lp39कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे, काश्मिरात दल लेकमध्ये कमळं फुलतात.. आपली कमळाच्या फुलाबद्दलची माहिती यापुढे फार जात नाही. पण कमळफुलाबद्दल माहिती जमवण्याच्या छंदातून एका शेतकऱ्याने चक्क कमळाची शेतीच सुरू केली आहे.

जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण..? असा प्रश्न आपल्याला पडला तर त्याची उत्तरं वेगवेगळी मिळतील; त्यात कुणी बिल गेट्सपासून मुकेश अंबानींपर्यंत प्रत्येक जण वेगवेगळी नावं घेईल, पण एखाद्या छांदिष्ट माणसाला हा प्रश्न विचारला तर तो निर्विवाद सांगेल की, या जगातील सर्वात सुखी आणि श्रीमंत व्यक्ती मीच..!
याचं बोलकं उदाहरण म्हणजे आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत त्याचं व्यवसायात रुपांतर करून छंदालाच आपल्या उपजीविकेचं साधन बनवणारा एक छंदवेडा.. आणि त्याचा छंदही कुठला तर कमळफुलांच्या विविध प्रजातींच्या कमळ बागेचा.. कमळफुलांचा छंद असणाऱ्या या छंदवेडय़ाचं नाव आहे सतीश गदिया. सतीश हे िपपरी-चिंचवडजवळील दिघी या गावाचे रहिवासी. गदियांच्या कुटुंबाची तेव्हाची आíथक परिस्थिती बेताचीच होती. त्यांचं लहानपण चिंचवड गावात गेलं. त्यांचा जन्म लोणावळ्याचा. पण जन्माच्या दहा दिवसांनंतरच त्यांना आजीने आजोळी चिंचवडला आणलं. आजी सुंदरबाई बागमार हिला निसर्ग, फुलझाडं, बागकामाची आवड होती. देवपूजेसाठी तिला विविध फुलं लागायची. नदीकाठच्या परिसरातून गदिया तिला पूजेसाठी कमळफुलं आणून द्यायचे. प्रसंगी आजीसाठी कमळांच्या फुलांच्या शोधात ते परिसरात तासन्तास पायपीट करायचे. त्यातूनच त्यांना कमळफुलं आवडायला लागली. पुढे मोठेपणी त्यांच्या स्वत:च्या कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडली तेव्हा पोटापाण्यासाठी त्यांनी घरीच लाँड्रीचा व्यवसाय सुरू केला. पण डोक्यात कमळफुलांचं वेड कायम होतं. हलाखीच्या परिस्थितीतही त्यांचं कमळाचं आकर्षण पाहून परिसरातील लोकांनी त्यांना केव्हाच वेडय़ात काढलं होतं. लाँड्रीचा व्यवसाय करणारे गदिया हे कपडय़ांपेक्षा फुलातच जास्त रमत. लाँड्री असल्यामुळे घरोघरी जाऊन कपडे गोळा करताना एके दिवशी एका ग्राहकाच्या अंगणात असलेल्या कमळफुलाने त्यांना आकर्षित केलं, त्यामुळे लहानपणापासून कमळप्रेमी असणाऱ्या गदिया यांच्या छंदाने पुन्हा उचल खाल्ली. त्या ग्राहकाकडून त्यांनी एक कमळरोप घेतलं आणि ते आपल्या घरात एका भांडय़ात लावलं. प्रथम वर्षी या कंदातून एकही फूल आलं नाही त्यामुळे गदिया थोडेसे निराश झाले. पण कमळवेडाने ही सर्व निराशा झटकत गदिया यांनी कमळावर लिहिलेली अनेक पुस्तकं वाचून त्याचा सखोल अभ्यास केला. अचानक एके दिवशी त्या कंदाला एक टपोरी कमळाची कळी आली आणि निराश गदियांची कळी फुलली. मग तर गदियांचं कमळप्रेम आणखीनच खुललं. पाहता पाहता हे रोप एका छोटय़ा भांडय़ातून एका