यावेळच्या फूटबॉल विश्वचषकात वेन रुनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, सेझ फॅब्रिगास, स्टीव्हन गेर्रार्ड, मारिओ बेलाटोली यांच्यासारख्या भरवशाच्या खेळाडूंनी लाजिरवाणी कामगिरी केली, तर मेस्सीसारख्या काही खेळाडूंनी आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ केला.

ब्राझिलमधली आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघातर्फे आयोजित विश्वचषक स्पर्धा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत लिओनेल मेस्सी, वेन रुनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, स्टीव्हन गेर्रार्ड, मारिओ बेलाटोली यांच्यासारख्या महारथींकडून अव्वल दर्जाची कामगिरी अपेक्षित होती. व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात अब्जावधी डॉलर्स मोजले जातात अशा या खेळाडूंच्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीविषयी त्यांच्या देशांचे प्रशिक्षक व संघटकांबरोबरच हे खेळाडू ज्या क्लबकडून व्यावसायिक स्पर्धेत खेळत असतात अशा क्लबच्या मालकांनाही उत्सुकता असते. कारण आपण ज्या खेळाडूवर पैसे लावले आहेत, त्या खेळाडूमध्ये अव्वल दर्जाचा खेळ करण्याची क्षमता आहे की नाही हे संबंधित क्लबच्या मालकांना माहीत करून घ्यायचे असते. खेळाडूंच्या कामगिरीवरूनच आगामी काळात खेळाडूंकरिता आपण किती पैसे लावायचे याचे आराखडे त्यांना ठरवायचे असतात.
व्यावसायिक स्पर्धेत क्लबकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशाकडून खेळताना लाजिरवाण्या कामगिरीस सामोरे जावे लागले. विश्वचषक स्पर्धेत क्लबनिष्ठेपेक्षा देशाभिमान अधिक महत्त्वाचा असतो. फुटबॉलसारख्या सांघिक खेळामध्ये आपल्या संघास विजय मिळवून देण्यासाठी एकमेकांमधील समन्वयास अधिक महत्त्व आहे. दुर्दैवाने वेन रुनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, सेझ फॅब्रिगास, स्टीव्हन गेर्रार्ड, मारिओ बेलाटोली यांच्यासारख्या महान व महागडय़ा खेळाडूंनी देशाभिमानाचे महत्त्व ओळखले नसावे. आपल्या देशाचे विश्वचषक स्पर्धेतील स्थान आपल्यावर अवलंबून आहे याची जाणीव त्यांना नसावी. त्यामुळेच की काय या खेळाडूंनी स्वत: खराब कामगिरी केली, पण आपल्या संघावरही पराभव ओढवून घेतला.
स्पेन या गतविजेत्या संघाकडून यंदाही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात होती. स्पेन, जर्मनी व इंग्लंड या देशांमध्ये फुटबॉल स्पर्धाची मांदियाळी असते. सतत तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. या स्पर्धामध्ये जगातील अनेक नामवंत खेळाडू भाग घेत असतात. साहजिकच या स्पर्धा म्हणजे अनुभवी व उदयोन्मुख खेळाडूंसाठी अनुभव समृद्धीसाठी सुवर्णसंधीच मानली जाते. स्पेन संघातील डेव्हिड व्हिला, डेव्हिड सिल्वा, सेझ फॅब्रिगास, इकेर कॅसिलास हे खेळाडू व्यावसायिक स्पर्धेच्या क्षेत्रातील अत्यंत महागडे खेळाडू मानले जातात. त्यांच्याकरिता अनेक पुरस्कर्त्यांमध्ये अहमहमिका लागली असते. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत हे खेळाडू कामगिरीच्या दृष्टीने ‘हिरो’ च्या ऐवजी ‘झिरो’ ठरले. साखळी गटातील पहिल्याच सामन्यात त्यांच्यापुढे नेदरलँड्सचे आव्हान होते. चार वर्षांपूर्वी स्पेनने अंतिम फेरीत नेदरलँड्सवर मात करीत अजिंक्यपद मिळविले होते. त्यामुळेच यंदा त्यांच्यातील लढतीविषयी कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. नेदरलँड्सने गतवेळच्या पराभवाचे उट्टे काढताना स्पेनचा ५-१ असा दारुण पराभव केला. त्यांच्या कॅसिलास या अव्वल दर्जाच्या खेळाडूस अपेक्षेइतके भक्कम गोलरक्षण करता आले नाही. त्याची कामगिरी खूपच खराब झाली व संघाच्या मोठय़ा पराभवात त्याचाही हातभार मोठा होता. पहिल्याच लढतीत एवढी मोठी हार स्वीकारल्यामुळे स्पेनच्या खेळाडूंना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. मानसिकदृष्टय़ा खचलेले स्पेनचे खेळाडू जागे झालेच नाहीत. कोणीही येते आणि थप्पड मारून जात आहे, अशीच त्यांची अवस्था झाली. त्यामुळेच की काय त्यांनी साखळी गटात चिलीसारख्या तुलनेने दुय्यम असलेल्या संघाकडूनही पराभव स्वीकारला. या पराभवामुळे स्पेनचे आव्हान साखळी गटातच संपुष्टात आले.
