एकही संवाद नसलेली दाजी ही व्यक्तिरेखा चोख साकारणाऱ्या राजू आठवले यांनी ‘अस्मिता’ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. वाढीव शिफ्ट आणि इतर काही गोष्टींमुळे त्यांनी या निर्णय घेतला आहे.

एखाद्या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखेला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच त्यातल्या सहाय्यक व्यक्तिरेखांनाही असतं. विशेषत: ती सहाय्यक व्यक्तिरेखा प्रत्येक भागात प्रेक्षकांसमोर येत असेल तर ती महत्त्वाची ठरतेच. अशी व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार मालिका सोडून गेला तर तो चर्चेचा विषय होतो. असंच काहीसं झालं ‘अस्मिता’ मालिकेच्या दाजींचं अर्थात राजू आठवले यांचं. काही दिवसांपूर्वी राजू यांनी फेसबुकवर ‘अस्मिता मालिका सोडली’ अशा प्रकारची पोस्ट लिहिली होती. या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली. दाजी ही व्यक्तिरेखा आणि ती साकारणारा अभिनेता हे दोन्ही सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय होते. त्यामुळे मालिकेत त्यांचं नसणं हे प्रेक्षकांसाठी खुपणारं होतं. मालिका अचानक सोडण्याबाबत राजू म्हणाले, ‘मालिकांच्या शिफ्टचे तास वाढत असतील, तर प्रॉडक्शन टीमने कलाकारांना थोडं आधी सांगावं अशी माफक अपेक्षा असते. ‘अस्मिता’च्या बाबतीत एका शिफ्टच्या वेळी याच संदर्भात झालेल्या काही मतभेदांमुळे मी मालिका सोडली.’ एप्रिलमध्ये ‘अस्मिता’ या मालिकेचं शूट सुरू असताना रात्री शिफ्ट संपल्यानंतर वाढीव शिफ्ट लागतेय असं सांगण्यात आल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. कलाकारांना गृहीत धरणं चुकीचं आहे, असंही राजू यांचं म्हणणं आहे. घडलेल्या प्रकाराबाबत मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक संगीत कुलकर्णी मात्र असं म्हणाले, ‘छोटय़ा-मोठय़ा गोष्टी सगळ्यांमध्येच होत असतात. राजू यांनी मालिका सोडली असेल तर ते अजून माझ्यापर्यंत आलेलं नाही.’
डेली सोपचं शूट साधारणत: बारा तास सुरू असतं. काही वेळा चॅनेल किंवा मालिकेची गरज म्हणून हे शूट पुढे वाढवलंही जातं. पण, कलाकार आणि मालिकेशी संबंधित प्रत्येकाला याची माहिती असणं गरजेचं असतं. कलाकार एखाद्या मालिकेला बांधील असला तरी तिथले त्याचे कामाचे तास संपल्यानंतर वैयक्तिक पातळीवर त्याची काही कामं असू शकतात. त्यामुळे प्रत्येकाला याबाबत विचारात घेतलं जाणं आवश्यक आहे. याच मुद्दय़ावर राजू म्हणाले, ‘वाढीव शिफ्ट करायला अजिबात हरकत नाही. पण, त्या दिवशी आमची शिफ्ट रात्री नऊला संपणार होती. पण ती संपेपर्यंत साडेदहा वाजले. तांत्रिक गोष्टींमुळे काही वेळा तास-दीड तास पुढे-मागे होत असतं हे आम्ही जाणून आहोत. त्यामुळे त्याला आमचा नकार नसतो. पण, त्या दिवशी साडेदहानंतर शिफ्ट पुढे वाढतेय असं आम्हाला सांगण्यात आलं. याबाबत मी आणि मालिकेची मुख्य कलाकार मयूरी वाघने प्रॉडक्शनमध्ये विचारलं. त्यानंतर तब्येत बरी नसल्यामुळे मयूरीने वाढीव शिफ्टला नकार दिला. त्यानंतर मी माझ्या शिफ्टबाबत विचारलं असता, ‘तुझे दोन सीन आहेत’ असं सांगण्यात आलं. सगळ्यांना एकच नियम असावा असं माझं मत आहे. तरी मी तयार झालो. मेकअप रूममध्ये असताना मलाही पॅक अप झालं असं सांगितलं. त्यामुळे मी तिथून निघालो. सेटवरून मी निघाल्यावर दिग्दर्शकांचा मला याबाबत फोन आला. मी त्यांना सांगितलं की पॅक अप झालंय असं सांगितल्यानंतरच मी सेटवरून निघालो आहे. दुसऱ्या दिवशी मी दिग्दर्शकांना या प्रकाराबाबत पुन्हा मेसेज केला, त्यावर त्यांचा ‘भेटल्यावर बोलू’ असा मेसेज आला. पण, अजूनही आम्ही भेटलो किंवा बोललो नाही.’
