दोन दशकांपूर्वीच्या काळातलं विशिष्ट क्षेत्रातलं दोन मानवी मनोवृत्तींमधलं द्वंद्वं ‘दोन स्पेशल’ या नाटकातून समोर येतं. सर्वार्थाने सकस असलेलं हे नाटक प्रेक्षकांना ‘स्पेशल’ ट्रीट देतं.

पत्रकारिता हे क्षेत्र व्यावसायिक होऊ लागलं आहे. गेल्या काही वर्षांत ते व्यावसायिकतेने वळत होतंच, पण ते कासवाच्या गतीने. आता मात्र हा वेग कमालीचा जलद झाला आहे. पत्रकारितेला ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ आता म्हणावं का असा प्रश्न विचारावा इथवर परिस्थिती आली आहे, अशा चर्चाही होत असतात. तसं बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रात व्यावसायिकतेने डोकं खुपसलं आहे. ते इतकं की कोणत्याही क्षेत्रातून हे डोकं बाहेर काढता येत नाहीये किंवा त्या त्या क्षेत्रांनाही ते बाहेर काढायचं नाही. जे तसा प्रयत्न करतील त्यांना ‘कोणत्या काळात जगतोस?’ असा प्रश्न विचारला जाईल बहुधा. या क्षेत्राविषयी कुतूहल, उत्सुकताही लाक्षणिकरीत्या वाढली आहे. म्हणूनच या क्षेत्राकडे वळणाऱ्या तरुण मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. सच्चेपणाने काम करू, सत्याचा पाठपुरावा करत बातमीच्या तळाशी जाऊ वगैरे असा प्रामाणिक विचार करून ही पिढी उमेदीने या क्षेत्रात यायचा विचार करते. पण, प्रत्यक्षात विहिरीत उडी मारल्यावरच जशी त्याची खोली कळते तशीच जाणीव या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकल्यावर होते. मग त्यातलं राजकारण, सच्चेपणाची गळचेपी, तत्त्वांना मुरड घालणारी माणसं वगैरे गोष्टींचा प्रत्यय येतो. या सगळ्याची माहिती या क्षेत्रात काम न करणाऱ्याही अनेकांना असते. याचं कारण यापूर्वीचे काही मराठी-हिंदी सिनेमे हे आहे. आता नाटकातून या विषयाचा आणखी एकदा अनुभव घ्यायला मिळतोय. निमित्त आहे ‘दोन स्पेशल’ या नाटकाचं. व्यावसायिकतेची झळ खरंतर दोन दशकांपूर्वीच या क्षेत्राला लागली होती. तत्त्व आणि व्यावसायिकता असं द्वंद्वं तेव्हाही होतंच. पण, आता त्याचं प्रमाण वाढलंय. ‘दोन स्पेशल’ हे नाटक ऐंशीच्या दशकतातल्या पत्रकारितेचं आणि तत्संबंधीच्या बाबींचं दर्शन घडवतं.
ह. मो. मराठे यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर ‘दोन स्पेशल’ हे नाटक आधारित आहे. माध्यमांतर करताना सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते. तशी या नाटकातही आहे. साल १९८९. पुण्याच्या ‘हिंदुस्थान’ नावाच्या दैनिकाच्या ऑफिसात घडणारी गोष्ट. मिलिंद भागवत हा उपसंपादक रात्रीपाळीसाठी घाईघाईत ऑफिसात येतो. कोणत्या बातम्या, कशा, कुठे लावायच्या, भाषांतरं वगैरे अशा सगळ्या कामांना पटापट हात घालतो. तो यायच्या आधीच उमेश भोसले हा प्रामाणिक तरुण ओळख काढत नोकरीच्या आशेने दैनिकाच्या ऑफिसात पोहोचलेला असतो. खरंतर घाईच्या आणि महत्त्वाच्या वेळी तो ऑफिसात आला हे मिलिंदला फारसं आवडलेलं नाही हे त्याच्या देहबोलीतून वारंवार जाणवत असतं. पण, उमेशच्या बोलण्यातल्या सच्चेपणाने मिलिंदचं ते ‘नावडणं’ विरघळून जातं. पुण्यात एका प्रतिष्ठेच्या सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीची भिंत कोसळून एक लहान मुलगी दगावली आणि काही जखमी झाल्याची बातमी येते. ती बातमी पहिल्या पानावर मोठी लावायची हे मिलिंद ठरवतो. जोडूनच त्याच्याच एका सहकाऱ्याने काढलेला एक फोटो इतका बोलका असतो की तो बातमीसोबत जाईल हेही पक्कं होतं. तो उमेशलाही कामाला लावतो. तितक्यात स्वप्ना ऑफिसात हजर होते. स्वप्ना म्हणजे मिलिंदची एकेकाळची प्रेयसी. अवेळी आणि दैनिकाच्या ऑफिसात त्यांची भेट होईल असा कधी विचारही न केल्यामुळे दोघेही संभ्रमात आहेत. पण, तरी बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे औपचारिक गप्पांपासून संवादांना सुरुवात होते. हळूहळू स्वप्नाचा तिथे येण्यामागचा उद्देश मिलिंदला उमगतो. सांस्कृतिक केंद्राच्या बातमीतली शेवटची तीन वाक्यं काढण्यासाठी स्वप्ना वेगवेगळ्या दैनिकांना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करत असते. कारण केंद्राची इमारत बांधणाऱ्या संकलेचा बिल्डरचं पीआर म्हणजे पब्लिक रिलेशनचं काम ती बघत असते. इतर दैनिकांप्रमाणेच ती ‘हिंदुस्थान’ या दैनिकाची पायरीही चढते. हे कळताच क्षणी मिलिंद आणि स्वप्ना या दोघांमध्ये सुरू होतं ते तत्त्व आणि गरज यातलं द्वंद्वं. गरजेपुढे तत्त्व वाकतात की तत्त्वांपुढे गरज लहान वाटू लागते या लढाईला श्रीगणेशा होतो.
एका व्यक्तीला एक गुलाबाचं फूल आवडतं. त्याला ते हवं असतं. पण, ते झाडापासून तोडू नये म्हणून प्रयत्न करणारी दुसरी व्यक्ती त्या पहिल्या व्यक्तीला तसं करू देत नाही. ‘एक फूल तोडलं तर काय होतं’ असं म्हणणारी पहिली व्यक्ती. तर ‘आज एक तोडाल, उद्या दुसरं. मग अशी साखळी सुरू राहील’ असा प्रतिवाद करणारी दुसरी व्यक्ती. ‘मी रोज पाणी घालायला येईन ना इथे या झाडाला’ अशी आश्वासनवजा विनंती करणारी पहिली व्यक्ती. तर ‘रोज पाणी घालाल हो, पण ते एक फूल तोडताना रोपटय़ाला झालेल्या त्रासाचं काय’ असा सवाल करणारी दुसरी व्यक्ती. हे नेहमीचं द्वंद्वं आपल्या आजूबाजूला घडणारं आहे. आपण ऐकतो आणि सोडून देतो. पण, याचा गांभीर्याने विचार केला तर या रस्सीखेचीत कोणा एकाची हार ही ठरलेली, हे लक्षात येईल. पण, दोघांनाही दोघांचीही हार व्हायला नको असेल तर ‘तोडगा’ या पर्यायाचा विचार होतो. पण, काही वेळा हा ‘तोडगा’ कोणा तिसऱ्याच्याच भावनांशी खेळतो हे मात्र दुर्लक्षित होतं. याचा प्रत्यय ‘दोन स्पेशल’मध्ये चटका लावून जातो. स्वप्ना आणि मिलिंद दोघांनाही एकमेकांचं हरणं नकोय. मिलिंदला स्वप्नाची गरज कळतेय तर स्वप्नाला मिलिंदची तत्त्व महत्त्वाची वाटतात. स्वप्नाची गरज भागवण्यासाठी ती वाक्यं बातमीतून काढून टाकली तर स्वत:विषयीचाच आदर गमवून बसू अशी भीती मिलिंदच्या मनात तर आधीचा प्रियकर असलेल्या मिलिंदच्या स्वभावातला एकेक पैलू चोख माहीत असतानाही त्याला त्याच्या तत्त्वांशी तडजोड करायला लावणं म्हणजे त्याला कोलमडून बघण्यासारखं आहे, ही स्वप्नाच्या मनातली भीती. दोघांच्याही मनातली ही भीती मनातून, डोळ्यातून आणि देहबोलीतून दिसतेच. दोघांमधलं हे वैचारिक, तात्त्विक द्वंद्वं शब्दातीत केलंय, लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने.
