05 June 2020

News Flash

चर्चा : एक गोष्ट देवबाप्पाची

‘चांगली माणसे म्हणजे देव आणि वाईट, दुष्ट माणसे म्हणजे राक्षस!’ ही माझी साधीसोपी व्याख्या मुलांना किती भावली माहीत नाही, कुलकर्णीबाईंना मात्र ती फारच खटकली. असं

| November 21, 2014 01:22 am

‘चांगली माणसे म्हणजे देव आणि वाईट, दुष्ट माणसे म्हणजे राक्षस!’ ही माझी साधीसोपी व्याख्या मुलांना किती भावली माहीत नाही, कुलकर्णीबाईंना मात्र ती फारच खटकली. असं का झालं? त्यातलं नेमकं काय खटकलं असेल त्यांना?

सहावी अच्या वर्गावर आज माझा तास होता. तसा आज शाळा सुरू होऊन एक आठवडा झाला होता. प्राथमिक उजळणी वगैरे, शाळा सुरू झाल्यावर साधारण अभ्यासक्रम सुरू व्हायला लागतात ते दिवस संपले होते. आता खऱ्या अर्थाने अभ्यासक्रमाला सुरुवात झाली होती. आज जरा सगळे लवकरच आटोपून मी मुलांना पहिला गृहपाठ देणार होते. पहिल्या दिवसाची सुरुवात निबंधाने करावी असे माझ्या मनात आले.

मी म्हटले, ‘मुलांनो, या वर्षीचा पहिला गृहपाठ मी आज देणार आहे. तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे. निबंधाचा विषय असेल ‘देवबाप्पा’. मुलांनी विषय वहीत लिहून घेतला, ‘देवबाप्पा!’ वह्य़ा बंद करून ‘आता एक गोष्ट बाई!’ सर्वानी एकच गलका करून मला एक गोष्ट सांगण्याचा आग्रह केला. तास संपायला तसा बराच वेळ होता. ‘उद्यापासून आम्ही अभ्यास करू बाई, हट्ट करणार नाही.’ काना-कोपऱ्यातून एकच स्वर ‘बाई गोष्ट!’ मुलांचे हे निरागसपण बघून मला मोठे हसू आले. खरं तर ‘देवबाप्पा’ हा विषय याहूनही लहान मुलांचा. पण याबाबत त्यांच्या मनात काही बदल झाला आहे का हे मला अजमावयाचे होते. मी हसून म्हणाले, ‘बरं बाबा, आज गोष्ट, हट्टी मुलं आहात तुम्ही. पण उद्यापासून अभ्यास एके अभ्यास हं! कबूल?’ ‘कबूल’ सारे एका स्वरात चिवचिवले.

मी गोष्ट सांगायला सुरुवात केली. ‘मी तुम्हाला ‘देवबाप्पा’ हा विषय दिलेला आहे. तेव्हा मी आज तुम्हाला देवासंबंधीच एक गोष्ट सांगणार आहे. शंकर आणि पार्वतीपुत्र कार्तिकेय आणि श्री गणेशाची! ‘बाप्पा’ म्हटल्यावर पहिला देव गणपतीबाप्पाच येतो ना? म्हणून पहिली गोष्ट गणपतीचा भाऊ कार्तिकेय आणि गणपतीबाप्पाची! गोष्ट सांगून झाली. त्यातील बोध सांगून झाला. मुलांचे पहिले दैवत कोण? तर मुलांवर जिवापाड प्रेम करणारे त्यांचे आई-वडील! माता-पिता! गणपती आणि कार्तिकेयाच्या कथेतून हेचं सिद्ध करायचे होते. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव!’ ती गोष्ट सांगून झाल्यावर मुलांचा पुन्हा दुसरा सूर, ‘बाई, देव आणि राक्षसाच्या युद्धाची सांगा ना!’ अजून बेल व्हायला थोडा अवकाश होता. तेव्हा मलाही पटले. आणि हेही पटले की, या वयातच आपण देवांनी दानवावर कसा विजय मिळवला, सत्याचाच नेहमी असत्यावर विजय कसा होतो हे मुलांवर बिंबवण्याचा हाच काळ! हेच खरे वय आहे हे समजावून सांगण्याचे! मग मी राम-रावणाच्या युद्धाची कथा सांगितली. रावणाचा कपटीपणा, खोटेपणा आणि रामाने सत्याचा आधार घेऊन खरेपणाने रावणाचा पराभव कसा केला, याचा मुलांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला असावा. मुले चांगलीच खूश झाली होती. मलाही आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान वाटले. बेल झाली. मी जाता जाता मुलांना एकाच वाक्यात देव आणि राक्षस यातील फरक मनावर बिंबावा म्हणून सांगितले, ‘तर काय मुलांनो, देव म्हणजे चांगली माणसे आणि वाईट माणसे म्हणजेच राक्षस! लक्षात आले ना?’ मुले एक सुरात म्हणाली, ‘हो बाई!’ आणि पाठीवर दप्तर अडकवून त्यांनी वर्गातून धूम ठोकली. कुणास ठाऊक त्यांना काय कळले? पण मला मात्र समाधान वाटले.

