बऱ्याच दिवसापासून लिहावंसं वाटत होतं, पण संभ्रमात होतो. काही गोष्टी कागदावर उतरवून इतरांशी वाटून घेतल्या की मन हलकं होतं, घुसमट पूर्ण थांबली नाही तरी घुसमटीला छिद्र तरी पाडता येते, तेवढेच मन रिते होते. आयुष्यातील काही आठवणी जाता जात नाहीत, अशीच एक आठवण स्वप्निलची. स्वप्निलची आठवण आली की मी आणि मीनल आम्ही दोघे शून्यात जातो अन् डोळ्यांच्या पापण्या ओल्या होतात. कधी भेटला होता तो शेवटचा ते फारसं आठवत नाही, पण बहुतेक विरार गाडीत तो नालासोपाऱ्यात चढला तीच बहुधा शेवटची भेट. आणि स्वप्नजा, ती कुठे असेल आता? आठ-नऊ वर्षांपासून तिचाही संपर्क नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वप्निल, जसे नाव तसाच चेहरा, एकदम स्वप्निल. गोरा अन् हसरा. मीनलबरोबर मीरारोड येथील रॉयल कॉलेजला एकत्र होता. स्वप्निल, मीनल अन् स्वप्नजा या तिघांचा ग्रुप. मी सोयरीक होण्याअगोदर मीनलला कॉलेजमध्ये भेटायला जायचो तेव्हा स्वप्निल अन् स्वप्नजाशी भेट व्हायची अन् मनसोक्त गप्पाही. स्वप्निल नालासोपाऱ्याला राहायचा, मला वरचेवर मदत करायचा. पुढे कळलं की, स्वप्निल अन् स्वप्नजा दोघेही एकमेकांत गुंतले आहेत. हसऱ्या डोळ्याच्या स्वप्निलसाठी घाऱ्या डोळ्यांची गालावर खळी पडणारी गोरी अन् शिडशिडीत स्वप्नजा अगदी अनुरूप अशीच होती. कधी एकत्र असताना चेष्टा-मस्करी करताना स्वप्नजा स्वप्निलच्या पाठीत धपाटा मारायची, ते पाहून गंमत वाटायची. स्वप्निल हसायचा तेव्हा जणू गुलमोहर फुलायचा अन् स्वप्नजाचे हसणे म्हणजे प्राजक्ताचा सडा.
आमचं प्रकरण सोयरीकीपासून लग्नापर्यंत जेवढय़ा सहजपणे पुढे गेलं, तेवढा सोपा प्रवास स्वप्निल अन् स्वप्नजाच्या वाटेला आला नाही. जेव्हा त्यांच्या प्रेमाची बातमी स्वप्नजाच्या घरी कळली, तेव्हापासून तिच्या घरच्यांचा विरोध सुरू झाला. जात अन् कूळ आडवे आलं. आम्ही त्यांना पाठीशी घालायचो, हेही बहुधा त्यांना पसंत नसावं. आमच्या लग्नाला जेव्हा दोघे आले होते, तेव्हा मी त्यांना सांगून टाकलं होत की, बिनधास्त कोर्ट मॅरेज करा, आम्ही दोघे साक्षीदार म्हणून तुमच्या लग्नाला येतो. पण सुदैवाने बरीच मनधरणी करून दोघांच्या घरच्यांना राजी करण्यात ते यशस्वी झाले अन् त्यांचा साखरपुडा झाला.
नंतर फोनवर गप्पा व्हायच्या, पण भेटणं कमी झालं होतं. मग एक दिवस त्यांच्या लग्नाची पत्रिका हाती आली. बोरिवलीला कोणत्या तरी हॉलवर त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. किती गोड हसत होते दोघे. माझ्या मोठय़ा लेकीच्या बारशाला जेव्हा ते घरी आले होते, ते चित्र मला अजून डोळ्यासमोर आठवते. हातात मुलीसाठी आणलेल्या भेटवस्तू अन् चेहऱ्यावरील स्वप्निल हास्य हे विसरता विसरणे शक्य नाही. स्वप्नजाच्या गालावरची खळी तितकीच गोड अन् स्मरणात राहणारी. मुलीसाठी झोपायची गादी, खेळणी अन् कपडे असा खर्चीक अहेर देऊन त्यांनी बारशाचा कार्यक्रम आमच्या कुटुंबातील व्यक्तीसारखा डोळ्यात साठवला होता.
