे यजमान माझ्याकडे जठराचा कॅन्सर झाला म्हणून आले. त्यांच्यावरदेखील शस्त्रक्रिया व इतर औषधोपचार केले गेले. परंतु त्या कशालाही न जुमानता फक्त ४ महिन्यांतच तो आजार त्यांना घेऊन गेला. हे कॅन्सर वेगवेगळ्या अवयवातील म्हणून असा फरक असतो.
परंतु एकाच अवयवाच्या कॅन्सरचा प्रवास हा वेगवेगळा असू शकतो. गुदद्वाराजवळील कॅन्सरच्या बाबतीतील काही बोलकी उदाहरणे पाहिली तर लक्षात येईल की, प्रत्येक कॅन्सरचा स्वभाव कसा वेगवेगळा असतो. १९८९ मध्ये एक महीला वय वर्षे साधारण ५०-५५, गुदद्वाराजवळील कॅन्सरसाठी माझ्याकडे आल्या होत्या. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून तिची शौचाची जागा बंद करून टाकली व पोटाला छिद्र पाडून संडासची जागा करून दिली. वाटलं होतं, जास्तीत जास्त ५ वर्षे जगेल. ती पुढे २० वर्षे जगली. याउलट असाच कॅन्सर घेऊन आलेले चाळिशीत ते पन्नाशीतले इतर दोन रुग्ण शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्याभरातच या जगातून निघून गेले.
माझ्या एका रुग्णाला मूत्राशयाचा कॅन्सर होता. अधूनमधून लघवी म्हणजे चक्क रक्ताची जणू धारच, असं आयुष्य जगत होता. तो हा कॅन्सर घेऊन ३० वर्षे जगला व वयाच्या ७८ व्या वर्षी निवर्तला. वरील उदाहरणांनी हे स्पष्ट होते की काही कॅन्सर हे अतिजलद वेगाने वाढतात. उदा. अन्ननलिका, जठराचा कॅन्सर, तोंडातील कॅन्सर हे जलद वाढतात व आजुबाजूला पसरतातही लवकर. तर काही कॅन्सर फार हळूहळू वाढतात. उदा. मोठय़ा आतडय़ाचे काही कॅन्सर + थायोरॉईड ग्रंथींचा कॅन्सर, हे कॅन्सरचे निदान झाल्यानंतरही १५-१६ वर्षे या व्यक्ती व्यवस्थित आयुष्य जगू शकतात.  Lymphoma, Neuro Endocrine Tumour  यासारखे कॅन्सरही तसे मंदगतीने पसरतात, आणि त्यावर नवीन औषधोपचारदेखील उपलब्ध आहे.
म्हणूनच म्हटलं कॅन्सरला घाबरून जाऊ नये, कदाचित तो अति मंदगतीने असेल तर काही होणार नाही. कॅन्सरची वाढ, त्याच्या आजूबाजूच्या अवयवांत पसरत जाणं हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं.-
* कॅन्सरचा हा कुठला प्रकार आहे हे तपासण्यांद्वारे शोधून हे नक्की ठरविता येते की हा जलद गतीने वाढणारा आहे की मंदगतीने वाढणारा आहे.
* कॅन्सर हा कोणत्या स्टेजवर आहे यावरही त्याचं वाढणं अवलंबून असतं.
* तुमची प्रतिकारशक्ती, जगण्याची उमेद, यावरही हे अवलंबून असते. प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर कॅन्सरची वाढ मंद राहते.
* कॅन्सर म्हणजे पेशींची भरमसाट वाढ. ही वाढ सुरुवातीला कमी वाटत असते. पण शेवटी ती एकदम जलद होते. उदाहरण द्यायचं तर एका तळ्याचं देता येईल.
एका तळ्यात पहिल्या दिवशी १ थेंब, दुसऱ्या दिवशी पुन्हा २ थेंब, तिसऱ्या दिवशी ४ थेंब याप्रमाणे समजा २९ व्या दिवशी ते तळं अर्ध भरलं गेलं तर ३० व्या दिवशी म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी ते पूर्ण भरलं जाईल. कॅन्सरच्या पेशींची वाढ अशीच असते.
* प्रत्येक कॅन्सरचं स्वरूप वेगळं वेगळं असतं. काही आपल्या अवयवांतच बरेच दिवस राहणं पसंत करतात तर काही अल्पावधीतच लीव्हर, फुप्फुस, हाडं यासारख्या अवयवात पसरत जातात.
रुग्णाचा त्रास, औषधोपचार व जगण्याची मर्यादा हे सर्व वरील गोष्टींवर अवलंबून राहतं.
ढोबळमानानं, कॅन्सरची प्रारंभिक लक्षणं खालीलपैकी असू शकतात.
* कुठेही गाठ येणं,
* कुठून तरी उदा. नाकातून गुदद्वारातून रक्तस्राव होणं,
* न थांबणारा खोकला,
* घटत जाणारं वजन,
’ अचानकपणे शौचाची बदललेली सवय.
कॅन्सरची शंका ही वाटत असल्यास लगेचच तपासण्या करून घ्याव्यात. लवकर आजार कळला तर औषधोपचाराने तो आटोक्यात आणता येतो. गर्भाशयाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर व मोठय़ा आतडय़ांचे कॅन्सर, हे सर्व सोनोग्राफी, pap-smear, mamo इ. तपासण्यांवरून लवकर हुडकून काढता येतात.
कॅन्सर होऊच नये असं वाटत असल्यास
* धूम्रपान, नशापान करू नये.
* भरपूर फळभाज्या, पालेभाज्या व फळे खावीत.
* वजन व्यवस्थित असावं.
* Red meat, मटण फार खाऊ नये.
* चुकीच्या लाइफस्टाइल या कॅन्सरसदृश आजाराकडे नेणाऱ्या आहेत. खबरदारी घ्यावी.
* अतिस्थूलपणा, रोजच्या दिनक्रमांत शारीरिक श्रमांचा अतिअभाव, प्रदूषित हवा, प्रदूषित अन्न, प्रदूषित पाणी हे सर्व घटक जेवढे शक्य होईल तेवढे टाळावे.
डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व कशासाठी? पोटासाठी! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancer
First published on: 19-06-2015 at 01:18 IST