समाधानाचे हास्य घेऊन मी वर्गाबाहेर पडत होते, तेवढय़ात समोर कुलकर्णीबाई उभ्या दिसल्या. मी मुलांशी जे शेवटचे वाक्य बोलले होते, ‘मुलांनो, चांगली माणसे म्हणजे देव आणि वाईट माणसे म्हणजे राक्षस!’ हे कुलकर्णीबाईंना खटकले असे त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवले. त्या म्हणाल्या, ‘अहो बाई, तुम्ही ‘देव’ या संज्ञेचा इतका साधा-सरळ अर्थ कसा सांगू शकता? अहो, इतका सोपा आहे का देव? मग सारेच देव झाले असते.’ मी मध्येच म्हटले, ‘हो, का नाही होऊ शकत? मनात आणले तर जरूर होऊ शकतात. म्हणे चांगली माणसे म्हणजे देव!’ त्या पुटपुटल्या. पण मला हे कळेना यांना का एवढा या वाक्याचा राग यावा? मी मनात म्हटले, ‘अहो, तेच तर दु:ख आहे. माणसाला देव बनण्याची संधी असून तो किरकोळ राग, लोभ, हेवेदावे यांनी ती गमावतो. असो. मी गडबडीत होते. तो विषय मी तिथेच सोडला.

दुसऱ्या दिवशी सर्व मुले आपआपले निबंध घेऊन वर्गात हजर होती. प्रत्येकाने ‘देवबाप्पा’ या विषयावर आपला निबंध लिहून आणला होता. त्यांनी ‘देवबाप्पा’ या विषयावर मोठय़ा उत्साहाने निबंध लिहिले होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या निबंधावर मी जे एक वाक्य जाता जाता सांगितले होते, त्याचा बरोबर परिणाम झाला होता. चांगल्या-वाईटाचा आणि त्याच्याशी संबंधित आपल्या आयुष्यातील माणसांचाही त्यांनी उल्लेख केला होता. एकाने लिहिले होते, ‘माझे आई-बाबा फार फार चांगले आहेत. ते माझ्यावर खूप खूप प्रेम करतात. चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. माणसाने देवाप्रमाणे वागावे, दुसऱ्याचे चांगले चिंतावे, दुसऱ्याचा हेवा करू नये, दुसऱ्यांना मदत करावी, नेहमी सत्य बोलावे, प्रेमळपणाने बोलावे, अशी चांगली शिकवण माझे आई-बाबा मला देतात. म्हणून मी माझ्या आई-बाबांनाच देव मानते!’ किती सुंदर! किती चटकन् आत्मसाद केले. या मुलाने दैवी गुण? हे मोठय़ांना कोणी सांगावे? माझ्या मनात आले.