त्या वेळी मी वांद्रे येथील बीकेसी कार्यालयात कामाला होतो, स्वप्निलसुद्धा वांद्रे येथील एका नामांकित कंपनीत रुजू झाला होता. जुलै २००६चा तो महिना होता, तारीख ११ जुलै. नेहमी दादरला डाऊन जाऊन विरार लोकल पकडणाऱ्या स्वप्निलने त्या दिवशी वांद्रे येथून चर्चगेटवरून येणारी विरार गाडी पकडली होती. सायंकाळी ६.३०च्या सुमारास मोबाइल खणखणू लागले अन् एकापाठोपाठ एक ट्रेनमधील बॉम्बस्फोटाच्या बातम्या कानी पडू लागल्या. सहजच त्या रात्री स्वप्निलला मेसेज केला ‘होप यू आर फाइन’, पण उत्तर काही आलं नाही. दोन दिवस निघून गेले, पण मनात शंकेची पाल चुकचुकत राहिली. स्वप्निलचा फोन बंद येत होता अन् स्वप्नजाचाही काही संपर्क होत नव्हता.
दुसऱ्या दिवशी त्याच्या भावाचा फोन आला अन् स्वप्निल बॉम्बस्फोटात गेल्याची बातमी कळली. क्षणभर माझ्या पायाखालची जमीन सरकली. असं काही होईल असे वाटले नव्हते. मोठा धीर धरून ती वाईट बातमी मी मीनलला सांगितली. दोघे ओक्साबोक्शी रडलो. अवघ्या एक वर्षांचा संसार करून स्वप्निल स्वप्नजाला एकटीला सोडून निघून गेला होता, कायमचा कधीही न परतण्यासाठी. संध्याकाळी स्वप्निलचे नालासोपाऱ्यातील नवीन घर शोधून काढले. संपूर्ण इमारतीत शुकशुकाट होता. इमारतीच्या पायथ्याशी त्याच्या अकाली जाण्याची बातमी लिहिली होती. त्याच्या लहान भावाने दार उघडले, घरात भयाण शांतता होती अन् एका टेबलावर हार घातलेला स्वप्निलचा फोटो. स्वप्नजाला भेटायचं होतं, पण तिला माहेरी आईकडे घेऊन गेल्याचं कळलं. आमच्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता. काही दिवसांनतर मीनलने तिच्या आईकडे फोन केला, पण ती भेटण्याच्या अन् बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हती. आमचा गुलमोहर अकाली कोमेजून गेला होता अन् अल्लड प्राजक्त? त्याचा गंध अन् फुलणं?
स्वप्नजाला भेटून तिला सामोरे जाण्याचे धाडस न माझ्यात होते न मीनलमध्ये. तिला आमची गरज आहे, हे मनोमनी वाटत होते, पण आम्ही भेटल्याने ती कोसळेल हेही खात्रीने कळत होते. आज स्वप्नजा कुठे आहे, कशी आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, काही माहीत नाही, तिचा काही संपर्कही नाही. तिला न भेटल्याची एक खंत अन् सल मनाला अजून टोचत आहे. असेही वाटते की आता तिने तिचे नवीन आयुष्य सुरू केले असेल, तर उगाच आम्ही तिला भेटून तिचा कटू भूतकाळ तिच्या पुढे का उभा करू? फुलली असेल ती नव्याने, ते बहरू दे तिला तिच्या नव्या आयुष्यात. कधी तरी जुन्या आठवणीत रमताना आठवणीच्या पाऊलवाटेवर स्वप्निल भेटतो अन् आमच्या मनाचा बांध सुटतो. अश्रू डोळ्यांतून सावरत असताना नकळत डोळ्यांसमोर उभी राहते ती घाऱ्या डोळ्यांची, गालावर खळी पडणारी स्वप्नजा. एक आर्त सूर मनातल्या मनात टाहो फोडतो अन् विचारतो, ‘स्वप्नजा तू कुठे आहेस?’ आम्हाला तुला भेटायचे आहे.
सचिन मेंडिस

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dream
First published on: 27-03-2015 at 01:22 IST