२० एप्रिल हा राजू यांचा शूटचा शेवटचा दिवस. त्यानंतर मालिकेकडून त्यांना शूट असल्याचा फोन किंवा मेसेज आला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ‘मी स्वत:हून याबाबत चौकशी करण्यासाठी फोन केल्यानंतर मी पुढच्या दोनेक कथांमध्ये नसल्याचं मला समजलं. काही अडचण आहे का असं विचारल्यावर ‘गैरसमज आहेत काही’ असं उत्तर मला मिळालं. अजूनही मी मालिकेत आहे की मला मालिकेतून काढून टाकलंय याबाबत स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलेलं नाही. पण, मला कळवण्याची तसदी न घेतल्यामुळे मीच आता त्या मालिकेत काम करणार नाही. केलंच तरी माझ्या नियमांवर करेन’, असं ते म्हणाले. तर निर्माते-दिग्दर्शक असं म्हणाले की, ‘कथेच्या गरजेनुसार मालिकेत एक नवीन पात्र येणार होतं. दाजींचा भाचा हे पात्र आम्हाला आणायचं होतं. त्यामुळे दोन-तीन कथांमध्ये दाजी त्यांची आई आजारी असल्यामुळे त्यांच्या गावाला गेले आहेत असं दाखवण्यात आलं. ते त्यांच्या बदली त्यांच्या भाच्याला पाठवतात असा कथानकाचा तो भाग आहे. त्यामुळे दाजी दोन-तीन कथांमध्ये नाहीत. या गोष्टीवरून काही गैरसमज झाले असतील असं मला वाटतं. पण, याबाबत नेमकं काय घडलं हे मलाही शोधायला हवं.’ कलाकारांचा वाढीव शिफ्टला नकार देण्याचा पवित्रा स्वाभाविक आहे. वाढीव शिफ्ट केल्याने किंवा सतत पंधरा-वीस तास शूट केल्याने कलाकारांच्या आरोग्याची हेळसांड झालेली उदाहरणं गेल्या काही महिन्यात दिसून आली आहेत. तसंच मालिकेच्या गरजेनुसार दोनेक तासांचं काम पुढे वाढवणं हे टीमच्या दृष्टीनेही अपरिहार्य असतं. अशावेळी योग्य तो मार्ग काढणं फायद्याचं ठरतं. पण, काही वेळा गोष्टी जमून येत नाहीत आणि मग वादाला सुरुवात होते. राजू यांचं शूट महिन्यातून साधारण पंधरा दिवस असायचं. तरी ते जवळपास संपूर्ण महिना मालिकेसाठी राखून ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं. दाजी ही व्यक्तिरेखा सर्व वयोगटात लोकप्रिय आहे. एकही संवाद नसलेली मूक व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक. पण, या व्यक्तिरेखेला आणि कलाकाराला बघण्यापासून प्रेक्षक वंचित राहतील असं दिसतंय.

17गैरसमज आहेत
कथेच्या गरजेनुसार मालिकेत एक नवीन पात्र येणार होतं. दाजींचा भाचा हे पात्र आम्हाला आणायचं होतं. त्यामुळे दाजी दोन-तीन कथांमध्ये नाहीत. या गोष्टीवरून काही गैरसमज झाले असतील असं मला वाटतं. पण, याबाबत नेमकं काय घडलं हे मलाही शोधायला हवं. राजू यांनी मालिका सोडली असेल तर ते अजून माझ्यापर्यंत आलेलं नाही.
संगीत कुलकर्णी, निर्माता-दिग्दर्शक

18गृहीत धरू नका
कलाकारांना गृहीत धरणं मला अजिबात मान्य नाही. वाढीव शिफ्टचं काम करण्याची माझी हरकत नाही. पण त्याबाबत वेळेत सांगणं ही प्रॉडक्शन टीमची जबाबदारी आहे. यापूर्वीही मी अनेकदा माझ्या वैयक्तिक कामांचं नुकसान करून वाढीव शिफ्ट्स केल्या आहेत. कोणतीही गोष्ट एखाद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो. तोच नेमका माझ्याबाबतीत घडला नाही.
राजू आठवले