scorecardresearch

Premium

भविष्य विशेष : समाजमाध्यमे आणि आपण

फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम अशी अनेक समाजमाध्यमे मोबाइल फोनमुळे आपल्या मुठीत आली.  या आभासी जगात माणसामाणसांतील अंतर कमी होत गेले.

social_astro
या समाजमाध्यमांचा वापर जसा समाजप्रबोधन किंवा काही सकारात्मक कामांसाठी करण्यात आला, तसाच तो गुन्हेगारी, फसवणूक, दंगली घडवून आणण्यासाठीही होऊ लागला.

कलिका गोखले – response.lokprabha@expressindia.com
माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, कारण तो विचार करू शकतो. चर्चा-परिचर्चा, मतभेद अनादि कालापासून घडत आले आहेत. माणूस हा समाजप्रेमी जीव आहे. संवाद साधल्याशिवाय तो जगू शकत नाही आणि या संवादातून किंवा चर्चातूनच समान मतांचे पंथ तयार होतात आणि त्याचबरोबर त्या मतप्रणालीला विरोध करणारे प्रवाहही निर्माण होतात. फार पूर्वीपासूनच मानवी जीवनाच्या जडणघडणीत ही प्रक्रिया समाविष्ट झाल्याचे आपल्याला दिसून येते. मतमतांतराच्या या गलबल्यात कित्येक वेळा लढाया, हाणामाऱ्या झाल्या आहेत, वर्चस्व गाजवले गेले आहे किंवा असहाय्य होऊन मान्य नसणाऱ्या विचारांचे वर्चस्व नाइलाजाने मान्य केले गेले आहे. एकूण काय तर फार पूर्वीपासूनच माणसामध्ये आपले विचार समाजासमोर मांडण्याची वृत्ती प्रबळ आहे. काळ बदलत गेला तशा समाजात व्यक्त होण्याच्या पद्धती बदलत गेल्या आणि आज २१व्या शतकात  व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम ठरले आहे, समाजमाध्यमे.

ही माध्यमे आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ यातून पुढे जात आपण मोबाइलपर्यंत पोहोचलो. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम अशी अनेक समाजमाध्यमे मोबाइल फोनमुळे आपल्या मुठीत आली.  या आभासी जगात माणसामाणसांतील अंतर कमी होत गेले. जगाचे व्यासपीठ सर्वानाच उपलब्ध झाले. या समाजमाध्यमांचा वापर जसा समाजप्रबोधन किंवा काही सकारात्मक कामांसाठी करण्यात आला, तसाच तो गुन्हेगारी, फसवणूक, दंगली घडवून आणण्यासाठीही होऊ लागला. या नवमाध्यमांचा ज्योतिषशास्राच्या दृष्टीतून विचारात करताना कुंडलीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कुंडलीतील तृतीय स्थान हे पूर्वीपासूनच संपर्क स्थान म्हणून मानले गेले आहे, तर ग्रहांमध्ये बुध हा ग्रह या संदर्भात लक्षात घेतला जातो. 

kutuhal writer noam chomsky
कुतूहल : नोम चॉमस्की
Loksatta kutuhal State of Artificial Intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अवस्था
girl student commits suicide in kota
तणावामुळे कोटा येथे विद्यार्थिनीची आत्महत्या
The person who posted about the abuse on social media was arrested Mumbai news
समाज माध्यमांवर गैरव्यवहाराबाबतची पोस्ट करणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

भारताच्या कुंडलीचा विचार करता वृषभ लग्न व कर्क चंद्राची ही कुंडली फार बोलकी आहे. तृतीय स्थानी रवी, चंद्र, शुक्र, शनि, व बुध हे पाच ग्रह आहेत. त्यामुळे इथे मतमतांतराचा गलबला कायमच सुरू असतो. प्रत्येक पंथ, प्रत्येक मतप्रवाह आपलेच वर्चस्व राखण्याचा प्रयत्न सदैव करताना दिसतो. सत्ताकारक रवी जलतत्त्वाच्या कर्क राशीत असल्याने तो काहीसा दुर्बळ झाल्याचे दिसते. आपण सुरुवातीपासून पाहिले तर कुठलेही सरकार असले तरी त्याच्या विरोधात उभे ठाकणारे सरकारच्या प्रत्येक धोरणावर टीकाच करणारे लोक आपल्याला आढळतात. ज्या तृतीय स्थानावरून आपण समाजमाध्यमांचा विचार करतो तिथे तृतीयेश चंद्र स्वत: बसलेला आहे. जो सामान्य जनतेचा कारक मानला जातो. त्यामुळे भारतात सुरुवातीपासूनच सामान्य जनतेच्या मतांना महत्त्व आहे.

