हिंदी सिनेमांमधली गाणी हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कितीतरी गाणी आपण सहज जाताजाता गुणगुणतो. पण त्यांच्यामागे असलेल्या कित्येक गोष्टींबाबत आपण अनभिज्ञ असतो.

फिल्मी गीत हा आबालवृद्धांच्या आवडीचा विषय आहे. काही लोक तानसेन असतात, तर काही लोक कानसेन असतात. पण यांच्यामधली बरीचशी मंडळी फक्त श्रोते असतात. आपण एखादे गाणे ऐकतो याची पाश्र्वभूमी त्यांना क्वचितच माहिती असते.
फिल्मी गाण्यांशी (सिने-संगीत) संबंधित असलेले, संगीतकार, गीतकार, गायक/गायिका इ. सर्व माणसेच असतात व त्यांच्यात ईष्र्या, हेवेदावे, स्पर्धा, समज-गैरसमज इ.इ. साहजिक असतात व या कारणांनी येणारा दुरावा अगदी स्वाभाविक असतो. बऱ्याच फिल्मी गाण्यांना या दुराव्याची पाश्र्वभूमी लाभलेली असते, पण गाणे ऐकणाऱ्याला याविषयी अनभिज्ञता असते. या दुराव्यांच्या पाश्र्वभूमीवर गाण्यांचे किस्से पाहू.
संगीतकार- गायक/गायिका यांच्यातील दुरावा. यातले काही मोजके पण गाजलेले दुरावे असे.
सी. रामचंद्र – लता मंगेशकर
संगीतकार सी. रामचंद्र यांनी लतादिदींकडून अनेक अवीट गोडींची गाणी गाऊन घेतली. अनारकली, अलबेला, यास्मिन, आझाद, अमरदीप, बारिश, देवता इ. अनेक चित्रपटांत सदाबहार (लताची) गीते केवळ अविस्मरणीय! लताचा उदय होण्यापूर्वी अण्णासाहेबांनी ललिता देवलकर, अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम, सुरैया यांच्याकडून त्यांच्या नदिया के पार, पतंगा, नमूना, शहनाई, खिडकी इ.इ. चित्रपटांतील गीते गाऊन घेतली. पण लताशी त्यांचे टय़ुनिंग झाल्यावर त्यांनी वरील सर्वाना बाजूला केले (त्यांना एकदा शमशाद बेगमने ‘‘क्या अण्णासाहब, आप तो हमें भूल ही गये’’ असे म्हटले होते.) व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’पर्यंत हे टय़ुनिंग झकास होते, पण पुढे दोघांचे इगो आडवे आले. अण्णासाहेबांनी ‘लता केवळ एक गोड गळय़ाचा टेप रेकॉर्डर’ अशी तिची संभावना केली व त्यांच्या सर्व हीट-सुपरहिट गाण्यांचे श्रेय स्वत: घेतले. यामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन मोठा दुरावा निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी लताला वगळून नवरंगपासून बहुतांशी आशा भोसले (व सुमन कल्याणपूर) यांना गाणी दिली. त्यातील निवडक अशी!
* ‘तुम मेरे मैं तेरी’, ‘तुम सैंया गुलाबी फूल’, ‘आ दिल से दिल मिला ले’ इ.इ.
(सर्व नवरंग (१९५९), गीतकार भरत व्यास/ संध्या
* ‘गा रही है जिंदगी हर तरफ बहार है’ (आशा + महेंद्र कपूर)
(चित्रपट:- आँचल, गीतकार- प्रदीप) सुरेश कुमार + बेबी नंदा
* ‘मेरे जीवन में किरन बन के आने वाले’- (आशा + मन्ना डे)
(चित्रपट:- तलाक, गीतकार- प्रदीप/ राजेंद्रकुमार- कामिनी कदम )
* आजा रे आजा. (सरहद) (सुचित्रा सेन) (मजरूह सुलतान पुरी)
राजकमलच्या ‘स्त्री’ (१९६१) या चित्रपटात व्ही. शांताराम यांच्या मध्यस्थीमुळे अण्णासाहेब व लता पुन्हा एकत्र आले व अर्थात ‘ओ निर्दयी प्रीतम’ ‘आज मधुवातास डोले (मन्ना डे) बरोबर इ.इ. अशी अवीट गोडीची गाणी दिली. बहुरानी (१९६३) मध्ये ‘मैं जागू तुम सो जाओ’, ‘बलमा अनाडी मन भाये’ इ. सुमधुर गाणी दिली. बहुरानी १९६३ मध्ये आला (प्रदर्शित झाला), पण ही गाणी १९६० पूर्वीच रेकॉर्ड झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. १९६२च्या चीन युद्धाच्या पाश्र्वभूमीवरचे ‘ऐ मेरे वतन के लोगों (कवी प्रदीप)’ या ऐतिहासिक गीतानंतर सी. रामचंद्र व लताजी पुन्हा कधी एकत्र आले नाहीत व सी. रामचंद्र यांच्या संगीतातील जादू ओसरत चालली होती. या सर्व दुराव्यानंतर अण्णासाहेबांची कारकीर्द संपुष्टात आली.

दत्ताराम- लता मंगेशकर
दत्ताराम हे अत्यंत प्रतिभाशाली संगीतकार होते. ते शंकर-जयकिशन यांचे असिस्टंट होते. पण त्यांनी स्वतंत्रपणे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांचा ‘दत्तूचा ठेका’ हा प्रसिद्ध होता. परवरिश, संतान, कैदी नं. ९११ इ.इ. चित्रपटांत लता मंगेशकर यांची अवीट गोडीची सोलो व युगुलगीतं होती. पण कैदी नं. ९११ च्या वेळी त्यांचे मतभेद झाल्याने ( नेमके कारण कळले नाही) दत्ताराम यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटांत लताऐवजी प्रामुख्याने सुमन कल्याणपूर (सुमनताई) यांना घेतले. त्यांचे मन्ना डे व हसरत जयपुरी यांच्याशी विशेष टय़ुनिंग होते. त्यांची काही निवडक चित्रपटांतील गाणी खालीलप्रमाणे-
* ‘ना जाने कहां हम थे ना जाने कहां तुम थे..’ (सुमन + मन्ना डे)-चित्रपट: जिंदगी और ख्वाब, गीतकार- प्रदीप, (राजेंद्रकुमार- मीनाकुमारी)
* ‘ये नशिली हवा आ रहा है मजा’ (सुमन + मन्ना डे)
चित्रपट: नीली आंखे, गीतकार- गुलशन बावरा (अजित – शकिला)
* ‘ये दिन दिन है खुशी के आजा रे साथी मेरे जिंदगी के (सुमन + मन्ना डे)- चित्रपट: जब से तुम्हे देखा है, गीतकार- प्रदीप कुमार- गीता बाली)
* कहती है ये झुकी झुकी नजर.. ‘आज कोई आयेगा (सुमन कल्याणपूर)-चित्रपट: जिंदगी और ख्वाब, गीतकार- प्रदीप, (मीनाकुमारी)