खरं तर नाटकाचा विषय साधा, सोपा आहे. पण उत्तम मांडणीमुळे तो सरस ठरलाय. क्षितिज पटवर्धन याचं रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून हे पहिलं नाटक. पण पहिल्याच प्रयत्नात त्याने षटकार मारला आहे. सशक्त संवाद, प्रसंगांची चोख मांडणी आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे नाटक विशिष्ट उंचीवर जातं. १९८९ साल म्हणजे नव्वदीच्या सुरुवातीचा काळ क्षितिजने काही संवादांमधून रंगवला आहे. स्वप्ना आणि मिलिंद यांच्या अधुऱ्या राहिलेल्या प्रेमकथेची कारणं, विरह आल्यानंतर मिलिंदची झालेली अवस्था, स्वप्ना दूर गेल्याबाबतचं तिचं स्पष्टीकरण हे सगळं योग्य वेळी प्रेक्षकांसमोर येतं. या घटना घडल्याचा उल्लेख दोघांच्याही बोलण्यातून वारंवार येतो. त्यामुळे नेमकं काय झालं असेल तेव्हा, हा प्रश्न त्याचं उत्तर मिळेपर्यंत प्रेक्षकांना सतावत राहतो. पण सरधोपट मांडणी न करण्याची हुशारी दिग्दर्शकाने केली आहे. योग्य प्रसंगी एकेक गोष्टीचा उलगडा होत असल्यामुळे प्रेक्षकांमधलं कुतूहल टिकून राहतं. या नाटकाचे हायलाइट्स म्हणजे त्याचं नेपथ्य, प्रकाशयोजना आणि ध्वनी रेखाटन. या तिन्ही गोष्टींमुळे १९८९ हे र्वष प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रत्यय सबंध नाटय़कृती बघताना येतो. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य, प्रकाशयोजना जबरदस्त झालंय. बल्बच्या भगभगीत प्रकाशात काम करण्याचा तो काळ या प्रकाशयोजनेमुळे अधोरेखित होतो. पाण्याचा तांब्याचा पिंप, टाइपरायटर, खुच्र्या, सतत वाजणारं टेलिप्रिंटर, बंद असलेल्या दुकानाच्या शटरवर असलेलं चित्र, बाजूला त्याकाळच्या सिनेमाचं पोस्टर. या आणि अशा अनेक गोष्टी लक्षवेधी ठरतात. दैनिकाचं ऑफिस असल्यामुळे प्रिटिंग प्रेसचा आवाज अनिवार्य होता. ही अत्यंत महत्त्वाची बाब ध्वनी रेखाटक अनमोल भावे यांनी लक्षात ठेवून संपूर्ण नाटकात तो आवाज वापरला आहे. ऑफिस वरच्या मजल्यावर आहे, खाली उतरल्यावर लगेच रस्ता आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा आवाज सतत ऑफिसात येत असणारा हा अभ्यासही त्यांनी केलाय. म्हणूनच त्याचा वापरही नाटकात दिसतो. रिक्षेचं ऑफिसच्या जवळ असणं आणि नंतर थोडं पुढे जाणंही या आवाजातून जाणवतं. त्यामुळे नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनी रेखाटन या तिन्ही गोष्टींमुळे नाटकाला चार चाँद लागलेत असं म्हणायला हरकत नाही.