कर्मस्थानाचा अधिपती शनी इथे स्थानापन्न आहे. कर्मस्थान हे अधिकाररुढ पक्ष किंवा सरकार दर्शवते आणि शनी या स्थानी अस्तंगत झालेला आहे. याचा अर्थ लोकांनी निवडून दिलेलेच सरकार इथे कायम राहणार आहे. चंद्र म्हणजेच सामान्य जनतेचा सरकारवर कायमच दबाव राहणार आहे. चंद्र इथे स्वगृहीचा असल्याने व त्यावरून सामान्य जनतेची भूमिका ठरत असल्यामुळे जनतेचे प्राबल्य राहते. संपर्क यंत्रणेचा कारक ग्रह बुध हादेखील इथेच स्थित असल्याने भारतात सामाजिक माध्यमे किंवा संपर्क यंत्रणा कायमच प्रभावी राहिल्या आहेत. बुध हा संपर्क यंत्रणेचा तसेच बुद्धिवंत व विचारवंताचाही कारक आहे, त्यमुळे भारतात विचारवंताची एक फळी सामाजिक क्षेत्रात कायमच सक्रिय असते. आता आपण येणाऱ्या वर्षांत समाज माध्यमाचे भारतातील जनजीवनावर काय व कसे परिणाम होतील ते पाहूया. जानेवारीच्या १४ तारखेपर्यंत रवी धनू राशीत राहील आणि नंतर मकरेत जाईल. मकरेत जाणारा रवी हा तृतीय स्थानावर दृष्टी टाकेल त्यामुळे समाज माध्यमांवर काहीसं सरकारचं वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. ३० डिसेंबरला शुक्र वक्री होऊन धनू राशीत येईल. कलाकारांच्या बेताल वक्तव्यांमुळे किंवा कृतीमुळे समाजमाध्यमांत खळबळ माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१६ जानेवारीला मंगळ धनू राशीत प्रवेश  करत आहे व त्याचीही दृष्टी तृतीय स्थानावर येईल, त्यामुळे समाज माध्यमांतील संदेशांमुळे विभिन्न पंथांच्या व्यक्तींमध्ये हाणामाऱ्या, कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. मकरेतून जाणारा बुध १५ जानेवारीला वक्री होत आहे. त्यामुळे गमतीत प्रसारित केलेल्या संदेशांमुळेसुद्धा गैरसमज वाढून भांडणे होतील. विचार न पटल्याने विरोध दिसून येईल. भारताच्या कुंडलीत दशमस्थानी सात्त्विक ग्रह गुरू कुंभेत स्थित आहे. तो सत्तारुढ पक्षाला विचारपूर्वक निर्णय घ्यायला लावेल. धार्मिक प्रसारासाठी समाज माध्यमांचा वापर केला जाईल. न्यायाधीश मानला गेलेला महत्त्वाचा ग्रह शनी सध्या मकरेत भ्रमण करत आहे. एप्रिलपर्यंत तो मकरेतूनच भ्रमण करेल. त्याची सरळ दृष्टी तृतीय स्थान व त्यातील ग्रहांवर येणार आहे. त्यामुळे समाज माध्यमात न्यायप्रविष्ट प्रकरणांची चर्चा होऊन जनमानसात एक प्रकारची अलिप्तता, निराशा दिसून येईल. मात्र हा शनी एप्रिलमध्ये कुंभेत जाईल त्या वेळी सत्तारूढ पक्षाच्या काही निर्णयांमुळे समाज माध्यमांत वादळ निर्माण होण्याची शक्यता राहील. मार्च महिन्यात पापग्रह राहू व केतू हे आपापली स्थाने बदलून मागे जातील त्या वेळी राहू शनीच्या तिसऱ्या दृष्टीत सापडेल व काही गोष्टींबद्दल समाज माध्यमांत परसलेले संभ्रमाचे वातावरण थोडेसे कमी होईल. फेब्रुवारीच्या मध्यात फक्त रवीचे राशी संक्रमण होईल व तो कुंभेत गुरूबरोबर येईल. धार्मिक बाबतीत सरकारने उचललेल्या काही ठोस पावलांमुळे समाजमाध्यमांत खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