दुसऱ्या निबंधात त्या मुलाने लिहिले होते, ‘माझी आई फार चांगली आहे. ती मला रोज चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते. देवाचे गुण अंगी बाणवायला सांगते. माता-पिता हे देवाच्या स्थानी असतात, असे म्हणतात. मी माझ्या आईला देव मानतो, पण माझे बाबा वाईट आहेत. ते रोज दारू पिऊन येतात आणि आईला मारतात. त्यामुळे मी त्यांना राक्षस म्हणतो. आई म्हणते, ‘असे बोलू नये.’ पण मी वाईट माणसाला देव कसे म्हणणार? वाईट माणसे राक्षसच असतात. आमच्या बाईपण सांगतात म्हणून मी फक्त माझ्या मातेला देव मानतो. मातृदेवो भव.’ मलाही देवासारखे वागून देव बनायला आवडेल. त्याचा निबंध वाचून मला आश्चर्य वाटले, पण आनंदही तितकाच झाला.

मुलांनी ‘देवबाप्पा’ या विषयावर मोठय़ा उत्साहाने निबंध लिहिले होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या निबंधावर मी जे एक वाक्य जाता जाता सांगितले होते, त्याचा बरोबर परिणाम झाला होता.

काही मुलांनी देवाच्या गोष्टी लिहिल्या होत्या. शंकर-पार्वती, गणपती, राम-लक्ष्मण अशा आपल्याला माहीत असलेल्या व आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी लिहून, कोणता देव आपल्याला जास्त आवडतो तेही लिहिले होते. एकाने तर राजा शिवाजी याने कसे पराक्रम केले, तो कसा चांगला राजा होता आणि चांगला माणूस म्हणून देव होता असे लिहिले होते. या वयात त्यांनी जे विचार मांडले त्याचे मला कौतुक वाटले. मुलेही विचार करू शकतात, आपण फक्त त्यांच्या विचारांना योग्य दिशा दाखवून चालना द्यायची असते याचे मला चांगलेच प्रत्यंतर आले. एकाच वाक्यात देव आणि राक्षसातील फरक त्यांच्या चांगलेच पचनी पडले होते. त्या वाक्याचा त्यांच्यावर पगडा बसला होता. म्हटलं ना? मन आणि विचार बनविण्याचे मुलांचे हेच वय असते.

