24 February 2021

News Flash

जगणे शिकवणारे गुरुजी.. ताकाहिरो अराई – संतूरवादक

ख्यात संतूरवादक शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई यांना संगीताच्या क्षेत्रातच नव्हे तर जीवनातही आपल्या गुरुकडून काय मिळाले आणि त्याचा कसा उपयोग झाला, याचा केलेला

| July 31, 2015 01:18 am

lp06ख्यात संतूरवादक शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई यांना संगीताच्या क्षेत्रातच नव्हे तर जीवनातही आपल्या गुरुकडून काय मिळाले आणि त्याचा कसा उपयोग झाला, याचा केलेला ऊहापोह..

‘‘संगीत हे काही फक्त करमणुकीचे साधन नाही. त्यातून करमणूक होते हे सत्य असले तरी संगीत हे आध्यात्मिकतेकडे नेणारे साधन आहे. आणि आपण त्याचे प्रामाणिक साधक असणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीत शास्त्रीय संगीताला हे स्थान आहे,’’ ही माझ्या गुरूंची, आदरणीय पं. शिवकुमार शर्मा यांची पहिली शिकवण. आणि म्हणूनच आपण जेव्हा संतूर वाजवतो तेव्हा ते आपण वाजवत नसतो तर आपल्याकडून वाजवून घेतले जात असते, या धारणेनेच माझी संतूर प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
संतूर.. अत्यंत तरल, नाजूक आणि मनाच्या अगदी कोपऱ्यातील इवलीशी भावनाही अचूक टिपणारे भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्य. या वाद्याला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामध्ये मानाचे पान मिळवून देण्याचे महत्कार्य गुरुजींनी केले. शास्त्रीय संगीतामध्ये अविभाज्य मानले जाणारे मिंड, अवघड प्रदीर्घ तानांसारखे lp31प्रकार संतूर या वाद्यावर वाजवणे, त्यासाठी वाद्याची रचना करणे म्हणावे इतके सोपे नव्हते. माझ्या गुरुजींनी ते कार्य केले. वाद्याच्या मूलभूत मर्यादांवर मात करून ते वाद्य शास्त्रीय संगीतासाठी योग्य असे घडवले गेले. आणि अशा गुरुजींकडे शिकण्याचे भाग्य मला लाभले, हे मी परमेश्वरी आशीर्वादच मानतो.
मुळात मला संगीताची आवड होतीच. शालेय शिक्षणानंतर मी पहिल्यांदा ड्रमवादक म्हणून एका बँडचा सदस्यही होतो. पण एकदा संतूरचे सूर कानी पडले आणि सगळे आयुष्यच बदलून गेले. मला संतूरनादाने झपाटले. त्याचा गोडवा, त्याची आर्तता, तरलता आणि त्या वाद्याचे पाण्याच्या नादमाधुर्याशी असणारे साधम्र्य मोहक होते. त्याच क्षणी हे वाद्य शिकायचेच असे माझ्या मनाने घेतले. शिवाय ड्रम वाजवतानाही हातात दोन ‘स्टिक्स’चा वापर करायची सवय होतीच. इथे फक्त त्याची जागा नाजूक अशा कलमांनी घेतली.
वयाच्या २६ व्या वर्षी जपानी संतूरवादक सेत्सुओ मियाशिता यांच्याकडे मी रीतसर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मियाशिता हेही माझ्या गुरुजींचेच शिष्य. त्यांच्याकडे मूलभूत प्रशिक्षण झाल्यानंतर, मला गुरुजींकडे सोपविण्याची शिफारस त्यांनी केली. आपल्या विद्यार्थ्यांची तळमळ आणि चिकाटी यांना शिक्षकाने प्रोत्साहन देणे गरजेचे असते. माझ्या पहिल्या गुरुजींनी ते केले. म्हणून खरे तर माझ्या पुढील प्रवासाची दारे खुली झाली.
मे २००७ मध्ये भारतात येण्याचा निर्णय मी घेतला. येथील संस्कृती, राहणीमान, भाषा सारे काही माझ्यासाठी नवीन होते. पण माझ्या गुरुजींचा आधार मला होता. ज्याच्यामागे त्याचे गुरू आहेत त्याला भीती कसली आणि चिंता तरी कसली? गुरुजींनी माझ्या केवळ संतूर शिकण्याचेच नव्हे तर जीवनाकडे मी कसे पाहावे, याचेही प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
