आवडता पदार्थ पाहिल्यावर खाण्याची तीव्र इच्छा होणे म्हणजे तोंडाला पाणी सुटणे तर खूप घाबरून जाणे म्हणजे तोंडचे पाणी पळणे. शब्द एकच पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या क्रियापदामुळे अर्थ बदलाचे वैविध्य मराठीत दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल कबूल केल्याप्रमाणे पद्मजासाठी आजचा शब्द होता माउथ. नाश्त्याच्या टेबलवर पेपर वाचत बसलो असताना पद्मजाला काय काय वाक्प्रचार सांगायचे याची मनात उजळणी करत होतो. एवढय़ात माझी शिष्या माझ्यासाठी गरमागरम मसाला डोसा घेऊन आली. मी पद्मजाला म्हटले, ‘‘डोसा बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘काका, आजचा शब्द आहे माउथ व त्याचे वेगवेगळे पार्ट्स आणि मला माहीत आहे की तुम्ही आता त्यावरूनच काहीतरी वाक्प्रचार वापरला आहे.’’ मी म्हटले, ‘‘होय, तोंडाला पाणी सुटणे म्हणजे समोर आवडती गोष्ट पाहिल्यावर ती खायची खूप घाई होणे.’’
एवढय़ात माझी सौ. म्हणाली, ‘‘पण तेच जर तोंडचे पाणी पळणे असा शब्द वापरला तर त्याचा अर्थ होतो खूप घाबरणे.’’
मी डोसा खाताना पद्मजाला म्हटले की तुझ्या येण्यामुळे आता खास साउथ इंडियन खाद्यसंस्कृतीशी आमची चांगलीच तोंडओळख होईल. तोंडओळख होणे म्हणजे परिचय होणे हे मी सांगितल्यावर पद्मजाने लगेच तिच्या हातातली डिश बाजूला ठेवून आपल्या डायरीमध्ये अजून एक अर्थ लिहून घेतला.
आता मी वर्तमानपत्रामध्ये पद्मजासाठी नेहमीप्रमाणे अर्थ शोधू लागलो. त्यात एका प्रसिद्ध समाजसेवकाने असे म्हटले होते की, पुढाऱ्यांनी नुसती तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा काहीतरी भरीव कार्य समाजासाठी करावे. मी पद्मजाला म्हटले, ‘‘घे अजून एक अर्थ, तोंडाची वाफ दवडणे म्हणजे नुसत्या मोठय़ा मोठय़ा आश्वासनांची घोषणा करणे, पण प्रत्यक्षात काहीही कृती न करणे.’’
दुसरी बातमी होती की, कांद्याच्या चढय़ा भावांमुळे गरीब व मध्यमवर्गीय दोघांच्याही तोंडचा दोन वेळचा घास सरकार व साठेबाज हिरावून घेत आहेत. मी पद्मजाला म्हटले, ‘‘तोंडचा घास हिरावून घेणे म्हणजे लोकांना उपाशी ठेवणे.’’
माझे पेपर वाचन आवरून मी आंघोळीला पळालो. पण त्याआधी पद्मजाला मी सवयीप्रमाणे गृहपाठ दिला. तोंडदेखल्या करणे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार व दुतोंडी वागणे याचे अर्थ मी तिला शोधून काढायला सांगितले.
शिरस्त्याप्रमाणे मी ऑफिसला निघालो. आज रिक्षाने ऑफिसला जाईन असा विचार केला; पण कोणताही रिक्षावाला माझ्या ऑफिसच्या दिशेला यायला तयार होईना. एकदा मी विचार केला की जबरदस्तीने रिक्षा थांबवून आपण रिक्षात बसू या, पण नंतर मात्र विचार केला की सकाळी सकाळी त्यांच्या तोंडाला लागून आपलाच मूड खराब होईल. तेव्हा मी सरळ एसी बस पकडली. तोंडाला लागणे म्हणजे वादविवाद करणे हा नवीन अर्थ मात्र मला अनायसे सापडला.
ऑफिसला पोहोचल्यावर मी कामाला सुरुवात केली. तेव्हा मला जाणवले की कर्मचारी युनियनला माझ्या वरिष्ठांनी जर वेळेवर चर्चेला बोलावले नाही तर हेच युनियनवाले पुढे जाऊन व्यवस्थापनाच्या तोंडाला फेस आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तेव्हा ही बाब मी माझ्या वरिष्ठांच्या नजरेस लगेच आणून दिली. हे करीत असताना तोंडाला फेस आणणे म्हणजे एखाद्याला अडचणीत आणणे हा अर्थ मी पद्मजासाठी बसच्या तिकिटामागे लिहून ठेवला.
संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्यापूर्वी मी माझ्या सहकाऱ्याला बोलावून घेतले. त्याला सांगितले की, उद्या सकाळी नवीन प्रॉडक्ट लाँच करायचे आहे. त्या संदर्भातील फाइल उद्या सकाळी मी येण्यापूर्वी माझ्या टेबलवर तयार असली पाहिजे. तसे न झाल्यास वरिष्ठांपुढे मला व आपल्या सर्व टीमला तोंडघशी पडावे लागेल. जे मला बिलकूल खपणार नाही. माझा सहकारी मला आश्वासन देऊन गेला की फाइल योग्य वेळी तयार असेल. माझ्या बसच्या तिकिटावर अजून एका अर्थाची एन्ट्री झाली व ती म्हणजे तोंडघशी पडणे म्हणजे सर्वापुढे फजिती होणे, मान खाली घालावी लागणे.
घरी परतलो, फ्रेश झालो व सवयीप्रमाणे चहाचा कप तोंडाला लावला. तेव्हा सौ.ने येऊन सांगितले की, शेजारच्या विंगमधील काळेंची नात एका रिक्षावाल्याचा हात धरून घरातून पळून गेली. त्यामुळे काळे कुटुंबीय, ‘मुलीने पळून जाऊन आमच्या तोंडाला काळे फासले व आमच्यावर तोंड लपवायची वेळ आणली’ असे सर्वाना सांगत आहेत. आजपासून त्या मुलीशी आमचा संबंध संपला असेही ते सर्वाना सांगत आहेत. मी म्हटले, ‘‘आशाकडून, काळे कुटुंबीयांच्या खूप अपेक्षा असल्याने त्यांना असे वाटणे साहजिकच आहे. मी बघतो, आशाला परत घरी आणण्यासाठी काय करावे लागेल ते.’’
परिस्थितीचे गांभीर्य बघून पद्मजाने माझ्याशी तूर्त संवाद न करण्याचा शहाणपणा दाखविला. मी लगेच काळे कुटुंबीयांकडे गेलो. त्यांना समजावले व अजून एकदोघांच्या मदतीने आशाला शोधून काढून तिला घरीदेखील आणले. आशा घरी आल्यावर तिच्यावर तोंडसुख घेऊ नका हे मी आधीच सर्वाना बजावले होते. सर्व मामला शांत झाल्यावर मी घरी परतलो. पद्मजा व सौ.ने लगेच पाने वाढायला घेतली.
मी पद्मजाला म्हटले, तुझी शिकवणी आता पूर्ण करूया. मी तिला तिकिटावर लिहिलेले अर्थ तर सांगितलेच, पण त्याशिवाय तोंडसुख घेणे म्हणजे वाईटसाईट बोलणे, तोंड काळे करणे म्हणजे लाज आणेल असे कृत्य करणे व तोंड लपवून फिरावे लागणे म्हणजे लोकांचे टोमणे ऐकावे लागू नयेत म्हणून त्यांना टाळावे लागणे हेही अर्थ समजावले.
पद्मजा म्हणाली, ‘‘काका, ऐका आता माझा होमवर्क; तोंडदेखल्या करणे, म्हणजे मनापासून एखादी गोष्ट न करता समोरच्याला बरे वाटावे म्हणून अनिच्छेने करणे; तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हणजे आपल्याच माणसाकडून त्रास होत असल्याने ते दु:ख कोणापाशी सांगूही न शकणे व दुतोंडी वागणे, म्हणजे एकदा एका विषयावर एक भूमिका घेणे तर लगेच दुसऱ्या वेळी त्याच विषयावर पूर्णपणे विरुद्ध भूमिका घेणे.
मी पद्मजाला म्हटले, ‘‘तुला शेवटचा एक अर्थ सांगून ही शिकवणी आवरती घेतो. तोंडाला कुलूप लावणे म्हणजे मौन धारण करणे. खरेतर आज आपण तोंडाचे इतर भाग पण बघणार होतो, जसे की दात, जीभ, ओठ वगैरे वगैरे. पण आपली तोंडपाटिलकीच एवढी झाली की या सर्वासाठी वेळच नाही पुरला.’’ अर्थात तोंडपाटिलकीचा अर्थ काय ते मी पद्मजालाच शोधायला सांगितले हे काय वेगळे सांगायला हवे?

More Stories onमराठीMarathi
मराठीतील सर्व मराठी तितुकी फिरवावी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language
First published on: 25-07-2014 at 01:13 IST