ओ. पी. नय्यर – लता मंगेशकर
ओ.पी. नय्यर यांनी लता मंगेशकर यांना का गाणी दिली नाहीत याचे स्पष्ट कारण माहीत नाही. पण त्यांचा पहिला चित्रपट ‘आसमान’मध्ये लताजींनी गायन करण्यास नकार दिल्यामुळे (या चित्रपटातील गाणी गीता दत्त व आशा भोसले यांनी गायली आहेत) त्यांचा इगो दुखावला जाऊन पुढे त्यांनी लताजींना कधीही घेतले नाही. तसेच ‘मेहबूबा’ हा चित्रपट ‘रोशन’ यांनी अर्धवट सोडल्यानंतर तो ओ.पी. नय्यरकडे आला. त्या वेळी लताजींनी काही रिमार्क पास केल्यामुळे ओपी दुखावले गेले असेही कळते.

ओ. पी. नय्यर – आशा भोसले
ओ.पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनात आशा भोसले यांनी किती सुपरहिट गाणी दिली आहेत हे सर्वानाच माहीत आहे. ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ या चित्रपटादरम्यान त्यांच्यांत इगो प्रॉब्लेममुळे खूप दुरावा आला. इतका की ‘चैन से हमको कभी आपने सोने ना दिया..’ या गाण्याच्या फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड सोहळय़ाला आशाताईंची अनुपस्थिती खूप काही सांगून गेली. आशाताईंनंतर ओ.पी. नय्यर यांनी कृष्णा कल्ले, दिलराज कौर यांना घेऊन काही गाणी दिली, पण त्यात आशा भोसलेंची किमया नव्हती. शेवटी ते विस्मृतीच्या गर्तेत फेकले गेले.

ओ. पी. नय्यर- मोहम्मद रफी
मोहम्मद रफी यांनी ओ.पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनात गायलेल्या गाण्यांना तोड नाही. ‘तुमसा नही देखा’, ‘कश्मीर की कली’, ‘मेरे सनम’, ‘फिर वोही दिल लाया हू’, ‘हमसाया’, गुरू दत्तचे सर्व चित्रपट इ. चित्रपटांतील गाणी आजही फ्रेश वाटतात; पण एकदा (बहुतेक ‘सावन की घटा’ या चित्रपटाच्या वेळी) मोहम्मद रफी ओ.पीं.च्या रेकॉर्डिगला उशिरा पोहोचले व त्यापूर्वी कोण्या दुसऱ्या संगीतकारांकडे रेकॉर्डिग केल्याने ओ.पीं.ना प्रचंड राग आला व त्यांनी रेकॉर्डिगरुममध्येच ‘अब इसके बाद मै आप को कभी भी नही लूंगा’ असे निर्वाणीचे सुनवून त्या क्षणापासून त्यांच्याशी आपले संबंध तोडून टाकले (असे प्रत्यक्ष ओ.पीं.नीच आपल्या एका मुलाखतीत सांगितले.)
त्यानंतर ओ.पीं.नी बहुतेक सर्व गाणी महेंद्र कपूर यांना दिली, पण महेंद्र कपूरवर ते विशेष खूश नव्हते (कारण त्यांच्या मते त्याला मोहम्मद रफीची सर नव्हती.) ‘दिल और मोहोब्बत’, ‘कभी दिन कभी रात’, ‘किस्मत’, ‘मोहोब्बत जिंदगी है’, ‘बहारे फिर भी आयेगी’ (शीर्षक गीत), ‘ये रात फिरना आयेगी’ (काही गाणी) त्यांनी महेंद्र कपूरकडून गाऊन घेतली आणि महेंद्र कपूरनी आपल्या परीने खूप छान गायली; पण रफी असलेल्या गाण्यांची उंची पुन्हा ओ.पीं.ना कधी गाठता नाही आली.
ओ.पी. नय्यर – महेंद्र कपूरची काही गाणी खालीलप्रमाणे –
* हाथ आया तेरा मेरे हाथ में- (महेंद्र कपूर + आशा भोसले)
चि: दिल और मोहोब्बत (एस. एच बिहारी/ जॉय मुकर्जी- शर्मिला टागोर)
* तुम्हारा चाहनेवाला खुदा की दुनिया में.. (म. कपूर + आशा भोसले)- चित्रपट: कही दिन कही रात (एस. एच. बिहारी)
* तुम सबसे हंसी हो तुम सब से जवां हो (महेंद्र कपूर + आशा)
चित्रपट- मोहोब्बत जिंदगी है (मजरुह, धर्मेद्र-राजश्री)
* आँखो मे कयामत के काजल – (महेंद्र कपूर)-चित्रपट : किस्मत (एस. एच बिहारी, विश्वजीत)

एस. डी. बर्मन- लता मंगेशकर
लता मंगेशकर यांनी ‘बर्मनदां’च्या संगीत दिग्दर्शनात खूप सुमधुर गाणी दिली. ते लताला ‘लोता’ असे बंगाली उच्चारणांनुसार म्हणायचे. ‘नौजवान’, ‘जाल’, ‘हाऊस नंबर फोर्टीफोर, टॅक्सी ड्रायव्हर, ‘हम दोनो’ इ.इ.मधील लताजींची गाणी कधीही न विसरता येणारी आहेत; पण (काही अज्ञात कारणामुळे) पन्नासच्या दशकाच्या शेवटी व साठच्या दशकाच्या सुरुवातीला पाच-सहा वर्षे एस. डी. बर्मन यांनी लताला एकही गाणं दिलं नाही.
‘बात एक रात की’, ‘नौ दो ग्यारह’, ‘काला बाजार’, ‘शबनम’, ‘सोलवा साल’ (दिलीपकुमार), ‘बहार’, ‘फंटूश’, ‘सुजाता’ इ. चित्रपटांत लताला एकही गाणं नाही. याविषयी स्पष्ट कारण कळले नाही.

