News Flash

खच्चीकरण!

आता तालिबानीही बदलले आहेत, असे त्यांनी जगाला सांगायला सुरुवात केली आहे.

taliban afghanistan
परिस्थिती बदलली तसे तालिबानी खरेच बदलले आहेत का, हाच खरा प्रश्न आहे.

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
संपूर्ण जगाचे लक्ष अफगाणिस्तानकडे आहे. आणि जगभरातील विश्लेषकही तेथून दररोज येणाऱ्या गोपनीय आणि खुल्या अशा दोन्ही प्रकारच्या माहितीवर नजर ठेवून त्याचा अर्थ-अन्वयार्थ लावण्यामध्ये गर्क आहेत. २५ वर्षांपूर्वी तालिबानने ताबा घेतला त्या वेळेस अफगाणिस्तान कोलमडलेल्या अवस्थेत होते. आता परिस्थिती तशी नाही. केवळ अमेरिकेनेच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांनी अफगाणिस्तानच्या उभारणीत हातभार लावला, त्यात भारताचाही समावेश आहे. आताच्या अफगाणिस्तानमध्ये पायाभूत सुविधा आहेत. अमेरिकेने त्यांची खाती सध्या गोठवलेली असली तरी त्यामध्ये बऱ्यापैकी पैसे आहेत, अर्थात ते मोकळे करण्यासाठी तालिबान्यांना जगभरातील देशांची रीतसर मान्यता मिळणे हे महत्त्वाचे असेल. आता तालिबानीही बदलले आहेत, असे त्यांनी जगाला सांगायला सुरुवात केली आहे. कारण सारे व्यवहार निर्वेध करायचे तर त्यासाठी त्यांना जगभरातील महत्त्वाच्या देशांनी दिलेली ही मान्यता महत्त्वाची असेल. पण परिस्थिती बदलली तसे तालिबानी खरेच बदलले आहेत का, हाच खरा प्रश्न आहे.

खरेच बदलले असतील तर कदाचित त्यांना आणि पर्यायाने इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना आजवरची मिळालेली ती खूप मोठी सुवर्णसंधी असेल. कारण त्यांना ती सिद्ध करता आली तर जगभरातील समीकरणे बदलतील. गेली ४० वष्रे युद्धसदृश्य तडाख्यात सापडलेल्या अफगाणिस्तानची देश म्हणून आणि अफगाणींची नागरिक म्हणून ती मोठीच सुटका असेल. इस्लामी मूलतत्त्ववादीही देश चालवू शकतात हे सिद्ध करणे हे कट्टरतावाद्यांसाठी अनेक अर्थानी वेगळे परिमाण देणारे असेल. त्याचा एक परिणाम कट्टरतावाद्यांचे हेतू धारदार होणे हा देखील असेल. पण हे सारे वाटते तितके सोपे नाही. कारण आजवर पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या तालिबान्यांवरचे नियंत्रण पाकिस्तान कमी होऊ देणार नाही. सध्या तरी पाकिस्तानच त्यांच्यावर नियंत्रण ठेवून आहे. मात्र पाकिस्तानला त्यांच्या पश्चिम सीमेवर तहेरिक-ए-तालिबान पाकिस्तानची (टीटीपी) डोकेदुखी नको आहे. अलीकडे पाकिस्तानच्या ग्वादार बंदराजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यास आणि त्याहीआधी १३ चिनी नागरिक ठार झाले त्या हल्ल्यास टीटीपी जबाबदार असल्याची पाकिस्तानची धारणा आहे. शिवाय दुसरीकडे ‘इस्लाम खतरे में’ असे म्हणत एकत्र आलेल्या सर्व कट्टरतावादी संघटना अल काईदा आणि इस्लामिक स्टेटसह सर्वानाच आता अफगाण सत्तेमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यांना आणि अफगाणिस्तानातील विविध प्रांतांनाही प्रतिनिधित्व देत सर्वसमावेशक सरकार स्थापन करणे वाटते तितके सोपे नाही.

पलीकडे उग्युरमध्ये असलेली टीटीपीच्या दहशतवाद्यांची भीती अफगाणिस्तानच्या भूमीवर पोसली गेलेली चीनला नको आहे. सध्या तालिबान्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तत्पर असलेल्या रशियालाही त्यांच्या दक्षिणेकडील प्रातांमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी मूळ धरलेले नको आहे. त्या सर्व दहशतवाद्यांसाठी अफगाण भूमी हे आश्रयस्थान ठरण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे ज्या ‘इस्लामी सत्ता’ या विषयाने तालिबानला व पाकिस्तानला जोडून ठेवले; अमेरिकेसारख्या बलाढय़ राष्ट्राविरोधात लढण्याचे बळ दिले तोच मुद्दा आता प्रमुख डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

या साऱ्यातून तालिबान वाट कसे काढणार, या प्रश्नाच्या उत्तरात अफगाणिस्तानचे भविष्य दडलेले आहे. दरम्यान, सर्वात महत्त्वाची वाईट गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या पराभूत माघारीने मूलत्त्ववादी आणि कट्टरतावाद्यांना मात्र नतिक बळ दुपटीने मिळणार आहे. बलाढय़ व तंत्रसमृद्ध राष्ट्रालाही तब्बल २० वर्षांच्या लढय़ानंतर का होईना पण इस्लामी कट्टरतेच्या मानसिक बळावर दहशतवादी पुरून उरतात, हा अमेरिकेच्या माघारीमुळे गेलेला संदेश जगाचे मानसिक खच्चीकरण करणारा आहे, हे मात्र निश्चित!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2021 6:36 pm

Web Title: crisis in afghanistan taliban mahitartha dd 70
Next Stories
1 मुक्त शिक्षणाच्या दिशेने
2 स्वातंत्र्य १६ सेकंदांचं!
3 राजकीय गोची!
Just Now!
X