२६ फेब्रुवारीला मंगळ त्याच्या उच्चराशीत मकरेत प्रवेश करेल. तो साधारण ७ एप्रिलपर्यंत तिथेच राहील. या कालावधीत भारतात समाज माध्यमांमध्ये बऱ्यापैकी उलथापालथ झालेली दिसेल. उच्चपदांवरील व्यक्तींच्या काही लिखाणामुळे किंवा वक्तव्यांमुळे सामाजिक क्षेत्रात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. शनीही त्या सुमारास तिथेच असेल. भल्याभल्या विचारवंत किंवा संयमी लोकांकडूनही काही प्रक्षोभक वक्तव्य केली जाण्याची शक्यता आहे. ही वक्तव्ये किंवा लेखन समाजमाध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचल्यास खळबळ माजू शकते. २७ फेब्रुवारीला शुक्र  मकरेत प्रवेश करेल त्यामुळे कलाकारांकडून राजकीय किंवा सामाजिक स्थितीबद्दल समाज माध्यमांवर वक्तव्ये केली जातील. मार्चच्या सुरुवातीला बुध तर मध्यात रवी राशीबदल करतील. एप्रिल महिन्यात ७ तारखेला मंगळ कुंभ राशीत म्हणजे भारताच्या कुंडलीत दशमात जाईल त्यावेळी प्रक्षोभक लिखाण करणाऱ्यांवर कारवाई होण्याचे प्रमाण वाढेल. लगेचच ८ तारखेला बुध मेष राशीत प्रवेश करेल म्हणजे भारताच्या कुंडलीच्या व्ययात जाईल. त्या वेळी काही लोक अनिष्ट कारवायांसाठी समाज माध्यमांचा वापर करतील. याच महिन्यात महत्त्वाचे दोन ग्रह राशीबदल करतील. १३ एप्रिलला गुरु मीनेत तर २९ एप्रिलला शनी कुंभेत प्रवेश करेल. शत्रूची पाचवी दृष्टी तृतीय स्थानावर येत असल्याने धार्मिक गोष्टींचा प्रसार समाज माध्यमांत वाढीला लागेल व एकंदरच सर्वसामान्यांची बिथरलेली मन:स्थिती ताळय़ावर येईल. युवा वर्गाकडून समाज माध्यमांचा गैरवापर कमी होईल. दशमेश दशमात असल्यामुळे व त्याची १२ व्या स्थानातल्या बुधावर दृष्टी असल्याने समाज माध्यमांमधून केला जाणारा अपप्रचार, पसरवले जाणारे गैरसमज, प्रक्षोभक लेखन यावर नियंत्रण राहील. २७ एप्रिलला शुक्र मीनेत जाईल तो गुरु महाराजांबरोबर आल्यामुळे कलाकार मंडळी विचारपूर्वक वक्तव्ये करतील. एप्रिलमध्ये काही दिवसांसाठी रवी व शनी हे पितापुत्र एकत्र असतील. समाज माध्यमांचा उपयोग सरकार व जनता आपापल्या कामांसाठी करतील तिथे मंगळ ही असल्याने सामाजिक माध्यमांतून खडाजंगी होण्याची शक्यता राहील. १४ मे रोजी रवि तर १७ मे रोजी मंगळ राशी बदलतील. वृषभेत म्हणजे भारताच्या कुंडलीत लग्नात येणारा रवी सरकारकडून जनतेच्या आरोग्यासंबंधी तसेच देशाला उन्नतीकडे नेण्यासाठी कार्य घडवून घेईल ज्याचा समाजमाध्यमांद्वारे जोरदार प्रचार करण्यात येईल. मीनेत म्हणजे लाभात येणारा मंगळ शत्रूंचा पाडाव करेल व त्याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांतून केली जाईल. मेषेत जाणारा शुक्र कलाकारांना परदेशी जायला उद्युक्त करेल. त्यावरून त्यांना समाजमाध्यमांवरील टीकेला सामोरे जावे लागेल. त्यांच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्यांच्यावर बोचरी टीका होईल. १५ जूनला समाजमाध्यमांत खळबळ माजण्याची शक्यता आहे. १८ जूनला शुक्र वृषभेत लग्नात येईल. कलाक्षेत्रातल्या उत्तमोत्तम कलाकृतींची चर्चा समाजमाध्यमे रंगवतील. जून २६ ला मंगळ मेषेत जाईल. शत्रुस्थानी दृष्टी टाकणारा मंगळ शत्रुवर यशस्वी लष्करी कारवाई घडवून आणेल. तसेच पोलिसांकडून गुन्हेगांराचा योग्य तपास घडवेल. त्याची चर्चा समाजमाध्यमांत होईल. २ जुलैला मिथुनेत जाणारा बुध लगेचच अस्तंगत होत आहे. १२ जुलैला शनी वक्री होऊन पुन्हा मकरेत येईल व त्याची थेट दृष्टी तृतीयस्थानी येईल. १३ जुलैला शुक्र मिथुनेत जाईल. १६ तारखेला कर्केत जाणाऱ्या रवीमुळे सरकार जनसामान्य, बुद्धिवंत आणि कलाकारांनी मांडलेल्या मुद्दय़ांच्या कचाटय़ात सापडेल. त्याचवेळी बुध सामाजिक माध्यमांना जास्त सक्रीय करेल. ऑगस्टच्या सुरुवातीला सिंहेत जाणारा बुध विरोधकांना समाजमाध्यमांवर जास्त सक्रिय करेल. ६ ऑगस्टला कर्केत जाणारा शुक्र कलाकारांना व स्त्रियांना सामाजिक माध्यमांवर बोलतं करेल. १० ऑगस्टला वृषभेत जाणारा मंगळ सरकारच्या धडक कारवायांची चर्चा माध्यमांतून रंगवेल. १७ ऑगस्टला सिंहेत जाणारा रवी व कन्येत जाणारा बुध पाणीसाठय़ाची, विरोधी पक्षांची चर्चा माध्यमांतून घडवून आणतील. सरकारच्या त्यावरच्या योजना हा चर्चेचा प्रमुख विषय राहील.

