यशासाठी फक्त परिस्थिती अनुकूल असावी लागते की मनाच्या मातीची मशागतही नीट झालेली असावी लागते? शिवाजी महाराजांच्या बाबतीत परिस्थिती प्रतिकूल होती, पण मनाची मशागत चांगली झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थशास्त्रातील पहिले सूत्र, पृथ्वीचा लाभ व तिचे पालन यांचे शास्त्र सांगणारा हा ग्रंथ कौटिल्याने रचल्याची ग्वाही देते. त्यामुळे अर्थशास्त्र आणि पर्यायाने राजाचे प्रथम कर्तव्य म्हणजे पृथ्वीचा लाभ किंवा पृथ्वी मिळवणे आणि मग त्या मिळवलेल्या पृथ्वीचे रक्षण करणे आहे. शिवाजी महाराजांसाठी हे प्रथम कर्तव्य किती कठीण होते हे समजण्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजापूर्वीची महाराष्ट्राची स्थिती थोडक्यात समजून घ्यावी लागेल.
शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रासह संपूर्ण भारत मुघलांच्या ताब्यात गेला असला तरी शिवाजी महाराजांचा राज्यविस्तार पाहता आपण केवळ महाराष्ट्रापुरता विचार करणार आहोत.
महाराष्ट्रावर देवगिरीकर यादवांचा एकछत्री अंमल होता. यादव घराण्यातील खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा शेवटचा राजा रामचंद्रदेव यादव. याच्याच कारकीर्दीत अलाउद्दीनने महाराष्ट्र जिंकला आणि रामचंद्राला ‘राय-रायान’ हा किताब देऊन आपला मांडलिक म्हणून ठेवले. रामदेवरायाचा मृत्यू इसच्या तेराव्या शतकाच्या अगदी प्रारंभी झाल्यावर त्याच्या मुलाने शंकरदेवाने अल्लाउद्दीनच्या विरुद्ध बंड पुकारले पण युद्धात तो ठार झाला. त्यानंतर रामदेवरावाचा जावई हरपालदेवाने उठाव केला. पण आपली दहशत बसावी म्हणून दिल्लीचा बादशाह झालेला अल्लाउद्दीनचा तिसरा मुलगा मुबारकशाहने हरपालदेवाच्या अंगाची साले सोलून फार भयानक पद्धतीने त्याला ठार केले. खलजीपासून सुरू झालेल्या या सुलतानीत अनेक घराणी आली आणि गेली. खलजीपासून चौदावे घराणे हे शिहाबुद्दीन महमूदाचे. या महमूदाच्या काळात युसुफ आदिलखान, फतहुल्लाह इमाद, कुत्ब उल्मुख, अमीर कासिम बरीद आणि मलिक अहमद बहिरी यांनी आपली स्वतंत्र राज्ये स्थापिली जी पुढे आदिलशाही, इमादशाही, कुत्बशाही, बरीदशाही व निजामशाही अशी वेगळी घराणी बनली (शककर्ते शिवराय, पृ.५७). राज्य करायची सगळ्यांची पद्धत एकच, तू अधिक क्रूर की मी याचीच स्पर्धा. केवळ क्रौर्य, जुलूम, दडपशाही.. क्रौर्याच्या पद्धतीत तेवढा बदल!
