0shitalमार्च आणि एप्रिल म्हणजे शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांचे महिने. सगळीकडे शांत, गंभीर वातावरण. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींची संध्याकाळची खेळाची वेळ अभ्यासाने घेतलेली असते, तर महाविद्यालयीन विद्यार्थी एकमेकांकडून नोट्स झेरॉक्स करण्यात मग्न असतात. हल्ली व्हॉट्स अ‍ॅपमुळे ग्रुपवर छायाचित्र पाठवली की एकरकमी काम होते. झेरॉक्सचे पसे वाचतात. सगळ्यांना अभ्यासक्रम मिळतो, नोट्स मिळतात. काम फत्ते!!! बापरे काय भयंकर आहे हे! माझी पिढी फारच भाग्यवान आहे, कारण दहा वर्षांपूर्वी ही सुविधा उपलब्ध नव्हती. असो तर मुद्दा हा आहे की परीक्षा म्हटल्यावर सगळीकडेच गंभीर, टेन्शनचं वातावरण बघायला मिळतं.

गेल्या काही वर्षांपासून शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांप्रमाणेच संगीताच्या नृत्याच्या परीक्षा पद्धतीकडेसुद्धा गांभीर्याने पाहायला सुरुवात झाल्याचे चित्र आपण बघू दिसते आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि एप्रिल-मे म्हणजे सर्व संगीत, नृत्य वर्गामध्ये परीक्षांचा माहोल असतो. या परीक्षा पद्धतीचाच आढावा आजच्या लेखात घेतला आहे.
कला ही मानवाला मिळालेली एक देणगी आहे. गायन, वादन, नृत्य, नाटय़ या प्रयोगशील कला आहेत. या कला प्रयोगरूपात आपल्यासमोर सादर होतात म्हणून त्यांना प्रयोगजीवनी कला असे म्हटले जाते. या कलांचा आस्वाद घेतल्यावर मनाला आनंद मिळतो. त्या शिकण्याची इच्छा निर्माण होते; आणि घराजवळच असलेल्या एखाद्या नृत्य, संगीत वर्गामध्ये आपली अथवा आपल्या पाल्याची शिकवणी सुरू होते. वर्ग सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनंतर असे कळते की, आता पहिली परीक्षा द्यायची वेळ आली आहे. म्हणता म्हणता पहिली परीक्षा उत्तीर्णही होते. अचानक नृत्य वर्गाला जाण्याचा उत्साह वाढलेला दिसतो. तीन परीक्षा होईपर्यंत उत्साह, गंभीरपणा फारच दिसून येतो. कारण तोपर्यंत अभ्यासक्रम तसा सोपा असतो. आठवडय़ाचे दोन दिवस नृत्यवर्गाला जाऊन केलेला सराव या तीन परीक्षांपर्यंत पुरतो. जसजशा पुढच्या परीक्षा येतात, शाळेचा अभ्यास वाढतो तशी संगीत, नृत्य वर्गातील संख्या कमी होते. पालक म्हणतात आता दहावी / बारावीचे वर्ष आहे, तुझे ते नृत्य वर्ग बंद कर. पाल्यासमोर एकच पर्याय ठेवल्यामुळे नृत्यवर्गातील संख्या अशा रीतीने कमी होते. पालकांना अशा वेळी एक प्रश्न विचारावासा वाटतो की, का बंद करायचा वर्ग? कलेला कमी महत्त्व का द्यावं? शाळा, महाविद्यालयाची परीक्षा महत्त्वाची मग कलेची का नाही? की दोन गोष्टी एका वेळी झेपणार नाही असं स्वत: पालक ठरवतात आणि शाळेची परीक्षा अर्थातच जास्त महत्त्वाची आणि नृत्याची परीक्षा देऊन काय करणार? असं म्हणून स्वत:ची आणि पाल्याची खोटी समजूत काढतात.
या परीक्षा पद्धतीचे अनेक फायदेही आहेत. परीक्षा असल्यामुळे आपोआपच त्या विषयाची ओळख म्हणून का होईना अभ्यास केला जातो. प्रत्येक परीक्षेनुसार जो अभ्यासक्रम आखलेला असतो तो त्या त्या परीक्षेची काठीण्यपातळी बघून तयार केलेला असतो. या अभ्यासक्रमामुळेच वेगवेगळ्या, नवीन गोष्टी मुलांना शिकायला मिळतात. परीक्षा द्यायची असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा त्याकडे गंभीरपणे बघतात. समोर लक्ष गाठायचे असल्यामुळे एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पुढच्या परीक्षांना परफॉर्मन्स द्यायचा असतो. त्या दृष्टीनेही विद्यार्थ्यांची तयारी होते. आपण जे काही शिकतोय ते मुद्देसूदपणे शब्दांतून व्यक्त करण्याचीही सवय परीक्षा पद्धतीमुळे होऊ शकते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या मूल्यमापनासाठीचेही मानदंड मिळतात. अनेक विषयांची ओळख होते. वेगवेगळे मुद्दे हाताळले जातात. नृत्यांच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गायन आणि वादन कलेचीही तोंडओळख होते. सद्धांतिक बाजूचीही ओळख या परीक्षांमुळे होते. कारण प्रात्यक्षिक आणि सद्धांतिक या दोन्ही बाजूंना नृत्यांच्या परीक्षांमध्ये समान महत्त्व आहे. आताच्या काळात या परीक्षा पद्धतीची एक सकारात्मक बाजू अशी आहे की, तुमच्या पाल्याच्या गायन, वादन, नृत्याच्या चार परीक्षा उत्तीर्ण झाल्या असतील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना, सांस्कृतिक कोटय़ामध्ये राखीव असलेल्या जागांमधून त्या विद्यार्थ्यांला प्रवेश मिळणे सुलभ होते.
परीक्षा पद्धती ही वर्तमानकाळाची गरज आहे असे मला वाटते. कला ही आनंदासाठी शिकायची असते, कलेचा आस्वाद घ्यायचा असतो हे जरी कितीही बरोबर असले तरीही आजच्या काळात कागदाला महत्त्व आहेच. कारण आज अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी तुम्ही किती उत्तम गाता अथवा नृत्य करता हे न पाहता तुमचे नृत्याचे शिक्षण किती झाले आहे, किती प्रमाणपत्र आहेत, किती पदव्या मिळाल्या आहेत हे प्रथम पाहिले जाते. म्हणूनच आजच्या जगात जगण्यासाठी परीक्षा पद्धती ही महत्त्वाची आहेत.
परीक्षेला दुसरी बाजूही आहे. परीक्षांमुळे साचेबद्ध शिक्षणाला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. दुसऱ्या परीक्षेला सहा तोडे, एक परण? असेल तर सातवा तोडा मुलांना शिकवला जात नाही. जेवढा अभ्यासक्रम नेमून दिलेला असतो तेवढाच शिकवला जातो. कारण तेवढाच कसाबसा परीक्षेच्या वेळेपर्यंत पूर्ण होतो. गुरू-शिष्य परंपरेमध्ये ज्याप्रमाणे कला म्हणून बघितले जायचे किंवा ज्या पद्धतीचे शिक्षण त्या वेळी दिले जायचे तशा पद्धतीचे शिक्षण द्यायचे झाल्यास तीन वर्षांतून एक परीक्षा द्यावी लागेल. असे केल्यास वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्यास फारच कमी वेळ लागेल.
आपण इतर ठिकाणी काळाप्रमाणे जसे पुढे जातोच त्याचप्रमाणे याही विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास परीक्षा पद्धतीचे महत्त्व आपल्याला नक्की पटेल, याची मला खात्री वाटते.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू