एवढय़ात बऱ्याच वेळापासून अपेक्षित असलेला माझा पज्र्या माझ्या भेटीला आला. हा एकुलता एक असा मित्र आहे जो कधीही कबाबमध्ये हड्डी वाटत नाही, कोणालाच नाही. उलट आपल्याला हवी तशी वातावरणनिर्मिती करण्यात तो बराच हातभार लावतो.

मी मरिन ड्राइव्हला गेलो होतो. तिथं मी एकटय़ाने जात नाहीत, हे वेगळं सांगायला नकोच. खारा वारा तोंडावर आदळत होता. बाजूला केस भुरुभुरु उडत होते. कट्टय़ावर त्यातल्या त्यात सुकलेली जागा कुठे मिळते का, हे बघत आम्ही निघालो होतो. पज्र्या नुकताच येऊन गेला होता. एक बऱ्यापैकी सुकी जागा आम्हाला मिळाली. तिथे बसताक्षणी अंगात हुडहुडी भरली. बर्फाच्या लादीवर बसवलंय असं वाटायला लागलं. कट्टा भलताच गार पडला होता. आमच्या आधी तिथे बसलेल्या युगुलाचं तिथे फार काळ वास्तव्य झालं नसणार.. ते फार काळ का नव्हतं तेसुद्धा जाणवलं. पण आम्ही चिकाटीने बसून राहिलो. भरतीची वेळ होती. खडकांवर लाटा आदळताना पाहायला मजा वाटते. तिथल्या खेकडय़ांची आणि तिथे गेलोच तर सरकण्याची भीती नसती तर ती मजा आणखी जवळून घेण्याचा प्रयत्न केला असता. पण तूर्तास तरी मी कट्टय़ावरच बरा होतो. आजूबाजूला नजर फिरवली. लोकांच्या फोटोग्राफीला ऊत आला होता. खारा वारा भन्नाट सुटला होता. आम्ही थरथर कापत होतो. दात वाजत होते. त्यात फोटोसारख्या चाळ्यांसाठी धीर एकटवणं म्हणजे.. त्यापेक्षा राहू देत. इथे वेगळीच संधी चालून येत होती. थंडी जसजशी वाढत होती तशी डाव्या बाजूने माझ्याजवळ, उजवीकडे जवळीक वाढत होती (आधीचं वाक्य चुकलंच. संधी ‘सरकत’ येत होती.) आता हाताचा विळखा घालू, की नको? चालेल का? रुचेल का? आवडेल का? मी गोंधळात पडलो होतो. धीर होत नव्हता. एरव्ही येता-जाता कारण नसताना एकमेकांच्या गळ्यात गळे घालून कित्येकदा हिंडलो होतो. मैत्रीत इतकं चालतं आता. पण आज होणाऱ्या प्रत्येक स्पर्शामागची भावना वेगळी असणार होती.
‘ऐक ना रे..’
‘हं?’
‘मला थंडी वाजत्येय.’
एवढा क्लिअरकट्ट सिग्नल मिळाल्यावर मी कसला सोडतोय? घातला विळखा. आणि तत्क्षणी अंगावर काटा आला.
‘काय झालं?’
‘कुठे काय?’
‘तुझी हार्ट बीट का वाढले एवढे?’
‘म्हणजे? तुला जाणवले?’ या विचाराने माझे हार्टबीट अजूनच वाढले.
‘हो म्हणजे काय!’ माझ्या छातीवर एक मऊ पंजा हलकेच येऊन बसला. धडधड अजूनच वाढली. मी क्षणभर डोळे मिटून घेतले. ‘काय होतंय तुला?’
‘कुठं काय, काहीच नाही.’
‘मग एवढे फास्ट का हार्टबीट?’
‘थंडीत.. होतं.. कधी कधी.’
पंजा दूर गेला. चेहरा खाली झुकला. गालावर हलकीच एक खळी उमललेली दिसली. कळलं असावं. आवडलंही असावं.. खरंच? डोकं अलगद माझ्या खांद्याला येऊन भिडलं. माझं हृदय आता फुलून बाहेर येतं की काय, असं मला वाटायला लागलं. मला स्वस्थ बसवेना. मी इकडे-तिकडे पाहायला लागलो. आजुबाजूला पाहण्यासारखी बरीच चलचित्रं मला दिसायला लागली. एक पावचड्डीतलं चित्र तर माझ्या इतकं नजरेत भरलं की मी टक लावून बघतच बसलो. शेजारी बाह्य नसलेल्या टॉपात आणि घट्ट जीन्सेत बसलेल्या माझ्या आवडत्या चित्राचा मला थोडय़ा वेळासाठी विसरच पडला.
‘अरे काखेत आयटम असताना माझ्याकडे कशाला बघतोस?’
एकदम दणकाच बसला. मी झटकन नजर वळवली.
‘कोण रे? काय झालं?’
