एअरबस विमानाजवळ आल्यानंतर सगळय़ांच्याच काळजाचे ठोके वाढले होते. चंद्रावर पाऊल ठेवताना नील आर्मस्ट्राँगला कसे वाटले असेल याची कल्पना आम्हाला पहिल्यांदाच विमानात पाऊल ठेवताना आली.

‘धरती पर अगर कहीं स्वर्ग है तो बस यही है.. यही है.. यही है..’ अशा धरतीवरच्या स्वर्गाच्या सफरीवर जायचे आहे, असे जेव्हा माझ्या नवऱ्याने सांगितले तेव्हा मला ती थट्टा वाटली. पण, जेव्हा त्यांनी विमानाचे बुकिंग दाखवले तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणे भाग पडले. विमानाने प्रवास म्हटल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
आप्पा जाधव आणि त्यांचा सात/ आठ जणांचा ग्रुप नेहमीच वेगवेगळय़ा ठिकाणी, शहरात, पर्यटन स्थळांवर भटकंती करायचे. पण त्यांनी आपल्या भटकंतीच्या मौजमजेत सौभाग्यवतींना कधीच सामील करून घेतले नव्हते. याबद्दल ग्रुपमधल्या प्रत्येकाच्या घरातून बायकोची नाराजी पत्करावी लागत होती. म्हणून त्यांनीच ‘या सगळय़ा जणींना विमानाने काश्मीर फिरवून आणू या’ असा प्रस्ताव मित्रांसमोर ठेवला आणि तो तात्काळ एकमताने मंजूरही झाला. तेव्हापासून आमच्या सर्वाच्या घरात काश्मीरला जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली होती.. आणि ठरलेल्या दिवशी आमचा सोळा जणांचा ग्रुप काश्मीर टूरवर निघाला.
कोकणातल्या आमच्या गावातून प्रवास सुरू झाला. पहिला प्रवास आरामबसमधून होता. पावसाळय़ाचे दिवस आणि त्यात कोकणातला मुसळधार पाऊस! यामुळे गाडीतल्या सर्व सीट्स ओल्या होत्या. संततधार पावसामुळे बसच्या टपावरील पाण्याने सावंतच्या डोक्यावर अभिषेक होत होता. सावंत हा मुळातच भडक डोक्याचा प्राणी. सपत्नीक काश्मीरला निघालो आहोत या रोमांचक कल्पनेने तो वरून होणारा जलाभिषेक सहन करीत होता. परंतु तो फार काळ संयम राखू शकला नाही. गाडी मध्येच थांबवून त्याने ड्रायव्हर व त्याच्या मदतनीसाला धारेवर धरले- ‘‘काय रे? ही आरामबस आहे की डब्बा? असे भिजत जाण्यासाठी तुला पैसे दिले आहेत का? उद्या आम्ही विमानात बसणार आहोत. बॅगांमधले कपडे भिजले तर? आत्ताच्या आत्ता ही बस बदल, नाहीतर वरून गळणारे पाणी थांबव, नाहीतर काहीही कर. त्याशिवाय बस पुढे जाणार नाही.’’
सावंतचा पारा चढलेला पाहून ड्रायव्हर घाबरला. पण, या क्षणी तो काहीही करू शकत नव्हता. प्लास्टिक कागद सीटवर घालावेत असे कुणीतरी सुचविले. ड्रायव्हरने एका दुकानात प्लास्टिक कागदाची चौकशी केली. तिथे प्लास्टिक कागद नाही, पण बिस्किटांचे रिकामे बॉक्स मिळाले. ड्रायव्हरने ते बॉक्स या मंडळींच्या स्वाधीन केले. ते पुठ्ठय़ाचे बॉक्स फाडून कुणी खिडकीला आडवे लावले, तर कुणी ओल्या सीटवर टाकले. सावंतच्या डोक्यावर होणारा अभिषेक मात्र पाऊस थांबल्यावरच संपला. गाडीने वेग घेतला, तशी गाडीतली मंडळी निद्राधीन झाली..
श्रीनगरचे विमान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी दहा वाजून ५० मिनिटांनी सुटणार होते. आम्ही सकाळी नऊ वाजता विमानतळावर पोहोचलो.