पुन्हा दुसऱ्या दिवशी कुलकर्णीबाई वर्गासमोरून जाताना दिसल्या, हसल्या. म्हणाल्या, ‘काय बाई, लिहिला का मुलांनी ‘देवबाप्पा’ या विषयावर निबंध? कोण कोण देव माणसे आली त्यांच्या लिखाणात?’ त्यांच्या बोलण्याचा रोख ओळखून मी म्हटलं, ‘हो लिहिले ना सर्वानी!’ अगदी छान लिहले बरं का सर्वानी निबंध! म्हणजे अगदी मला अपेक्षित होते तसेच! त्यांना आवडेल त्या देवावर त्यांनी अगदी योग्य शब्दांत निबंध लिहिले बरं! पुराण काळातील देव, इतिहासातील देव, इतकंच काय मातृदेवो भव, पितृदेवो भव! हेही त्यांच्या लिखाणात आले. अगदी गुरू म्हणजे शिक्षक यांनाही देव मानायला ते विसरले नाहीत हं!’ आम्हाला शिक्षण देणारे शिक्षक म्हणजे आमचे गुरू आहेत. गुरूंना आम्ही देव मानतो, असेही लिहायला ते विसरलेले नाहीत. अहो, मुले म्हणजे अगदी सुकुमार, नाजूक अशा मूर्ती असतात. त्यांचा आकार सुबक बनविण्याचे खरे कार्य तर आपणा शिक्षकांनाच करायचे असते बरं का कुलकर्णीबाई! यातून जर खरच एक एक देवबाप्पाची मूर्ती घडली तर आपल्याला केवढा आनंद मिळेल माहीत आहे का तुम्हाला? तरीही त्यांचं एकच म्हणणं ‘देवाची इतकी सोपी व्याख्या, इतका सोपा अर्थ तुम्ही कसा सांगू शकता?’ माझं म्हणणं, ‘अहो, त्यांचं वय काय? हा एवढा सोपा अर्थ जर आज त्यांनी आत्मसाद केला, चांगला माणूस (देव) बनण्याचे बीज आज त्यांच्यात रुजले हेही पुष्कळ आहे. मला खरे तर कुलकर्णी बाईंशी या विषयावर बरेच काही बोलावे वाटत होते, पण असे जाता जाता बोलण्याचा हा विषय नव्हता. मी एवढंच म्हटलं, ‘कुलकर्णी बाई, तुम्ही तर इतिहासाच्या शिक्षिका आहात, तुम्हाला हे म्हणणं खोलवर विचार करता पटलं पाहिजे. इतिहासातही आपण पाहतो, सच्चाईने लढाई-युद्ध- करणारे आणि कपट, कारस्थान आणि घातपाताने आक्रमण करणारे यात तर जमीन अस्मानाचा फरक आहे. पुन्हा तेच शब्द देव आणि राक्षस. या दोन वृत्तीच शेवटी त्यांना त्या त्या स्थानी पोहचवितात. आजच्या युगात अशी दैवी वृत्तीची पिढी निर्माण झाली तर आजचा फार मोठा प्रश्नही सुटेल. चांगल्या विचारांची ही पिढी आपण निर्माण केली तर नारी सन्मानासारख्या विचारांना प्राधान्य मिळेल. स्त्रीभृण हत्या करणारे लोक कदाचित मिळणारही नाहीत. आपले आपण कार्य करीत राहायचे. शेवटी काय शुद्ध ‘सत्य हेच सुंदर असते.’ असो. पुन्हा भेटू आपण, असं म्हणून मी निघाले. बराच उशीर झाला होता.

दुसरे दिवशी माझ्या ‘सत्यशोध’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता. ‘सत्य’या शब्दावर मी त्यात उलटसुलट प्रतिक्रिया मांडल्या होत्या. सत्याचे इतके माहात्म्य का आहे? सत्यवचन हे माणसाला देवत्वाप्रत नेऊन पोहचविते. सत्यवचनाने नरकप्राप्ती झाली तरी चालेल म्हणजे वाटेल ती शिक्षा झाली, तरी चालेल अशा विचाराप्रत येणारा अपराधीही देवाच्या दारी रुजू होतो. तर मग ज्याचे जीवन खुद्द ‘सत्यम शिवम् सुंदरम्’चे प्रतीक असेल तर तो का नाही या देवपदाला पोहचू शकणार? सत्याचे पावित्र्य स्वत:सिद्ध आणि तेजस्वी असल्याने ते सुंदरच असते.

देव सत्य असतो. देव शिव म्हणजे पवित्र (शुद्ध भावनांचा) आणि म्हणूनच सुंदर असतो. थोडक्यात देव म्हणजे ‘सत्यम शिवम् सुंदरम!’ संत काव्याचा आपण अभ्यास करतो. संत, देव यांची देवळात पूजा करतो, पण खरा संत, खरा देव कोणी जाणलाय? हा विचार सुशिक्षितांनीच नाही केला तर मग अशिक्षितांचे काय? ते तर अंधश्रद्धांमध्ये गुरफटलेले! कसे म्हणावे याला नवयुग? संतांनी सांगितलं आहे तुझ्या माझ्या अंतरात देव वसतो, पण आपण ते विसरलो आहोत. अंतरातील देव आपणच जागृत केला पाहिजे. सुशिक्षितांनी हे आपल्या आचरणातून दाखवून दिले पाहिजे. तशी पिढी निर्माण केली पाहिजे. देव आकाशातून उतरून आपल्याला इच्छित वर प्रसन्न होऊन देईल असे मानणारा अडाणी समाज आता या युगात नसलाच पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे अध:पतनाचं मूळ नष्ट करून भारताचं पुनरुत्थापन घडवून आणायचे असेल तर शिक्षणाचा प्रसार केलाच पाहिजे. पूर्वी ईश्वरावर ज्याचा विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणत पण आता नवा धर्म म्हणतो ज्याच्या स्वत:वर विश्वास नाही, ज्याचा सत्यावर विश्वास नाही तो नास्तिक! माझ्याच शब्दात सांगायचे झाले तर, सत्य, प्रेम, बंधुता याविषयी जो आस्था ठेवतो तो आस्तक! मग या अर्थाने माणसाला नास्तिक असण्याचे कारणच काय? हे सर्व पायदळी तुडवितो तो नास्तिक. सत्याविषयी आस्था नाही तो नास्तिक! मग असा नास्तिक कोण असेल? चांगुलपणावर विश्वास, आदर्शाविषयी आस्था तो आस्तिक, अशी मी व्याख्या करू इच्छिते. इथे न आस्तिक अर्थात नास्तिकाचे काम काय?