जितेंद्र जोशी (मिलिंद भागवत) आणि गिरिजा ओक-गोडबोले (स्वप्ना) हे दोन तगडे कलाकार नाटकात जान आणतात. वडील दवाखान्यात असल्यामुळे घरी फोन लावून बायकोशी बोलताना काळजी व्यक्त करणारा, पैशांची व्यवस्था होईल असं बायकोला खरं तर स्वत:लाच समजावणारा, पूर्वीच्या प्रेयसीशी औपचारिकतेने गप्पांना सुरुवात करताना आलेलं अवघडलेपण व्यक्त करणारा, भिंत कोसळून दगावलेल्या लहान मुलीसाठी हळहळ बोलून दाखवणारा, पण तितकाच तत्त्वनिष्ठ कठोर असणारा मिलिंद जितेंद्र जोशीने उत्तम वठवलाय. जितेंद्र उत्तम अभिनेता असल्याचं त्याने याआधीच सिद्ध केलं आहे. पण या नाटकात त्याच्या सिद्धतेला आणखी एक पान जोडलं जाईल. मुळात जितेंद्रला गेल्या काही वर्षांमध्ये विशिष्ट साच्यातल्या भूमिकांमध्ये बघण्याची प्रेक्षकांना सवय झाली होती. त्यामुळे त्याच्याकडून साकारलेला मिलिंद भागवत हा प्रेक्षकांसाठी सरप्राइज पॅकेज ठरलं आहे. नाटकाच्या संवादांमध्ये दम आहेच. पण जितेंद्रच्या संवादफेकीने ते आणखी दमदार होतात यात शंका नाही. दमदार म्हणजे आवाज मोठा, मोठमोठाली वाक्यं, जड शब्द असा अर्थ इथे घेऊन चूक करता कामा नये. साधे संवादही त्याने त्याच्या कौशल्याने दमदार केले आहेत. त्याला टक्कर देण्यासाठी गिरिजा ओक-गोडबोले सज्ज आहे. तिचं वावरणं सहज, बोलणं हळुवार पण या सहजतेनेच तिने स्वप्ना खुलवली आहे. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणं, हा मनुष्य स्वभाव. स्वप्नाचं तसं करणं गिरिजाने उत्तम साकारलं आहे. ‘बातमीतील ती तीन वाक्यं काढून टाकणं’ ही तिची गरज ती वारंवार वेगवेगळ्या मुद्दय़ांमधून व्यक्त करते. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची गत झाली आहे. स्वप्नासोबत घडलेली घटना सांगण्याचा प्रसंग गिरिजा अतिशय संयमीरीत्या अभिनीत केला आहे. भावनिक प्रसंगात साधारण कलाकार वाहून जातो. जरा एक पैसा अलीकडे किंवा पलीकडे झाला की अभिनयाचं गणित चुकतं. पण, गिरिजाने तो समतोल हुशारीने सांभाळला आहे. तिची गरज असली तरी तिच्या वागण्या-बोलण्यात आतताईपणा दिसत नाही. अशा संयमी स्वप्नाला गिरिजा जिवंत करते. भूमिका लहान असली तरी ती चोख बजावणारे कलाकार मोजके आहेत. त्यात रोहित हळदणकर या कलाकाराची भर पडेल. उमेश भोसले ही व्यक्तिरेखा त्याने सशक्त पद्धतीने रेखाटली आहे. जिज्ञासू, अभ्यासू, प्रामाणिक, स्पष्टवक्ता अशी स्वभाववैशिष्टय़े असलेला उमेश रोहित साकारतो.
कोणतीही कलाकृती परिपूर्ण नसते. असलीच तर तो अपवाद. विशिष्ट कलाकृतीत काही अतार्किक किंवा बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी आढळल्या म्हणजे ती संपूर्ण कलाकृती वाईट असं होत नाही. असं असतंच तर सलमान-शाहरुखचे सिनेमे दणादण आपटायला हवे होते. तर असो, आपण जर त्याच्या किंवा त्याच्यासारख्या इतरांचे काही निर्थक सिनेमे सहन करू शकतो तर एखाद्या चांगल्या कलाकृतीतील काही अतार्किक, न पटणाऱ्या गोष्टींकडे काणाडोळा नक्कीच करू शकतो. तसंच ‘दोन स्पेशल’चंही आहे. यातही काही खटकणाऱ्या गोष्टींनी जागा घेतली आहे. मग ती नोकरी मिळण्याच्या आशेने आलेल्या उमेश भोसलेला नोकरी मिळालेली नसताना अत्यंत महत्त्वाच्या बातमीसंदर्भातली कागदपत्रं आणायला पाठवलेलं असो किंवा रात्रपाळीला असलेल्या उपसंपादक मिलिंद भागवत यांच्याकडे असलेला मोकळा वेळ असो. या गोष्टी काहीशा त्रास देतात. पण नाटकात इतर दर्जेदार गोष्टींचं पारडं जड असल्यामुळे या खटकणाऱ्या पारडय़ाला फारसं महत्त्व न दिलेलं बरं. तर नाटकांच्या भाऊगर्दीत वेगळी ओळख, स्थान, दर्जा, लोकप्रियता कमावणारं ‘दोन स्पेशल’ हे नाटक प्रेक्षकांना नक्कीच ‘स्पेशल’ ट्रीट देतं..!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com