अर्थशास्त्रात धर्मविजयी, लोभविजयी आणि असुरविजयी असे तीन प्रकारचे राजे सांगितले आहेत. यातील ‘धर्मविजयी’ राजे शरण गेल्याने संतुष्ट होतात. शरण आलेल्या शत्रूला किंवा त्याच्या राज्याला कोणतीही क्षती पोचवत नाहीत. ‘लोभविजयी’ हे भूमी व संपत्ती दिली की समाधान पावतात. पण तिसरे ‘असुरविजयी’.. यवनांचे राज्य असुरविजयी प्रकारात मोडणारे! राजे किंवा प्रजा दोघांनाही या भयानक क्रौर्याची कल्पनाच नव्हती. मुसलमान राज्यकर्त्यांना इथला धर्म, भाषा, संस्कृती, प्रजेचे सुख-दु:ख कशाशी काही देणे घेणे नव्हते. या सुलतानांनी प्रजेवर केलेल्या अत्याचारांनी अंगावर काटा उभा राहतो. हुमायुनशाह बहमनी विरुद्ध त्याचा भाऊ हसनखानने बंड पुकारले. दुर्दैवाने हसनखान पकडला गेला. त्यावेळी हुमायुनखानाने आपल्या भावाचा, त्याच्या सैन्याचा व त्याच्याकडील लोकांचा तेलात तळून काढणे अशा प्रकारचा केलेला भयानक छळ फेरिस्त्याने लिहून ठेवला आहे. त्याचे भावाशीसुद्धा एवढे क्रौर्य असेल तर एतद्देशीय लोकांशी काय व्यवहार असेल त्याची सहज कल्पना येते. या साऱ्या सुलतानांच्या कारकीर्दीत महत्त्वाची अधिकारपदे फक्त मुसलमानांनाच मिळत होती. दरबारात फारसी, उर्दूला मान मिळत होता, मूर्तिपूजेवर बंदी आली, मंदिरांतील मूर्ती फोडल्या जात होत्या, त्या घडवणाऱ्या मूर्तिकारांना कडक शिक्षा होत होत्या, मंदिरं फुटत होती. स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांचे वर्णन करणं शक्य नाही अशी परिस्थिती! लोक बाटवले जात होते. या बाटलेल्या लोकांना सर्व प्रकारच्या सवलती मिळत होत्या. आणि दुर्दैव महाराष्ट्राचे की ‘ही भूमी आमची आहे आम्ही तिचे स्वामी आहोत’ या विचाराने शत्रूविरुद्ध लढण्यापेक्षा स्वत:ला क्षत्रिय म्हणवणारे राजवंश क्षात्रतेज विसरून मिंधेपणात आनंद मानत होते. प्रजेचे रक्षण करणारे आमचे मोठमोठे राजवंशसुद्धा हीन- दीन होत होते. शिलाहारांचे शेलार, परमारांचे पवार, कदंबांचे कदम, चालुक्यांचे चाळके किंवा यादवांचे जाधव कधी झाले ते त्यांचे त्यांना कळले नाही. व्यक्तींची, गावांची नावे परकीय राज्यकर्त्यांच्या सोयीनुसार बदलली जात होती आणि त्याबरोबर आमची अस्मिता.! आमच्या क्षात्रतेजाबरोबर आमची बुद्धीसुद्धा गहाण पडत होती. धार्मिक न्यायनिवाडे मुसलमान शहांसमोर होत होते आणि माना तुकवून त्यांचा निवाडा आम्ही बिनबोभाट मान्य करत होतो. जो तो स्वत:चा जीव वाचवण्याच्या विवंचनेत. लाचारी, गुलामी, तोंडपूजेपणा ही जगण्याची साधने झाली. ‘यथा राजा तथा प्रजा’ हा न्याय सर्वत्र सुरू झाला होता. माझे वतन टिकले म्हणजे झाले अशा वृत्तीतून बादशाहापुढे कमरेतून झुकून फर्माने आणायची आणि त्याची मर्जी राखण्यासाठी आपल्याच लोकांवर अत्याचार करायचा यात आपल्या राजवंशांना धन्यता वाटू लागली. विचार आणि पराक्रम दोन्हीत महाराष्ट्र दरिद्री होत राहिला. हे सगळे कमी म्हणून पोर्तुगीज वरवंटाही फिरू लागला होता. आणि यानंतर पुढे सतत तीनशे वर्षे महाराष्ट्र सुलतानी आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देत कसाबसा उभा होता. थोडक्यात पृथ्वीच्या लाभाचा विचारसुद्धा कोणाच्या मनात येणार नाही अशी राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थिती होती.
