जेव्हा एखादी व्यक्ती करिअरमध्ये उत्तुंग कामगिरी करते तेव्हा बघणाऱ्या व्यक्तींना त्या माणसाचे फक्त यश दिसत असते. ते यश, सोनेरी किरणांमध्ये न्हाऊन निघालेल्या हिमनगाच्या टोकासारखे असते. हिमनगाचा जसा केवळ एक सप्तमांश किंवा एक अष्टमांश भाग पाण्यावर असतो, तद्वत हे यश फक्त जगासमोर असते, पण त्या यशाच्या खाली दडलेला असतो चिकाटी, अथक परिश्रम, त्याग, अपयश, शिस्त, निराशा, समर्पणवृत्ती यांनी बनलेला संघर्षमय, यातनादायक भूतकाळ! चिकाटी काय हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. जॉन रोबलिंग नावाचा एक इंजिनीअर होता. त्याचे स्वप्न होते न्यूयॉर्क व लाँग आयलंडला जोडणारा ब्रिज बांधायचे. पण त्याचे हे स्वप्न अनेकांनी अशक्य म्हणून हसण्यावारी नेले. मग जॉनने आपल्या मुलाला म्हणजे वॉशिंग्टनला विश्वासात घेतले. पिता-पुत्राने ब्रिज बांधण्याचे मनावर घेतले असतानाच नियतीने घाला घातला. एका अपघातामध्ये जॉनचे निधन झाले, तर त्याच अपघातामध्ये वॉशिंग्टनच्या मेंदूला जबर दुखापत झाली. त्याला चालता बोलता येईना. फक्त तो एका हाताचे बोट हलवू शकायचा. हॉस्पिटलमध्ये घायाळ होऊन पडले असताना वॉशिंग्टनने जवळ बसलेल्या आपल्या बायकोला बोटाने हलविले व कसेबसे त्याने पुलाच्या बांधकामासाठी इंजिनीअरला माझ्याकडे घेऊन ये असे बोटाच्या हालचालीने सुचविले. त्याने हळूहळू एका बोटाच्या मदतीने बायकोशी संवाद साधण्याची लिपी बनविली. अशा रीतीने केवळ एका बोटाच्या मदतीने त्याने इंजिनीअर्सना सूचना देऊन तो ब्रिज बनवलाच. हे स्वप्न साकारायला त्याला तब्बल १३ वर्षे लागली. ब्रुकलीन ब्रिजच्या यशामागे अशी ही एका चिकाटीची कहाणी लपली आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असे म्हणतात. ज्या रॉकी चित्रपटामुळे सिल्वेस्टर स्टॅलोन प्रचंड प्रसिद्ध व श्रीमंत झाला; त्या यशामागेपण एक रोचक आकडेवारी आहे. सिल्वेस्टरचे ‘रॉकी’चे स्क्रिप्ट तब्बल १५०० वेळा रिजेक्ट केले गेले होते. दहा हजार वेळा थॉमस एडिसनचे इलेक्ट्रिक बल्बचे प्रोटोटाइप अयशस्वी ठरले होते. यशाच्या शिखरावर विराजमान होताना कधी कधी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, जसे की रक्ताच्या नात्यांचादेखील. जगप्रसिद्ध आदिदास कंपनीचे मालक ‘अडॉल्फ आदी दास्लर’ यांची कथादेखील अशीच रंजक आहे. त्यांनी आपल्या भावाला सोबत घेऊन ‘आदिदास’ कंपनीची स्थापना केली. स्पोर्ट्स वेअरमध्ये जम बसला असतानाच अडॉल्फचा भाऊ त्यांच्यापासून दूर झाला व त्याने निर्माण केली आदिदासची स्पर्धक कंपनी ‘प्युमा’. या निर्माण झालेल्या कटुतेला मागे सारत अडॉल्फने आपल्या कंपनीला सदोदित अग्रेसरच ठेवले. कधी कधी सततच्या अपयशामुळे नैराश्य येण्याची शक्यता असते; अशा वेळी जर वेगळा विचार केला तर करिअरलाच नवी दिशा मिळू शकते. सतत नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका युवकाला प्रत्येक ऑफिसमध्ये ‘नॉट हायिरग नाऊ’ असेच नकारात्मक उत्तर मिळत होते. त्यातूनच त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. ‘नो व्हेकन्सी’ किंवा ‘नो हायिरग’चे साइन बोर्ड तयार करून विकण्याची. असेच काहीसे ग्रेट अभिनेता बलराज सहानी यांच्या सोबत घडले होते. महान कथाकार भीष्म सहानी यांचे धाकटे बंधू असल्याने त्यांचाही नैसर्गिक कल लेखनाकडे होता. ते नियमितपणे ‘हंस’ मासिकात कथा लिहायचे. पण बलराज यांना बीबीसी-हिंदीमध्ये काम मिळाल्याने लंडनला जावे लागले. तिथून भारतामध्ये परतल्यावर त्यांनी परत ‘हंस’च्या प्रकाशकांकडे कथा पाठविली. पण या वेळी त्यांची कथा नाकारली गेली. या प्रकारामुळे बलराज यांना नैराश्य आले व त्यांनी मासिकासाठी परत कधीही न लिहिण्याचा पण केला व आपले करिअर चित्रपटसृष्टीमध्ये, अभिनयात किंवा कथालेखनात करण्याचे ठरविले. थोडक्यात काय तर यशस्वी व्यक्तिमत्त्वानेदेखील नैराश्याचा सामना कधीना कधी केलेला असतो, पण नैराश्याला