‘काही नाही, तू झोप.’
‘ती मुलगी म्हणाली ना काहीतरी? ए ती आपल्याकडेच बघत्येय’
‘मला चेकआऊट करत असेल.’
‘प्लीज.. रागाने बघत्येय ती. तिने तुलाच झापला ना आत्ता?’
‘छे गं. मला कशाला झापेल?’
‘खरं सांग. तू तिच्याकडे बघत होतास ना?’ प्रश्नात जाब विचारण्याऐवजी मिश्कील भाव जास्त होते.
‘हो..’ मी ओशाळून म्हटलं.
थोडा वेळ मला घोडय़ाच्या खिंकाळीहून वाईट आणि किचाट हास्य, तेही माझ्या अगदी कानापाशी, ऐकत राहावं लागलं.
‘तू कधीच सुधारणार नाहीस.’
‘त्यात बिघडलं काय? सौंदर्य हे न्याहाळण्यासाठीच असतं. आता न्याहाळता न्याहाळता तंद्री लागली माझी आणि कळलं तिला.’
‘ओऽऽऽ अस्संय का..’
‘तू नाही न्याहाळत मुलांना.. आणि मग गुणगान गात बसतेस, किती क्यूट आहे आणि हँडसम आहे वगैरे.’
‘मी फक्त लूक्स बघते. तुझ्यासारखं नाही’
‘मग मी ओव्हरॉल लुक्स बघतो. त्यात काय चुकलं?’
‘बरं..’
‘..’
‘मला भूक लागलीये.’

आम्ही मक्याची गरमागरम कणसं खात उभे होतो. मस्त मूड होता (त्यात दोघांचे पैसे मी दिले होते.) एवढय़ात बऱ्याच वेळापासून अपेक्षित असलेला माझा पज्र्या माझ्या भेटीला आला. हा एकुलता एक असा मित्र आहे जो कधीही कबाबमध्ये हड्डी वाटत नाही, कोणालाच नाही. उलट आपल्याला हवी तशी वातावरणनिर्मिती करण्यात तो बराच हातभार लावतो. तसा त्याने यावेळीही लावला. माझंच थोडंसं कणीस अजून शिल्लक होतं. ते होईपर्यंत मी पज्र्याकडे पाठ वळवून उभा होतो. पज्र्याला सगळ्यावरच ताव मारायचा असतो. भूक अनावर झाली तर वेळेच्या आधी येऊनच सगळ्या पिकांचा फडशा पाडतो. आंबा तर त्याचा फेव्हरेट!! तो आता माझं कणीस सोडणार होय? मी तर इकडे खास पज्र्याला भेटण्यासाठीच आलो होतो. तसा तो मला कुठेही भेटायला आला असता, पण मुंबईत असताना पज्र्याला भेटावं तर मरिन ड्राइव्हवरच. तशी दुसरी जागा नाही.
‘खा पटापट.. ओ शीट.. छत्री काढ लवकर!!’
‘मी नाही आणली..’
‘अरे, माझी छत्री काढ, तुझ्याच बॅगेत ठेवली होतीस ना मघाशी.’
‘काढ ना तूच मागच्या कप्प्यात आहे’
मला छत्री नको होती. मला भिजायचं होतं, भिजवायचं होतं. पण शेवटी ती छत्री बाहेर आलीच. ती उघडली गेली. दोन मिनिटांत उलटी झाली. बरं झालं. ती सुलटी करेपर्यंत आम्ही चिंब भिजून गेलो होतो. पज्र्या तुफान बरसत होता. आपल्या लाडक्या मित्राला सुखानुभव घेताना पाहून तो चेकाळला होता. आम्ही तिथे खास बसण्यासाठी बांधलेल्या एका ठिकाणी गेलो. तिथे सगळीच जोडपी दाटीवाटीने जमलेली होती. आम्ही बऱ्याच छत्र्या उलटय़ापालटय़ा होताना पाहिल्या आणि आमच्यावर हसणाऱ्यांवर मनसोक्त हसूनही घेतलं. आता दात जरा जास्तच वाजत होते. मी पज्र्या ज्या दिशेने येत होता तिथे पाठ करून उभा राहिलो.
‘तू अख्खा भिजतोयस.’

डोळ्यांत डोळे घालून एकटक फिल्मी स्टाइलमध्ये बघत राहावं असं मला सारखं वाटत होतं, पण ते काही जमलं नाही. मला हवी तशी दाद मिळत नव्हती.

‘हो.. मला मजा येत्येय. पाठीवर जोरजोरात आपटतायत थेंब. तुला नाही भिजायचं?’
‘भिजलेय तेवढं पुरेसं आहे.’
‘मी उंच आहे. मी झाकतो तुला. अशी उभी राहा.’
आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ उभे होतो. वर छत्री धरलेली. लांबून पाहणाऱ्या कोणालाही आम्ही तिथे उभे राहून नको ते चाळे करतोय असंच वाटलं असतं. मनातही तेच होतं म्हणा, निदान माझ्या तरी. आम्हा दोघांच्याही मध्ये आमची दप्तरं आम्ही पुढे घेतलेली होती. काही करायचं म्हटलं, तर थोडं पुढे सरसावं लागणार होतं आणि तसा मी सरसावलो तर ते अगदीच स्वाभाविक झालं असतं. समोरून आत्ता तरी तसा काहीच सिग्नल मिळत नव्हता. फक्त मी हसून दाखवल्यावर मला एक दीन हास्य मिळत होतं. कदाचित सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे.. असो. मी तो विचार सोडून दिला. पण बाकी मी भलताच खुशीत होतो. मला भिजायला मिळत होतं, तेही माझ्या आवडत्या ठिकाणी, तेही माझ्या सर्वात लाडक्या चलचित्राबरोबर.. सगळं जग तिथेच थांबायला हवं होतं, फक्त आमच्या मनातली चलबिचल आणि पज्र्या सुरू राहायला हवे होते.
पज्र्याचं अक्षरश: तांडव सुरू होतं. जमिनीवर पडणारे टपोरे थेंब त्याच्या मिश्कील आणि खदाखदा हसण्याचा आवाज करत होते. पज्र्या कोसळत होता, तोवर आम्ही तस्सेच उभे होतो. इकडे तिकडे बघत, सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे जवळच उभे असूनही एकमेकांशी मोठमोठय़ाने बोलत. डोळ्यांत डोळे घालून एकटक फिल्मी स्टाइलमध्ये बघत राहावं असं सारखं वाटत होतं, पण ते काही जमलं नाही. मी जरा जास्त वेळ नजर भिडवली की लगेच चेहरा इकडे-तिकडे फिरायचा, विषय वेगळा निघायचा. हवी तशी दाद मिळत नव्हती.
एका अर्थी म्हटलं तर एवढय़ा सगळ्या वेळात काहीच झालं नाही. एका अर्थी म्हटलं तर बरंच काही झालं. नेमके कोणकोणते संकेत मला दिले गेले आणि त्यातल्या किती आणि कोणत्या संकेतांचा मी मनातल्या मनात बरोबर अर्थ लावत होतो, ते मला कळलं नाही. म्हणूनच मी कुठलंही ठोस पाऊल उचललं नाही. सगळं म्हटलं तर तसं वरवरचंच. पण एकंदरीत तो अनुभव जबरदस्त होता.
थोडय़ा वेळाने पज्र्या कंटाळून निघून गेला. जाताना ‘अरे मी चांगली तुझी सेटिंग लावायला आलो होतो, आणि तू शेपूट घालून गप्प काय बसलास? काही करायचं, करवलं नाही तर निदान बोलायचं. बोलवलं नाही तर निदान इशारे तरी द्यायचे. डोळ्यांचे खेळ खेळायचे, काहीच कसं केलं नाहीस तू?’ असाच त्याचा सूर होता. खरंच, मी इतका कसा फट्टू निघालो?
‘आज बऱ्याच दिवसांनी इतकी मजा आली पावसात भिजताना’ या उत्स्फूर्त प्रतिक्रियेने मी थोडा सुखावलो.
‘हो ना? मलासुद्धा!! आपण पुन्हा पुन्हा यायला हवं इथे.’
‘ओ महाशय, आजारी पडायचंय का? चला आता..’
‘काय गं तू थांब ना..’
‘इथे येऊन जे जाणवायचं होतं ते जाणवलंय मला, आता पुन्हा पुन्हा कशाला यायचं? मजा जाईल या जागेची.’
‘अगं हा मरिन ड्राइव्ह आहे. अशी कशी मजा जाईल? आणि काय जाणवलंय?’
माझ्या सावळ्या डाव्या हाताभोवती फेअर आणि लव्हली उजव्या हाताचा विळखा पडला.
‘आपण पुढच्या वर्षी येऊ आता, याच दिवशी. आजच्या दिवसाची आठवण ताजी करायला.’
‘ही तारीख लक्षात राहील तुझ्या?’
‘मुलींची मेमरी शार्प असते. आणि त्यात रिलेशनशिपची अ‍ॅनिव्हर्सरी डेट तर त्या कधीच विसरू शकत नाहीत.’
तिने माझ्याकडे बघून डोळा मिचकावला. माझी टय़ूब पेटायला थोडा वेळ लागला. पेटली, तेव्हा मी काय केलं, हे इथे नमूद न केलेलंच बरं. पण त्या क्षणाची साक्ष देण्यासाठी मघाशी माझ्यावर रुसून बसलेला पज्र्या आता पुन्हा माझ्या भेटीला आला होता आणि आम्ही दोघंही आजारी पडेपर्यंत त्याच्याबरोबर धिंगाणा घालत राहिलो.