News Flash

आइन्स्टाइनचे अमेरिकेतील घर

जागतिक व्यापारीकारणांमुळे आणि विशेषत: संगणक युगामध्ये ‘हे विश्वचि माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे नातेवाईक, मुले, मुली, भावंडे आता परदेशी...

| November 7, 2014 01:13 am

जागतिक व्यापारीकारणांमुळे आणि विशेषत: संगणक युगामध्ये ‘हे विश्वचि माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे नातेवाईक, मुले, मुली, भावंडे आता परदेशी नोकरीनिमित्त किंवा उच्च शिक्षणासाठी युरोप, ऑस्ट्रेलिया आणि विशेषत: अमेरिका येथे जात आहेत, आणि स्थायिक पण होत आहेत. त्यामुळे भारतातील त्यांची भावंडे, आई-वडील, मित्रमंडळी परदेशी सहजपणे जात-येत आहेत. परदेशी गेल्यावर त्या देशातील प्रमुख शैक्षणिक स्थळे ते आवर्जून पाहात आहेत. विशेषत: अमेरिकेत गेल्यावर नेहमीपेक्षा वेगळे म्हणजे ज्या अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी नष्ट करून मानवाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला त्यांचे घर, प्रेसिडंट रुझवेल्ट यांची लायब्ररी, पृथ्वीतलावरील सर्वात विद्वान मानव म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे प्रिस्टॉन येथील घर-विद्यापीठ अशी अनेक स्थळे सांगता येतील.

माझ्या या वर्षीच्या भेटीमध्ये मी अल्बर्ट आइन्स्टाइन अमेरिकेमध्ये असताना ज्या घरांमध्ये राहत होते ते घर व जेथे त्यांचे संशोधन चालू होते ती प्रिस्टॉन विद्यापीठ पाहाण्याचे ठरविले होते. प्रिस्टॉन विद्यापीठ न्यूयॉर्कपासून जवळच आहे. या विद्यापीठाचा परिसर सुंदर आणि अनेक प्रकारच्या उंच-उंच झाडांनी भरलेला आहे. याच विद्यापीठामध्ये आइन्स्टाइन यांचे संशोधन झाले.

आइन्स्टाइन १७ ऑक्टोबर १९३३ मध्ये वयाच्या ५४ व्या वर्षांमध्ये आपला देश सोडून न्यूयॉर्क बंदरात आले. प्रिस्टॉन-टाऊनमध्ये पिकॉक इन या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय केलेली होती. थोडय़ा अंतरावर प्रिस्टॉन विद्यापीठ होते. तेथे एका कॉर्नरवर त्यांना तात्पुरते ऑफिस देण्यात आलेले होते. ऑफिस देताना त्यांना विचारण्यात आले ‘आपल्याला ऑफिससाठी कशाची जरुरी आहे.’ आइन्स्टाइन म्हणाले, ‘मला एक टेबल व एक खुर्ची द्या. कागद आणि पेन्सिल द्या आणि हो, मला एक मोठे बास्केट द्या त्यामध्ये माझ्या अनेक चुका टाकता येतील.’

प्रिस्टॉन टाऊनमध्ये आल्यावर त्यांनी एक दुमजली घर भाडय़ाने घेतले होते. नंतर त्यांनी तेच घर विकत घेतले. साधारणत: सफेद रंगाचे घर फारसे उंच नव्हते. पुढे लहान अंगण होते व बाजूला झाडे होती. या घराचा नंबर होता ११२ मेरसर स्ट्रीट. जगातील एक सर्वश्रेष्ठ विद्वान, असामान्य बुद्धिवैभव असणारी व्यक्ती येथे राहत आहे, असे त्या वास्तूलाही माहिती नव्हते. मुख्य रस्त्यावर पुढे, व्हरांडय़ाच्या मध्ये आकाशातील ढग दिसत असत, असे त्याचे वर्णन वाचायला मिळाले. समोरच्या भिंतीवर दोन-तीन फोटो होते. त्यात एक फोटो न्यूटन यांचा होता. दुसरा फोटो महात्मा गांधींचा होता.