मोठय़ा तबकात, नंतर मग मोठय़ा लोखंडी टबात ते कमळरोप विसावलं. आता मात्र कमळवेडय़ा गदियांची अडचण झाली. जिथे माणसांनाच राहायला जागा कमी होती, तिथे कमळांच्या रोपासाठी जागा कुठून आणायची, अशी समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली. यावर उपाय म्हणून त्यांनी घराच्या छपरावर आपली कमळबाग फुलवायला सुरुवात केली. मग मात्र गदियांना कमळांच्या रोपासाठी घराचं छप्परदेखील कमी पडू लागलं. गदियांना आता कमळकंदाविषयीच्या शास्त्रीय ज्ञानाची गरज वाटू लागली. कमळाचा वेल कसा वाढवायचा, त्याला खतपाणी कसं घालायचं, कमळाचं रोप कसं तयार करायचं, कमळाच्या शेतीसाठी हौद कसा बनवायचा, त्यामुळे या सर्वाची माहिती म्हणून कुणी तरी त्यांना नेरळच्या शेखर भडसावळे यांचा पत्ता दिला. गादियांनी लगेच त्यांच्याकडे धाव घेतली. भडसावळे यांनी त्यांना सोबतच कमळाची जोपासना कशी करायची, कमळाचे प्रकार, कमळाचा इतिहास, कमळाचं आयुष्य हे सारं ज्ञान दिलं. सोबतीला कमळांचे कंद आणि रोपही दिले. या मार्गदर्शनामुळे गदियांच्या छंदाला शास्त्रीय दिशा मिळाली. मग त्यांनी विविध जातींच्या कमळांची जोपासना सुरू केली. त्यांचे हे कमळवेड पाहून त्यांचे सासरे सुभाष रुणवाल यांनी आळंदीजवळील डुडूळ गावात एक एकर जमीन दिली. या शेतजमिनीवर गदियांनी १० बाय १० फुटांचे हौद निर्माण केले. अशा प्रकारे पत्र्यावरची कमळबाग ही शिवारात पोहोचली. तोपर्यंत गदियांकडे तीन ते चार प्रकारची कमळफुलं होती. मग कमळरोपांच्या शोधात गदियांनी आजपर्यंत ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, पं. बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, आदी राज्यं पालथी घातली. आंध्र प्रदेश, गुजरात, बिहारमध्ये तर रस्त्याच्या कडेला पण कमळांची तळी दिसतात. गदियांना पहिलं कमळ रोप त्यांचे गुरू शेखर भडसावळे यांनी दिलं. त्यानंतर मखना जातीचे रोप डॉ. विनोद गुप्ता यांनी, तर राजकमळ डॉ. शिवकुमारजी, यांनी दिले. तर इतर विदेशी कमळांच्या उपजाती कुमुदिनी रोपे या अमेरिकेच्या मिलनजॉनी यांनी पाठविली आहेत. सतीश गदिया यांचं हे कमळवेड दोनदा त्यांच्या जिवावरसुद्धा बेतलं आहे. ओरिसा, बिहार, केरळ, प. बंगाल या राज्यांत जाऊन तिथल्या तळ्यातली कमळरोपे आणि कमळकंद प्रसंगी ते चिखलात शिरून मिळवत असत. एकदा ओरिसातल्या तळ्यात कमळांचे कंद मिळवत असताना एक मगर त्यांच्या पाठीमागे लागली. ऐन वेळी किनाऱ्यावर लागल्यामुळे ते वाचले. बिहारमध्ये कमळकंद मिळविताना कमळाच्या तळ्यातच ते रुतले. त्या वेळी मित्रांच्या मदतीने त्यांना त्या तळ्याबाहेर काढावं लागलं. पण आपण कमळाचा कंद मिळविला याचाच आनंद त्यांना अधिक होता. आपल्या कमळ बागेत फुललेलं पहिलं कमळ त्यांनी आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण केलं आणि आपल्या कमळाच्या व्यवसायाला प्रारंभ केला.
