चार्ली चॅप्लीन व्हायचं असेल तर त्याचं हसरं दु:खही जणू सोबत येतं की काय, असा प्रश्न पडावा असं काहीसं सोमनाथ स्वभावने याचं आयुष्य. चार्लीच्या डोक्यावरची काळी गोल टोपी, काळा कोट डिट्टो तसाच, तशीच पॅण्ट आणि हातात छडी घेतली की सोमनाथ मेकअपसह प्रार्थना करतो. त्यानंतर तो जेव्हा डोळे उघडतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चार्ली अवतरतो. तो प्रत्येक हालचालीत दिसू लागतो. मेकअप उतरतो आणि सोमनाथचं मौन सुटतं. तो सांगू लागतो- खात्यापित्या घरचा असतो तर चार्ली अंगात आलाच नसता. त्याचं आणि माझं आयुष्य आता घट्ट बांधल्यासारखं आहे. कारण काय? एकदा आत्महत्या करायला गेलो होतो, पण वाचलो. त्यामुळेच यापुढचं आयुष्य चार्लीचं म्हणून जगायचं असं सोमनाथनं ठरवलं आहे.

सोमनाथ आजही एका भाडय़ाच्या खोलीत राहतो. कोणाच्या घरी कार्यक्रम असला की किंवा सार्वजनिक कार्यक्रम असला की तो चार्ली बनून जातो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याची गुजराण होते.
सोमनाथ हा शिडशिडीत अंगकाठीचा गृहस्थ. डोळ्यांची बुब्बळं दोन वेगवेगळ्या कोनात फिरणारी. वडील पैठणहून औरंगाबादला आले तेव्हा एका स्मशानभूमीत एका खोलीत राहू लागले. वॉचमनची नोकरी त्यांची. पैशाची नेहमीची चणचण. जगन्नाथ वाडकर यांनी सोमनाथचे वडील शिवहारअप्पा यांना नोकरी दिली. जगण्याच्या धबडग्यात सुयोग मंगल कार्यालयात पुढे त्यांनी नोकरी पत्करली. तेव्हा सोमनाथ शाळेत शिकत होता. तत्पूर्वी त्यानं दोनदा शाळा सोडून दिली होती. एका हॉटेलात तो साफसफाईचे काम करू लागला. या कामात तो चांगलाच तयार झाला. तेथे त्याची ओळख झाली ती नारायण वैद्य यांच्याशी. बजाज हॉस्पिटलमध्ये पुढे तो कामाला लागला. मग त्याच कॅन्टीनचं कंत्राट घेण्याचं त्याने ठरवलं. चांगला फायदा झाला. पैसे मिळू लागले, तसे चार मोटारगाडय़ा घेतल्या. या गाडय़ांच्या भाडय़ातून अधिक पैसे मिळतील असा त्याचा होरा. तत्पूर्वी सोमनाथनं वर्तमानपत्र टाकण्याचं काम केलं.
सोमनाथने २००३ मध्ये चार्लीचा पोशाख अंगावर चढवला. एका बाजूला कॅन्टीनच्या व्यवसायातून आणि घेतलेल्या चार गाडय़ांतून पैसा चांगला मिळत होता. त्यामुळे चार्ली बनून या असे कोणी सांगितलं तरी जावं की नाही यावर सोमनाथ विचार करू लागला. पुढे व्यवसायातील गणितं बिघडत गेलं आणि सोमनाथवर काही लाखांचं कर्ज झालं. सासुरवाडीत नाचक्की झाली. बायकोही दूषणं देऊ लागली. माहेरी निघून गेली. आत्महत्येचा विचार मनात डोकावला. शेवटी चार्लीचा कोट घेऊन सोमनाथनं मुंबई गाठली. चार्लीचा कोट घातला, मेकअप केला आणि लोक खिशात पैसे ठेवू लागले. जुहू चौपाटी, काळा घोडा परिसरात ज्युनिअर चार्ली दिसू लागला. लोक त्याच्याकडे बघायचे, पैसे द्यायचे. जगणं सुरू राहिलं. एक चादर विकत घेता आली. झोपण्यासाठी जागा शोधावी लागे. पण रस्त्यावरच कोठे तरी पडून राहायचा. पुढे दासबाबू नावाच्या एका दिग्दर्शकानं सिनेमात काम दिलं. काहींनी मग वेगवेगळ्या कार्यक्रमात आमंत्रणं द्यायला सुरुवात केली. राहायला जागा मिळाली. चार्ली आता स्थिरावला. याच काळात कधीतरी ‘हसरं दु:ख’ही वाचून झालं. तेव्हापासून सोमनाथ चार्लीच्या अधिकच प्रेमात पडत गेला. ज्युनिअर चार्लीला आता त्याला आवडणारी सायकल मिळाली आहे. एक चाक मोठं आणि एक छोटं. त्यावर बसून वेगवगळ्या भावमुद्रा बदलणारा चार्ली आला की आनंद भरून वाहतो. माणसं हसू लागतात. पण हसरं दु:ख काही लपून राहत नाही. जगण्याची कुतरओढ उराशी बाळगून कधी हसत, तर कधी सामाजिक संदेश देत ज्युनियर चार्ली मनोरंजन करतो तेव्हा त्याच्या हसऱ्या दु:खाची कधी तरी किनार उमटते. बाकी सर्व काही मनोरंजनासाठी. सोमनाथ नावाच्या या ज्युनिअर चार्लीच्या नशिबी ते ‘हसरं दु:ख’ आहेच.