News Flash

टाचणी आणि टोचणी -जुने ते सोने?

आजचे सगळे वाईट आणि जुने ते चांगलं असे मानण्याची, म्हणण्याची फॅशनच आहे आपल्याकडे. पण खरोखरच तसे असते का? खरे तर नसतेच..

| January 2, 2015 01:07 am

आजचे सगळे वाईट आणि जुने ते चांगलं असे मानण्याची, म्हणण्याची फॅशनच आहे आपल्याकडे. पण खरोखरच तसे असते का? खरे तर नसतेच.. जनामनात रुजलेल्या नव्या-जुन्या मिथकांना टाचणी आणि विचारांची टोचणी लावणारे नवं सदर..

एके दिवशी रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला तो नववर्ष घेऊनच.. इतक्या सहजपणे कधी नवे वर्ष येत नसते.
तसे असते तर केवढी मौज आली असती. परंतु ते येते ते काही कामे घेऊनच.
म्हणजे थट्र्टीफर्स्ट वगैरे साग्रसंगीत साजरा करणे, नवी दिनदर्शिका, नवी डायरी वगैरे सहसा चकटफू मिळवण्याचे प्रयत्न करणे, पुन्हा आता काय व्हाट्स्यापमुळे वगैरे नववर्षांभिनंदनाचे संदेश फुकटात फॉरवर्ड तर कोणीही कोणालाही करू शकतो, तेव्हा ते करणे, झालेच तर जानुआरीच्या पहिल्या पानावरच नव्या वर्षांचे नवे संकल्प लिहून ठेवणे अशी बरीच कामे मनुष्याला करावी लागतात. पुन्हा हे सर्व करता करता गेल्या वर्षांच्या आठवणींना उजाळाही द्यावा लागतो. हे काम च्यानेले आणि वर्तमानपत्रे उत्साहाने करतात म्हणा. पण त्यात एक कमतरता असते. उसाश्यांची! ‘गेले ते दिन गेले’च्या उसाश्यांची!!ते ज्याचे त्यानेच टाकायचे असतात. आणि लोक टाकतातही.
हे उसासे जोवर गेल्या वर्षी झालेल्या पगारवाढीबद्दल असतात, एलटीए घेऊन केलेल्या कुलूमनालीवारीबद्दल असतात, झालेच तर ईएमआयवर केलेल्या खरेदीचे असतात, तोवर ठीक असते. ते शाळेतल्या दिवसांबद्दल, महाविद्यलयातल्या राडय़ांबद्दल, पूर्वीच्या गरिबीबद्दल असतात तोवरही ठीक असते. आपल्या टूबीएचकेमध्ये बसून उंची मद्याचे प्याले रिचवताना त्या पूर्वीच्या गरिबीच्या आठवणी कशा बावनकशी सोन्याच्या होऊन जातात!
पण त्यांचे ते उसाश्यांनी धपापणारे ऊर इतिहासाच्या पानांत शिरले की मग मात्र काळजीचे कारणच निर्माण होते. काळजी त्या ऊरांची नसते. आपण ज्या भविष्यकाळात जाणार असतो त्याची असते. कारण ही अशी जुने तेच सोन्याच्या मोहातली मंडळी गुडघ्यांना अमृतांजन चोळता चोळता दिनरात त्यांचे ज्येष्ठ नागरिक-शास्त्र सांगत वर्तमानाची चव तर बिघडवतातच, पण भविष्याची वाटही तेढीमेढी करून ठेवतात.
मध्ये असेच एक इतिहासाचे तज्ज्ञ सांगत आले की, हल्ली खूपच सामाजिक समस्या वाढल्यात. कारण आपण आपली जुनी समाजरचना सोडली. यांचे नाव वाय. सुदर्शन राव. गृहस्थ सध्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे म्हणणे असे, की तुम्ही जातिव्यवस्थेला खराबघाण मानता, पण त्यातला हा ऐब आजकालचा. प्राचीन काळी ती व्यवस्था उत्तमच काम करीत होती. सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत तत्कालीन समाजाच्या गरजा भागविण्याच्या हेतूने ही व्यवस्था उत्क्रांत होत गेली. ती वर्णव्यवस्थेशी एकात्म होती. बरे तिच्याबद्दल कोणाचीही तेव्हा तक्रार नव्हती. तसे उल्लेखच कुठे आढळत नाहीत म्हटल्यावर लोकहो, तुम्ही कशाला तक्रार करता? उलट आज अशा व्यवस्थांचे पुनरुज्जीवन करायला हवे.
