पालक काथी रोल्स

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :
२ पोळ्या (चपात्या)
१५ ते २० पालकाची पाने
७० ग्राम पनीर
२ चमचे तेल
१ चमचा बारीक चिरलेली मिरची
१ लहान कांदा उभा चिरून
१/२ भोपळी मिरची, उभी चिरून
१ टेस्पून लसूण, बारीक चिरून
१/२ चमचा धणेपूड
पाव चमचा जिरेपूड
२-३ चिमटी गरम मसाला
चाट मसाला आवडीनुसार
टोमॅटो केचप आवडीनुसार
चवीपुरते मीठ
पुदिन्याची चटणी

कृती :
१) पालक मिठाच्या उकळत्या पाण्यात घालून २ मिनिटे शिजवावा. बाहेर काढून गार पाणी घालावे. पाणी निथळून टाकावे. नंतर पालकाची प्युरी करावी.
२) तेल गरम करून त्यात चिरलेली मिरची, लसूण, कांदा आणि भोपळी मिरची घालून परतावे.
३) पालकाची प्युरी घालून परतावे. थोडे ड्राय झाले पाहिजे. पनीर, धणे-जिरेपूड, गरम मसाला, थोडे मीठ आणि टोमॅटो केचप घालावा.
४) पोळीला थोडी चटणी लावून घ्यावी. पोळ्या ताटात ठेवून मधोमध उभे असे तयार सारण ठेवावे. वरून चाट मसाला थोडा टोमॅटो केचप घालून रोल करावे. रोलमधून कापावा.
टीप :
सारण पोळीवर ठेवल्यावर त्यावर आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालू शकतो.

ब्रोकोली पराठा

साहित्य :
स्टिफगसाठी
१ मध्यम ब्रोकोलीचा गड्डा
१ मध्यम कांदा, बारीक चिरून
२ चमचे लसूण पेस्ट
१ चमचा आलेपेस्ट
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा आमचूर पावडर
१ चमचा मिरची पेस्ट
चवीपुरते मीठ
कव्हरसाठी
दीड वाटी गव्हाचे पीठ
१/४ चमचा हळद
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा मीठ
१ चमचा तेल
इतर जिन्नस
१/४ वाटी तेल
कोरडे पीठ पराठे लाटताना
कृती :
१) प्रथम कणिक मळून घ्या. मिक्सिंग बोलमध्ये गव्हाचे पीठ, हळद, जिरे, मीठ आणि तेल घालून मिक्स करावे. पाणी घालून पीठ घट्टसर माळून घ्यावे.
२) ब्रोकोलीचे लहान तुरे करावेत. मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. त्यात चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, मिरची पेस्ट, आमचूर पावडर आणि मीठ घालून मिक्स करावे.
३) ब्रोकोलीचे मिश्रण आणि मळलेली कणीक दोन्ही ५-५ समान भागांत विभागावेत. एक कणकेचा गोळा घेऊन ३ इंच लाटावा. मध्यभागी ब्रोकोलीच्या मिश्रणाचा एक भाग ठेवून कणकेच्या सर्व बाजू एकत्र करून सील करावे. कोरडे पीठ लावून पराठा लाटावा.
४) तवा तापवून पराठा तेल किंवा तूप सोडून दोन्ही बाजू भाजून घ्याव्यात. पराठा गरमच दही आणि बटर बरोबर सव्र्ह करावे.
टीप :
ब्रोकोलीचे स्टफिंग बनवून तसेच जास्त वेळ ठेवले तर त्याला पाणी सुटते आणि पराठे लाटताना फाटतात. यासाठी ब्रोकोली मिक्सरमध्ये बारीक करताना त्यात पाण्याचा अंश नसावा, ती कोरडी असेल याची काळजी घ्यावी. आणि जेव्हा पराठे बनवायचे असतील तेव्हाच स्टफिंग बनवावे.

मसूर पुलाव

साहित्य :
भातासाठी :
दीड वाटी बासमती राइस
तीन वाटय़ा गरम पाणी
१ स्टारफूल
२ तमालपत्र
२ लवंगा
१ चमचा तूप
१/२ चमचा मीठ
मसूर ग्रेवी :
१/२ वाटी मसूर
१ चमचा तूप
२ वेलची
२-३ काळी मिरी
१/४ चमचा हळद
१/२ चमचा लाल तिखट
१/२ वाटी बारीक चिरलेला कांदा
१ चमचा आलं पेस्ट
१ चमचा लसूण पेस्ट
१/२ वाटी दही
१ चमचा धणेपूड
१/२ चमचा जिरेपूड
१ चमचा गरम मसाला
२ चमचे बेदाणे, थोडेसे काजू
चवीपुरते मीठ
कृती :
१) मसूर रात्रभर किंवा ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावी. कूकरमध्ये १ शिट्टी करून मसूर पाणी न घालता शिजवून घ्यावे. शिजवताना थोडे मीठ घालावे.
२) पॅनमध्ये तूप गरम करून त्यात वेलची आणि मिरी घालावी. १० सेकंद परतावे. हळद, लाल तिखट आणि आलेलसूण पेस्ट घालून परतावे. कांदा घालून पारदर्शक होईतोवर परतावे.
३) आता शिजलेले मसूर आणि १/२ कप पाणी घालावे. थोडेसेच मीठ घालावे. थोडा वेळ शिजू द्यावे. गरम मसाला, धणे-जिरेपूड, बेदाणे, काजू घालून मिक्स करावे. चव पाहून गरजेनुसार मसाला घालावा. गॅसवरून बाजूला काढावे. ही ग्रेव्ही घट्टसरच असावी. कारण थंड झाल्यावर यात नंतर दही घालायचे आहे.
४) ग्रेव्ही जरा गार झाली की त्यात घोटलेले दही घालून नीट मिक्स करावे. लागल्यास थोडे मीठ घालावे.
५) बासमती तांदूळ १० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा.
६) एक मीडियम सॉसपॅन गरम करावा. त्यात तूप घालून वितळू द्यावे. स्टारफूल, तमालपत्र आणि लवंगा घालून १० सेकंद परतावे. निथळलेला तांदूळ घालून चांगला कोरडा होईस्तोवर परतावे.
७) तांदूळ चांगला परतला गेला की गरम पाणी घालावे. भात मोकळा शिजवावा.
८) एकूण ग्रेव्हीतील १/२ ग्रेव्ही घालून भात हलकेच मिक्स करावा. लागेल तशी ग्रेव्ही घालावी.
९) थोडे तूप घालून मिक्स करावे आणि १० मिनिटे एकदम मंद आचेवर झाकण ठेवून भात गरम होऊ द्यावा.
गरम गरम पुलाव रायत्याबरोबर सव्र्ह करावा.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व रुचकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food recipes
First published on: 19-06-2015 at 01:23 IST