lp37अप्पासाहेब तथा सा. रे. पाटील हे कोल्हापूर जिल्ह्य़ातले ज्येष्ठ समाजवादी नेते. सहकार चळवळीत विशेषत: साखर कारखान्यासंदर्भातलं त्यांचं योगदान लक्षणीय आहे. त्यांचं जीवन, त्यांचं काम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी त्यांच्यावर पुस्तक काढलं जावं अशी अनेकांची इच्छा होती. त्यासाठी काही जणांनी प्रयत्नही केले होते. पण सा. रे. पाटील यांनी या सगळ्या प्रयत्नकर्त्यांना बाजूला करत आपल्यावर पुस्तक येऊ दिले नाही. त्यासाठीच्या प्रत्येक प्रयत्नाला जाणीवपूर्वक नकार दिला. थोरामोठय़ांच्या चरित्रपर पुस्तकात जे गुणवर्णन केले जातं ते आलं होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. मग इतर कुणी तुमच्यावर लिहिण्यापेक्षा तुम्हीच तुमच्या स्वत:विषयी नव्हे तर तुमच्या कार्याविषयी सोप्या शब्दात सांगा आम्ही त्याचं शब्दांकन करू हे त्यांना ‘साप्ताहिक साधना’तर्फे सुचवले गेले. सा. रे. पाटलांनी हे मान्य केल्यावर किशोर रक्ताटे त्यांना दर काही दिवसांनी भेटत राहिले आणि दहा तासांच्या दहा मुलाखतींमधून ‘सा. रे. पाटील बोलतोय’ हे पुस्तक उभं राहिलं आहे.
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आपल्या हातात पुस्तक पडतं तेव्हा त्याच्यामागे कोणकोणत्या प्रक्रिया घडलेल्या असतात ते आपल्याला माहीत असतंच असं नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर साधना परिवाराची सगळी समीकरणं बदलली आणि त्यामुळे २०१३ मध्ये घेतलेल्या या मुलाखतींचं पुस्तक लगेचच प्रकाशित होऊ शकलं नव्हतं. आता ते वाचकांच्या हाती आलं आहे.
साध्या सोप्या भाषेत प्राजळपणे आपल्या आयुष्याकडे बघत सा. रे. पाटलांनी मांडलेली त्यांची वाटचाल अतिशय वाचनीय झाली आहे. वडिलांचा शेतीच्या कामाचा आग्रह आणि सा. रे. पाटलांना असलेली सेवादलाची ओढ यातून ते एक दिवस शेतीचं काम असतानाही सरळ दहा दिवसांच्या शिबिराला निघून गेले. सेवादलाने आपल्याला कसं घडवलं, आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या चांगल्या गोष्टींचा पाया सेवा दलात कसा घातला गेला, सेवा दलात एसेम जोशी, अच्युतराव पटवर्धन, श्यामराव पटवर्धन, प्रभुभाई संघवी या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कामाचा, भाषणांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता.
