‘कौन बनेगा करोडपती’च्या आत्यंतिक यशस्वी इनिंगनंतर सुपरस्टार अमिताभ बच्चन आता ‘युद्ध’ या मालिकेतून लोकांच्या भेटीला येत आहेत. लौकरच सुरू होणाऱ्या या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत-

टीव्हीवर एखादी मालिका करण्याचा निर्णय तुम्ही नेमका कसा घेतलात?
– आपण कधीतरी टीव्ही मालिका करायचीच असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. त्यामुळे तशी संधी आली तेव्हा मी ती लगेचच घेतली. खरंतर संधी आली आणि ती मी घेतली असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण खरं तर ही टीव्ही मालिका करण्यासाठी मीच पुढाकार घेतला. मला टीव्ही मालिका करायची इच्छा आहे, असं मी काही समविचारी लोकांना सांगितलं आणि ती इच्छा फलद्रूप झाली. या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम म्हणजे युद्ध ही मालिका.
टीव्ही हा खरं म्हणजे एक राक्षस आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रम तुम्ही कसा वेगळ्या उंचीवर नेलात ते सगळ्यांनाच माहीत आहे. पण टीव्हीवरच्या कार्यक्रमाच्या गरजेप्रमाणे आणि त्या गतीनुसार एपिसोड चित्रित करणं आणि एक मालिका तिच्या कथानकानुसार चित्रित करणं यात फरक आहे. ‘कौन बनेगा’च्या वेगळ्या अनुभवानंतर मालिका चित्रित करण्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला, आवडला का?
– मुळात टीव्ही हा काही राक्षस नाही. ते एक खिळवून टाकणारं, सगळ्यांना आवडणारं माध्यम आहे. कोणत्याही सृजनशील कामात वेळ देणं, एकाग्र होणं आणि स्वत:ला झोकून देणं आवश्यक असतं. टीव्ही मालिकेचा वेग आणि आशयाबद्दल म्हणाल तर आम्ही परस्परसंमतीने आधीपासूनच पक्कं केलं आहे की युद्ध ही एक सुरूवात- शेवट सगळंच नियोजित आहे, अशी मालिका असेल. तिला एक सुरुवात असेल, मध्य असेल आणि शेवटही असेल आणि मालिकेची प्रक्रिया सुरू होण्याआधीच हे आधीच ठरवलं गेलं होतं. आमच्यावर वेळेचा ताण येऊ नये यासाठी मालिकेचा पहिला भाग प्रसारित होण्याच्या आधीच आवश्यक ते एपिसोडही शूट करायचे असं आम्ही ठरवून टाकलं होतं. इतर लोक कसं काम करतात ते मला माहीत नाही, पण आमची तरी हीच पद्धत होती आणि हीच पद्धत सगळ्यात सोयीची, आव्हानात्मक आणि कामाचा आनंद देणारी आहे, असं मला जाणवलं आहे.
‘युद्ध’साठी एकदम उत्तम लोक एकत्र आले आहेत. या टीमच्या कामाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. त्यात विशेष म्हणजे तुम्ही आणि अनुराग कश्यप एकत्र आले आहात. तुम्ही दोघांनी एकत्र काम कसं केलं त्याबद्दल सांगाल का?
– माध्यमांनी ‘युद्ध’ला लक्षवेधक ठरवलं आहे, हे ऐकून मला खूप समाधान वाटलं. त्याबद्दल मी मीडियाचे आभार मानतो. मला असं वाटतं की सध्या सुरू असलेल्या टीव्ही मालिका आणि ठरलेले दंडक यांच्यापेक्षा आमच्या मालिकेने वेगळं काहीतरी केलं आहे असं माध्यमांना वाटत आहे. तसं असेल तर होय, आम्हाला जशी टीव्ही मालिका असायला हवी होती, तशी बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असं मी म्हणेन आणि मला असं वाटत आहे की आमचा हा प्रयत्न लोकांना नक्की आवडेल आणि त्याचं कौतुक होईल. अनुराग कश्यप हा एक यशस्वी, अनुभवी आणि गौरवला गेलेला दिग्दर्शक आणि निर्माता आहे. या मालिकेसाठी आमच्या जेव्हा आयडिया डेव्हलप करायच्या चर्चा सुरू होत्या तेव्हाच मी असा विचार केला होता की या मालिकेसाठी दिग्दर्शक असावा तर तोच. विशेष म्हणजे आम्ही त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा तो अगदी लगेचच तयार झाला. मग तो या प्रकल्पात क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सहभागी झाला. दिग्दर्शक रिभू दासगुप्ताबरोबर त्यानं खूप चांगलं काम केलं आणि मग आम्ही कामाला सुरूवात केली. अनुरागबरोबर काम करायला मला खूप मजा आली. नावीन्याची त्याची ओढ कौतुकास्पद आहे. सुरुवातीलाच त्यानं मला जो ड्राफ्ट दिला तो केवळ माझ्या भूमिकेपुरता सीमित नव्हता. त्या प्रसंगाचा एकूण आवाका लक्षात घेऊन माझे संवाद काय असावेत ते मला जाणवावं आणि त्यानुसार मी ते म्हणावेत यावर त्यात भर देण्यात आला होता. आणि उगीचच कॅमेर कुठे कुठे आहेत याचे तपशील देऊन मला विनाकारण सजग करण्याचा प्रयत्न त्यात केला गेलेला नव्हता. त्यानं फारच मोजके आणि बुद्धिमान कलाकार निवडले होते आणि त्यांच्याबरोबर काम करणं मी एन्जॉय केलं. त्यातून मला बरंच काही शिकायलाही मिळालं.
