चटण्या-कोशिंबिरींपाठोपाठ ताटात मान असतो तळणाला. आवडीने खाणाऱ्यांच्या जिभेवर मात्र तळणाला पहिला मान. ताटात तळण वाढल्याबरोबर उचलून पटकन तोंडात टाकलं गेलं नाही असं होतंच नाही. मग ते पापड असोत, कुरडया असोत की भज्यांसारखं काही. त्यांचा कुरकुरीतपणा, चटपटीतपणा, जिभेवर ठेवल्यावर विरघळल्यासारखं मऊ पडत जाणं, ते खाताना होणारा कुर्रम् कुर्रम हा आवाज हे सगळं इतकं हवंहवंसं असतं की विचारू नका. असं असलं तरी ते तोंडी लावणं आहे. त्यामुळे तोंडी लावणं म्हणूनच खायला हवं. अर्थात ही मर्यादा घालण्याचं काम आजकालच्या तेल, साखर, मीठ प्रमाणात खा या आरोग्यसल्ल्याने केलेलं आहेच. तरीही तळणाचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही, हेही तितकंच खरं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठेही मिळणारा, सहसा सगळ्यांना आवडणारा पापड म्हणजे उडदाचा. त्यात आणखी वैविध्य हवं असेल तर उडदाचा लसूण पापड, लसूण मिरची पापड किंवा लाल तिखट घालून केलेला पापड, हे काहीही नसलेला उडदाचा साधा पापड तळून समोर आला की त्याचा तुकडा मोडावा असं वाटल्याशिवाय राहातच नाही. पूर्वी घरोघरी केले जाणारे हे पापड विकत आणून खायची सवय लावली ती लिज्जतनं. त्या सवयीमुळे कित्येक भगिनींना घरबसल्या चांगला रोजगारही त्या काळात मिळाला. आता इतरही अनेक ब्रॅण्डचे उडदाचे पापड मिळायला लागले आहेत. नोकरी करणाऱ्यांच्या घरात पापड केले जाणं शक्यच नसतं. पण त्यातल्या आज चाळिशी पार केलेल्यांच्या अनेकांच्या आठवणीत लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आपण कसे पापड लाटले, लाटय़ा कशा खाल्ल्या याच्या आठवणी असणार. पापड लाटल्यानंतर ते वाळवण्याऐवजी तळलेल्या ओल्या पापडांची चवही जिभेवर रेंगाळत असणार. उडदाच्या पापडांइतकेच चवीने खाल्ले जाणारे पापड पोह्य़ांचे. हे पापड उडदासारखे भाजूनसुद्धा खाल्ले जातात, पण ते तळूनच जास्त चांगले लागतात. त्यांचा किंचित ठसका तोंडाला मस्त चव आणतो. पोह्य़ाच्या पापडांचेच भाऊबंद म्हणजे जिभेला तरतरी आणणारी खमंग मिरगुंडं. ती पण अर्थातच तळावी लागतात. हल्ली मायक्रोवेव्हमुळे नुसता तेलाचा हात लावून बेक करता येतात, पण तळल्याची चव काही या बेकिंगला येत नाही, हेही तितकंच खरं. हे पापड जेवणात तोंडी लावणं म्हणून खा, दहीभाताबरोबर खा, तळलेल्या आख्ख्या पापडावर कांदा, टॉमटो, कोिथबीर, लाल तिखट पसरून मसाला पापड म्हणून खा किंवा अगदी पोह्य-उप्पीटाबरोबर खा, ते खाण्यात मजा आणतात.

मराठीतील सर्व पोटपूजा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Papad kurdai
First published on: 04-03-2016 at 01:05 IST