आपण जे काही करू, जे काही खाऊ त्यातला पहिला भाग आधी अत्यंत भक्तिभावाने देवाला अर्पण करायचा, ही सर्वसामान्य भावना असते. देव येऊन त्यातलं काहीच खाणार नाही, नंतर आपणच ते संपवायचं आहे, हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण वास्तवापेक्षा कधीकधी श्रद्धा जास्त मोठी ठरते. आणि देवाला दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून सगळ्यांच्या हातात पडतो. भक्ताच्या भावनेनुसार नैवेद्यात वैविध्य येत जातं. घरच्या सगळ्यांचं पोट भरून उरलेलं वाटीभर दूध भक्तिभावाने शंकराला वाहणाऱ्या श्रावणातल्या सोमवारी सांगितल्या जाणाऱ्या म्हाताऱ्या आजीच्या कथेतल्या दुधापासून ते देवाला चढवल्या जाणाऱ्या ‘भोग’पर्यंत नैवेद्यात काहीही असू शकतं.

संस्कृतीच्या एका विकसित टप्प्यावर आल्यावर नैवेद्याला काय आहे, यापेक्षा त्यातला भक्तिभाव महत्त्वाचा, अशी धारणा दृढ होत गेली. पण सहज जाता जाता एक संदर्भ द्यायला हरकत नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांचं ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हे मानव टोळी अवस्थेत जगत होता, तेव्हापासून विवाहसंस्था आजच्या टप्प्यावर येऊन पोहोचण्याच्या काळात कोणकोणती स्थित्यंतरं झालेली असू शकतात, याची मांडणी या पुस्तकात आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की देव ही एक अत्यंत प्रबळ अशी जमात त्या काळात होती. या जमातीशी दोन हात करणं इतरांना शक्य नव्हतं. ही जमात येऊन लुटालूट करून असेल नसेल ते सगळं घेऊन जात असे. हे टाळण्यासाठी बाबांनो तुम्ही आम्हाला लुटू नको, पण आम्ही जे काही पिकवलं असेल त्यातला वाटा आम्ही तुम्हाला देतो, अशी पद्धत सुरू झाली. आपल्याकडे जे असेल त्यातला वाटा आधी या देवांना द्यायचा, या सवयीचा इतका पगडा बसला की नंतर त्या व्यवस्थेचं उदात्तीकरण देवांना नैवेद्य दाखवणं या प्रथेत झालं. अर्थात इतिहासाचार्य राजवाडे यांनी ही एक शक्यता मांडली आहे.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

आधी नैवेद्य म्हणून दाखवलेला पदार्थ नंतर प्रसाद होऊन आपल्या हातात येतो. या प्रसादाचं पहिलं रूप म्हणजे पंचामृत. दही, दूध, तूप, मध आणि साखर घालून केलेलं पंचामृत चवीला चांगलं लागतंच शिवाय पौष्टिकही असतं. त्यात केळं कुस्करून घालणं हा पंचामृताचा आणखी एक प्रकार. डाव्या हाताच्या पंज्यावर उजव्या हाताचा पंचा उलटा ठेवून मधल्या खळग्यामध्ये पंचामृत घेऊन ते पिऊन नंतर न चुकता तो हात भक्तिभावाने डोक्यावरून फिरवताना मंडळी दिसतात. काहीजणांकडे हे पंचामृत रोजच्या रोज नैवेद्य दाखवलं जातं, तर काहीजणांकडे सत्यनारायणाच्या पूजेला. साहजिकच पंचामृत घेतलं की पुन्हा हात पुढे होतो तो सत्यनारायणाच्या प्रसादाला. सगळे घटक सव्वाच्या पटीत घेऊन केलेला सत्यनारायणाचा शिरा कमालीचा चविष्ट लागतो. खरं तर सत्यनारायण अशी काही पारंपरिक देवता नाही. इतर देवांसारखं तिचं सांस्कृतिक उगमस्थान, त्यामागच्या शेकडो वर्षांची परंपरा सांगणाऱ्या व्युत्पत्तीकथा नाहीत. पण प्रसादाच्या शिऱ्यासाठी अनेकांचे हात सत्यनारायणाला आपोआप जोडले जातात.