त्याच्या इतर काही कामांमुळे तो नेहमी आणि सतत सेटवर येऊ शकत नसे, पण सेटवर काय चाललं आहे याबद्दल तो सतत सजग असायचा आणि त्यानुसार आम्हाला सूचनाही द्यायचा. एडिटिंगसाठी मात्र तो आवर्जून यायचा. त्याच्या अनुपस्थितीत मी शोजित सरकारला सेटवर उपस्थित राहण्यासाठी, आवश्यकतेनुसार बदल सुचवण्यासाठी बोलावलं होतं. माझ्या विनंतीला मान देऊन तो आला, त्याबद्दल त्याचे आभार मानावे तेवढे थोडेच होतील. एक दर्जेदार मालिका बनवण्यासाठी या क्षेत्रातले सगळे दिग्गज एकत्र येतात, ही गोष्ट खरंतर खूपच उल्हसित करणारी, आनंददायक आहे.
अनुराग आणि शोजित या दोघांच्यामध्ये ‘व्हेटो’ कुणाचा चालतो? काय सांगाल?
– शोजितचा. मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे या प्रकल्पासाठी क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणूनच मी त्याला बोलावलं होतं. त्याच्याबद्दल मी काय आणि किती बोलू, त्याचे किती वेळा आभार मानू ते कमीच पडतील. खरं तर या टीममधल्या प्रत्येक मेंबरकडे, कलाकाराकडे व्हेटो होता. मालिका चांगली व्हावी यासाठी टीममधला प्रत्येक मेंबर झटला आहे.
तुम्ही स्वत: टीव्ही बघता का, बघत असाल तर तुमचा आवडता कार्यक्रम कोणता?
– मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा तेव्हा मी टीव्ही बघतो आणि मी वेगवेगळ्या मालिका बघतो, स्पोर्ट्स चॅनेल्स बघतो आणि इतरही माहितीपर कार्यक्रम बघतो.
तुम्ही बाहेरच्या देशांमधल्या मालिका बघता का, त्यातल्या तुमच्या आवडत्या मालिका कोणत्या?
– मी बाहेरच्या मालिकाही बघतो. त्यात मला गेम ऑफ थ्रोन्स, द किलिंग, ट्र डिटेक्टिव्ह या आणि अशा मालिका आवडतात.
टीव्ही मालिका खूप मोठय़ा लोकसंख्येपर्यंत आणि रोजच्या रोज पोहोचत असल्या, तरी सिनेमांना जे वलय आहे, जो मानसन्मान मिळतो तो या मालिकांना मिळत नाही. तुमचं यावर मत काय आहे?