विमानतळाच्या भव्य, सुसज्ज आणि सुरेख वातावरणात आम्ही प्रवेश केला. बॅगा चेकिंगसाठी पाठविण्यात आल्यानंतर मेटल डिटेक्टरमधून आणि नंतर मॅन्युअली तपासणी झाल्यावर आम्ही वेटिंगरूममध्ये थांबलो. टॉक-टॉक करीत चालणाऱ्या त्या टकाटक मुली, टाय सूट-बुटातले तिथले कर्मचारी, तिथली स्वच्छता, स्टॉल्स सगळंच कसं मनोवेधक! विमानात बसण्याच्या कल्पनेने किंवा भीतीने म्हणा, पण सावंतवहिनींच्या चेहेऱ्यावरील हसू मात्र लुप्त झाले होते. एअरबसमध्ये चढतानाही त्या अक्षरश: थरथरत होत्या. सावंतने त्यांचा हात धरला. लग्नानंतर सर्वासमक्ष बहुधा पहिल्यांदाच बायकोचा हात त्याने धरला
असावा.

pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
Ship catches fire in Thailand all passengers safe
थायलंडमध्ये जहाजाला आग, सर्व प्रवासी सुखरूप

तो कर्तव्यदक्ष, काश्मिरी तरुण तपासनीस काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. सारखे समोरच्या भल्या मोठय़ा डस्टबिनकडे बोट दाखवून ‘फेक दो’ म्हणत होता. 

एक मोठा वळसा घालून एअरबस विमानाजवळ आल्यानंतर सगळय़ांच्याच काळजाचे ठोके वाढले होते. चंद्रावर पाऊल ठेवताना नील आर्मस्ट्राँगला कसे वाटले असेल याची कल्पना आम्हाला पहिल्यांदाच विमानात पाऊल ठेवताना आली. ‘वेलकम सर,’ ‘वेलकम मॅम’ म्हणत स्वागत करणारी आणि खरोखरच सुंदर दिसणारी ‘हवाईसुंदरी’ पाहून पुरुषमंडळींचे ‘होश’ उडाले. पण, पाठीमागून बायकोने, ‘चला हो पुढे’ म्हटल्यावर ‘होश’ परत ठिकाणावर आले. आपापल्या सीटवर स्थानापन्न झाल्यानंतर सगळय़ात आधी आमच्या मंडळींनी न सांगताच आपापले सीटबेल्ट उलटसुलट करून लावून टाकले. न जाणो, पटकन विमान सुरू झाले तर बेल्ट लावायचा राहून जायचा आणि विमानाच्या गचक्याने तोंडावर पडायला व्हायचे. तेही त्या हवाई सुंदऱ्यांसमोर! उगीच रिस्क नको.. सावंत आणि शिंदेवहिनी तर डोळे विस्फारून पाहत होत्या. त्यात भीतीही होती आणि विस्मयही..!
विमानाच्या पायलट केबिनमधून हिंदी आणि इंग्रजीतून दिली जाणारी माहिती सर्वजण अगदी कान देऊन ऐकत होते. थोडय़ा वेळाने एक हवाईसुंदरी विमानाच्या मध्यभागी उभी राहून घोषित होणाऱ्या सूचनांप्रमाणे ‘प्रात्याक्षिक’ करून दाखवू लागली. ‘संकटकाळी स्वत:ला वाचविण्याचे प्रात्यक्षिक’ ती जेव्हा करून दाखवित होती, तेव्हा बेल्ट सोडून विमानातून धावत बाहेर पडावे असे एकदा मोरेला वाटले. पण, मोठा आवंढा गिळून तो बसल्या जागी आणखी घट्ट बसला.
काही वेळातच विमानाचे इंजिन सुरू झाल्याचा आवाज येऊ लागला. आमच्या गोटात एकदम सन्नाटा पसरला. कानठळय़ा बसविणारा आवाज होऊन विमानाने धावपट्टीवरून आकाशाकडे झेप घेतली. सावंतवहिनींच्या पोटातील गोळा क्षणाक्षणाला वाढत होता. पण आता कोणताही पर्याय समोर नव्हता. ना धड जमीन. ना धड आकाश.. पूर्ण अधांतरी..! विमान आकाशात वेगवान झाले. थोडय़ा वेळाने दोन हवाई सुंदऱ्या चहा-कॉफी, खाद्यपदार्थाची ट्रॉली घेऊन आल्या. धावत्या विमानामध्ये कशाचाही आधार न घेता, अगदी आरामात त्या फिरत होत्या. ते बघून आमचा धीर चेपला..