नौशाद – तलत महमूद
नौशाद यांनी त्यांच्या घरचीच निर्मिती असलेल्या ‘बाबुल’मध्ये तलत महमूदला दिलीपकुमारला प्लेबॅक देण्यास घेतले; पण एकदा त्यांच्यासमोर तलत महमूदने सिगरेट ओढली. हा आपला अपमान समजून त्यांनी तलतला पुन्हा कधीही घेतले नाही. ‘बाबुल’मधील ‘मेरा जीवनसाथी बिछड गया’, ‘हुस्नवालो दिल ना दो ये मिल कर दगा देते है’ ही तलतची दोन सोलो गीते व ‘मिलते ही आँखे दिल हुआ दीवाना किसी का’, ‘दुनिया बदल गयी मेरी.’ ही तलत व शमशाद बेगम यांची युगलगीते आजही बरेच वेळा ऐकायला मिळतात; पण याव्यतिरिक्त तलतची नौशादच्या संगीतातील गाणी ऐकायला मिळाली नाहीत. कदाचित या दोन महान कलाकारांकडून खूप चांगली गाणी ऐकायला मिळाली असती; पण नौशादचे सहकारी गुलाम महंमद यांनी तलतला खूप सुमधुर गाणी दिली व यापैकी काही अजूनही ऐकायला मिळतात. गुलाम महंमदच्या संगीताने नटलेली तलतची काही (सोलो आणि युगुलगीते) खालीलप्रमाणे-
* ‘चांदनी रातों में मेरे दिले पे छा जाते हो तुम..’-चित्रपट: नाजनीन, गीतकार : शकील बदायुनी.
* ‘जो खुशी से चोट खाये वो जिगर कहा से लाऊ..’
चित्रपट: दिले नादान, गीतकार : शकील बदायुनी/ तलत महमूद (नायक)
* ‘जिंदगी देने वाले सुन तेरे दुनिया से दिल भर गया.’- चित्रपट: दिले नादान, गी: शकील/ तलत महमूद (नायक)
* ‘जिंदगी की कसम हो चुके उनके हम’-चित्रपट: मालिक,
गी: शकील ब./ तलत महमूद (नायक)
(ही प्रातिनिधिक यादी आहे.)

गायक/ गायिकांमधील दुरावा
चित्रपटसृष्टीत सगळय़ांत गाजलेला दुरावा म्हणजे लता मंगेशकर व मोहमद रफी यांच्यातील साठच्या दशकातील दुरावा. मानधनावरून एका बैठकीत काही वाद होऊन रफी यांनी ‘ये महारानी (लता) जैसा चाहेगी वैसा ही होगा’ अशी कॉमेंट केल्याने केल्याने लताजींना खूप राग आला व त्यानंतर जवळपास पाच-सहा वर्षे दोघांमध्ये दुरावा होता.
लता व रफी यांनी युगलगीते गाणे बंद केल्यावर दोन गट पडले. त्या काळचे काही नायक : शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार इ. हे मोहमद रफी यांचा आग्रह धरायचे, त्यामुळे लताला वगळून सुमन कल्याणपूर यांना गाणी मिळायची. याचा सुमनताईंना अप्रत्यक्ष फायदाच झाला. आशा भोसले, मुबारक बेगम, कृष्णा कल्ले यांनाही घेण्यात आले; पण जास्त गाणी सुमन कल्याणपूर यांना मिळाली. लता, आशा बहिणी असल्याने आशाताई शक्यतो दूर राहिल्या. तरी त्यांना काही युगलगीते मिळाली. काही युगल-गीते.
मो. रफी – सुमन कल्याणपूर
* आजकाल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर..’- चित्रपट: ब्रह्मचारी/ सं. शंकर जयकिशन/ शम्मी कपूर- मुमताज
* दिल एक मंदिर है प्यार इसमे होती है पूजा ये वो घर है (शीर्षकगीत)
चित्रपट: दिल एक मंदिर/ सं. शंकर जयकिशन/ पाश्र्वगीत/ राजकुमार- मीनाकुमारी
* ठहरिये होश में आऊ तो चले जायेगा-चित्रपट: मोहोब्बत इसको कहते है/ सं. खय्याम/ शशी कपूर- नंदा
* जब से हम तुम बहारों में खो बैठे है नजारों में..-चित्रपट: मै शादी करने चला/ सं. चित्रगुप्त/ फिरोज खान- सईदा खान
(ही प्रातिनिधिक यादी आहे.)

मो. रफी (सुमन कल्याणपूर वगळून) ची इतर युगलगीते
* यही है वो सांझ और सवेरा (शीर्षकगीत) -चित्रपट: सांझ और सवेरा/ सं. शंकर जयकिशन/ गुरू दत्त- मीनाकुमारी/ रफी-आशा
* जाने मेरी आँखो ने देखा है क्या पानी से निकला है चांद नया
चि: प्यार की जीत/ सं. सुधीर फडके / रफी + आशा
* कैसे समझाऊ बडे ना समझ हो- रफी + आशा -चित्रपट: सूरज/ सं. शंकर जयकिशन / राजेंद्रकुमार – वैजयंतीमाला
* हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक.. – रफी + आशा-
चित्रपट: बहू-बेगम/ सं. रोशन/ प्रदीपकुमार – मीनाकुमारी
(ही प्रतिनिधिक युगुलगीतं आहेत)
दुसरा गट लता मंगेशकरांचा आग्रह धरणारा होता. यात मदन मोहन प्रमुख होते. या पाश्र्वभूमीवर मोहमद रफी वगळून ही काही युगुलगीते (रफीच्या जागी बहुतांशी महेंद्र ्रकपूरला घेतले गेले.)
* छोड कर तेरे प्यार का दामन ये बतादे हम किधर जाये
चित्रपट: वो कौन थी / सं. मदन मोहन / महेंद्र कपूर + लता / मनोज कुमार-हेलन
* दो नैन मिले दो फूल खिले दूनिया मे बहार आयी
चित्रपट: घूंगट/ सं. रवि / महेंद्रकपूर + लता/ प्रदीपकुमार – बीना राय
* तुम ही तुम हो मेरी निगाहो के आगे – महेंद्र+ लता
चित्रपट: चांद और सूरज / सं. सलील चौधरी/ धर्मेद्र – तनुजा
* जरा संभालिये अदाए आपकी .. महेंद्र – लता
चित्रपट: बडा आदमी/ सं. चित्रगुप्त/ मजरूह सुलतानपुरी
(ही प्रतिनिधिक युगलगीतं आहेत)

लता मंगेशकर- तलत महमूद
लता मंगेशकर व तलत महमूद यांच्यात काही दुरावा होता असे कुठे स्पष्ट होत नाही. पण शंकर-जयकिशन यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘दाग’ (दिलीप कुमार + निम्मी) (१९५२) या चित्रपटात लताने तलतबरोबर युगलगीत गाण्यास स्पष्ट नकार दिल्याचे वाचनात आले आहे.

