lp06महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, बॉम्बे आर्ट सोसायटी, राज्य शासनाचे सवरेत्कृष्ट शिक्षक असे अनेक पुरस्कार मिळवलेले वसंत सोनावणी यांनी गुरू-शिष्य नात्याचे विविध पैलू मांडले.
वसंत सोनावणी. मूर्ती घडवण्याच्या इच्छेने मुंबईत आले, पण एकाच्या सांगण्यावरून त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकला शिकण्यासाठी प्रवेश घेतला. जेजेमध्ये असताना त्यांना पळशीकर आणि संभाजी कदम सर यांच्याकडे शिकण्यास मिळाले. तेच आपले खरे गुरू ठरले असं वसंत सोनवणी सांगतात. त्या वेळी ‘हे असं कर’ हे सांगणारे शिक्षक नव्हते. ‘शिक्षकांकडून काय शिकायचं ही विद्यार्थ्यांची कसोटी असायची. पण, यातूनच विद्यार्थी घडायचा. सध्याच्या ‘स्पून फिडिंग’मुळे विद्यार्थी परावलंबी होतात. कला हा विषय शिकवणं म्हणजे कलाकाराच्या जाणिवा जागृत करणं आहे. मग कला आपोआप आत्मसात होते आणि त्याच्या घडवलेल्या, निर्माण झालेल्या जाणिवांनुसार ती रेखाटली जाते. माझ्या गुरूंनी ही जाणीव करून देण्याचं काम केलं. मीही हेच पुढे माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत करू शकलो’, असं वसंत सोनवणी सांगतात.
पळशीकर आणि कदम या दोन्ही सरांच्या चित्रांबद्दल ते म्हणतात, ‘त्यांच्या चित्रांमधले रंग इतके परिपूर्ण असायचे की माणसाच्या त्वचेचा रंग चित्रात जसाच्या तसा दिसायचा. तर संभाजी कदम यांचं चित्रं आम्ही बघायचो तेव्हा त्यांचं ब्रशने रंगवणं इतकं सुंदर असायचं की असा हात आपल्याला मिळावा असं वाटायचं.’ जेजेमध्ये ते शिकायला होते तिथेच त्यांनी नंतर ३१ वर्षे नोकरीही केली. कला विभागाचे शिक्षकप्रमुख म्हणूनही काम केलं. आजच्या बदललेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याबद्दल ते म्हणतात, ‘आजच्या पिढीतल्या मुलांना चांगला गुरू मिळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आई-वडिलांना पहिले गुरू असं म्हणलं जातं. पण, त्याच आई-वडिलांना मुलांसाठी वेळच नाही. त्यामुळे मुलांनी मोकळं व्हावं आणि योग्य तऱ्हेने घडावं यासाठी शिक्षकांचं मुलांशी नातं महत्त्वाचं आहे.’
त्यांच्या दृष्टीने लहान मुलांना व्यक्त होण्यासाठीचं सर्वात उत्तम माध्यम म्हणजे चित्रकला. याचं कारण म्हणजे चित्रकाराच्या भावना त्या चित्रात दडलेल्या असतात. विशिष्ट चित्र काढणारा चित्रकार त्या चित्रावर काय विचार करत होता हे अनुभवी चित्रकाराला लगेच लक्षात येतं. म्हणूनच आपल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांबाबत वसंत सोनवणी सांगतात, ‘आम्हाला मुलांच्या चित्रांवरून कळतं की ही मुलं कितपत मोकळी झाली आहेत. एक अनुभव सांगतो. एका विद्यार्थ्यांची चित्रं बघितल्यावर त्यातून त्याच्या मनाची अस्वस्थता जाणवायची. एकदा त्याला सहजच भेटायला बोलवलं. दोन-तीन तास अगदी सहज गप्पा मारल्या. अक्षरश: दुसऱ्या दिवसापासून त्याच्या चित्रातला बदल, मोकळेपणा मला जाणवला. हे जसं मोठय़ांचं आहे तसंच लहान वयातही मुलांनी मोकळं होणं गरजेचं आहे.’ यासाठी तसे शिक्षक, गुरू आणि ज्ञानासाठी आतुर असणारे विद्यार्थी घडणंही महत्त्वाचं आहे. ‘गुरुस्तु मौनम् व्याख्यानम्’ हे आपलं संस्कृत वचन फार पूर्वीपासून प्रचलित आहे आणि त्याची अनुभूती आताच्या काळातही येते. स्पष्टपणे न बोलताही गुरूच्या मौनाचा अर्थ त्याच्या शिष्यापर्यंत पोहोचतो. पण, आताच्या पिढीतल्या मुलांना शिक्षकांची गरजच नसते. हाताच्या बोटांवर त्यांच्या प्रत्येक शंकेचं, समस्येचं उत्तर त्यांना मिळत असतं. पण हेच, शिक्षकांना ज्या वेळी तीच शंका, तीच समस्या विचारली जाते त्यावेळेस त्या प्रश्नाव्यतिरिक्तही भरपूर ज्ञान, अनुभव शिक्षकांकडून मिळतात. म्हणून गुरू-शिष्य परंपरा महत्त्वाचीच आहे’, असं ते सांगतात.
श्रुती आगाशे – response.lokprabha@expressindia.com