नैवेद्याचं ताट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं, ते केळीचं हिरवंगार पान. त्यावर मधोमध पांढरीशुभ्र भाताची मूद. त्यावर पिवळंधमक वरण. डावीकडे खोबऱ्याची चटणी, एखादी कोशिंबिर, तळणाचा एखादा पदार्थ, सहसा शेवयांची किंवा गव्हल्यांची खीर, उजवीकडे पुन्हा पिवळी धमक बटाटय़ाची भाजी, वाटीत एखादं सार, एकावर एक रचलेल्या दोनचार पुऱ्या, त्या दिवसासाठी केलेला खास गोडाचा पदार्थ.. हिरव्यागार केळीच्या पानात हे सगळे पदार्थ इतकी सुंदर रंगसंगती साधतात की बघतच राहावं. हा सगळा नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर घरातल्या सगळ्यात लहानग्याला कौतुकाने ते ताट दिलं जातं आणि वर प्रसादाचं ताट आहे, त्यातलं काहीही टाकायचं नाही अशी तंबीही दिली जाते.

त्याशिवाय काही सणांनुसारचे नैवेद्य असतात. म्हणजे श्रावणात पुरणावरणाचा नैवेद्य झाल्याशिवाय गृहिणीला चैन पडत नाही. गणपतीत नैवेद्याला मोदक हवाच, मग तो उकडीचा असेल, तळलेला असेल किंवा दुकानात मिळणारा खव्याचा रेडीमेड असेल. पण तेच गौरीजेवणाचा नैवेद्य वेगळा. त्यात तर जातींनुसार वैविध्य आहे, प्रादेशिक वैविध्य आहे. काही जातींमध्ये गौरीला मटणाचा आणि दारूचा नैवेद्य असतो. आणि तिला काय नैवेद्य दाखवला आहे, तो गणपतीने बघू नये म्हणून त्या दिवसापुरता गौरीगणपतीमध्ये चक्क पडदा लावलेला असतो. गणपती विसर्जनाच्या वेळी त्याचा निरोप घेताना काही ठिकाणी दहीभाताचा नैवेद्य असतो.

गोकुळाष्टमीला केला जाणारा गोपाळकाला हा चविष्ट प्रकार म्हणजे कृष्णजन्माचा नैवेद्य दाखवून दिला जाणारा प्रसादच. तर रामजन्माचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या सुंठवडय़ाची चव नंतरही बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते.

हनुमान हा संसाराबिंसारापासून लांब असलेला ब्रह्मचारी देव. त्यामुळे त्याच्या जन्मावेळी फार सोपस्कार नसतात. टरबुजासारख्या फळाचा नैवेद्य त्याला सहज चालतो.

वेगवेगळ्या नैवेद्यांमध्ये चविष्ट आणि पुन:पुन्हा मागून खावासा वाटणारा नैवेद्य चैत्रगौरीचा. कैरीची डाळ आणि थंडगार पन्ह्य़ाचा. हरभऱ्याची डाळ भिजवून भरडसर वाटून तिच्यात किसलेली कैरी, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ किंचित चवीपुरती साखर घालून खमंग फोडणी दिली की झाली कैरीची डाळ तयार. कुणी तिला आंबेडाळही म्हणतं. ही आंबटतिखट डाळ आणि तिच्यासोबत किंचित आंबटगोड चवीचं पण मधुर आणि थंडगार पन्हं मिळतं म्हणून बच्चेकंपनी आईबरोबर कितीही घरांना भेटी द्यायला एका पायावर तयार असते.

प्रसाद म्हणून एरवी देवळांमध्ये एखादा साखरफुटाणा, खोबऱ्याचे काप, बत्तासा, चुरमुरे, साळीच्या लाह्य़ा, पेढय़ांचा चुरा असे प्रकार मिळतात. शिखांच्या गुरूद्वारात तर प्रसाद म्हणून लंगर म्हणजे अत्यंत उत्तम असं जेवणच असतं. बरेच ट्रेकर्स उत्तराखंडमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करायला जातात. तिथून पुढे समुद्रसपाटीपासून १५ हजार फूट उंचीवर हेमकुंड हे शिखांचं धर्मस्थळ आहे. सतत कमालीची थंडी असलेल्या हेमकुंडला गुरूद्वारामध्ये प्रसाद म्हणून खाता नव्हे तर पिता येईल अशी पातळ गरमगरम मुगाची खिचडी आणि अप्रतिम चहा मिळतो. त्या थंडीत हे दोन पदार्थ स्वर्गसुखाचीच जाणीव करून देतात. (समाप्त)

वैशाली चिटणीस response.lokprabha@expressindia.com