हल्ली आधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून लहान वयातच कोलेस्टरॉल वाढायला सुरूवात होते. नंतर हळूहळू एक दुष्टचक्र आपल्याभोवती वेढा घालत जातं. ते टाळणं आपल्याच हातात आहे.

‘‘तुला छुंब्या आठवतो?’’ केदारने डॉ. मीनाला विचारलं.
‘‘अजय चेंबूरकर ना? आपल्या वर्गाचा स्कॉलर! आता तर सात बडय़ा कंपन्यांच्या डायरेक्टर बोर्डावर आहे! चाळिशीच्या आत! ग्रेट आहे ना?’’
‘‘ऐक. गेल्या आठवडय़ात छुंब्या हार्ट-अ‍ॅटॅकने गेला.’’
सुन्न झालेल्या डॉ. मीनाकडे त्या दिवशी त्यांच्या वर्गातल्या आठ जणांनी हेल्थ-चेकसाठी हजेरी लावली. सगळ्यांचे धाबे दणाणले होते.
अजय चेंबूरकर त्यांच्या वर्गाचा नुसता स्कॉलर नव्हता, तो त्यांचा आयडॉल होता. खेळ, नाटकं, पिकनिक-पार्टीज सगळ्यांतच तो वर्गाची जान आणि शान होता. पुढच्या आयुष्यातही त्याने अनेक मोठी कामं एका हाती सहज झेपवली. त्याला कामाची झिंग चढायची. मीटिंग्ज-कॉन्फरन्सेसमध्येच रात्रीचा दिवस होई. त्यात व्यायाम-फेरफटका वगैरेंना स्थानच नव्हतं. दिवसाचे पंचवीस तास काम करता करता एका हाताने हॅम्बर्गर खाणं सोपं जाई. एक्झिक्युटिव्ह डिनर्स-ड्रिन्क्स रोजचीच होती. सिगारेट ओढताना डोक्यावरचा भार हलका वाटे; क्रिएटिव्ह अकलेची कुलपंही झटझट निखळत. आवाका कितीही मोठा असला तरी सात जगड्व्याळ कंपन्यांच्या हिताचं भान सतत जपणं, एकाच वेळी दोन्ही ध्रुवांवरच्या हजेरीची अपेक्षा पेलणं कठीणच होई. आंतरराष्ट्रीय प्रवासांच्या धबडग्यात एक्झिक्युटिव्ह-हेल्थ-चेक राहून जाई.
त्याच्या मोठय़ा जबाबदारीच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून त्याच्या बायकोनेही त्याची लाइफस्टाइल कौतुकाने जपली. ‘या वयात चालतं,’ या सर्वसाधारण समजुतीमुळे अजयचं वाढतं वजन आणि पोट त्याच्या भरभराटीची लक्षणं म्हणून थट्टेवारी नेली गेली. यशाच्या शिखरावर कौतुकाचा पाऊस पडत असताना प्रकृतीचा पाय कधी घसरला ते कळलंच नाही.
सध्या जगात दर मिनिटाला एक जण हार्ट-अ‍ॅटॅकने दगावतो. त्यामुळे स्वर्गाला पोचायचा कलियुगातला तो एक राजमार्ग झालेला आहे. श्री. चेंबूरकर ऐंशी वर्षांचे असते तर कदाचित त्यांच्या पेन्शनर मित्रांना फारसा धक्काही बसला नसता, पण ‘छुंब्या’ची चाळिशीसुद्धा झाली नव्हती! त्याच्यापासून स्वर्ग किमान दोन तपं तरी दूर असायला हवा होता.
अशी समजूत आहे. पण जागतिक सर्वेक्षणांच्या मते मात्र एकूण हार्ट-अ‍ॅटॅक्सपैकी सुमारे ६% अ‍ॅटॅक्स वयाच्या पंचेचाळिशीच्या आधीच येतात. उतारवयातल्या हार्ट-अ‍ॅटॅक्सना कारणीभूत ठरतो तो रक्तवाहिन्यांमध्ये बसलेला कॉलेस्टेरॉलचा साका. तरुण वयातल्याही बहुतेक हार्ट-अ‍ॅटॅक्सना तोच साका कारणीभूत असतो. इतर कारणंही असतात. पण योग्य काळजी घेतली तर कॉलेस्टेरॉलचा साका बसणं टाळता येतं आणि म्हणूनच ते कारण सर्वात महत्त्वाचं गणलं जातं.