सप्टेंबर महिन्यात रवी व शुक्र कन्येत जातील. सरकारच्या शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या धोरणांविषयी चर्चा होईल. १५ ऑक्टोबरला मिथुनेतून जाणारा मंगळ आर्थिक बाबींमध्ये स्फोटक घटना घडवेल ज्याची चर्चा सर्वत्र होईल. ऑक्टोबरमध्ये तुळेत जाणारे रवी, शुक्र, बुध यांच्यामुळे खाद्यपदार्थाचे  साठे व त्यांची साठेबाजी तसेच त्यावरचे सरकारचे नियंत्रण, आरोग्यविषयक समस्या इ. गोष्टींची चर्चा होईल. ११ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर वृश्चिकेत जाणारे शुक्र, बुध, रवि परराष्ट्र संबंध, आपली धोरणे, विवाह संस्थेची कोलमडणारी परिस्थिती समाजमाध्यमांतून अधोरेखित करतील. वृषभेत वक्री मंगळ लष्करी व पोलिसी कारवायांचे प्रमाण वाढवेल. डिसेंबरमध्ये सुरुवातीला बुध व शुक्र तर मध्यावर रवी धनू राशीत प्रवेश करेल. अष्टमात जाणारे ते तीनही ग्रह समाज माध्यमांचा गैरवापर वाढवतील लोकांच्या मनात समाजमाध्यमांबद्दल भीती, संशय निर्माण करतील. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात मकरेत जाणारे बुध, शुक्र, शनीच्या साहाय्यात येतील त्यामुळे समाजमाध्यमांवर जनतेला व कलाकारांना प्राधान्य मिळेल. ३० डिसेंबरला बुध वक्री होऊन पुन्हा अष्टमात जाईल आणि पुन्हा वाईट कामांसाठी, फसवणूक करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जाईल. भारताच्या १५ ऑगस्ट १९४७ च्या कुंडलीवरून समाजमाध्यमांची बदलत जाणारी परिस्थिती पाहिली. आता आपण बाराही राशींनी या वर्षांत समाजमाध्यमे वापरताना काय काळजी घ्यावी हे पाहू या.