– मला हा प्रश्नच थोडा असंवेदनशील वाटतो. माझ्या दृष्टीने कोणतंही, अगदी कोणतंही क्रिएटिव्ह काम महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी टीव्हीशी जोडला गेलेला असो वा नसो, टीव्हीला कोणत्याही संदर्भात कमी लेखणं मला बरोबर वाटत नाही. मी ते मान्यच करणार नाही. टीव्ही मालिका असो की सिनेमा, जेव्हा त्यांच्याशी क्रिएटिव्ह माणसं जोडली जातात, त्या प्रकल्पासाठी ती कष्ट करतात तेव्हा त्यांनी खरोखरच अतिशय कठीण परिस्थितीत खूप प्रामाणिकपणे जीवतोड मेहनत केलेली असते. माध्यमांएवढंच महत्त्वाचं, सन्मानाचं काम त्यांनी केलेलं असतं. ते जाऊ द्या, आपल्या देशात टीव्ही या माध्यमाची उलाढाल सिनेमाच्या तिप्पट आहे. आज शंभरहून जास्त टीव्ही चॅनेल्स आहेत, टीव्ही या माध्यमाची लोकप्रियता इतकी आहे की आज फिल्मवाले आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी टीव्हीवर जातात. हे सतत वाढतं, विकसित होत असलेलं, लोकप्रिय माध्यम आहे. तेव्हा त्याला योग्य तो मान दिला पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला विनंती करतो की त्याची अशी सिनेमाशी तुलना करू नका.
सरस्वती ऑडिओ व्हिज्युअल्सने ‘देख भाई देख’ ही एक फार चांगली मालिका केली होती. तुम्हाला आठवते ती? तुम्ही त्या मालिकेत क्रिएटिव्हली सहभागी होतात, की ती पूर्णपणे जया बच्चन यांचीच निर्मिती होती?
– ती मालिका एकदम हिट झाली होती. ती पूर्णपणे जयाचीच कल्पना होती.
अनेक सिनेमांवरून प्रेरणा घेऊन टीव्ही मालिका- कार्यक्रम तयार केले गेले आहेत. एखादा सिनेमा, विशेषत: तुमचा सिनेमा घेऊन टीव्ही शोची निर्मिती होऊ शकते असं तुम्हाला वाटतं का?
– प्रेरणा ही सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशी दोन्ही प्रकारची असते असं मला वाटतं. या जगातल्या कोणत्याही गोष्टीमधून प्रेरणा मिळू शकते. त्या प्रेरणेचा दर्जा काय आहे आणि परिणाम काय आहेत हे महत्त्वाचं. हे जर मान्य केलं तर काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही. माझ्यापुढचा प्रश्न एवढाच आहे की माझा असो की इतर कुणाचा सिनेमा, त्याचं टीव्ही मालिकेत किंवा शोमध्ये रूपांतर होऊ शकतं का, हे मी ठरवायचं असेल तर ते ठरवायला मी माझ्यापुरता एकटा असमर्थ आहे.
सिनेमांमधल्या अभिनेत्यांना टीव्ही करायचा आहे आणि टीव्हीवरचे अभिनेते इथे काम करून झाल्यावर मोठय़ा पडद्यावर जाताहेत या सध्याच्या ट्रेंडबद्दल तुम्ही काय सांगाल?
– बदल सगळ्यांनाच हवा असतो.
सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्याचा जो दबाव असतो तेवढाच टीआरपीचा दबाव मोठा असतो का? तुम्ही यापूर्वी टीव्ही शोसुद्धा केला आहे, त्यामुळे चांगल्या टीआरपीच्या शक्यता अधिक आहेत असं काही आहे का?
– होय. अर्थातच. जिथे जिथे आर्थिक गुंतवणूक असते, जाहिराती असतात, तिथे फायद्याची, चांगल्या परताव्याची अपेक्षा असतेच असते.
एक कलाकार म्हणून तुमची जी तहान असेल ती ‘युद्ध’ मालिकेने किती भागली आहे, असं तुम्हाला वाटतं?
– मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून मी कधीच पूर्णपणे, कायमचा समाधानी होऊ शकत नाही. असं पूर्णपणे समाधान मिळणं म्हणजे त्या कलाकाराचा शेवट, खरंतर मृत्यू होण्यासारखंच आहे. नवा दिवस हे नवं आव्हान वाटणं, नवनवी क्षितिजं खुणावत राहणं
हेच कलाकाराला जिवंत ठेवत असतं. ‘युद्ध’मध्ये आम्ही सगळ्यांनी जे काम केलं आहे ते लोकांना आवडेल अशी मी आशा करतो. लोकांना ते आवडलं तर आनंद आहे आणि नाही आवडलं तर काय.. पुन्हा प्रयत्न करायचे.
(‘इंडियन एक्स्प्रेस’मधून)

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

आम्हाला जशी टीव्ही मालिका असायला हवी होती, तशी बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असं मी म्हणेन आणि मला असं वाटत आहे की आमचा हा प्रयत्न लोकांना नक्की आवडेल आणि त्याचं कौतुक होईल.