जांभळी या त्यांच्या गावी असलेल्या सहकारी सोसायटीचं काम अनपेक्षितपणे त्यांच्याकडे आलं आणि त्यांच्या सामाजिक कामाला सुरुवात झाली. त्यातून त्यांचा तालुकाभर संपर्क निर्माण झाला. या सोसायटीसाठी त्यांनी जे काम केलं तो त्यांच्या पुढच्या सगळ्या सामाजिक कामाचा पाया होता. सामाजिक कामाचा अपरिहार्य टप्पा म्हणजे राजकीय क्षेत्रात सक्रिय होणं. १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून सा. रे. पाटील उभे राहिले आणि निवडूनही आले. वास्तविक तेव्हा देशभर काँग्रेसचा प्रभाव होता. कोल्हापुरातही काँग्रेसचं पारडं जड होतं. कारण तिथं रत्नाप्पा कुंभार होते. तरीही सा. रे. पाटील निवडून आले याचं श्रेय मात्र ते सेवादलाला देतात. त्यांचा प्रचार करत एसेम जोशी फिरत आणि लोकांना आवाहन करत की यांना मत द्या आणि निवडणूक प्रचारासाठी एक रुपयापण द्या. अशा रीतीने लोकांकडून पैसा उभा करून त्यांनी निवडणूक लढवली आणि आमदार झाले. हे सगळं आज वाचताना अचंबित करणारं वाटतं. त्यानंतर १९६० साली संयुक्त महाराष्ट्र झाला आणि पुढच्या निवडणुकीत त्याचं सगळं श्रेय काँग्रेसला मिळालं. एसेमपासून सगळे समाजवादी नेते पराभूत झाले. सा. रे. पाटील पडले तरीही ते मनाने पराभूत झाले नाहीत. आपलं सामाजिक काम ते करत राहिले. सहकाराच्या माध्यमातून काही तरी करत राहायचं असं त्यांनी ठरवलं आणि मग लोकांना शेतीला पाणी मिळावं यासाठी इरिगेशन, सहकारी दूध संघ, पोल्ट्री असे सगळे व्याप त्यांनी उभे केले आणि धसास नेले. अगदी सहकारी तत्त्वावर ‘इंद्रधनुष्य’ नावाचं दैनिकही काढलं. पण पुढे ते बंद करावं लागलं. या ‘इंद्रधनुष्य’मध्ये मजकुराची बरीच जबाबदारी वि. स. खांडेकरांनी घेतली होती. या सगळ्यामागे अर्थातच होतं ते साहित्य कलांबद्दलचं सा. रे. पाटील यांचं प्रेम. तमाशा, सिनेमा, नाटक, वाचन या सगळ्यांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व समृद्ध केलं.
शिरोळ इथे त्यांनी उभ्या केलेल्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या प्रक्रियेविषयी त्यांनी तपशिलात सांगितले आहे. इतर कारखाने सहकारी असले तरी ते कुणा एखाद्या नेत्याच्या नावाने ओळखले जात. हा कारखाना मात्र खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा होता. कारखान्याच्या माध्यमातून शाळा, किराणा, कपडे, स्टेशनरीचे केंद्र, झुणका भाकरी केंद्र, सुसज्ज हॉस्पिटल कसं उभारलं गेलं. एक खासदार – आमदार जो विकास करून दाखवू शकत नाही तो एका कारखान्याच्या माध्यमातून करून दाखवता यतो असं ते सांगतात.
सा. रे. पाटील यांना सेवादलाची ओढ असली तरी त्यांच्या वडिलांमुळे त्यांच्या अंतर्मनात कुठे तरी शेतीची आस्था होती. तिचं प्रत्यंतर त्यांच्या पुढच्या आयुष्यातल्या कामांमधून दिसतं. इस्रायलला जाऊन आल्यावर तर त्यांचा शेतीविषयक दृष्टिकोन एकदमच बदलला. परदेशातल्या शेतीत त्यांनी जे जे पाहिलं ते ते आपल्या शेतीत आणण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांनाही पाण्याचं नियोजन, शेती व्यवस्थापन, बियाणांचा वापर याबाबत खूप मार्गदर्शन केलं. आपल्या शेतीविषयक विचारांचं सार मांडताना सा. रे. पाटील सांगतात की, आपल्या शेतीत अजून म्हणावं तेवढं आधुनिकीकरण झालेलं नाही आणि दुसरं म्हणजे सरकारही शेतीकडे बघावं तेवढय़ा गांभीर्याने बघत नाही. स्वत: सा. रे. पाटील यांनी आपल्या मुलाला, गणपतराव पाटलांना मात्र शेतीकडे वळायला उद्युक्त केलं. त्याने केलेल्या प्रयोगांचा सार्थ अभिमान बाळगला. त्याने केलेल्या शेतीतील प्रयोगांबद्दलही त्यांनी या मुलाखतींमध्ये भरभरून सांगितलंय.