रक्तवाहिन्यांच्या आधी त्या साक्याची सुरुवात रक्तातच होते. एलडीएल म्हणजेच रक्तातलं दुष्ट कॉलेस्टेरॉल. त्याची रक्तातली पातळी वाढली की जास्तीचं कॉलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या अस्तरात कणाकणाने साठतं. आधी ते साठे लहान आणि लापशीसारखे दबदबीत असतात, पण हळूहळू ते वाढतात, पसरतात आणि त्यांचा कडक साका होतो. तो रक्तवाहिनीच्या अस्तराशी एकरूप होतो. तशा जुन्या, पक्क्य़ा साक्यामुळे रक्तवाहिन्याही कडक, अरुंद होतात; त्यांचा लवचीकपणा घटतो. व्यायाम, श्रम झाले की हृदयाला अधिक ऑक्सिजनची गरज असते. तशा वेळी लवचीक रक्तवाहिन्यांतून अधिक रक्त हृदयाकडे पोचवलं जातं. कडक आणि अरुंद रक्तवाहिन्या ती गरज भागवू शकत नाहीत. त्याबद्दल हृदयाने केलेली तक्रार म्हणजे छातीतलं दुखणं किंवा अंजायना पेक्टोरिस. पण तशा पक्क्या साक्याने हार्ट-अ‍ॅटॅक येत नाही.
सुरुवातीला तो साका रक्तवाहिनीच्या अस्तराशी एकरूप झालेला नसतो. त्या काळात त्याच्या खपल्या निघतात आणि अस्तराला जखम होते. त्या जखमेवर रक्त गोठून जी गुठळी जमते, तिने त्या रक्तवाहिनीला बूचच बसतं आणि पुढल्या भागाचा रक्तपुरवठा पूर्णपणे थांबतो. मग हृदयाच्या त्या भागाला ऑक्सिजन मिळत नाही आणि तो मरतो. म्हणजेच हार्ट-अ‍ॅटॅक येतो.

भारतीय पक्वान्नांत, केक-आईसक्रीम-चॉकोलेट वगैरे पाश्चात्त्य मिठायांतही दुधा-तुपाची, साखर-गुळाची रेलचेल असते. हे गनीम टाळावेच. कुठलाही अन्नप्रकार गरजेपेक्षा अधिक प्रमाणात खाल्ला तर त्याची चरबीच होते. म्हणून कशाचाही अतिरेक टाळावा.

हार्ट-अ‍ॅटॅक एकाएकी, काही मिनिटांत येतो. पण कॉलेस्टेरॉल वाढणं आणि त्याचा साका बसणं हे मात्र त्याच्यापूर्वी कित्येक वर्षांपासून चालू असतं; बहुतेक वेळा लहानपणापासूनच सुरू झालेलं असतं. म्हणून त्या जीवघेण्या शत्रूशी मुकाबला करायची तयारी गर्भावस्थेपासून सुरू करायला हवी. बाळ पोटात असताना आईची उपासमार झाली, तिने धूम्रपान केलं तर गर्भाची वाढ नीट होत नाही. तशा मुलांमध्ये वाढलेला रक्तदाब, वाढलेलं कॉलेस्टेरॉल आणि मधुमेह यांचं प्रमाण आणि पर्यायाने हार्ट-अ‍ॅटॅकचं प्रमाण पुढल्या आयुष्यात फार मोठं असतं. म्हणून गरोदरपणी काळजी घेणं महत्त्वाचं.
सुमारे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी दूधदुभतं, गोडधोड या अपूर्वाईच्या गोष्टी होत्या. आता सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरांत त्या मुबलक प्रमाणात असतात. बहुतेक आयांना आपल्या मुलांनी बाळसेदार दिसावं अशी इच्छा असते. त्यामुळे घरोघरीच्या बाळकृष्णांना दूध-लोणी, तूप-साखर यांचा सक्तीचा खुराक तर मिळतोच, शिवाय चॉकोलेट, केक, आइस्क्रीम ही पाश्चात्त्य नवलाईही आवर्जून असते. तशा स्निग्ध-मधुर माऱ्यामुळे अनेक मुलांमध्ये रक्तवाहिन्यांच्या अस्तरावर चरबीच्या रेघा अगदी लहानपणापासूनच दिसायला लागतात आणि त्याच्यापुढल्या आयुष्यात त्या पसरतच जातात. त्या साठय़ांचं रक्तातल्या कॉलेस्टेरॉलच्या पातळीशी सख्खं नातं असतं. शिवाय धूम्रपान, मधुमेह आणि वाढलेला रक्तदाब यांनी रक्तवाहिन्यांच्या अस्तराचा पोत बिघडतो आणि त्याचा चरबी साठवण्याकडे कल वाढतो. धूम्रपान करणाऱ्या अकरा वर्षांच्या मुलांच्या रक्तवाहिन्याही चरबीच्या साक्यांनी कडक होतात असं २००७ सालच्या सर्वेक्षणात आढळलं.
