विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab
ओमायक्रॉन काही फारसा जीवघेणा नाही, असे म्हणून बेफिकिरी वाढली तर नंतर तीच जिवावर बेतू शकते. त्यामुळे करोनाच्या विषाणूचे आजवरचे वर्तन आपण ध्यानात घ्यायला हवे. हा विषाणू अतिशय वेगात उत्परिवर्तित होतो. जीवघेणा नाही असे म्हणून बेफिकीर राहिलो आणि पुन्हा उत्परिवर्तित झाला तर नंतर सारे काही नियंत्रणाबाहेर गेलेले असेल. यापुढे कोणताही हलगर्जीपणा ना सरकारला परवडणार, ना नागरिकांना!

एक महत्त्वाची बाब नागरिकांनीही ध्यानात घ्यायला हवी ती म्हणजे करोनासंदर्भातील तीन नियम हे आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातात आहेत. हात धुणे, अंतरभान आणि मुखपट्टी. आजवर जगात कुठेही असे सिद्ध झालेले नाही की, हा विषाणू मुखपट्टी भेदून तुमच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे करोनाविरोधातील लढय़ामध्ये मुखपट्टी हे आपले प्रमुख अस्त्र आहे!

सरकारसाठीही आता वेळ येऊन ठेपली आहे ती वर्धक मात्रेसंदर्भातील निर्णय तातडीने घेण्याची. कारण ‘लॅन्सेट’मधील संशोधनही असे सांगते की, दुसऱ्या मात्रेस तीन महिने झाल्यानंतर तिचा प्रभाव ओसरत जातो. याचाच अर्थ ओमायक्रॉनशी लढा देण्यासाठी वर्धक मात्रा गरजेची आहे. तशी सूचना बुधवारीच जागतिक आरोग्य संघटनेनेही केली आहे. गेल्या दोन्ही लाटांचा अनुभव पाहता आपल्याला सर्वप्रथम करोनायोद्धा असणाऱ्या वैद्यकीय सेवेकरींना प्रथम ही मात्रा देऊन त्यांच्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे लागेल. कारण काही विपरीत घडले तर त्याचा सामना करण्यासाठी ही पहिली वैद्यकीय फळी सक्षम असणे गरजेचे आहे. शिवाय सहव्याधी असलेल्यांनाही त्यानंतरच्या टप्प्यात वर्धक मात्रा द्यावी लागेल. शाळा सुरू झाल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाबाबतही निर्णय घ्यावा लागेल. अद्याप दुसरी मात्र न घेतलेल्यांची संख्याही कोटीच्या घरात आहे, त्यांना शोधून त्यांच्या लसीकरणाचेही आव्हान आहेच. ओमायक्रॉन आलेला असला तरी डेल्टा हा त्याचा जीवघेणा पूर्वावतार अद्याप गेलेला नाही, हेही ध्यानात घ्यावे लागेल. त्यामुळे सध्या तरी नियमन कठोर करतानाच वर्धकसज्जतेच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेण्याशिवाय दुसरा ठोस पर्याय समोर नााही!

vinayak parab