लता मंगेशकर- आशा भोसले
लता व आशा सख्ख्या बहिणी असल्याने त्यांच्यात थेट दुरावा कधी दिसला नाही. पण लताच्या उत्तुंग यशामुळे आशा थोडीशी झाकोळून गेली होती हे निश्चित.
लता व आशा युगलगीते गाताना दोन वेगळ्या माईकवर एकमेकांकडे पाठ फिरवून गायच्या असा उल्लेख आहे. एखादी चांगली तान घेतली तर त्या एकमेकींना दादपण द्यायच्या. मध्यंतरी लताजींनी इतर गायकांना (हेमंतकुमार, मुकेश, तलत इ.) आदर दाखविण्यासाठी त्यांनी गायिलेली गाणी स्वत: पुन्हा गायली. (याची सीडी पण निघाली होती) पण त्यांनी आशा भोसले यांची गाणी मात्र गायली नाही, पण यामुळे त्यांच्यात दुरावा होता असे स्पष्ट होत नाही. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे ‘ऐतिहासिक’ गीत आधी आशाताई गाणार होत्या व त्यांच्या सी. रामचंद्रबरोबर रिहर्सलपण चालू झाल्या होत्या. पण पुढे हे गाणे लताजींनी गाईले व या गाण्याने इतिहास घडविला हे सर्वाना माहीत आहेच. लता व आशा यांची काही निवडक युगलगीते खालीलप्रमाणे.
* ऐ चांद जहाँ वो जाये- चित्रपट: शारदा/ सं. सी. रामचंद्र/मीना कुमारी- शामा
* दबे लबों से कोई हमारा सलाम तो ले/ सं. हेमंत कुमार
चित्रपट: बिबी और मकान (कल्पना / परवीन चौधरी)
* अजी चले आओ तुम्हे आँखों ने दिले में बुलाया./ चि. हलाकू
सं. शंकर-जयकिशन/ हेलन-कक्कू
* जब जब तुम्हे भुलाया, तुम याद आये- चि. जहाँआरा
सं. मदन मोहन/ राजेंद्र कृष्ण/ मीनु मुमताझ

मोहमद रफी + किशोर कुमार
पन्नास व साठच्या दशकांत मोहमद रफी यांचे राज्य होते त्या वेळी किशोरकुमार यांनीही चांगले गायन केले. पण ‘आराधना’पासून चित्र पालटले. मोहमद रफीची आघाडीची जागा किशोरकुमारने घेतली. या दोघांत स्पष्ट दुरावा जरी दिसला नाही तरी मोहमद रफी शिखरावर असताना किशोर कुमारला नक्कीच थोडी स्पर्धात्मक उणीव जाणवत असणार व १९७० नंतर किशोर युग सुरू झाल्यावर रफीची डिमांड कमी झाली तेव्हा मोहमद रफी थोडेसे अस्वस्थ झाले होते. तरीपण त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता युगलगीत गायले. (ये दोस्ती/ सलामत रहे दोस्ताना हमारा इ.इ.)
‘रागिणी’ या अशोककुमार निर्मित चित्रपटात किशोर कुमार नायक होता. पण ‘मन मोरा बावरा..’ या सेमीक्सासिकल गीतात ओ. पी. नय्यर (संगीतकार) यांनी किशोरला मोहमद रफी यांचा प्लेबॅक दिल्याने तो थोडा हिरमुसलेला झाला होता. तसेच ‘अजब है दासतां तेरी ऐ जिंदगी’ या ‘शरारत’ (सं. शंकर -जयकिशन) नावाच्या चित्रपटात किशोरला पुन्हा उसना आवाज घ्यावा लागला. कारण या चित्रपटात किशोरचा डबल रोल होता व एक मीनाकुमारीचा प्रेमी (जो पुढे आत्महत्या करतो) व एक राजकुमार यांचा छोटा भाऊ (पुढे मीनाकुमारीचा दीर होता) यामुळे प्रेमी असताना किशोरचा स्वत:चा आवाज वापरण्यात आला आहे (हम मतवाले ना जबान मंझिले के उजाले..) व वर निर्देश केलेल्या गाण्यांत (दीर म्हणून किशोरला मोहमद रफीचा प्लेबॅक घ्यावा लागला. भूमिकेमुळे त्याला ही तडजोड करावी लागली.

रफी- मन्ना डे- किशोरकुमार
मन्ना डे यांना मोहमद रफी व किशोर कुमार यांच्या विषयी फार आदर होता. पण किशोरबरोबर गात असताना त्यांना थोडे दडपण यायचं. ‘एक चतुर नार’- पडोसन तसेच ‘सूर ना सजे क्या गाऊ मैं’ – बसंत बहार व ‘पूछो ना कैसे मैने रैन बिताई’ – मेरी सूरत तेरी आँखे. या वेळी त्यांना फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळण्याची खात्री असून ते न मिळाल्याने ते नाराज झाले होते, पण पुढे ‘ए भाई जरा देख के चलो’ – मेरा नाम नोकर या गाण्याला फिल्मफेअर अ‍ॅवॉड मिळूनही ते खूप खूष झाले नाही. मन्ना डे यांचे सहगायक-गायिकेबरोबर सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यांच्यात दुरावा कधी दिसला नाही.

मंगेशकर भगिनी व इतर.
लता, आशा व उषा या मंगेशकर भगिनींची मक्तेदारी असून त्यांना भिऊन संगीतकार आम्हाला गाणी देत नाहीत, अशी ओरड काही इतर गायिकांनी केली. त्यांत वाणी जयराम (बोले रे पपिहरा फेम) व अनुराधा पौडवाल या मुख्यत्वे करून होत्या. पण त्यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले. अनुराधा पौडवाल यांनी गुलशन कुमार (टी सिरीज) च्या साहाय्याने लता मंगेशकरांची हीट गाणी पुन्हा गाऊन काही कॅसेट बाजारात आणल्या. पण त्यांना फारसे यश मिळाले नाही.