शिकवताना काहीही हातचे राखायचे नाही, अत्यंत तल्लीनपणे शिकवायचे हे त्यांचे सूत्र. प्रचंड संयम, चिकाटी आणि समजेपर्यंत समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी ही त्यांची मला भावलेली वैशिष्टय़े. आधुनिक काळात जेव्हा आपले समवयस्क कमवायला लागलेले असतात आणि आपण चाचपडत असतो अशा मानसिक अवस्थेत आपल्या ध्येयाकडे लक्ष एकाग्र करून वाटचाल करीत राहणे निश्चितच आव्हानात्मक आहे. त्यासाठी गुरूंचा आशीर्वाद आणि स्नेह अनिवार्य आहे. माझ्या गुरुजींनी अशा आव्हानांना सामोरे जाताना मोठा आधार दिला. जे चांगले वाटते त्याला प्रोत्साहन देणे, जे अयोग्य वाटेल त्यापासून दूर राहण्याचे सामथ्र्य देणे ही माझ्या गुरुजींची आणखी काही वैशिष्टय़े.
आव्हान जितके मोठे आणि त्यासाठी धोका पत्करायची तुमची मानसिक तयारी जितकी अधिक तितकी तुमची यशाकडे जाण्याची शक्यता अधिक. यात अपयशी ठरण्याचा धोका असला तरी मोठय़ा आव्हानाला सामोरे जाताना अंत:करणात निर्माण होणारी तळमळ विजयाचा मार्ग दाखवते, हे माझ्या गुरुजींचे तत्त्वज्ञान. अवघड काळात यामुळे उभे राहणे मला शक्य झाले.
माझ्या या गुरुजींमुळेच मला भारतातील अनेक ठिकाणी प्रवास करता आला. तिथली संस्कृती पाहता- अनुभवता आली. केवळ संतूरवादनातीलच नव्हे, तर शास्त्रीय संगीतातील आणि जगण्यातीलही अनेक बारकावे मला कळू शकले. गुरू-शिष्यांचे म्हणून एक वैशिष्टय़पूर्ण नाते असते, पण मला गुरुजींच्या कुटुंबातील एक सदस्य असल्यासारखेच वागवले गेले. गुरुजींच्या कुटुंबानेही माझ्यावर अतिशय प्रेम केले. त्यामुळेच खरे तर इथे भारतात मला माझ्या कुटुंबापासून पारखे झाल्यासारखे वाटले नाही.
गुरुपौर्णिमेची माझ्या मनात एक विशेष आठवण आहे. २००९ साली पुण्यात गुरुपौर्णिमेच्याच दिवशी मी पहिल्यांदा लोकांसमोर संतूरवादनाचा कार्यक्रम सादर केला. माझ्या गुरुजींनीच मला तो कार्यक्रम करावा असे सांगितले होते. एका शिष्याच्या मनात गुरूंविषयी सदैव प्रेम असतेच आणि त्यामुळेच गुरुपौर्णिमेचे एक अनन्यसाधारण महत्त्व मनात असते. पण त्याबरोबरीनेच माझ्या गुरुजींमुळे मला पहिल्यांदा संतूरवादनाची संधी या दिवशी मिळाली. आणि हा दिवस माझ्यासाठी खरोखरीच अविस्मरणीय ठरला. एका शिष्याने आपल्या गुरुजींसाठी त्यांच्याचकडून शिकलेल्या वाद्यावरील वादन जाहीरपणे सादर करणे ही मनस्वी गुरुदक्षिणाच आहे.
गुरुजींविषयी किती सांगावे? त्यांचा संयम, सामान्य माणसाने उद्विग्न व्हावे अशा प्रसंगी त्यांच्याकडे असलेली तरल विनोदबुद्धी, त्यांचे संगीतावर असलेले प्रेम, संगीताच्या प्रसाराची-प्रचाराची आणि विश्वशांतीची त्यांना असलेली ओढ, त्यांचा मनुष्यसंग्रह, त्यांचे सहृदय माणूसपण, त्यांचे निरहंकारी असणे, त्यांची आजही सतत जाणवणारी शिकण्याची वृत्ती, त्यांचे संगीतात हरवून जाणे, आजही आपण काही केले नाही तर देवाने आपल्याकडून काही करामती घडवून घेतल्या ही धारणा..
यातले एकेक गुणमूल्य इतके महत्त्वाचे आहे की, त्यापैकी एखादा जरी अंगी बाणवता आला तरी धन्य झाल्यासारखे वाटावे. येत्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या लेखाच्या माध्यमातून मी माझ्या गुरुजींविषयी कृतज्ञता आणि मनस्वी असलेले प्रेम व्यक्त करू इच्छितो. हे माझे फक्त सांगीतिक गुरू नाहीत. तर ते माझे जगण्याचे गुरू आहेत. या गुरुजींनी मला स्टेजवर बोलावे कसे, लोकांशी संवाद कसा साधावा, हिंदी कसे बोलावे अशा असंख्य गोष्टी शिकवल्या. इतके असामान्य गुरुजी मला देणाऱ्या परमेश्वराचेही मी आभार मानू इच्छितो.
शब्दांकन : स्वरूप पंडित – response.lokprabha@expressindia.com
(ही मुलाखत ‘लोकसत्ता शागीर्द’ या पृथ्वी एडिफिस प्रायोजित कार्यक्रमादरम्यान घेण्यात आली.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:18 am

Web Title: guru paurnima special 21
Next Stories
1 कोणीही कोणाचाही गुरू अक्षय वर्दे – बाईक मॉडीफायर
2 तरुणांचा नेट-गुरू
3 पुस्तकांनी दिली जीवनदृष्टी!
Just Now!
X