काचेच्या खिडकीतून मी हळूच बाहेर पाहिले आणि पाहतच राहिले..आहाहा..नुसते कापसासारखे ढग.. जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत पांढरेशुभ्र ढगच ढग. सिनेमामध्ये देव अशा ढगांतून फिरताना पाहिले होते. तेच ढग. एखादा ढग पर्समध्ये टाकून घेण्याचा मोह मोठय़ा कष्टानं आवरावा लागला. पायलट केबिनमधून वातावरण, उंची, विमान ज्या शहरांवरून मार्गक्रमण करीत होते त्या शहरांची नावे इत्यादी माहिती सांगितली जात होती, पण बाहेर ढगांशिवाय काहीच दिसत नसल्यामुळे पायलट सांगेल ते खरे मानण्याशिवाय पर्याय नव्हता.
शुभ्र ढगांतला सुंदर प्रवास झाल्यानंतर पायलट केबिनमधून पुन्हा एकदा बेल्ट बांधण्याच्या सूचना आल्या. म्हणजे आता विमान जमिनीवर उतरणार.. विमान खाली येण्याच्या प्रक्रियेदरम्यान जमिनीवर पाहिले तर पांढरीशुभ्र चमचमणारी, गगनाला गवसणी घालणारी हिमशिखरे दिसू लागली होती. लांबून दिसणारा तो देखणा, तपस्वी हिमालय पाहून ऊर अगदी भरून आले. खाली हिरवाई होती. देवदार, चिनार, पाइनचे आकाशाकडे झेपावणारे वृक्ष, घनगर्द झाडींमधून शुभ्र खळाळणाऱ्या नद्या, रंगीबेरंगी पत्र्यांची घरे.. आकाशातून दिसणारे हे नंदनवनाचे दृश्य पाहून डोळय़ांची, मनाची क्षुधा वाढत होती. श्रीनगर विमानतळावर लॅिण्डग करताना पुन्हा एकदा खडखडाट झाला. आता कोणीही घाबरले नाही.
काश्मीर खोऱ्यातील डोळे दिपवणारे आणि मन तृप्त करणारे अद्भुत सृष्टिसौंदर्य, निसर्गाची लयलूट असलेले सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगरचे विस्तीर्ण दललेक, चष्मेशाही, मुगल, शालिमार या अप्रतिम शाही बगिचे, शंकराचार्य मंदिर, दल लेकमधल्या आलिशान हाऊसबोट मधील शाही मुक्काम, घोडय़ावरची डौलदार सफर.. असा स्वर्गीय आनंद लुटून आठ दिवसानंतर सगळय़ांनाच घरची ओढ लागली. परतीच्या विमानासाठी आम्ही दुपारी एक वाजता श्रीनगर विमानतळावर पोहोचलो. त्या दिवशी वटपौर्णिमा होती. आमच्या ग्रुपमधील सगळय़ाच बायकांचा उपवास होता. आमच्या ‘सत्यवानांनी’ सकाळीच श्रीनगरचे मार्केट धुंडाळून आपल्या सावित्रीची उपवासाची सोय म्हणून तीन डझन केळी आणली होती. बोर्डिग झाल्यावर वेटिंगरूममध्ये केळय़ांचा फलाहार करायचा, असे ठरले होते. तपासणीसाठी स्त्री आणि पुरुषांची वेगळी रांग होती. आमच्या मोठय़ा बॅगा पुरुषांच्या ताब्यात होत्या. त्यामुळे तपासणीतून स्त्रियांची लवकर सुटका झाली. आम्ही सर्व जणी वेटिंगरूममध्ये जाऊन बसलो. केळय़ांची पिशवी सावंतकडेच होती. त्याची तपासणी सुरू असताना तिथल्या तपासनीसाने केळी विमानामध्ये नेता येणार नाहीत असे सांगितले. ज्यांच्यासाठी ही केळी, आणलेली होती, ते महिलामंडळ वरती वेटिंगरूममध्ये, ते आता खाली येऊ शकत नव्हते. केळी वरती नेता येत नव्हती. मग तीन डझन केळय़ांचं करायचं काय? सगळय़ांनी मिळून शुद्ध हिंदी बोलण्याचा प्रयत्न करून तपासनीसाला समजावण्याची शिकस्त केली, ‘बाबा रे, आज वटपौर्णिमा है। हमारे महाराष्ट्र में सुवासिनी औरतें अपने हजबंड के लिए ये उपवास रखती है। ये सब केले हमारे लिए उपवास करने वाली हमारे औरतों के लिए है! लेकिन, ये केले यही पे खा के खतम करने वाले है! प्लेन में बिलकुल नही ले के जानेवाले..’