घराचा मुख्य हॉल एल्साने आणलेल्या जर्मन फर्निचरने भरलेला होता. पहिल्या मजल्यावर एक लहानशी लायब्ररी होती. त्याच्या बाजूची खोली ही ऑफिस म्हणून वापरली जाई. येथूनच हेलन डय़ूकास पत्रव्यवहार सांभाळत असे. तेथेच एकुलता एक असलेला टेलिफोन होता. मागील बाजूला खिडकीवर चित्रे लावलेली होती, त्यामुळे मागील भाग दिसत नव्हता. दोन्ही बाजूंचे छत उंच होते. बाजूच्या ऑफिसमध्ये एक लाकडाचे टेबल, पेन्सिल व धूम्रपानासाठी पाइप ठेवलेले असे. समोरच्या खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसत असे, तेथे एका आरामखुर्चीमध्ये आइन्स्टाइन आकाशाकडे डोळे लावून आपल्याच विचारांत तल्लीन होत असत आणि त्यांच्या मांडीवर असंख्य कागद इतस्तत: पडलेले असत. ते नेहमी म्हणत असत, ‘विद्वतेला मर्यादा असतात, परंतु कल्पनाशक्तीची ताकद सर्व जगाला हलविणारी असते.’

त्यांच्या या घरात काही पक्षी व प्राणी होते, असा उल्लेख सापडतो. त्यांच्याकडे एक पोपट होता. त्याचे नाव होते बिबो, त्याला नेहमी पशुपक्षी डॉक्टरांची औषधे चालू असायची. त्यांच्याकडे एक मांजरपण होते. त्याचे नाव होते टायगर. त्यांनी एक कुत्रापण पाळलेला होता.

हे त्यांचे घर विद्यापीठाजवळच होते. शक्यतो आइन्स्टाइन चालतच विद्यापीठात जात असत. केव्हा केव्हा ते सायकलवर बसूनपण जात असत. ज्या वेळी ते विद्यापीठात चालत जात असत, त्या वेळी सर्व टाऊनमधील जनता त्यांना आदराने वंदन करत असे; परंतु ही जनता येथे का जमली आहे हे त्यांना समजत नसायचे. ते आपल्याच विचारात असायचे. एकदा विद्यापीठामध्ये एका व्यक्तीने फोन केला व एका डिपार्टमेंटच्या मुख्य व्यक्तीला फोन जोडून द्यावा, अशी विनंती केली. स्वागतिकेने सांगितले, आताच फोन जोडून देणे शक्य नाही. माफी करावी. नंतर त्या व्यक्तीने आइन्स्टाइनच्या घराचा पत्ता विचारला. स्वागतिका म्हणाली, आइन्स्टाइनच्या घराचा पत्ता आम्हाला देता येणार नाही. त्या वेळी ती व्यक्ती म्हणाली, ‘मुली, मीच आइन्स्टाइन आहे. मला घरी जावयाचे आहे. म्हणून पत्ता विचारला.’ स्वागतिकेने कपाळाला हात लावला व आइन्स्टाइनना त्यांच्या घरी पोहोचवले. सध्या हे घर एका अमेरिकन व्यक्तीने घेतलेले आहे. हे घर आम्ही प्रत्यक्ष पाहिले. आइन्स्टाइनची इच्छा होती की, या घराचे स्मारक वगैरे काही करू नये. त्यामुळे हे घर सर्वसाधारण घरासारखे दिसते. या घरामध्ये एके काळी पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान व्यक्ती राहात होती असे वाटतपण नाही. या घराचा आम्ही फोटो काढला नाही. पाश्चात्त्यांच्या शिष्टाचारांचा मान करून आम्ही हा मोह टाळला; परंतु या भूमीवरील मातीला मात्र आम्ही मन:पूर्वक वंदन केले.

या संदर्भात विद्वान व्यक्ती ईश्वरास मानते की नाही? असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जातो. त्यांना एकदा हा प्रश्न थेट विचारला गेला. तुम्ही देवाला, परमेश्वराला मानता का? परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल आइन्स्टाइननी कुठेही स्पष्ट असे विचार मांडलेले दिसत नाहीत. खरं तर विषयाशी संबंध नसताना हा मुद्दा मी का लिहीत आहे याला एक कारण आहे. पिस्टॉन विद्यापीठातील आइन्स्टाइनच्या पुतळय़ास अभिवादन करण्यासाठी मी गेलो असताना त्या चबुतऱ्यावर असे लिहिले आहे की, मला या टाऊनमध्ये संधी मिळाली ती फेट (Fate) मुळे, तसेच या घरामध्ये राहण्याची संधी मिळाली ती फेटमुळेच नाही काय? हे घर म्हणजे मानवाच्या बुद्धिमत्तेच्या असामान्य क्रांतीचे तीर्थस्थान आहे हे निश्चितच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2014 1:13 am

Web Title: einstein home in america
टॅग : Scientist
Next Stories
1 माउली!!
2 ७ ते १३ नोव्हेंबर २०१४
3 ग्लॅमर विरुद्ध वास्तव
Just Now!
X