गायक- गायिका, नायक- नायिका,
चित्रपटसृष्टीत काही नायक-गायक अशा जोडय़ा प्रसिद्ध होत्या. आघाडीवरील नायक दिलीपकुमार-राज कपूर-देव आनंद (त्रिमूर्ती) यांचे गायक खालीप्रमाणे असायचे.
दिलीपकुमार- मोहम्मद रफी/ राज कपूर-मुकेश/ देव आनंद – मोहम्मद रफी/ किशोरकुमार व इतर.
मनोजकुमार- मुकेश/ प्रदीपकुमार व विश्वजित – हेमंत कुमार/ राजेंद्रकुमार- मोहम्मद रफी/ शम्मी कपूर- मोहम्मद रफी/ भारत भूषण- तलत महमूद- मोहम्मद रफी इ.इ. काही नायक धर्मेंद्र, शशी कपूर इ.इ. यांचा गायकांविषयी विशेष आग्रह नसायचा. संगीतकारांप्रमाणे ते जमवून करून घ्यायचे.
हे सर्व होऊनही या मुख्य नायकांनी बरेच वेळा त्यांच्या प्रस्थापित गायकांना सोडून इतर गायकांशी जमवून घेतले ते असे. (त्यांची एक-दोन प्रतिनिधिक गाणी दिली आहेत.)
दिलीपकुमार- तलत महदूद- दाग/ देवदास/ आरजू/ शिकस्त/तराना/ संगदिल इ.इ. (हम दर्द के मारों का इतना ही फसाना है-
दाग/ शंकर-जयकिशन/ ह. जयपुरी/ तुफान में है मेरी नय्या- शिकस्त/ शंकर-जयकिशन/ शैलेंद्र.. इ.इ.
मुकेश- (यहुदी/ मधुमती/ अंदाज/ मेला/ शबनम इ.इ.)
(ये मेरा दिवानापन है.. यहुदी (शंकर-जयकिशन/ शैलेंद्र)
(सुहाना सफर और ये मौसम हसी/ मधुमती/ सलिल चौधरी/ शैलेंद्र)
दिलीपकुमारला ‘सगीना’ या चित्रपटात किशोरकुमार यांचा प्लेबॅक घ्यावा लागला. (सं. कल्याणजी-आनंदजी) हा काळाचा महिमा आहे. (किशोरयुग)
राज कपूर- तलत महमूद- (बेवफा, अनहोनी, जान पहचान इ.इ.)- (मै दिल हूँ एक अरमान भरा/ अनहोनी/ रोशन/ सत्येंद्र, तुम को फुरसत हो मेरी जो इधर देख तो लो/ बेवफा/ ए. आर. कुरैशी.) इ.इ.
मोहम्मद रफी- (अंबर/ एक दिल सौ अफसाने/ अंदाज/ पायी इत्यादी, इत्यादी. (तेरा काम है जलना परवाने चाहे शमा जले या ना जले/ पापी/ एस. मोहिंदर, हम तुम ये बहार देखो रंग लाया प्यार/ अंबर (युगलगीत रफी + लता/ गुलाम महंमद.. इत्यादी.

इतर गायक
मन्ना डे- (दिल का हाल सुने दिलवाला- श्री ४२०, ए भाई जरा देख के चलो- मेरा नाम जोकर इत्यादी, इत्यादी.
चितळकर (सी. रामचंद्र)- (मैं हू एक खलासी मेरा नाम है भीम पलासी/ सरगम) सी. रामचंद्र/ पी. एल. संतोषी
देवानंद- तलत महमूद (पतिता, रुप की रानी चोरों का राजा, टॅक्सी ड्रॉइव्हर, सजा, नादान, इ.इ.)
(आ तेरी मैं तस्वीर बना लू/ नादान/ चिक चॉकलेट/पी. एल. संतोषी
तुम तो दिल के तार छोड कर/ रूप की रानी चोरो का राजा/ शंकर जयकिसन/ शैलेंद्र इ.इ.
मुकेश- (विद्या, शायर, बंबई का बाबू इ.इ.)
(बहेंना कभी नयन से नीर/ विद्या/ एस. डी बर्मन/ ये दुनिया है यहां दिल का लगना किसको आता है! शायर/ युगलगीत लता + मुकेश / गुलाम महमद/ शकील बदायुनी इ.इ.