बरे असे म्हणणारी मंडळी काही कमी नाहीत. जुना समाज छान होता, जुनी कुटुंबव्यवस्था उत्तम होती, जुनी गावे चांगली होती, जुनी शेते मस्त धान्ये पिकवीत.. अगदी काहीही!
जुन्या समाजाचे गुणगान ऐकताना आपण मात्र तेव्हाचे शोषण, गुलामी, अन्याय हे सारे विसरायचे. जुन्या कुटुंबव्यवस्थेचे पोवाडे गाताना त्या कुटुंबांमध्ये बाईमाणसे कशी गाडली जात असत ते लक्षातही घ्यायचे नाही.
जुन्या काळी गावरान भाज्या, धान्य खायला मिळायचे. त्यामुळे लोक धडधाकट होते. बसल्या जागी पायलीच्या भाकरी रिचवायची ताकद अंगात होती. आता हायब्रीड आले नि त्यामुळे आजार वाढले, हे सगळे आपण गपगुमान ऐकायचे. आणि या हायब्रीडमुळे भूकबळी जाणे संपले हे मात्र बोलायचे नाही.
हल्ली गावोगावी तुमचे ते डॉक्टर झालेत. पूर्वी ते डॉक्टरही नव्हते आणि आजारही, असे जेव्हा ही जुने ते सोनेवाली मंडळी सांगत असतात तेव्हा त्यांना हे मात्र अजिबात आठवत नसते, की पूर्वी एकेका साथीच्या रोगात गावेच्या गावे मसणात जायची. साध्या साध्या आजारांनी माणसे खंगून मरायची. बरे यातही एक मौज अशी, की तिकडे एड्सचा बोलबाला झाला की इकडे लगेच आपण आपल्या पोथ्या काढून छाती फुगवत डिंगा मारायच्या, की बघा, या रोगावर आमच्या आयुर्वेदात औषध दिलेले आहे. याचा अर्थ पूर्वीच्या काळात एड्स हा आजार होता हेही या मंडळींच्या लक्षात येत नसते. त्यांना तसे सांगितले, तर पूर्वीचे आजारही मस्तच असत, असे म्हणतील एखाद्वेळी.
पूर्वीचे सगळेच मस्त म्हणणारांचे असेच एक आवडते क्षेत्र आहे – चित्रपटगीतांचे. आजचे संगीत आणि कालचे संगीत असा विषय काढून पाहा एकदा त्यांच्यापुढे. गाण्यांच्या सनावळ्यांपासून गायक-संगीतकारांच्या गोतावळ्यापर्यंत असा काही इतिहास फेकतील तुमच्या तोंडावर की यंव रे यंव. त्यात त्यांचे सांगणे एकच. पूर्वीचे संगीत म्हणजे संगीत. शब्द म्हणजे शब्द. चाल म्हणजे चाल. आजचे मात्र सगळेच चवचाल.
आजची सगळीच गाणी चांगली आहेत असे म्हणण्याची कोणाचीही टाप नाही. काही काही गाणी तर खरोखरच कानावर अन्याय असतो. त्यामुळे आशाबाई भोसले जेव्हा म्हणतात की, आताची गाणी रटाळ आणि भावविरहित आहेत, आज कोणीतरी मुन्नी येते आणि ‘झंडू बाम’वर नाचून जाते, तेव्हा बाईंच्या म्हणण्याला मान डोलावण्याशिवाय पर्यायच नसतो. हा झाला एक भाग. पण बाई किंवा अन्य कोणी जुने गायक, जुने संगीतकार आजच्या गाण्यांवर टीका करीत असतात तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा दुसरा अर्थ असा असतो की, जुनी गाणी मात्र फारच फर्मास असतात. आता यालाही कोण कसा नकार देणार? कारण आजही पन्नास, साठ, सत्तरच्या दशकांतली अनेक गाणी आपल्या ओठांवर आहेत, मोबाइलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत. त्यांचा गोडवा आजही कायम आहे. आमची वृत्तपत्रीय जुने जाणती संगीत समीक्षक मंडळी सदान्कदा हेच तर सांगत असतात.