मेष : या वर्षी मार्च महिन्यात राहू व केतू आपल्या लग्न सप्तमात येतील व गुरू लाभातून व्ययात जाईल तर शनी महाराज दशमातून लाभात येतील. लग्नावर यांची दृष्टी राहील. हे मेष राशीचे ग्रहगोचर राहील. समाज माध्यमांचा वापर मार्चनंतर विचारपूर्वक करावा. तुमच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. राग व संतापाने कुठल्याही माध्यमात विचार व्यक्त करू नयेत. विशेषत: सत्तेविरुद्ध बोलताना संयम राखावा. मार्च महिन्यात सुरुवातीला या माध्यमांचा लाभ वैयक्तिक गोष्टींसाठी होऊ शकतो. एकंदर हे वर्ष संयमाने व्यक्त होण्याचे आहे, हे विसरू नये.

वृषभ : मार्चमध्ये राहू-केतू व्यय षष्ठात जातील तर एप्रिलमध्ये शनी भाग्यातून दशमात व गुरू लाभात स्वगृही जाईल. हे वृषभेचे ग्रहगोचर राहील. एप्रिलनंतर समाज माध्यमांतून वैयक्तिक, व्यावसायिक पातळीवर फायदा होण्याची शक्यता आहे. विचारांची अभिव्यक्ती बऱ्याच प्रमाणात परिपक्व होताना दिसेल. जुलै मध्यानंतर समाज माध्यमे वापरताना संयम ठेवावा लागणार आहे. फेब्रुवारीच्या अखेरीपासून एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवडय़ापर्यंत समाजमाध्यमांतून व्यक्त होताना बेदरकारपणा, उद्धटपणा ताब्यात ठेवावा लागेल. सुयोग्य विचारांबरोबर संयम ठेवला तर या वर्षांत समाजमाध्यमांतून फायदा होण्याची शक्यता आहे.

मिथुन : लाभात व पंचमातून राहू केतूचे भ्रमण तर भाग्य दशमातून शनी गुरूचे स्वगृहीचे भ्रमण आणि राशी स्वामी बुधाची अनेकदा वक्री व अस्तंगत होणे हे मिथुनेचे ग्रहगोचर आहे. तृतीयेश रवी दर महिन्यास राशीबदल करत असतो. जूनच्या उत्तरार्धात समाज माध्यमांवरचा तुमचा वावर जास्त वाढणार आहे. एप्रिलमध्ये मात्र खोटय़ा लाभांच्या आशेपासून सांभाळून राहायचे आहे. समाज माध्यमात दिसणाऱ्या आकर्षक योजना सत्य पडताळल्याशिवाय प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करू नये. शनी महाराजांची तृतीय स्थानावरची दृष्टी समाजमाध्यमांवरच्या तुमच्या व्यक्ततेला विचारीपणाचा, संयमाचा साज चढवेल. ऑगस्टच्या उत्तरार्धात या माध्यमांवर तुमच्या व्यक्ततेमध्ये जास्त सुस्पष्टता येईल. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मात्र या माध्यमांवर प्रेक्षकाची भूमिका घेणे सोयीस्कर राहील.