स्पेनप्रमाणेच इंग्लंडलाही साखळी गटात पराभूत होण्याची नामुष्की स्वीकारावी लागली. इंग्लंड हा देश फुटबॉलचे माहेरघर मानला जातो. तेथील क्लबकडून खेळण्यासाठी अन्य सर्व देशांमधील खेळाडू खूप उत्सुक असतात. तेथे अनेक व्यावसायिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळावी हे अनेक नामवंत खेळाडूंचे स्वप्न असते. अशा स्पर्धामधून तयार झालेले वेन रुनी, स्टीव्हन गेर्रार्ड, लिटन बेन्स यांच्यावर इंग्लंडची मोठी भिस्त होती. या खेळाडूंच्या जोरावर आपण विश्वचषक जिंकू शकू, अशी त्यांना मोठी अपेक्षा होती.
रुनी व गेर्रार्ड यांना आपल्या क्लबमध्ये घेण्यासाठी अनेक व्यावसायिक क्लबमध्ये जबरदस्त चढाओढ दिसून येते. त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर करण्यासाठी अनेक कंपन्या अब्जावधी युरो खर्च करतात. मात्र या दोन्ही खेळाडूंना ब्राझीलमध्ये आपले कौशल्य दाखविण्यात सपशेल अपयश आले. क्लब संस्कृती व देशाभिमान यामध्ये जमीन-अस्मानइतका फरक असतो हे त्यांना कळलेच नाही. आपल्या कामगिरीवर देशाचे आव्हान अवलंबून आहे हे त्यांना कधी कळणार हाच प्रश्न आहे.
इटली या माजी विजेत्या संघासही साखळी गटातच बाद होण्याच्या लाजिरवाण्या कामगिरीस सामोरे जावे लागले. जॉर्जिओ चेलिनी, मारिओ बेलाटोली, आन्द्रियास पिर्ली यांच्यासारख्या दर्जेदार खेळाडूंची मात्रा येथे चाललीच नाही. महागडय़ा खेळाडूंमध्ये स्थान असलेल्या बेलाटोली याला आपला करिश्मा दाखविता आला नाही. खरंतर सांघिक खेळामध्ये इटली हा अव्वल दर्जाचा संघ मानला जातो. मात्र उरुग्वेविरुद्धच्या निर्णायक लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हा सामना गाजला तो उरुग्वेच्या लुईस सोरेझ याने चेलिनी याच्या खांद्यास घेतलेला चावा. हे प्रकरण चांगलेच गाजले. प्रतिस्पर्धी खेळाडूंचा चावा घेण्याबाबत कुविख्यात असलेल्या सोरेझ याने येथेही आपल्या दुष्कर्माचा प्रत्यय घडविला. त्याच्यावर अल्पकाळ बंदीची कारवाई झाली आहे. खरंतर अशा खेळाडूंवर तहहयात बंदीची कारवाई करणेच योग्य असते. मात्र फिफाच्या पदाधिकाऱ्यांनी ते धाडस केले नाही.