आधुनिक जीवनशैलीच्या परिणामाने २५% मुलांमध्ये कॉलेस्टेरॉल वाढायची सुरुवात विशीलाच होते. वाढता अभ्यास, बैठे खेळ आणि फास्ट-फूड यांनी वजन वाढतं. एकोणिसाव्या शतकातलं ‘क्षय-भय’ भारतीय मनांमध्ये असं घट्ट रुजलं आहे की, जाडजूडपणा हे निरोगीपणाचं लक्षण समजलं जातं. त्यामुळे तरुणाईने खाऊन-पिऊन तगडं राहायला हवं हा आग्रह असतो. परीक्षा जवळ आली की बुद्धीला पोषक म्हणून साजूक तुपातला बदामाचा शिराही रोज खाऊ घातला जातो! शिवाय काही जण त्याच वयात स्टाईलमध्ये सिगारेटचे झुरके घ्यायला लागतात. हार्ट-अ‍ॅटॅकचा श्रीगणेशा तिथेच होतो. त्या वयाच्या मुली मात्र त्यांच्या भिन्न हॉर्मोन्समुळे त्यामानाने सुरक्षित राहतात.
१९४८ साली उत्तर अमेरिकेतल्या फ्रॅमिंगहम गावातल्या पाच हजार माणसांच्या आरोग्याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी सुरू केला. तो अभ्यास अजूनही अव्याहतपणे चालू आहे. सध्या त्या माणसांच्या तिसऱ्या पिढीचं निरीक्षण सुरू आहे. रक्तात दुष्ट कॉलेस्टेरॉलचं वाढणं आणि गुणी कॉलेस्टेरॉलचं घटणं, मधुमेह, वाढलेला रक्तदाब, धूम्रपान आणि लठ्ठपणा ही हार्ट-अ‍ॅटॅकची महत्त्वाची कारणं शास्त्रज्ञांना त्याच अभ्यासावरून प्रथम समजली. त्यांच्यातले दोन किंवा त्याहून अधिक दोष असले तर पुरुषांना हार्ट-अ‍ॅटॅक येण्याची शक्यता सत्तर टक्के असते. त्याउलट एकही दोष नसलेल्यांपैकी फक्त ५% लोकांना हार्ट-अ‍ॅटॅक येतो. ते सदोष जगणाऱ्यांपेक्षा सरासरी अकरा र्वष अधिक जगतात.
मग जगभरात प्रयोग झाले आणि नव्या गोष्टी कळल्या. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये तरुणपणी हार्ट-अ‍ॅटॅक यायची शक्यता निव्र्यसनी माणसांच्या ५०% अधिक असते ह्याची खात्री पटली. असंही कळलं की भारतातल्या हार्ट-अ‍ॅटॅकचं प्रमाण सध्या जगात सर्वाधिक आहे! पाश्चात्त्यांपेक्षा भारतीयांना हार्ट-अ‍ॅटॅक सुमारे १५ र्वष लवकरच येतो आणि त्यांच्यातले २५% लोक त्यानंतर १५ वर्षांहून अधिक जगत नाहीत! २०२० सालापर्यंत भारतातले ३३% मृत्यू हार्ट-अ‍ॅटॅकनेच आणि मुख्यत्वे तरुणांतच होतील. त्या आजाराची अनेक आनुवंशिक कारणं भारतीयांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. परदेशी जाऊन आपलं बस्तान बसवणाऱ्या भारतीयांमध्ये स्पर्धेची भावनाही जोरकस असते. त्या चुरशीपोटी ताणतणाव वाढतात. त्यामुळेच प्रगत देशांतही तिथल्या इतर लोकांपेक्षा भारतीय वंशाच्या लोकांतच तरुणपणीच्या हार्ट-अ‍ॅटॅकचं प्रमाण अधिक असतं.
