25 May 2020

News Flash

कशासाठी? पोटासाठी! : पचन-अपचन

आपल्या लहानपणी जेवणाच्या पंगतीमध्ये ताटभर जिलेब्या किंवा भरपूर बासुंदी पज म्हणून अनेकांनी रिचवली असेल. तसेच कॉलेजमध्येही वसूल करायचे म्हणून मेस किंवा पार्टीत भुकेपेक्षा जास्त खाणारे

| February 13, 2015 01:10 am

avinashआपल्या लहानपणी जेवणाच्या पंगतीमध्ये ताटभर जिलेब्या किंवा भरपूर बासुंदी पज म्हणून अनेकांनी रिचवली असेल. तसेच कॉलेजमध्येही वसूल करायचे म्हणून मेस किंवा पार्टीत भुकेपेक्षा जास्त खाणारे अनेक असतात. इथे त्या क्षणी जरी ते खूश झाले तरी पुढे दोन दिवस त्यांना पोटाचा त्रास होतोच. आपल्या रोजच्या धावपळीतदेखील बरेच जण मला अपचन झाले असे म्हणतात. आपल्यापकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी अपचनाचा त्रास झालेलाच असतो. आज आपण पचन आणि अपचन याविषयी जाणून घेऊ या.

पचन म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे पाचक रसात रूपांतर होणे, ज्यामुळे आपलं पोषण व शरीरधारणा होत असते. आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत गेलेली एक लांबलचक पोकळ नळीच होय, ज्याची लांबी साधारणपणे नऊ मीटर इतकी असते. अन्नाचे पूर्ण पचन करून त्यातली पोषणद्रव्ये शरीरात शोषून घेणे व शेवट राहिलेला मळ शरीरातून गुदद्वारामाग्रे बाहेर टाकणे हे काम पचनसंस्था अव्याहतपणे करत असते.
अन्नपचन कसे होते?
आपण तोंडातून अन्न आत घेतो, जे तोंडाच्या पोकळीत दातांनी चावून चावून बारीक केले जाते. बारीक झालेले हे अन्न गिळायला सोपे जाते. तोंडामध्येच या अन्नात लाळ मिसळली जाते, जी अन्नातील पिष्टमय पदार्थाचे विघटन करते. अर्थात त्याच्या पचनाला सुरुवात करते. हे काम लाळेतील सलायव्हरी अमायलेझ (Salivary Amylase) नावाचे एन्झाइम (enzyme) करते.
गिळलेले अन्न पुढे अन्ननलिकेत उतरते व तिथून जठरापर्यंत आणले जाते. अन्ननलिकेमध्ये मात्र अन्न पचन होत नाही. जठरात आल्यावर हे अन्न जठरातील पाचकरसात मिसळले जाते. अन्नपचनाचे मुख्य कार्य जठरामध्ये होत असते. जठरात १) हायड्रोक्लोरिक अॅसिड, २) लायपेज, ३) पेप्सीनोजेन व ४) प्रोटेनिन असे विविध पाचकरस असतात, जे स्निग्धपदार्थ, नत्रयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ यांचं पचन घडवू लागतात. तसेच जठरात म्युकस (Mucus) म्हणजे पातळ बोळ असलेला हा पदार्थ अन्न पातळ करण्यासाठी उपयोगी पडतो.
जठरातून हे अध्रे पचन झालेले अन्न पुढे लहान आतडय़ात शिरते. लहान आतडय़ात यकृतातून आलेला पित्तरस (Bile) व स्वादुिपडाकडून आलेले पाचकरस (एन्झाइम्स उदा. ट्रिप्सीन, अमायलेझ इ.) पुढे अन्नाचे पचन पूर्ण करतात. म्हणजे पिष्टमय पदार्थाचं रूपांतर ग्लुकोजमध्ये, प्रथिनांचं रूपांतर अमायनो अॅसिडमध्ये (Amino Acids) व स्निग्ध पदार्थाचं रूपांतर फॅटी अॅसिड (Fatty Acids) मध्ये होते.
आपला अन्नमार्ग हा आतून स्नायूंनी बनलेला असतो. या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे अन्नमार्गात अन्न व पाणी पुढे पुढे ढकलले जाते. स्नायूंच्या या हालचालीस पेरीस्टाल्सीस असे म्हणतात व त्यामुळेच अन्न एका अवयवातून पुढच्या अवयवात जाते.
हे पचलेले अन्न मोठय़ा आतडय़ांच्या टोकापर्यंत म्हणजे रेक्टम (Rectum) पर्यंत जाते. या पूर्ण मार्गात द्रव पदार्थाचे शोषण होते व उरलेला मळ गुदद्वारामार्फत बाहेर टाकला जातो.