मग समस्या काय आहे?
समस्या ही आहे की, आजची काही गाणी चांगलीसुद्धा असतात आणि कालची काही गाणी वाईटसुद्धा होती, हे ही जुने ते सोनेवाली मंडळी समजूनच घेत नसतात. आजचा झंडू बाम जर झोंबत असेल तर इनामिनाडिका, चिनचिनचू या शब्दांत फार सांगीतिक थंडावा होता असे नाही.
आजच्या गाण्यांत अश्लीलता आहे अशी जोरदार टीका होते. त्याला मात्र उत्तर नाही. याचे कारण गाणी अश्लील आहेत म्हणून नव्हे, तर अश्लीलतेचे वस्तुनिष्ठ निकषच नसतात हे आहे. त्यामुळे होते काय, की आजच्या काळातली अर्धवस्त्रांकिता नायिका अश्लील वाटते आणि तेव्हाच्या गाण्यांतली बिकिनीतली शर्मिला टागोर मात्र गोडगोड असते. याला काय म्हणायचे? बरे चित्रपटांतील गाण्यांचा आपण नंतर आस्वाद घेतो तेव्हा तो काही चलत्चित्रांच्या सोबतने नव्हे. तसे केले तर मग भारतभूषण, महिपालपासून राजेंद्रकुमार, मनोजकुमार ते जितेंद्पर्यंतच्या कलाकारांवर चित्रित केलेली गाणी सोडूनच द्यावी लागतील.
अश्लीलता आजच्या गाण्यांच्या शब्दांत असते असे म्हणायचे तर मग लताबाईं आणि आशाबाईंची अनेक मराठी गाणीसुद्धा बादच करावी लागतील. अन्यथा राजसा एवढय़ातच निजलास वगैरे का रे, या सवालाचे काय करणार? आणि चांदणे शिंपीत चाललेल्या चंचलेला – गे निळावंती कशाला तुझी काया झाकतेस, मेघांविणच तुझे मोकळे सौंदर्य पाहू दे – असे जे आवाहन तेही पुन्हा बाईच्या आवाजात करण्यात येते त्याला काय म्हणणार?
मुद्दा असा, की संगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हणतात त्या काळातलीही अनेक गाणी पडली होती. जी उभी राहिली ती आजही आपल्यासमोर आहेत. जसजशी जुनी होतील तसतशी आजची काही गाणीही अभिजाततेच्या रकान्यात जाऊन बसतील. नाही तरी आजच ‘आप जैसा कोई’ ऐकायला गोडच वाटते की!
एकूणच जुने ते सोने असे आपण कितीही म्हटले तरी त्यात तसा काही अर्थ नसतो. प्रत्येक काळाची आपली अशी खासीयत असते. आपल्या रीती, आपली मूल्ये, आपली नैतिकता घेऊन तो वाहत असतो. त्यात चांगले, वाईट दोन्हीही घडत असते. आपणही आपल्या परीने ते घडवायचे असते. ते सोडून गेलेल्या काळाची मुक्तहस्त स्वप्नचित्रे रंगवून आपले न्यूनगंड झाकता येतील. पण तो आजारच असेल कालसुसंगती हरवल्याचा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:07 am

Web Title: criticizing old rituals and superstitions in society
टॅग : Superstitions
Next Stories
1 हिरवाई -एअर प्लान्ट्स
2 मेसेज – द मेसेंजर ऑफ गॉड
3 आवाहन : कलाजाणीव
Just Now!
X