यशस्वी यकृत प्रत्यारोपणानंतर रुग्ण खूप चांगले जीवन जगू शकतो. आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे २७ वर्षेही यकृत प्रत्यारोपणानंतर जगलेला रुग्ण आहे. पण डॉक्टर प्रत्येकाला अशी खात्री देऊ शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या शरीरामध्ये हृदय, मेंदू, फुप्फुसे याबरोबरच यकृत हादेखील एक महत्त्वाचा अवयव असतो. यकृत चयापचयाच्या क्रियेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका करते. यकृत पूर्णत: निकामी होते तेव्हा यकृत प्रत्यारोपण हीच एक संजीवनी असते.
यकृताची रचना व कार्ये
यकृत हा पोटातील सर्वात मोठा अवयव आहे. ६० ते ७० किलो वजन असणाऱ्या सामान्य व्यक्तीच्या शरीरातील यकृताचे वजन १२०० ते १५०० ग्रॅम म्हणजेच एकूण वजनाच्या दोन टक्के एवढे असते. ढोबळ मानाने उजवा अर्धा आणि डावा अर्धा असे यकृताचे दोन विभाग असतात. यकृतामध्ये पित्त तयार होते. यकृताचा एक भाग काढून टाकल्यास उर्वरित भागाची, त्यातील पेशींची वाढ होऊ शकते. यकृताच्या या खास वैशिष्टय़ामुळे प्रत्यारोपणासाठी आपण यकृत वापरू शकतो.
यकृत प्रत्यारोपण म्हणजे काय?
ज्या रुग्णाचे यकृत पूर्णत: निकामी झाले आहे, त्याचे निकामी यकृत काढून टाकून त्या जागी दुसरे यकृत बसविणे म्हणजे यकृत प्रत्यारोपण होय. यासाठी एखाद्या जिवंत, निरोगी व्यक्तीच्या शरीरातील अंशत: काढलेले किंवा मृत व्यक्तीच्या शरीरातून पूर्णत: काढलेले यकृत वापरले जाते. यकृत प्रत्यारोपण ही एक खूप गुंतागुंतीची, किचकट आणि म्हणूनच महागडी शस्त्रक्रिया आहे.
यकृत प्रत्यारोपणाचे प्रकार
१. लिव्हर डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट (Liver Donor Liver Transplant: LDLT)
अर्थात जिवंत दात्याकडून यकृत घेऊन प्रत्यारोपण करणे.
२. डिसिज्ड/ कॅडॅव्हेरिक डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट (Deceased / Cadaveric Donor Liver Transplant DDLT / CDLT)
एखाद्या नुकत्याच मृत झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून त्वरित यकृत काढून घेऊन ते वापरून प्रत्यारोपण करणे.
जिवंत असणारा दाता
रुग्णाच्या नातलगांपैकी एखादा त्याच्या यकृताचा एक भाग रुग्णासाठी दान करू शकतो. शस्त्रक्रियेचा धोका असला तरीही दात्यासाठी हे जवळजवळ सुरक्षित असते. यकृताच्या पेशींमध्ये पुनर्जननाची क्षमता असल्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या यकृताचा एक भाग काढून घेतला तरी उर्वरित भाग यकृताचे पूर्ण कार्य सांभाळू शकतो. इतर शस्त्रक्रियांसारख्याच काही समस्या मात्र दात्यांनाही त्रासदायक ठरू शकतात. फारच क्वचित प्रसंगी (०.०२ ते ०.०५ टक्के वेळा) हा निरोगी दाता दगावण्याचाही संभव असतो.
नुकताच मरण पावलेला दाता : (ब्रेन डेड रुग्ण/ कॅडेव्हर)
ब्रेन डेड रुग्णाचे मेंदूचे कार्य कायमस्वरूपी पूर्णत: बंद पडलेले असते. मात्र त्याचे हृदय, कृत्रिमरीत्या कार्यरत असणारी फुप्फुसे यांचे कार्य काही काळ चालू असते. उदाहरणार्थ, वाहतूक अपघातातील बळी. लहान मेंदूला जबर मार लागून कृत्रिम श्वासोच्छ्वासावर (व्हेंटिलेटरवर) ठेवलेला रुग्ण अवयव दानासाठी एकदम योग्य ठरतो. हा रुग्ण या परिस्थितीमध्ये वैद्यकीय, कायदेशीर, नैतिक, आध्यात्मिक सर्वच दृष्टय़ा मृत असतो. या वेळी त्याच्या हृदय आणि फुप्फुसांचा रक्तपुरवठा तात्पुरता कृत्रिमरीत्या चालू ठेवून त्याच्या शरीरातील अवयव प्रत्यारोपणासाठी काढून घेता येतात.
अगदी शेवटच्या अवस्थेतील यकृत बिघाड (End stage liver disease) म्हणजे काय?
एखाद्या आजारामुळे जेव्हा यकृताचा बहुतांशी (७५ ते ८० टक्क्यांहून अधिक भाग) खराब होऊन निकामी होतो तेव्हा त्याला शेवटच्या अवस्थेतील यकृत बिघाड म्हणतात. कोणत्याही औषधांचा या वेळी फारसा उपयोग होत नाही. परंतु स्वत:च्या उतींचे पुनर्जनन व वृद्धी करण्याचे जे खास वैशिष्टय़ यकृताकडे असते, ते मात्र शिल्लक राहते.
या आजारांमध्ये यकृत निकामी झाले असेल तर यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते.
१. हिपॅटायिटस (यकृताचा दाह)
२. दारू पिण्यामुळे होणारा यकृत बिघाड (Cirrhosis)
३. चयापचयाच्या क्रियेतील जन्मजात दोष
ड्ट विल्सन्स डिसीज (अति तांबे निर्मिती आणि संचय) व इतर
४. पित्त साचून होणारे आजार

मराठीतील सर्व कशासाठी? पोटासाठी! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liver transplant
First published on: 14-08-2015 at 01:10 IST