कर्क : चतुर्थ दशमातून जाणारे राहू केतू तर अष्टम भाग्यातून शनी गुरूचे भ्रमण आणि राशी स्वामींचे दर दोन दिवसांनी वेगवेगळय़ा राशीत भ्रमण हे कर्क राशीचे ग्रहगोचर राहील. तृतीय स्थानात कन्या ही बुधाची रास येते तर बुध महाराज अनेकदा वक्री व अस्तंगत होणार आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर व्यक्त होताना कर्क राशीच्या लोकांनी या वर्षी काळजी घेणे गरजेचे राहील. कुणाशीही वाद किंवा मतभिन्नता असेल तर त्याबाबत लिहिताना, बोलताना सांभाळून राहणे आवश्यक आहे. भाग्यातून जाणारा भाग्येश गुरू तृतीय स्थानावर एप्रिलनंतर दृष्टी टाकेल. त्यामुळे समाज माध्यमांतून ज्ञानार्जनाचा फायदा कर्क राशीच्या लोकांना मिळणार आहे.

सिंह : प्रत्येक महिन्याला राशीबदल करणारा राशी स्वामी रवी तर सप्तम अष्टमातून चालणारे स्वगृहीचे शनी गुरू व दर महिन्याला रवीबरोबर राशी संक्रमण करणारा तृतीय स्थानाचा स्वामी शुक्र हे सिंह राशीचे या वर्षांतले ग्रहगोचर राहील. एप्रिलपर्यंत षष्ठेश सप्तेश शनीची दृष्टी तृतीय स्थानावर असेल, तरी त्या वेळी समाज माध्यमांतून कुणाशीही शत्रुत्व घेणे टाळावे. एप्रिलनंतर गुरूची दृष्टी ही तृतीय स्थानावरून चतुर्थ स्थानावर जाईल, त्यामुळे वादंग, अहंकारामुळे दुसऱ्याला दुखावणे नकोच. फेब्रुवारीचा शेवट ते एप्रिलचा सुरुवातीचा आठवडा मंगळ ग्रह राहू बरोबर मेषेत असेल त्या वेळी समाज माध्यमांवर आक्रमक लिखाण टाळावे. केतूचे भ्रमण वर्षभर तृतीयेतून होणार असल्यामुळे कुठलेही संदेश पुढे पाठवण्यापूर्वी त्यांच्या सत्यतेची पडताळणी करावी. जूनच्या उत्तरार्धात व जुलैच्या पूर्वार्धात समाजमाध्यमांमुळे वैयक्तिक फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या : अनेकदा वक्री व अस्तंगत होणारा राशी स्वामी बुध, षष्ठ व सप्तमातून चालणारे स्वगृहीचे शनी, गुरू व दर ४४ दिवसांनी राशी बदलणारा मंगळासारखा आक्रमक तृतीयेश जो व्यक्तीला धाडस, धैर्य देतो, पण बिघडला तर अवास्तव कृती करायला लावून खड्डय़ात घालतो. सुदैवाने मार्चनंतर तृतीय भाग्यातून चालणारे राहू केतू मागे गेल्यामुळे समाजमाध्यमांतून फसवूणक होण्याची शक्यता दूर होईल. परंतु २६ फेब्रुवारीला मकरेत जाणारा मंगळ ७ एप्रिलपर्यंत शनी महाराजांबरोबर राहणार आहे. त्यामुळे तो चुकीच्या ठिकाणी आक्रमकता किंवा हट्टीपणा निर्माण करून नुकसान घडवेल, त्यामुळे या कालावधीत समाजमाध्यमांचा वापर फक्त मनोरंजनापुरताच करावा. गुरू महाराजांची दृष्टी एप्रिलनंतर तृतीय स्थानावर येईल. त्यामुळे उपयोगी माहिती किंवा गोष्टी समाजमाध्यमांवर मिळू शकते. जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून ऑगस्टच्या पूर्वार्धापर्यंत सामाजिक माध्यमे वापरताना सावधान राहावे लागणार आहे. घाईमुळे संकटात पडण्याची शक्यता राहाते.