पण हृदयविकाराचा झटका येण्यासाठी छुंब्यासारखं यशस्वी व्यावसायिक असणं गरजेचं नाही. र्ती-पाव खाऊन विडी ओढणाऱ्या कामगाराच्या पदरातही हार्ट-अ‍ॅटॅकचं झुकतं मापच पडतं. शहरी सुधारणा गावांकडे पोचायला अवकाश लागतो हे खरं. पण हॅम्बर्गर नसला तरी वडापाव-खारी हे फास्ट-फूड चापणं आणि शारीरिक कष्टांना कमी लेखणं हा शहरीपणा मात्र गावकऱ्यांच्या अंगी बाणवला जातो आहे. हार्ट-अ‍ॅटॅकच्या भारतीय सर्वेक्षणांमध्ये गाव आणि शहर यांच्यातले भेदभाव झपाटय़ाने नाहीसे होताहेत.
ते सारं शास्त्रज्ञांना कळलं. पण सर्वसामान्य तरुणाईपर्यंत ते अद्याप पुरेसं पोचलेलं नाही. त्या अज्ञानात आनंद नाही; धोका मात्र मोठा आहे. म्हणून त्या जीवघेण्या वैऱ्याविरुद्ध सतत आणि सर्वव्यापी जन-जागरण व्हायला हवं.
गोडधोड, चमचमीत खाण्याची आवड आणि शारीरिक कष्टांची नावड ह्या दोन प्रवृत्ती शत्रूला धार्जिण्या असतात. त्यांना प्रथम कह्यात ठेवायला हवं.
दूधदुभतं आणि त्याचे प्रकार, मांस, अंडी, कवचातले मासे या पदार्थात तर मुळातच हृदयविनाशी कॉलेस्टेरॉल भरपूर असतं. दिवसभराची साय काढली तरी दुधात बराचसा स्निग्धांश शिल्लकच राहातो. ‘स्कीम्ड’ दूध-ताकात मात्र तो नगण्य असतो. काजू-बदाम-शेंगदाण्यांतल्या स्निग्धांशात किंवा खोबऱ्यातही कॉलेस्टेरॉल नसतं. पण कुठल्याही स्निग्धांशाने वजन वाढतं आणि त्याने हृदयविकाराला पुष्टी मिळते.
गोड पदार्थामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे इन्सुलिन वाढतं. इन्सुलिनच्या आज्ञेनुसार लिव्हरमध्ये नवी कॉलेस्टेरॉलयुक्त चरबी बनते. भारतीय पक्वान्नांत, केक-आईसक्रीम-चॉकोलेट वगैरे पाश्चात्त्य मिठायांतही दुधा-तुपाची, साखर-गुळाची रेलचेल असते. हे गनीम टाळावेच. कुठलाही अन्नप्रकार गरजेपेक्षा अधिक प्रमाणात खाल्ला तर त्याची चरबीच होते. म्हणून कशाचाही अतिरेक टाळावा. रोजच्या खाण्यातले तसे शत्रूचे हस्तक हेरणं आणि पुढच्या पिढीलाही त्यांना हेरायला आणि टाळायला शिकवणं अत्यावश्यक आहे.
लाल-शेंदरी भाज्या-फळांत आरोग्यमित्र दोषनाशकं (अँटिऑक्सिडंट्स) असतात. दर मोसमातल्या भाज्या-फळांच्या रंगीबेरंगी कोशिंबिरी त्यांच्यात कांदा- कोथिंबीर- पुदिना- शेपू- मिरी- ओवा अशातला रोज वेगळा स्वाद घालून मुलांच्या बरोबर खाव्या.
रोज वजन बघायची सवयच लावून घ्यावी. सर्वानी मिळून सकाळी एरोबिक व्यायाम करणं, संध्याकाळी जिमला किंवा दूरवर चालायला जाणं हे लष्करी शिस्तीत नियमितपणे करावं. पण त्याचा जाच वाटू नये म्हणून मुलांबाळांसकट त्याचे आनंदोत्सव करावे.
हार्ट-अ‍ॅटॅक खानदानी आजार आहे. कॉलेस्टेरॉल वाढणं, मधुमेह होणं ह्य प्रवृत्तीही आनुवंशिक असतात. पण म्हणून भगीरथाच्या वंशजांनी हातपाय गाळायची गरज नाही. दैवाला दोष देण्यापेक्षा निदान आपल्या हातात जे आहे तेवढं सांभाळलं तरी पुष्कळ फायदा होऊ शकतो. आयुष्याच्या सुरुवातीपासूनच युद्धनीती नीट आखली, गनिमांना दूर ठेवलं आणि दोस्तांशी सलोखा केला तर हृदयगड शंभर र्वष लढवणं कठीण नाही.