परंतु, तो कर्तव्यदक्ष, काश्मिरी तरुण तपासनीस काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. सारखे समोरच्या भल्या मोठय़ा डस्टबिनकडे बोट दाखवून ‘फेक दो’ म्हणत होता.
सावंतच्या संतापाचा पारा चढू नये याची काळजी त्याचे सहकारी घेतच होते. पण, ही एवढी केळी टाकायची हिम्मत होत नव्हती. शेवटी सगळी पुरुषमंडळी एका बाजूला गेली आणि एकामागून एक केळी फस्त करायला सुरुवात केली.. लढाई सुरू होती.. आठ पुरुष आणि तीन डझन मोठमोठी केळी..! विमानतळावरचे लोक कुतूहलाने हा कार्यक्रम पाहत होते. पण, आमच्या या कोकणी शूर वीरांनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून ‘केळी संपविण्याचा’ कार्यक्रम सुरूच ठेवला. पोटाला तिडीक लागेपर्यंत प्रत्येकाने केळी खाल्ल्यावरही सहा-सात केळी उरलीच. ती संपविण्याची ताकद आता कोणामध्येही नव्हती. त्यामुळे उरलेली केळी कचराकुंडीत टाकण्याशिवाय पर्यायच नव्हता. अशा प्रकारे केळय़ांची विल्हेवाट लावल्यानंतरच त्या तपासनीसाने आमच्या पुरुषमंडळींना वेटिंगरूमची पायरी चढायला दिली.
खूप वेळाने ही पुरुषमंडळी वेटिंगरूममध्ये आली, ती आपापल्या टम्म झालेल्या पोटावरून हात फिरवीतच. आम्ही बायका नवऱ्याची आतुरतेने वाट पाहत होतो, कारण त्यांच्याकडे केळी होती. नवरेमंडळींना पाहताच आम्हा सगळय़ा जणींना आनंद झाला. पण, हा आनंद फार काळ टिकलाच नाही. ‘हाश्श-हुश्श करीत नवरेमंडळी वेटिंगरूमच्या आसनांवर आसनस्थ झाली आणि खाली घडलेला सर्व प्रकार कथन केला. नवऱ्याची अवस्था पाहून खूपच कीव येत होती आणि हसूही आवरत नव्हते. आमची वटपौर्णिमा ‘कडकडीत’ झाली आणि सत्यवान मात्र केळी खाऊन तृप्त झाले.
नियोजित वेळी विमानात प्रवेश आणि विमानाचे उड्डाण झाले. परतीच्या प्रवासात आम्ही सराईतपणे वावरलो. पायलटच्या सूचना, हवाईसुंदऱ्यांची लगबग याचा पुन्हा एकदा आनंद मिळाला. पुन्हा ढगांतला प्रवास करून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही पाय टेकले, त्या वेळी घरात पोहोचल्याचा आनंद सर्वाच्या चेहऱ्यावर झळकत होता. मुंबई-रत्नागिरी हा आणखी आठ-दहा तासांचा प्रवास करून आम्ही सर्व जण सुखरूप घरी पोहोचलो.
संपूर्ण सहल धम्माल-मज्जा करीत, अचानक उद्भवलेल्या प्रसंगांचीही गंमत-आनंद घेत अतिशय अविस्मरणीय झाली.