तूळ : रवीच्या मागेपुढे दर महिन्याला राशी संक्रमण करणारा राशी स्वामी शुक्र, पंचम षष्ठातून स्वगृही भ्रमण करणारे शनी, गुरू, तूळेचा तृतीयेशही आहे आणि तो षष्ठस्थानी वर्षभर मुक्कामी आहे. तर लग्न सप्तमात पापग्रह राहू, केतू हे तुळेचे या वर्षीचे ग्रहगोचर आहे. लग्नातून जाणारा केतू सारखा ग्रह वृत्तीला आकर्षणाकडे आणि चंचलपणाकडे नेईल, त्यामुळे समाज माध्यमांवर वावरताना सावध राहण्याची गरज आहे. तूळ राशीच्या व्यक्ती स्वत:हून कोणाची कळ काढत नाहीत. वादाचे प्रसंग उद्भवलेच तर व्यक्त होताना भान ठेवावे लागेल. जानेवारीच्या पूर्वार्धात तृतीयेतून जाणारा रवी विचारांमध्ये आग्रहीपणा आणेल. वर्षांच्या शेवटी तृतीयेतून जाणारा शुक्र समाजमाध्यमांद्वारे तुमच्या एखाद्या कलेला प्रोत्साहन मिळवून देण्याची शक्यता आहे. तर तिथूनच जाणारा बुध बौद्धिकदृष्टय़ा उपयुक्त ठरेल.

वृश्चिक : मार्चच्या उत्तरार्धात मागे जाणारे राहू, केतू आणि चतुर्थ पंचमातून जाणारे स्वगृहीचे शनी, गुरू व दर ४४ दिवसांनी राशीबदल करणारा राशी स्वामी मंगळ हे वृश्चिकेचे या वर्षीचे ग्रहगोचर आहे. काहीशी चंचल झालेली संदिग्ध मन:स्थिती मार्चनंतर बरीच ताळय़ावर येईल, त्यामुळे विचारांत बरीच सुस्पष्टता येईल. जानेवारीच्या उत्तरार्धात तृतीय स्थानात येणाऱ्या रवीमुळे तुमची मते आग्रही होतील. फेब्रुवारीच्या शेवटी उच्च स्थानी जाणारा राशी स्वामी योग्य मुद्दय़ांवर वाद घालण्याची क्षमता मिळवून देईल. समाजमाध्यमांवर व्यक्त होताना बौद्धिक झलक दिसेल. स्थिर बुद्धीने केलेले लिखाण वाचकांच्या पसंतीस उतरेल.

धनू : जानेवारीच्या पूर्वार्धात राशीत असणारे रवी, बुध, एप्रिलनंतर तृतीय चतुर्थात येणारे स्वगृहीचे शनी, गुरू म्हणजे राशी स्वामी, तर पंचम लाभात राहू, केतू हे या वर्षीचे धनू राशीचे ग्रहगोचर असेल राशी स्वामी गुरू चतुर्थात असल्यामुळे धर्माचरणात मन रमेल. तुमच्या वृत्तीला धार्मिकपणा, विवेकीपणा समाज माध्यमातल्या तुमच्या लिखाणावरूनही स्पष्ट दिसून येईल. तृतीयेश शनी तृतीयात स्वगृहीचा असल्यामुळे एखादी गोष्ट किंवा प्रकरण समाज माध्यमांचा वापर करून तुम्ही चिकाटीने लावून धराल.

मकर : जानेवारीच्या उत्तरार्धात राशीत येणारा रवी फेब्रुवारी महिन्यात राशीत येणारे मंगळ, शुक्र तर एप्रिलमध्ये तृतीयात येणारा स्वगृहीचा तृतीयेश एप्रिलपर्यंत राशीतच असणारा व नंतर दुसऱ्या स्थानात जाणारा व जुलैच्या मध्यात वक्री होऊन पुन्हा राशीत येणारा शनी हे मकर राशीचे या वर्षीचे ग्रहगोचर आहे. या वर्षी मकर राशीच्या लोकांनी समाज माध्यमांचा योग्य तो वापर केला तर त्यांना अनेक पातळय़ांवर फायदा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या शेवटात राशीत येणारा व एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राशीत राहणारा मंगळ सुरुवातीला शनीच्या सान्निध्यात असेल त्या वेळी तो तुमची मन:स्थिती थोडीशी बिघडवणार आहे. त्यामुळे समाज माध्यमांमध्ये व्यक्त होताना किंवा समाज माध्यमांचा वापर करताना भान ठेवणे गरजेचे आहे. अर्थात राशी स्वामी शनीची तिसरी दृष्टी तृतीय स्थान आणि तृतीयेशावर असल्यामुळे मंगळाच्या अतिरेकाला तो नक्कीच आवर घालेल. मे महिन्याच्या उत्तरार्धात तृतीयात येणारा लाभेश मंगळ समाजमाध्यमांवरील लेखनाच्या माध्यमातून लाभ मिळवून देऊ शकेल.