इतर गायक
चितळकर (सी. रामचंद्र)- (दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम/ बारीश / सी. रामचंद्र / राजेंद्र कृष्ण. कहते है प्यार किसको पंछी जरा बतादे / बारीश / सी. रामचंद्र/ युगलगीत चितळकर + लता/ राजेंद्रकृष्ण.
द्विजेन मुखर्जी- (ए दिल कहाँ तेरी मंजिल ना कोई दीपक है ना कोई तारा है.. / माया/ सलिल चौधरी/ मजरूह सुलतानपुरी, फिर एक बार कहो../ माया/ शकिल चौधरी/युगलगीत द्विजेन + लता/ मजरूह सुलतानपुरी इ.इ.)
हेमंत कुमार- (जाल, पतिता, घर नं. ४४, सोलवा साल, बात एक रातकी इ.इ.- (ये रात ये चांदनी फिर कहाँ../ जाल/ एस. डी बर्मन/ साहिर, ना तुम हमे जानो../ बात एक रात की / एस. डी बर्मन / मजरूह.
शम्मी कपूर- तलत महमूद- (चोर बाजार, लैला मजनू, मेमसाहेब, ठोकर, इ.इ.- (तेरे दर पे आया हू फरियाद लेकर/ चोर बाजार/ सरदार मालिक/ चल दिया कांरवा लूट गये हम यहा तुम वहा.
लैला मजनू/ गुलाम महंमद/ शकील बदायुनी इ.इ. ..)
मुकेश- (उजाला, ब्लफ मास्टर इत्यादी, इत्यादी)
(दूनियांवालों से दूर जलनेवालों से/ उजाला/ शंकर- जयकिसन/ युगलगीत- मुकेश + लता/ शैलेंद्र, सोचा था प्यार हम ना करेंगे.. ब्लफ मास्टर/ कल्याणजी-आनंदजी/ इत्यादी, इत्यादी.
हेमंत कुमार- ब्लफ मास्टर- (ना किसी का मै ना कोई मेरा)
मन्ना डे- उजाला- सूरज जरा आ पास आ आज सपनो की रोटी पका देंगे हम/ शंकर- जयकिसन/ शैलेंद्र/ झूमना मौसम मस्त महिना चांद सी गोरी एक हसिना../ उजाला/ शंकर जयकिसन/ युगुलगीत-मन्ना डे + लता/ शैलेंद्र इत्यादी, इत्यादी
भारत भूषण- मुकेश- (संगीतसम्राट तानसेन/ दुनिया ना माने/ मुड मुड ना देख/ रानी रूपमती इत्यादी, इत्यादी) – (हसीन हो खुदा तो नही हो/ मुड मुड ना देख/ हंसराज बहल/ प्रेम धवन, हम चल रहे थे वो चल रहे थे मगर दुनियाँ वालो के दिन जल रहे थे../ दुनिया ना माने/ मदन मोहन/ राजेंद्रकृष्ण
राजेंद्रकुमार- मुकेश- (प्यार का सागर, पतंग, जिंदगी और ख्वाब, आस का पंछी, साथी इत्यादी, इत्यादी- (कभी किसी की खुशियाँ कोई लुटे ना.. जिंदगी और ख्वाब/ दत्ताराम/ प्रदीप, वफा, जिनसे की बेवफा हो गये है../ प्यार का सागर/ रवी/ प्रेमधवन).. इत्यादी, इत्यादी
सुबिर सेन- दिल मेरा एक आस का पंछी../ आस का पंछी/ शंकर- जयकिसन/ हसरत जयपुरी.. धीरे चलावो जरा.. युगलगीत सुबिर सेन + लता/ आस का पंछी/ शंकर-जयकिसन/ हसरत जयपुरी
अशोक कुमार, सुनील दत्त, राजकुमार, प्रेमनाथ, अजित, प्रदीप कुमार, बलराज साहनी, इ. इ. यांनी रफी/ तलत/ मन्ना डे/ मुकेश/ हेमंत कुमार या सर्व आघाडीच्या गायकांना पाश्र्वगायक घेतले. पण राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांनी किशोर कुमार व काही अंशी मोहमद रफी यांनाच पाश्र्वगायक म्हणून घेतले. काही मोजक्या गाण्यांत मुकेशनेही पाश्र्वगायन केले. उदा. (कटी पंतग, फीर कब मिलोगी, आनंद, बंधन, एक रात, कभी-कभी ही सर्व गाणी बहुतेक लोकांना माहीत आहेत. त्यामुळे या लेखांतून वगळली आहेत.)
* ‘ब्लफ मास्टर’ या चित्रपटात शम्मी कपूरला मुकेश (सोचा था प्यार ना करेंगे) व हेमंत कुमार (ए दिल अब कही ना जा, ना किसी का मैं ना कोई मेरा) यांनी आवाज दिला होता. हेमंत कुमारला पाश्र्वगायक घेण्यास शम्मी कपूरने खूप नाराजी दाखविली होती. पण त्याला कसेबसे समजविण्यात आले. पण पुढे हे गाणे खूप गाजले.
* ‘सुबह का तारा’ या राजकमलच्या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे यात चित्रपती व्ही. शांताराम यांनी ‘बेवडय़ा’ची भूमिका केली होती व त्यांच्यासाठी पाश्र्वगायन केले होते संगीतकार सी. रामचंद्र यांनी (दोन्ही अण्णासाहेब) हे गाणे ‘जयश्री’वर केंद्रित होते.
‘काला आदमी’ या चित्रपटात अशोक कुमार यांच्याकरिता मुकेशने पाश्र्वगायन केले होते. ते गाणे होते ‘दिल ढूंढता है सहारे सहारे..’
(दत्ताराम/ हसरत जयपुरी) अशोक कुमार-तलत
* ‘कठपुतली’मध्ये बलराज साहनी यांच्याकरिता सुबीर सेनने पाश्र्वगायन केले होते. ते गाणे होते ‘मंझिल वही है प्यार की, राही बदल गये है..’ (शंकर जयकिसन/ हसरत जयपुरी)
* अभिताभ बच्चन/ अशोक कुमार यांनी बरीच गाणी गायली आहेत व ती जवळपास सर्वानाच माहिती आहेत. पण ‘मुसाफिर’ या चित्रपटात दिलीप कुमार यांनीपण एक गीत गायले आहे. (सं. सलील चौधरी)
* तलत महमूद हे गायक म्हणून प्रस्थापित होण्यापूर्वी नायकपण होते. चित्रपट : समाप्ति, एक गाव की कहानी, राजलक्ष्मी, रफ्तार, दिवाली की रात, दिले नादान इ. इ. ..) यातील सर्व गाणी बहुतेक रसिकांस माहीत आहेत. इथे एका गाण्याचा उल्लेख करावा वाटतो, ‘ये खुशी का समा जिंदगी है जवा’/ दिवाली की रात/ स्नेहल भाटकर/ नक्ष लायल पुरी) तलत महमूद यांची नायक-गायक सर्वच गाणी फारच उत्कृष्ट आहेत व ती स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
* दिलीपकुमार यांचे लहान भाऊ नासिर खान यांच्यासाठी सी. एच.आत्मा यांनी नगीना या चित्रपटात पाश्र्वगायन केले. ती गाणी म्हणजे रोऊं मै सागर किनारे सागर हसी उडाए/ दिल बेकरार है मेरा दिल बेकरार है। एक सितारा आकाश में/ शंकर- जयकिसन/ शैलेंद्र-हसरत (नासिरखान यांनी अंगारे या चित्रपटात नर्गिस बरोबर नायकाची भूमिका केली होती.)

गायिका, नायिकांचे दुरावे/किस्से
पन्नास आणि साठच्या दशकामध्ये आघाडीच्या (पहिल्या फळीच्या) नायिका म्हणजे नर्गिस, वैजयंतीमाला, मीना कुमारी, गीता बाली, निरुपा राय, मधुबाला, नलिनी जयवंत, निम्मी, सुरैय्या, बीना राय, नूतन, इ. होत्या.
दुसऱ्या फळीत माला सिन्हा, आशा पारेख, हेमा मालिनी, कल्पना, मूमताज, इ. होत्या. अर्थातच लता मंगेशकर यांनाच प्राधान्य असायचे. त्यानंतर आशा/ गीता व सुमन कल्याणपूर व इतर या गायिकांचा क्रम लागायचा. पण पन्नासच्या दशकात लताचा उदय होण्यापूर्वी व त्यानंतरही काही वर्षे सुरैय्या, शमशाद बेगम, मुबारक बेगम, जोहरावाली, अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी इ. गायिका खूप आघाडीवर होत्या. नूरजहान, सुरैय्या या नायिका-गायिका होत्या.
बहुतेक गायिकांचे पाश्र्वगायनाविषयी नायकांसारखे (उदा. शम्मी कपूर) ‘नखरे’ नसायचे. तरीपण आघाडीच्या नायिकांनी लता/आशाव्यतिरिक्त इतर गायिकांना पाश्र्वगायिका म्हणून घेतले (किंवा त्याांना यावे लागले.) अर्थात नायिका-गायिका (उदा. सुरैय्या/नूरजहान) या पाश्र्वगायिका होत नसत. याबाबतीत काही किस्से खालीलप्रमाणे.
* पन्नास आणि साठच्या दशकांत आघाडीची नायिका असलेल्या वैजंयतीमाला हिच्या पहिल्याच चित्रपटात म्हणजे बहारमध्ये शमशाद बेगमने आवाज दिला होता. ती गाणी सैया दिल मे आना रे/ दुनिया का मजा लेलो दुनिया तुम्हारी इत्यादी गाणी अजूनही ऐकायला मिळतात. (सं. एस. डी. बर्मन, गीतकार राजेंद्रकृष्ण)
वैजयंतीमाला यांच्याचकरिता सुमन कल्याणपूर व शारदा यांनी खालीलप्रमाणे पाश्र्वगायन केले.
* तुझे देखा, तुझे चाहा, तुझे पूजा मैने (युगुलगीत रफीबरोबर) (छोटी सी मुलाकात/ शंकर- जयकिसन/ हसरत जयपुरी.
* मेरा प्यार भी तू है ये तहार भी तू है.. (युगुलगीत – मुकेशबरोबर.)
साथी/नौशाद/ मजरुह
* तितली उडी उड जो चली/ शारदा/ सूरज/ शंकर-जयकिसन/ शैलेंद्र
* देखो मेरा दिल मचल गया/ –
* इतना है प्यार मुझे तुमसे मेरे राजदार/ सुमन + रफी/ र.ख./ हसरत/ सूरज
* मीनाकुमारी यांना शमशाद बेगम यांनी ‘नया अंदाज’ या चित्रपटात आवाज दिला. गाणे आहे, ‘मेरी नींद मे तुम मेरे ख्वाबों मे तुम (युगलगीत – किशोरबरोबर/ ओ. पी. नय्यर /मजरुह)
* मीनाकुमारी यांना सुमन कल्याणपूर यांनी दिलेल्या आवाजाची गाणी पूर्वीच्या परिच्छेदात आली आहेत. ‘जुही ही कली मेरी लाडली- दिल एक मंदिर/रख/ शैलेंद्र – हे गाणेपण प्रसिद्ध आहे.
* नर्गिससाठी बहुतांशी लता/आशा यांनी पाश्र्वगायन केलं असलं तरी काही गाण्यांचं पाश्र्वगायन शमशाद बेगमनेपण केलं. ‘चमन मे रहके विराना मेरा दिल होता जाता है..’ दीदार/ नौशाद/ मेला/ शकील
* वहिदा रेहमानसाठी बहुतांशी लता/ आशा/ गीता (गुरूदत्त फिल्म्स) यांनी पाश्र्वगायन केले आहे, पण सुमन कल्याणपूर यांनीही त्यांना उसना आवाज दिला आहे. उदा : बुझा दिये है खुद हमने दिये अपने वफा के..’ शगुन/ खय्याम/ कैफी आझमी, ‘दिले बेताब को सीने से लगाना होगा.. युगुलगीत- (रफीबरोबर) पालकी/ नौशाद/ शकील
* नूतन ने छबीली या चित्रपटात स्वत:च गाणी गायली आहेत. उदा. ‘ऐ मेये हमसफर, रोक अपनी नजर.’/ स्नेहल भाटकर/ एस. रतन, ‘लहरों पे लहर उलकत है जवाँ’ युगुलगीत (हेमंत कुमार). इतर नायिकांनी लता/आशा/गीताव्यतिरिक्त कमल बारोट/ कृष्णा कल्ले/ पुष्पा पागधरे/ सुलोचना कदम/ मुबारक बेगम/ सुधा मलहोत्रा, इ. इ. गायिकांना पाश्र्वगायनासाठी घेतले होते.