त्यांचा प्रतिसाद हा सकारात्मक असतो. अथक परिश्रम काय असतात हे या दोन-चार उदाहरणांवरून लक्षात येईल. अॅपलचे सीईओ टीम कूक पहाटे साडेचार वाजल्यापासून ई-मेलद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतात; तर जनरल मोटर्स कंपनीच्या मेरी बारा रात्री ११ वाजेपर्यंत महत्त्वाच्या ई-मेलना उत्तरे देण्यात बिझी असतात. अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस ऐन उमेदीच्या काळात स्वत: पहाटे तीन वाजेपर्यंत पुस्तके डिलिव्हर करण्यात मग्न असायचे. निस्सान व रेनौचे सीईओ आपल्या कंपनीचा जगभर पसरलेला बिझनेस सांभाळण्यासाठी वर्षांला दीड लाख मैल हवाई प्रवास करतात. म्हणूनच एक प्रसिद्ध म्हण आहे, ‘हार्ड वर्क बिट्स टॅलेंट, व्हेन टॅलेंट डज नॉट वर्क हार्ड.’ करिअरच्या एव्हरेस्टवर टिकून राहायचे असेल तर अथक परिश्रमाला पर्याय नाही हे या गोष्टींवरून आपल्या लक्षात आले असेलच. आपल्या स्वप्नपूर्तीच्या प्रति समर्पण वृत्ती असेल तर करिअर बहारदार होणारच. ‘डेस्टार डेजर्ट्स’ कंपनी त्यांच्या चीज केकसाठी जगप्रसिद्ध आहे. ही कंपनी जॉन फर्नाडिस व रसेल कॉब यांच्या स्वप्नातून निर्माण झालेली कंपनी आहे. दोघांना हॉटेल मॅनेजमेंट ट्रेनिंग घेताना जाणवले की न्यूयॉर्क शहरात अशी अनेक लहानसहान हॉटेल्स किंवा कॉफी शॉप आहेत जिथे चांगल्या डेजर्ट्ससाठी गिऱ्हाईक आहे, पण या हॉटेल्स किंवा शॉप्सना त्यासाठी स्वत:चा फुल टाइम पेस्ट्री शेफ ठेवणे परवडत नाही. अशा हॉटेल्स व शॉप्सना या दोघांनी डेजर्ट्स विकण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक जागा नव्हती म्हणून मग जॉनच्या आईचे किचन डेजर्ट्स बेक करण्यासाठी वापरायचे ठरले, तर तिच्याच घराच्या गॅरेजमध्ये फ्रिझर ठेवून तिथेही डेजर्ट्स स्टोअर करण्याचे ठरले. उत्पादने बेक करण्यापासून, त्यांच्यासाठी ग्राहक शोधणे व अशा ग्राहकांना माल पोहोचता करणे अशी सर्व कामे हे दोघे जण प्रसंगी सलग ३६ तास राबून पूर्ण करायचे. जेव्हा अमेरिकन व कॅनेडिअन चलनामधील विनिमयाचा दर कॅनेडिअन चलनाच्या बाजूला झुकला, तेव्हा जास्त नफा कमाविण्यासाठी या दोघांनी आपली उत्पादने कॅनडामधून तयार करण्यास सुरू केली. पण नशिबाने जेव्हा साथ सोडली व हाच विनिमयाचा दर पुन्हा एकदा अमेरिकन चलनाकडे झुकला तेव्हा या दोघांनी आपले बस्तान परत अमेरिकेत हलविले. थोडक्यात काय कितीही वादळे आली तरी जॉनने बिझनेस प्रति आपले डेडिकेशन ढळू दिले नाही. करिअरमध्ये यश प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारची शिस्त अंगी बाळगावी लागते. आर्थिक शिस्त तर अत्यंत गरजेची असते. जेव्हा जॉनने व्यवसाय वाढविण्यासाठी व्हर्जिनिया प्रांतातील एक युनिट टेक ओव्हर केले तेव्हा त्याला असे जाणवले की तिथे सगळेच चुकीचे आहे. बेक करणारे ओव्हन, प्रॉडक्ट साठविणारे फ्रीझर व पॅकेजिंग एरिया यामधील अंतर खूप जास्त आहे. त्याच प्रमाणे बॅच प्रोसेस वापरल्यामुळे कच्चा माल स्टोअर करायला खूप रेक्सची गरज आहे, पण एकदा बॅच प्रोसेस संपले की ते रेक जागा अडवून ठेवतात. या सर्व गोष्टीमुळे श्रम, वेळ, परिणामी पैसादेखील वाया जात आहे. जॉनने लगेच लीन अवेरनेस प्रोग्राम अंतर्गत युनिटमधील सर्व मशिनरीचा ले आऊट बदलून टाकला. बॅच प्रोसेसऐवजी सिंगल पीस फ्लो कन्सेप्ट आणला. हे सर्व उपाय म्हणजे ऑपरेशन्समध्ये शिस्त आणण्याचे प्रयत्न होते. परिणामी फूड आयटम्सची अनावश्यक मुव्हमेंट कमी झाली, श्रम व वेळ वाचल्याने लेबर कॉस्ट कमी झाली. पैशाची बचत झाल्याने कच्च्या मालाच्या किमती वाढूनदेखील नफ्याचे मार्जिन कमी झाले नाही. या लेखाचा सारांश काय, तर फक्त यशाच्या शिखराकडे पाहू नका, ते यश कोणत्या पायावर उभे राहिले आहे ते अनुभवा, पायथ्याशी किती दगड-धोंडे, काचा, काटे होते ज्यांच्यामुळे शिखराकडची वाटचाल रक्तबंबाळ, थकविणारी झाली ते समजून घ्या. प्रशांत दांडेकर - response.lokprabha@expressindia.com