माणूस सर्व आदर्शाच्या ठिकाणी नतमस्तक होतो, जे जे चांगले त्याचा स्वीकार करतो आणि म्हणूनच या सर्व आदर्शाचे पूजन करतो आणि त्यासाठी देवळात एक मूर्ती स्थापन करतो. चराचरांत ईश्वर पाहणारे आपण मग, ते सर्व आदर्श एके ठिकाणी त्या आदर्शाचे प्रतीक असलेल्या मूर्तीला आपण शत शत प्रणाम करू यात नवल ते कोणते? तर देव कुठे आहे? ‘सत्यम शिवम् सुंदरम्’ च्या गाभाऱ्यात आपण मूर्त रूपात स्थापितो, त्या मूर्त रूपात जरूर पाहू आणि आपल्यातील दोष दूर करून त्या ठिकाणी आपले मन स्थापू.

असा आपल्या भारतीय संस्कृतीचा सुजाण अर्थ समजवून सांगितला तर भारतीयच काय, कोणीही मानव त्यापुढे नतमस्तक होईल.

माझ्या प्रकाशन समारंभातील हे भाषण (भाषण नाही मी तर त्याला सत्यच म्हणते) सर्वाना फार आवडले. अर्थात हे माझे भाषण म्हणा वा विचार माझ्या ‘सत्यशोध’ या पुस्तकाचे सारच म्हणावे लागेल. देव आणि संतवचने यांच्या विचार मंथनातून माझ्या या ‘सत्यशोध’चा पसारा ‘देव’ या संज्ञेचा मी माझ्या स्वतंत्र विचारातून जो उलगडा केला तो साऱ्यांना आवडला, ‘अहम, ब्रह्मास्मि’चा जुना मंत्र पुन्हा नव्याने जागविला पाहिजे हेच ‘सत्य!’

समारंभ संपला सगळय़ांशी बोलणे वगैरे झाल्यावर पुन्हा शेवटी कुलकर्णी बाई भेटल्या. त्या तर अतिशय खूश होत्या. इतक्या की त्यांचा गळा दाटून आला होता. त्या म्हणाल्या, ‘बाई, मी तुमच्याशी उगीचच वाद घातला. ‘चांगले लोक म्हणजे देव अन् वाईट लोक म्हणजे राक्षस हे तमचं साधं वाक्यही आज मला आदर्श वाटायला लागलंय.’

‘काही बोलू नका कुलकर्णी बाई आता.’ मी म्हटले. ‘तुम्ही माझ्या प्रकाशन समारंभाला आलात धन्यवाद! आता पटलं ना? देव ही संकल्पना कुठून कुठे पोहोचते. ती किती व्यापक अन् सुंदर आहे ते? अहो, मी तर फक्त ‘सत्य’ सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2014 1:22 am

Web Title: gods story
टॅग Charcha,Story
Next Stories
1 कथा : वाघोबांचे मुंबई दर्शन..
2 आधुनिक विकास सुखावह आहे?
3 आम्ही असू लाडके देवाचे…
Just Now!
X