परिस्थितीमुळे गदिया फार शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांना काही दोषांमुळे व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं समोरच्याला चटकन कळत नाही. यामुळे त्यांना शालेय जीवनापासूनच आत्मविश्वासाची कमतरता जाणवायची, मात्र कमळाच्या छंदाने त्यांना त्यांचा आत्मविश्वास मिळाला आणि त्याच्या जोरावर त्यांना जगण्याचं बळ मिळालं. म्हणून त्यांना कमळ हे त्यांच्या जीवनाला लाभलेला आधार वाटतो. वयाच्या पस्तिशीपर्यंत पुण्याची हद्दही न ओलांडणारे गदिया आज कमळछंदामुळे देशाटन करून आलेत. त्यांच्या पत्नीला पोलिओमुळे अपंगत्व आलं आहे. मात्र आपल्या शारीरिक व्यंगावlp38र मात करीत या दापम्त्याने कमळ बागेचं नवसृजन घडवलं आहे. गदियांच्या कमळ बागेत इंग्लंड, अमेरिका, बँकॉक, न्यूझीलंड आदी देशांतून मिळविलेल्या कुमुदिनी डौलाने डोलत आहेत. गदिया यांच्या कमळ बागेचं खास आकर्षण म्हणजे १०८ पाकळ्यांचं असणारं सर्वात मोठं कमळ. हे कमळ त्यांनी केरळमधून मिळवलं. कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे. आपल्या देशात कमळाचे दोन प्रकार- २४ पाकळ्यांचं कमळ आणि १०८ पाकळ्यांचं कमळ मिळतं, तर कमळलीलीच्या म्हणजेच कमळ कुमुदिनीच्या तीन जाती आहेत. कमळलीलीच्या काही जाती या दिवसा फुलणाऱ्या, तर काही रात्री फुलणाऱ्या आहेत. दिवसा फुलणाऱ्या कमळलीलींना सूर्यमुखी, तर रात्री फुलणाऱ्या कमळलीलींना चंद्रमुखी म्हणतात. मखना कमळ नावाची जात ही त्यातलीच. लीली प्रकारातली. तिची पाने पाच ते दहा फूट गोलाकार व्यासाची असतात. त्याच्या दोन्ही बाजूला काटे असतात. त्याचे फूलसुद्धा काटेरीच असतं. व्हिक्टोरिया जातीच्या कमळाची पानंसुद्धा पाच ते दहा फुटांपर्यंत मोठी आहेत. या पानांना फक्ती खाली काटे असतात. जगात कमळलीलीच्या ९० तर कमळाच्या आठ जाती असल्याचं गदिया सांगतात. गदियांच्या कमळ बागेत आज रोजी सहा कमळं आणि ३५ कमोदिनी (कमळांच्या उपजाती) आहेत.

Uddhav Thackeray Speech
Uddhav Thackeray : “गद्दारांच्या देशा, गुंडांच्या देशा, लाचारांच्या देशा ही आता महाराष्ट्राची ओळख होत चालली आहे”
Manoj Jarange SIT Inquiry
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; भाजपाच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश
Prakash Ambedkar in akola
महाविकास आघाडीत काय सुरू आहे माहिती नाही…. प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले !
Sindhutai Daughter post
“मम्मा बघते आहेस ना..”, सिंधुताईंच्या मुलीची आईसाठी भावनिक पोस्ट

कमळाच्या छंदाने लक्ष्मीदर्शन..!
बालपण व तारुण्य हलाखीत काढलेल्या गदियांना कमळ छंदाने आनंदच नव्हे तर अर्थाजनही दिले. कमळकंद पुरविणे, कमळाचे रोप लावून देणे, लोकांच्या घरात कमळाची बाग फुलविणे, कमळाचे हौद तयार करणे, आदी कामाद्वाद्वारे गदियांना कमळबागेतून अर्थाजन होत आहे. सणासुदीच्या काळात कमळफुलांना मागणी जास्त असते. त्यातही गणेशोत्सव व दिवाळीच्या वेळी मागणी सर्वाधिक असल्याची माहिती गदिया देतात. फूल व्यावसायिकांकडूनही या काळात कमळाची मागणी जास्त असल्याचे गदिया सांगतात. कमळ छंदाच्या या पाठबळावरच गदियांचे कुटुंब उभे आहे.
दिवसातला सर्व वेळ कमळाच्या सान्निध्यात घालविणारे गदिया ऊन, वारा, थंडी, पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता आपल्या कमळ बागेच्या सेवेत असतात. गारपीट, अवेळी पावसाच्या संकटावेळी तर त्यांच्या जिवाची कमळ बागेसाठी घालमेल होते. कमळ बागेला आपल्या जिवापाड जपणारे गदिया देवाजवळही एकच इच्छा व्यक्त करतात की, माझा शेवटचा श्वासही कमळाच्या सान्निध्यात जावा.

कमळफुलांचा धार्मिक आधार..!
कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. तसेच कमळाचा भारतीय धर्मशास्त्रात, धर्मग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनासाठी कमळ लागतेच. सर्व देवदेवतांच्या हाती कमळ असतेच. असे म्हणतात, भगवान विष्णूच्या नाभीतून कमळाचा जन्म झाला आहे, तर त्या कमळासोबत भगवान ब्रह्मापण प्रगट झाले. तेव्हा पालनकर्ता विष्णूंना ब्रह्माने त्यांच्या जन्माचे आणि जगण्याचे कार्य काय असेल असे विचारले तेव्हा पालनकर्ता विष्णूंनी ब्रह्मांना सृष्टीतील सजीव निर्मितीचे कार्य दिले. त्या वेळेसपासून भगवान ब्रह्मांना सजीवसृष्टीचे निर्माते मानले गेले आहे. भगवत गीता, रामायण, विष्णुपुराण या गंथपुराणांमध्ये िहदू धर्मग्रंथांमध्येच नव्हे तर अनेक िहदू राजे-महाराजांच्या स्थापित गडकिल्यांवरदेखील कमळाचे स्थापत्य शिल्प, कोरीव शिल्प हमखास पाहायला मिळते. कमळ हे विजयाचे, ऐश्वर्याचे व सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून िहदू स्थापत्यकलेत वापरले गेले आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला कमळ वाहण्याचे खास असे महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये कमळाला आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा उपदेश केलेला आहे.