कुंभ : वर्षांच्या सुरुवातीला राशीत असणारा गुरू एप्रिलमध्ये स्वगृही जात आहे. तर तेव्हाच राशी स्वामी शनी राशीत येणार आहे. तृतीय सप्तमातून राहू केतूचे भ्रमण वर्षभर चालणार आहे. हे कुंभ राशीचे या वर्षांचे ग्रहगोचर राहील. एप्रिलपर्यंत राशी स्वामी शनी व्ययात असेल व तो तृतीयातल्या राहूशी केंद्रयोग करेल. राहू हा संदिग्ध वातावरण निर्माण करणारा अविश्वासू ग्रह या वर्षी तृतीय स्थानी राहणार आहे. त्यामुळे समाजमाध्यमांत तुमची प्रतिमा अनाकलनीय व्यक्ती अशी होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात मेषेत जाणारा रवी राहूच्या सान्निध्यात येईल. चुकीच्या पद्धतीने व्यक्त होण्यामुळे तुमची प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे. तसेच अभ्यास करून, मेहनतीने केलेल्या लेखनाला अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. जूनच्या शेवटात तृतीयेत येणारा मंगळ ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत तिथे असेल. समाज माध्यमांवर काही गोष्टी स्पष्ट करताना त्या प्रक्षोभक होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक राहणार आहे. राशीतच असणारा राशी स्वामी शनी व स्वगृहीचा गुरू अर्थातच तुम्हाला सांभाळून घेतील.

मीन : वर्षांच्या सुरुवातीला व्ययात असणारा राशी स्वामी गुरू एप्रिलच्या मध्यात राशीत येईल, त्यानंतर वर्षभर तो राशीतच राहणार आहे. तर एप्रिलपर्यंत शनी लाभातच राहणार असून एप्रिलच्या शेवटात तो व्ययात तरीही स्वगृही कुंभेत जाईल. मार्चच्या मध्यापर्यंत तृतीय, दर महिन्याला राशीबदल करणाऱ्या रवीबरोबर राशी संक्रमण करत असेल. हे मीन राशीचे या वर्षीचे ग्रहगोचर असेल. वर्षांच्या सुरुवातीला तृतीयात राहू असल्याने समाज माध्यमांपासून थोडे दूरच राहणे योग्य. वर्षांच्या सुरुवातीला तृतीयेश शुक्र,  वक्री धनू राशीत दशमात असेल. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने समाजमाध्यमांचा वापर करणे किंवा व्यक्त होणे धोकादायक ठरू शकते. व्यवसायात अथवा कामाच्या ठिकाणी त्याचा त्रास होऊ शकतो. ३० जानेवारीला मार्गी होणारा शुक्र फेब्रुवारीच्या शेवटात मकरेत जाईल. सामाजिक माध्यमांद्वारे वैयक्तिक पातळीवर या सुमारास लाभ होण्याची शक्यता आहे. या संधीचा योग्य आणि पुरेपूर वापर करावा. मात्र घाई, आक्रमकपणा टाळावा. एप्रिलनंतर राशीत आलेला राशी स्वामी गुरू व्यक्तिमत्त्वात धार्मिकता, सहृदयता, विवेकीपणा आणेल. समाजमाध्यमांवर व्यक्त होताना याचे प्रतििबब दिसेल.

इथे सर्व राशींचा ढोबळमानाने विचार केला आहे. प्रत्येकाची वैयक्तिक कुंडली निश्चितच वेगवेगळी आणि अधिक खेाल भविष्य सांगणारी असते. तसेच इथे समाजमाध्यमांचे कारक स्थान म्हणून फक्त तृतीय स्थानाचाच विचार केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope special social media and people dd

First published on: 31-12-2021 at 17:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×