निर्माते-दिग्दर्शक/संगीतकार/ गायक-गायिका यांचे दुरावे/किस्से
निर्मात्यांचे बहुतेक संगीतकार ठरले असायचे.
* व्ही. शांताराम- (राज कमल)
संगीतकार- वसंत देसाई, सी. रामचंद्र, पं. शिवराम कृष्ण.
गायक/ गायिका- तलत महमूद मन्ना डे/ चितलकर/ लता/ आशा- गीता/ जयश्री
शांताराम बापू यांनी महंमद रफी व मुकेश यांना क्वचितच घेतले.
महंमद रफी- सेहरा (तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये../ रामलाल/ हसरत जयपुरी/ प्रशांत
मुकेश- बूंद जो बन गये मोती (हरी हरी वसुंधरापे नीला नीला ये गगन/ सतीश भाटिया/ भरत व्यास जितेंद्र) (तारों से सजके अपने सूरज से चली है धरती मिलने- जलबिन मछली नृत्य बिन बिजली (लक्ष्मीकांत-प्यारेलाल) मजरुह सुलतानपुरी. शांताराम बापूंनी बहुतांशी भरत व्यास, हसरत जयपुरी, नूर लखनवी यांनाच गीतकार म्हणून घेतले. (मजरुहचा अपवाद वगळता त्यांचे तलत महमूद हे आवडते पाश्र्वगायक होते. (मोहोब्बत जो ना समझे वो जालिम प्यार क्या जाने/ अपनी कहो तुम कुछ मेरी सुनो.. (लता + तलत) दोन्ही ‘परछाई’ (संध्या) चित्रपटातील गीते (गीतकार नूर लखनवी) त्या खालोखाल मन्नाडे (आज मधूवानास डोले/ युगलगीत/ लता + मन्नाडे/ स्त्री/ सी. रामचंद्र/ भरत व्यास
राज कपूर- राज कपूरनी मुकेश यांना आपला आवाज म्हटले आहे. त्यामुळे आरकेच्या बहुतांश चित्रपटांत संगीतकार शंकर-जयकिसन हे अविभाज्य असायचे. अर्थात शैलेंद्र व हसरत ही गीतकार जोडगोळी होतीच.
तरीही जागते रहो (सलिल चौधरी) अब दिल्ली दूर नही (दत्ताराम धरम करम (आर. डी. बर्मन) यांनी आरकेचे चित्रपट केले. पुढे शंकर-जयकिसन यांची जादू ओसरल्यावर लक्ष्मीकांत – प्यारेलाल (बॉबी, प्रेमचंद, इ.इ.) हे आरकेचे संगीतकार झाले. लक्ष्मीकांत – प्यारेलालनंतर हीना, राम तेरी गंगा मैली याकरिता रवींद्र जैन यांनी संगीत दिले.
देवानंद- नवकेतनकरिता खालीलप्रमाणे कलाकार होते.
संगीतकार- एस. डी. बर्मन, जयदेव, आर.डी. बर्मन
गायक/गायिका- महंमद रफी, किशोर कुमार, हेमंत कुमार
गीतकार- साहिर/ मजरुह/ शैलेंद्र/ हसरत/ नीरज तरीपण देवानंद यांनी द्विजेन मुकर्जी (गायक-माना) चितळकर (गायक- बारिथो ेयांना पण घेतले..
केदार शर्मा- शर्मा फिल्म्स
संगीतकार- स्नेहल भाटकर (हमारी याद आयेगी, फरियाद)
रोशन- (बावरे नैन) जमाल सेन (शोखियाँ)
गीतकार- स्वत: केदार शर्मा हेच बरेच वेळा गीते लिहीत असत.
नासिर हुसेन- ओ. पी. नय्यर, शंकर-जयकिसन, आर.डी. बर्मन
फिल्मालय- ओ.पी. नय्यर, उषा खन्ना-मजरुह
वर्मा फिल्म्स- शंकर जयकिसन, शैलेंद्र-हसरत
के. जुगल किशोर- उषा खन्ना/ मजरुह
मिनव्‍‌र्हा मूव्हीटोन (सोहराब मोदी) – सी. रामचंद्र/ मदन मोहन/ गु. महंमद (परवेश शमसी/ राजेंद्र कुमार/ राजेंद्रकृष्ण/ शकील बदायुनी
फिल्मीस्तान- सी. रामचंद्र (हेमंत कुमार/ राजेंद्रकृष्ण
मार्स अ‍ॅण्ड मूव्हीज (अमिया चक्रवर्ती)- शंकर जयकिसन/ शैलेंद्र/ हसरत
ए. आर. कारदार -नौशाद / शकील
साहू फिल्म्स- (किशोर साहू)- शंकर-जयकिसन/ शैलेंद्र/ हसरत
बिमल रॉय- सलिल चौधरी/ एस.डी. बर्मन/ शैलेंद्र/ मजरुह.
वरील सर्व संगीतकारांनी (महंमद रफी, मुकेश, तलत, मन्नाडे, इ. इ. लता, आशा, गीता/ राजकुमारी/ मुबारक बेगम, इ. गायिकांना पाश्र्वगायनाकरिता घेतले.)