अपचन : अन्न जर नीट पचले नाही तर आपण अपचन झाले असे म्हणतो.
* अन्न पचनमार्गात जास्त वेळ राहते, कुजण्याची प्रक्रिया सुरू होते, हानिकारक बॅक्टेरिया लहान व मोठय़ा आतडय़ात तयार होतात व आतडय़ाचा दाह होणे, असे आजार उद्भवतात.
* आपल्या शरीरात काही पाचकरसांची कमतरता असल्यास अन्नपचन योग्यरीत्या होत नाही.
* अन्न नीट पचले नाही तर तसेच ते पुढे जाते व त्यातील मोठे कणही आतडय़ांत शोषले जातात, ज्यामुळे अॅलर्जी निर्माण होऊ शकते.
* अन्नपचन योग्य झाले नाही तर शरीरासाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्ये तयार होत नाहीत व थकवा जाणवू लागतो. कुपोषण व विविध विटामिन्सची कमतरता होते.
आपल्या सवयी आणि अन्नपचन :
आपल्या चुकीच्या सवयी व चुकीच्या पद्धतीचा आहार पचनाच्या तक्रारी निर्माण करतात.
१) प्रीझव्र्हेटिव्ह घातलेले अन्न – जे जास्त टिकाऊ असतं. डबाबंद अन्न, प्रोसेस्ड अन्न, प्रीझव्र्हेटिव्ह घातलेलं अन्न – हे सर्व खाल्ल्याने पचनाचे विकार होतात.
२) काहींना लॅक्टोज पचत नाही, गॅसेस होतात, पोट फुगल्यासारखे वाटते, ढेकर येतात, अॅलर्जी होते.
३) तळलेले पदार्थ, मार्गारिन, रासायनिक द्रव्ये मिसळलेले पदार्थ हे पचायला जड जातात. खूप तळलेले, जास्त तूप असलेले पदार्थ, खूप वेगवेगळे अन्नघटक एकत्र केलेले जडान्न पचनक्रिया मंदावते.
४) नॅचरल (नसíगक) अन्न म्हणजे फळे, कडधान्ये, दाणे, भाज्या या पचायला अगदी उत्तम.
५) अती प्रमाणात मांसाहार करणे, धान्यावर प्रक्रिया करणे, तांदळाचा कोंडा काढून वापरणे, अती प्रमाणात गोड पदार्थ खाणे, शरीराला घातक आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व गॅस्ट्रिीस, क्रोनिक डिसिज, diverticulitis, appendicitis, cholecystitis सारखे आजार उद्भवतात. म्हणून नैसर्गिक अन्न खाण्यावर भर द्यावा.
अपचन : अपचन म्हणजे अन्न नीट न पचणे. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांमध्ये अपचन, गॅसेस, अॅसिडिटी याचा त्रास होताना दिसतो. याला कारण आपली फास्ट जीवनपद्धती. अपचनाचा त्रास प्रत्येकात वेगवेगळे लक्षण घेऊन प्रकटू शकतो. पोटाला तडस लागणे, खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं, वाटणे, अस्वस्थता वाटणे, छातीत जळजळ होणे, करपट ढेकरा येणे, भूक न लागणे, काही वेळा नुसता कोरडा खोकला येणे
अपचनाची कारणे :
* तेलकट, अतिस्निग्ध पदार्थ, अती मसालेदार चमचमीत पदार्थ खाणे, अतिशय गोड खाणे.
* अतिताण, तणाव, अतिकाळजी, नराश्यग्रस्तता या सर्वामुळे अपचनाचा विकार वाढतो.
* वेदनाशामक औषधे, स्टिरॉईड्स यांचा अतिरिक्त वापर
*  जठरातून पोटातील आम्लपाचक रस अन्ननलिकेत येणे.
* शरीरात पाचक रसांचा अभाव किंवा कमतरता
या सर्वामुळे पोटात अपचन होऊ शकते. पुढील काही भागांमध्ये आपण यातील काही आजारांचा वेध घेऊ.
डॉ. अविनाश सुपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2015 1:10 am

Web Title: digestion
Next Stories
1 बॉक्स ऑफिस : लो मैं आ गया!
2 आगामी : आंतरराष्ट्रीय सिनेमात इम्रान हाश्मी
3 नटरंग : ‘माझं नाटक परंपरांना प्रश्न विचारणारं..’
Just Now!
X