रुनी, बेलाटोली यांच्याप्रमाणेच पोर्तुगालच्या रोनाल्डो, मिग्वेल व्हेलोसो व पेपे यांनाही आपली जादूमय कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेपूर्वी रोनाल्डो याला दुखापतीस सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता होती. तथापि स्पर्धेपूर्वी तो तंदुरुस्त झाला व स्पर्धेत सहभागी झाला. फ्री किकद्वारा गोल करण्याबाबत हुकमी खेळाडू समजला जाणारा रोनाल्डो हा ब्राझीलमध्ये प्रभावहीन ठरला. त्याला येथे स्वप्नवत कामगिरी करता आली नाही.
भरवशाच्या या खेळाडूंनी केलेल्या लाजिरवाण्या कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना), अर्जेन रॉबेन, रॉबिन व्हॅनपर्सी (नेदरलँड्स), करीम बेन्झेमा, मथायू व्हेलब्युएना (फ्रान्स), मिरालेम पीजानिक (बोस्निया), जेम्स रॉड्रिक्स (कोलंबिया), थॉमस म्युल्लर (जर्मनी), झेर्दान शाकिरी (स्वित्र्झलड) या खेळाडूंनी आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करताना आपल्या देशास कसा विजय मिळविता येईल यास प्राधान्य दिले आहे. मेक्सिकोविरुद्धच्या बाद फेरीच्या लढतीत रॉबेन याने आपल्या संघास पेनल्टी मिळवून दिली व हीच पेनल्टी त्याच्या संघास रोमहर्षक विजय मिळविण्यासाठी तारणहार ठरली. रॉड्रिक्सने या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातच पाच गोल करीत आपला करिश्मा दाखवून दिला आहे. त्यामुळेच त्याच्या कोलंबियास बाद फेरीत स्थान मिळविता आले. अमेरिकेचा जेर्मीन जोन्स हा ३२ वर्षीय खेळाडू ब्राझीलमध्ये आपल्या वेगवान चालीबाबत ख्यातनाम झाला आहे. आक्रमणाच्या शैलीबरोबरच उत्कृष्ट बचाव करण्याबाबतही त्याने ख्याती मिळविली. गुर्लिमो ओचोवा या मेक्सिकोच्या गोलरक्षकाने साखळी गटात अतिशय प्रभावी कौशल्य दाखविले होते. दुर्दैवाने बाद फेरीत तो अपेक्षेइतका भक्कम बचाव करू शकला नाही. बचावरक्षकांमध्ये अग्रगण्य खेळाडू म्हणून नेदरलँड्सच्या डॅले ब्लाइण्ड याचे नाव सातत्याने घेतले जाते. मेक्सिकोविरुद्धच्या बाद फेरीच्या लढतीत त्याने बचाव फळीत अतिशय मोलाची कामगिरी केली. घाना संघास बाद फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र त्यांच्या आंद्रे एयेवू याने दाखविलेली चमक खूपच प्रशंसनीय होती. डाव्या फळीत खेळताना तो जोरदार चाली करण्यात माहीर ठरला. त्याला अन्य सहकाऱ्यांकडून अपेक्षेइतकी साथ मिळाली असती तर कदाचित त्याच्या संघास उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविता आले असते. क्रिस्तियन गाम्बोआ (कोस्टारिका), गॅरी मेदेल (चिली), इनेर व्हॅलेन्सिया (इक्वेडोर), टीम काहिल (ऑस्ट्रेलिया), गेव्र्हिन्हो (आयव्हरी कोस्ट) यांनीही आपल्या अनोख्या शैलीने हा विश्वचषक गाजविला.
ही स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी सोनेरी संधी असते. काही खेळाडू ही संधी साधण्यात यशस्वी होतात, तर काही खेळाडू खराब कामगिरी करीत स्वत: या संधीचे मातेरे करतात.