वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

ऋषी कपूर लहानाचे मोठे झाले ते रुपेरी पडद्यावरच, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. ‘श्री ४२०’ मध्ये कोसळत्या पावसात भिजणारी नर्गिस ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यात ‘हम ना रहेंगे, तुम ना रहेंगे, फिर भी रहेंगी निशानियाँ’ असं गात रस्त्यावरून चाललेल्या तीन मुलांकडे बोट दाखवते तेव्हा त्यातले एक होते अवघे तीन वर्षांचे ऋषी कपूर.

‘मेरा नाम जोकर’मध्ये आपल्या आवडत्या मेरी टीचरला अनावृत बघितल्यानंतर आपण पाप केले आहे, या भावनेने चर्चमध्ये त्या पापाची कबुली द्यायला आलेल्या १६ वर्षांच्या राजूला मेरी टीचर हटकते. तिलाही तो आपण पाप केलं आहे असं सांगतो, तेव्हा ती म्हणते, बच्चे पाप नहीं करते. राजू उत्तरतो, मै बच्चा नहीं हूँ.

‘बॉबी’मध्ये केस विस्कटलेली, डोळे विस्फारलेली, चेहऱ्यावर पीठ लागलेली १६ वर्षांची बॉबी बघून तो विचारतो, मुझसे दोस्ती करोगी? आणि ही दोस्ती झाल्यावर ‘हम तुम एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाय’ असा खटय़ाळ प्रश्न विचारायलाही कमी करत नाही.

अगदी बालपण, पौगंडावस्था आणि पहिलं प्रेम या तिन्ही अवस्था पडद्यावर साकारणाऱ्या ऋषी कपूर यांनी जवळपास १५०च्या आसपास सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यातल्या १९७३ पासून २००० पर्यंतच्या ५१ सिनेमांमध्ये तर ते मुख्य भूमिकेत होते. त्यातले ११ हिट झाले तर ४० फ्लॉप. पण ऋषी कपूर यांच्या अभिनयक्षमतेबद्दल कधी कुणी शंका घेतली नाही. देखणं रूप, संयत अभिनय, नृत्यकौशल्य आणि वाटय़ाला आलेली उत्तमोत्तम गाणी यांच्यामुळे ऋषी कपूर यांची कारकीर्द कधीच झाकोळली गेली नाही. अमिताभ बच्चन नावाचा झंझावात समोर उभा असताना आपल्या वाटय़ाला येतील त्या भूमिका चोख करून आपलं स्थान निर्माण करण्याचं काम अर्थातच सोपं नव्हतं. त्यात ऋषी कपूर यांच्या वाटय़ाला आलेल्या भूमिका महत्त्वाच्या असताना आणि त्यांनी त्या जीव लावून केलेल्या असतानाही त्या त्या सिनेमांमध्ये दर वेळी कुणी तरी दुसरा स्टार अभिनेता किंवा अभिनेत्री जास्त भाव खाऊन गेले आहेत, असंही झालं आहे. पण त्यामुळे नाउमेद न होता हा अभिनेता आपलं काम चोख करत राहिला.

‘खेल खेल में’, ‘लैला मजनू’, ‘कभी कभी’, ‘हम किसीसे कम नहीं’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘सरगम’, ‘कर्ज’, ‘नसीब’, ‘प्रेमरोग’, ‘सागर’, ‘चाँदनी’, ‘हीना’, ‘दामिनी’, ‘याराना’.. त्यांचे असे किती तरी सिनेमे सांगता येतात. ‘मुल्क’, ‘१०२ नॉट आऊट’, ‘राजमा चावल’, ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘चश्मेबद्दूर’ (नवा), ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’, ‘हाऊसफुल’, ‘अग्निपथ’ (नवा), ‘लव्ह आज कल’, ‘देहल्ली ६’ अशा सिनेमांमधली त्यांची सेकंड इनिंग त्यांच्या खऱ्याखुऱ्या चाहत्यांना अधिक भावणारी ठरली. कारण या काळात अभिनयाला अधिकाधिक वाव देणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका त्यांना करायला मिळाल्या.

आपली वेगवेगळ्या विषयांवरची मतं सातत्याने ट्विटरवर मांडून त्यांनी आपलं ट्विटर आकाऊंट नेहमीच चालतंबोलतं ठेवलं. कधी कधी तर वादही निर्माण के ले. एका ट्वीटमध्ये ते म्हणतात, मी प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि प्रसिद्ध मुलाचा बाप या दोन्ही टोकांच्या मध्ये हिंदकळतो आहे. अर्थात ही गोष्ट अर्धसत्य होती, हे सगळ्यांनाच माहीत आहे. ऋषी कपूर यांनी लिहावंसं वाटलं म्हणून आत्मचरित्रही लिहिलं. त्याचं नाव आहे, ‘खुल्लम् खुल्ला ऋषी कपूर’.

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून रुपेरी पडद्यावर आलेल्या ऋषी कपूर यांनी ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमात त्यांनी १०२ वर्षांच्या वडिलांना वैतागलेल्या ७६ वर्षांच्या मुलाचीही भूमिका साकारली. आयुष्याचे सगळे रंग पडद्यावर साकारणाऱ्या या अभिनेत्याला आदरांजली.