सध्याची सहकारी चळवळ संक्रमणावस्थेत आहे हे सांगताना ते म्हणतात की सहकार हे तत्त्व म्हणून टिकण्यासाठी आजच्या जागतिक परिस्थितीचं भान या चळवळीने बाळगावं लागेल. तरच ही चळवळ टिकू शकेल. सहकारात सगळं आयुष्य घालवलेल्या सा. रे. पाटलांचं सहकारी चळवळीबद्दलचं हे चिंतन या क्षेत्रावरची मार्मिक टिप्पणी आहे.
पुस्तकातली ‘विचार आणि कृती’ या प्रकरणात समाजवादी चळवळ अपयशी का ठरली याविषयीचे त्यांनी मांडलेले मुद्दे अंतर्मुख करणारे आहेत. आपल्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव आहे, हे मान्य करून त्यांनी केलेलं आत्मपरीक्षण म्हणून ते महत्त्वाचे आहेत ते म्हणतात की, एके काळी देशात समाजवादी विचारांचं मोठ प्रस्थ होतं. पण सत्तेपासून दूर राहणं, संस्थात्मक उभारणी न करणं, कृती कमी आणि बोलणं जास्त, बदलता काळ लक्षात घेऊन न बदलणं, व्यापक राजकारण करण्यात आलेलं अपयश या सगळ्या मुद्दय़ांची चर्चा त्यांनी केली आहे. ‘राजकारण आणि मी’ हे प्रकरणंही मुळातून वाचण्यासारखं आहे. विशिष्ट ध्येय घेऊन राजकारणात- समाजकारणात वावरणं हे आजच्या काळात दुर्मीळ असताना त्यांचं प्रांजळ निवेदन परिणामकारक ठरतं. पुस्तकाच्या शेवटच्या भागात त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्यावर लिहिलं आहे.
सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक सा. रे. पाटील यांचं चरित्र नाही, तर त्यांच्या मुलाखतींचं शब्दांकन आहे. त्यामुळे ते वाचताना एरवी चरित्रातून माणूस जसा उलगडत जातो, तसं होत नाही. पण सा. रे. पाटील ही व्यक्ती आपल्या मनाचे वेगवेगळे कप्पे उघडून त्यात काय आहे, ते वाचकांना दाखवत आहे, असं वाटत राहतं. त्यांच्या समाजकारणाचं, राजकारणाचं प्रेरणास्थान होतं एसेम जोशी. एसेमचा अतिशय निकट सहवास सा. रे. पाटील यांना लाभला होता. त्यामुळे एसेमबद्दल त्यांनी आणखी बोलायला पाहिजे होतं, त्यांनी अनुभवलेले एसेमचे आणखी पैलू मांडायला हवे होते, असं पुस्तक वाचल्यानंतर वाटत राहतं.
राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल, सहकारी चळवळीबद्दल सा. रे. पाटील यांनी मांडलेली मतं, केलेलं विश्लेषण हे खरं तर सहकारी चळवळीतल्या, राजकारणातल्या माणसानं केलेलं आत्मपरीक्षण आहे. मुख्य म्हणजे ते हातचं काहीही राखून न ठेवता अतिशय परखडपणे केलेलं आहे.
राजकारणात- समाजकारणात वावरूनही ध्येयवादाची, तत्त्वांची भाषा करणारे, स्वत:च्या नव्हे तर समाजाच्या विकासाचा विचार करणारे, फक्त बोलण्यापेक्षा कृती करून दाखवणारे, सहकार हा शब्द खऱ्या अर्थाने जगणाऱ्या सा. रे. पाटील यांचं दोनच महिन्यांपूर्वी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या विचारांचं, व्यक्तिमत्त्वाचं किशोर रक्ताटे यांनी केलेलं हे दस्तावेजीकरण हा यापुढच्या काळासाठी मोठा ठेवा आहे.
सा. रे. पाटील बोलतोय
शब्दांकन – किशोर रक्ताटे
साधना प्रकाशन, वर्ष २०१५
मूल्य : रु. १२५
पृष्ठे : ११२
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com