कमळाच्या पाककृती..!
कुमुदिनीच्या तीन जातींच्या बियांपासून लाडू बनविले जातात. हे कमळफूल पाच रंगांत असते. लाल, पांढरा, गुलाबी, पिवळा व निळा इत्यादी. कमळबियांपासून बनणारे लाडू हे कमळफुलांचे बी एकत्र करून ते माठात भाजतात. नंतर कमळ बी व गुळाचा पाक करून लाडू बनवितात. मखना जातीच्या कमळाच्या बिया या बिहारमध्ये ५०० रुपये किलोने मिळतात. तामिळनाडू, केरळ, ओडिसा या राज्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता कमी होण्यासाठी ते वापरतात. कमळाच्या फुलांचा ज्यूस, कमळफुलाचे सरबत, कमळांचे कमळकंद, कमळ चटणी, कमळ पावडर, कमळांच्या बियांपासून बनविली जाणारी खीर बनवली जाते. त्यासाठी कमळबियांपासून लाहय़ा बनविल्या जातात. याच लाहय़ांपासून खीर बनविली जाते. कमळबियांचा अनेक भाज्यांमधून उपयोग केला जातो. कमळाच्या फुलांचा, कमळकंदाचा, कमळांच्या रोपांचा व्यवसाय तर होतोच, पण कमळाच्या देठांचाही व्यवसाय होतो. कमळदेठांना ८० रुपये किलो एवढा भाव मिळतो. कमळदेठांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. कमळदेठाची भाजी, भजी, कबाब, लोणचे केले जाते. कमळाच्या पानांची भजीही चविष्ट बनते. कमळाच्या पानांपासून जेवणाच्या पत्रावळीही केल्या जातात.

कमळाचा औषधी उपयोग..!
कमळाचा औषध म्हणून उपयोग केला जातो. कमळ हे थंड त्वचेला उजळण्यासाठी वापरात येते. कमळ चवीला गोड असते. जसे गुलाबाच्या पाकळ्याचा गुलकंद बनतो तसेच कमलपुष्पांपासून कमळकंदसुद्धा बनविला जातो. अ‍ॅसिडिटीच्या आजारावर कमळकंद उपयोगात येतो. कमळकंद बनविण्यासाठी कमळाचे बी, ज्येष्ठमध व साखरेचा पाक हे सर्व एकत्र करावे लागते. किडनीचे विकार, मूत्रसंसर्ग, गॅस, अस्थमा या विकारांवर कामनयनी हे कमळ उपयुक्त आहे. हे कमळ जास्त पाण्याच्या ठिकाणी आढळते. हे हृदयासाठी फार उपयुक्त आहे. कमळ हे रक्त वाढविण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, रक्तदाबाच्या समस्यांवर उपयोगी आहे. हृदय कमजोर असल्यास कमळाचे फूल, मध, लोणी, साखर मिक्स करून औषध म्हणून घेता येते. मधुमेहाच्या विकारावर पांढरे कमळ उपयोगात येते. पांढरे कमळ, गायीचे तूप व साखर यांची पेस्ट रोज घेतल्यास मधुमेह बरा होऊ शकतो. कमळकेशर हे थंड प्रकृतीच्या त्वचेला तजेला देण्यासाठी वापरले जाते. कमळाच्या पुंकेशर आणि चंदनाची पावडर यांचा एकत्र करून लेप लावल्यास चेहरा उजळतो. तसेच कमळ हे उत्तम शक्तिवर्धक आणि रोगप्रतिकारक असल्यामुळे सर्दी, खोकला, कफ, दूषित रक्तावर, रक्तशुद्धीकरणासाठी, विषबाधा झाल्यास उपयोगात येते. निळ्या रंगाचे कमळ हे हृदयरोगासाठी गुणकारी आहे. पांढऱ्या रंगाच्या कमळफुलांचा वापर हा डोकेदुखी थांबण्यासाठी करतात. कमळाच्या बियांचा उपयोग हाडे मजबुतीसाठी केला जातो.
संतोष विणके