काही मनोरंजक किस्से
* बहुतेक सर्व गायक/ गायिका आपल्या संग्रहात त्यांनी गायलेली गाणी ठेवत असतील असे आपल्याला वाटते. पण एकदा लता मंगेशकर यांनी त्यांच्या संग्रहात खालील दोन गाणी मिसिंग आहेत व ती कोणी त्यांना आणून दिल्यास त्यांना चांगले वाटेल अशी इच्छा व्यक्त केली होती.
१) ‘चल दिया मेरा दिल तोड के मुझको अकेला छोड के याद रखना मगर बेवफा तुझ को भूलेगा ना दिल मेरा’- चित्रपट : फिफ्टी- फिफ्टी.- सं. मदन मोहन, गी. : राजेंद्रकृष्ण
२) ‘जल के दिल खाक हुआ आँख से रोया ना गया’- चित्रपट : परिचय सं. शैलेश. गंमत म्हणजे ही दोन्ही गाणी पांढूर्णा (मध्य प्रदेश) येथील एका पानवाल्याने त्यांना सहर्ष मुंबईला नेऊन दिली.
* नूतन या, लाईट- हाऊस (एन. दत्ता/साहिर/ जी.पी. सिप्पी फिल्म्स)च्या चित्रपटाच्या नायिका होत्या. पण या चित्रपटांतील तंग आ चुके कश्म कश जिंदगी से हम (आशा भोसले), किस जगह जाये किसको दिखलाये जखमी दिल अपना (आशा) ही अप्रतिम गाणी त्यांच्याजवळ नव्हती. या दोन्ही गाण्यांच्या ७८ आरपीएम रेकॉर्ड्स त्यांना बराच प्रयत्न करून शेवटी मुंबईला कबाडी बाजारात मिळाल्या.
* संगीतकार नौशाद/ शंकर-जयकिसन/ ओ.पी.नय्यर/ सी. रामचंद्र यांच्यात नेहमीच छुपी स्पर्धा राहायची. रतन, बैजूबावरा, इ. चित्रपटांनंतर नौशाद यांचे मानधन एक लाखावर पोहोचले. त्यानंतर ओ.पी.नय्यर यांनी सीआयडी(तुमसे नही देखा, इ. इ.चे सुपर हीट संगीत देऊन आपले मानधन दीड लाखापर्यंत वाढवले. शंकर- जयकिसननी आपली घोडदौड पुढे ठेवून ‘जिंदगी’ या चित्रपटासाठी दोन लाख घेतले व पुढे ‘आरजू’ या चित्रपटासाठी शंकर यांनी (केवळ नृत्य बेस्ड गाण्यासाठी) पाच लाख व जयकिसन यांनी (बाकी सर्व गाण्यांसाठी) पाच लाख रु. घेतले.
* बी.आर. चोपडा यांचा ‘नया दौर’ खूप गाजला. यातील सर्व गाणी (मांग के साथ तुम्हारा/ उडे जब जब जुल्फे तेरी) खूप गाजली. याबाबतीत (निर्मिती/ दिगदर्शन) चोपडा यांनी ओ.पीं.जवळ आपली खूप तारीफ करत त्यांना (ओ.पीं.ना) विचारले की नैया दौर कैसा लगा? त्यावर ओ.पी. म्हणाले की, नया दौर तो नही दिखा पर नय्यर- दौर जरूर दिखा. यामुळे बी.आर. चोपडा नाराज होऊन त्यांनी पुन्हा ओ.पीं.ना संगीतबद्ध केले नाही.
* एस.डी. बर्मन- साहिर लुधियानवी यांनी जाल, हाऊस नं. ४४, बाजी, इ.इ. चित्रपटांत सुपर हिट गाणी दिली. प्यासा आंगन गाजला. त्या वेळी साहिर यांनी माझ्या गीतांमुळेच हा चित्रपट जास्त गाजला. त्यामुळे संगीतकारापेक्षा (एस.डी. बर्मन) माझे जास्त क्रेडिट आहे हे ठणकावून त्यांच्या मानधनापेक्षा एक रुपया जास्त मानधन मागितले. त्यामुळे एस.डीं.चा इगो दुखावला जाऊन या दोघांत दुरावा निर्माण झाला व नंतर एस.डी.- साहीर ही जोडी ब्रेक झाली व अर्थातच रसिक त्यांच्या उत्तम गाण्यांना मुकले.
* शंकर- जयकिसन यांनी बरीच वर्षे सुपर हिट संगीत दिले. पण शंकरची गाणी कोणती व जयकिसनची कोणती हे त्यांनी कधी कळू दिले नाही. ढोबळमानाने शैलेंद्र यांची गाणी शंकर कंपोज करायचे तर हसरत जयपुरी यांची गाणी जयकिसन करायचे. पण संगम (आर.के.) या चित्रपटातील ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर..(महंमद रफी) हे गाणे टॉपवर आले व इतर गाणी (दोस्त, दोस्त ना रहा) बरेच खाली राहिले. त्या वेळी जयकिसनने (ये मेरा प्रेमपत्र पढकर) हे गाणं मी कंपोज केलं असे जाहिर केले व त्यानंतर शंकर जयकिसन या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाले. अर्थात गायिका शारदा (हिला शंकरने या क्षेत्रात आणले होते) पण यासाठी जबाबदार होती. पुढे शंकर यांनी ‘सूरज’ या नावाखाली काही चित्रपट संगीतबद्ध केले. (स्ट्रीट सिंगर चंद्रशेखर) ती मी नव्हेच (मराठी चित्रपट) इ. इ. पुढे जयकिसन निवर्तल्यानंतर (१९७१ नंतर) त्यांनी पहचान, संन्यासी, आत्माराम, आजी की ताजा खबर, इ.इ. चित्रपटांना शंकर-जयकिसन या बॅनरखालीच खालीच संगीत दिले व हे सर्व संगीत बऱ्यापैकी गाजले.
वसंत राजूरकर