रौनक बागची – response.lokprabha@expressindia.com

भारताप्रमाणेच नेपाळमध्येदेखील कोविड १९ च्या संसर्गाचं प्रमाण वेगाने वाढत असल्यामुळे या देशाने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या महिन्यात नेपाळमध्ये दिवसाला १०० लोक करोनाबाधित होत होते, तर आता नेपाळमध्ये दिवसाला दर एक लाख व्यक्तींमागे २० लोक करोनाबाधित होत आहेत.

आरोग्यव्यवस्थेवर ताण

करोना विषाणूच्या या वाढत्या प्रसारामुळे नेपाळलाही भारताप्रमाणेच अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारताप्रमाणेच नेपाळच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

गेल्या म्हणजे २०२० च्या नेपाळ सरकारच्या कोविड १९ रिस्पॉन्स प्लाननुसार नेपाळमधल्या एकूण तीन कोटी लोकसंख्येमागे एक हजार ५९५ अतिदक्षता बेड तर ४८० व्हेंटिलेटर्स आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार नेपाळमध्ये दर एक लाख लोकांमागे ०.७ डॉक्टर आहेत. तर भारतात हीच आकडेवारी दर एक लाख लोकांमागे ०.९ डॉक्टर्स अशी आहे. नेपाळमध्ये दीर्घ सुटीवर असलेल्या आरोग्यसेवकांना परत कामावर बोलावलं जात आहे. नेपाळ लष्कराने तर त्यांच्या निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बोलावलं जाईल तेव्हा तयार राहायला सांगितलं आहे.

नेपाळ आरोग्य मंत्रालयाने गेल्याच आठवडय़ात दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की करोनाबाधितांची संख्या आरोग्य व्यवस्थेच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे लोकांना रुग्णालयाची सेवा तसंच सुविधा पुरवणं कठीण झालं आहे.

नेपाळमध्ये लसीकरणाचा दरही अतिशय कमी आहे. गेल्या महिन्याच्या अखेपर्यंत तिथे ७.२ टक्के लोकांना पहिली लस मिळाली होती.

सामूहिक कार्यक्रम

लग्न, सण-समारंभ, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय सभा या सगळ्यामुळे नेपाळमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत लोकांची उदासीनता आणि सरकारचं दुर्लक्ष या गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या आहेत.

एप्रिल महिन्यात पंतप्रधान के. पी. ओली यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना एक घरगुती उपाय सांगितला. त्यांच्या मते पेरूची पानं घालून ठेवलेल्या पाण्याने गुळण्या केल्या तर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होऊ शकते. नेपाळी लोक भरपूर मसाले खातात त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती खूप चांगली असते असंही त्यांनी याआधी सांगितलं होतं.

लोकांनी दरम्यानच्या काळात खूप गर्दी असलेल्या मोठमोठय़ा धार्मिक समारंभांनाही हजेरी लावली. काही जण भारतात झालेल्या कुंभमेळ्यातही जाऊन आले. नेपाळचे माजी राजे ग्यानेंद्र शाह आणि राणी कोमल शाह यांचाही अशा लोकांमध्ये समावेश होता. नेपाळमध्ये परतल्यानंतर करोनाबाधित झाल्यामुळे या दोघांनाही रुग्णालयात दाखल करावं लागलं. काठमांडूच्या नॉर्विक इंटरनॅशनल हॉस्पिटलने त्यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं होतं.

याच दरम्यानच्या काळात पहान चर्हे हा उत्सव साजरा करण्यासाठी काठमांडूत हजारोंच्या संख्येने लोक गोळा झाले होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सरकारी यंत्रणेचा विरोध असतानाही अनेकांनी भक्तपूर इथं बिस्केट जत्रेला मोठय़ा संख्येने हजेरी लावली.

एप्रिल २४ रोजी देशात २४०० पेक्षाही जास्त नवे करोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले. २०१५ च्या भूकंपात जमीनदोस्त झालेल्या धराहर या वास्तूच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान ओली यांना स्थानिक माध्यमांनी त्याबद्दल प्रश्न विचारले. रोज ४८०० हून जास्त करोनाबाधित रुग्ण निघू लागल्यानंतर सरकारने राजधानीत दोन आठवडय़ांची टाळेबंदी लावली. दुसऱ्याच दिवशी आरोग्य खात्याने सांगितलं की, ते या संकटापुढे हतबल झाले आहेत.

नेपाळमधल्या या परिस्थितीसाठी काही जणांनी भारताला दोष दिला आहे. त्यांच्या मते नवी दिल्लीतील दुसरी लाट नेपाळमध्येही पसरली आहे आणि ही परिस्थिती उद्भवली आहे. नेपाळ आणि भारत यांच्यामधील सीमा खुल्या आहेत. नेपाळमधील लोकांना सीमा पार करून भारतात येण्यासाठी पारपत्र किंवा तत्सम ओळखपत्र लागत नाही. अनेक नेपाळी लोकांचे भारतात तर भारतीयांचे नेपाळमध्ये व्यवसाय आहेत.

खबरदारी आणि भवितव्य

गेल्या गुरुवारी (६ मे) नेपाळमधील सरकारी यंत्रणेने काठमांडूमध्ये दोन आठवडय़ांची टाळेबंदी जारी केली. पण त्याआधी अनेक स्थलांतरित मजूर आपापल्या घरी परतले. ६ मे पासून अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान ओली यांनी सांगितलं की ७७ पैकी ४६ जिल्ह्य़ांमध्ये सामूहिक वावरावर बंदी घालण्यात आली आहे.

वैद्यकीय ऑक्सिजनची गरज तिपटीने वाढल्यामुळे गेल्या आठवडय़ात नेपाळ सरकारने परदेशातून २० हजार ऑक्सिजन सिलेंडर मागवले आहेत. आरोग्य खात्याचे प्रवक्ते डॉ. जागेश्वर गौतम यांनी सांगितलं की भारतातून घरी परतणाऱ्या नेपाळी मजुरांना आरोग्य सुविधा देण्यासाठी नेपाळी लष्कराने सीमेवरील आपली सेवा विस्तारली आहे.

सुदूरपश्चिमा भागात जिथं ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा आहे असं आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात होतं, तिथं दोन हजार बेडच्या सुविधेबरोबरच २०० बेड्सचं विलगीकरण केंद्र उभं केलं जात आहे.

याच महिन्यात काठमांडूमध्ये रातो मच्छिंद्रनाथ उत्सव आहे. या उत्सवाच्या आयोजकांनी आम्ही सामाजिक अंतर पाळून हा उत्सव साजरा करू, मुखपट्टी सक्तीची करू, योग्य ती काळजी घेऊ असं सांगितलं असलं तरी अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नजिकच्या काळात येऊ घातलेल्या आणखी काही उत्सवांचं नेपाळसमोर आव्हान आहे असं तिथल्या माध्यमांचं म्हणणं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’मधून