पण काळ बदलत होता. एकीकडे हिंदूंवरील दडपशाही वाढत असताना या सगळ्या शाहांना आपापल्या शाह्य टिकवण्यासाठी आणि दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी पराक्रमी मराठा सरदारांची गरज वाटू लागली. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा सरदारांना वाव दिला जाऊ लागला. अशा सरदार घराण्यातील एक प्रबळ घराणे-भोसले घराणे. कौटिल्याने मंडलयोनी अधिकरणात राजाचे आभिगामिक, प्राज्ञ, उत्साह आणि आत्मसंपत् असे चार गुण सांगितले आहेत. यातील काही गुण प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना घेऊन येते तर काही प्रयत्नसाध्य असतात. गुणांच्या या यादीत श्रेष्ठ कुळात जन्म, उदार, निश्चयी, सत्त्वयुक्त इत्यादी गुण आभिगामिक गुणांतर्गत येतात. तर शीघ्रता, पराक्रम, दक्षता इत्यादी उत्साह गुणाचे उपगुण आहेत. श्रवण, मनन, धारण योग्य विचार हे प्रज्ञागुण. तर सैन्याचे नेतृत्व करण्यास समर्थ, व्यसनांपासून मुक्त, तह करणे व युद्ध करणे, देणे व राखून ठेवणे, अटी पाळणे व शत्रूचे दोष दिसल्यास ते भेदणे यातील भेद जाणून आचरण करणारा ज्याला ‘मुत्सद्दी’ असा शब्द आहे इत्यादी अनेक गुण आत्मसंपत् या गुणांतर्गत येतात.
एक विजिगीषू राजा म्हणून शिवाजी महाराजांबद्दल अनेकांनी लिहून ठेवले आहे. गुणांच्या या क्रमवारीत प्रथम येतो तो श्रेष्ठ कुळात जन्म. शिवाजी महाराजांचा जन्म श्रेष्ठ क्षत्रिय कुळात झाला असल्याचे गागाभट्टांनी सांगितले आहे. एका ठिकाणी शिवप्रशस्ती गाताना ते म्हणतात, ‘‘विमल अशा महान राजकुळात शहाजीला या भुवनातील रत्न असा पुत्र प्राप्त झाला. असाधारण धैर्य, शौर्य, गांभीर्य, सौंदर्याने युक्त असा शिवाजी द्रविण म्हणजे संपत्ती ही दान करण्यासाठी प्राप्त करतो, त्याचे वीरव्रत लोकांच्या रक्षणासाठी आहे. नाव व रूपाने तो शिव म्हणजे मंगल करणारा आहे (उ१ल्लं३्रल्ल ऋ रँ्र५ं्न्र ३ँी ॅ१ीं३ – गागाभट्टकृत: श्रीशिवराज्याभिषेकप्रयोग: संपादक- वा. सी. बेंद्रे, प्रस्तावना, पृ. २५). राजांचा संपत्ती मिळवण्याचा हेतू व पराक्रमाचे जे वर्णन येथे येते अगदी तसेच वर्णन कालिदासाने रघुकुळाचे केले आहे. या कुळातील राजांच्या श्रेष्ठ गुणांचे वर्णन करताना कालिदास त्यागाय संभृतार्थानाम, यशसे विजिगीषूणां अशी विशेषणे वापरतो. म्हणजे रघुकुळातील राजे दान करण्यासाठी धन प्राप्त करत होते आणि चांगली कीर्ती मिळवण्यासाठी त्यांचा पराक्रम होता.
भूषणाचे काव्य पाहता शिवाजी महाराजांचा जन्म पृथ्वीला भूषण अशा सिसोदिया वंशात झाला. या भोसल्यांचे मूळ घराणे सिसोदिया. या वंशाचा सिसोदिया ते भोसले हा प्रवास कसा झाला त्याचे वर्णन कवी भूषणाने शिवभूषणात केले आहे –
राजत है दिनराज को बंस अवनि अवतंस।
जामें पुनि पुनि अवतरे कंसमथन प्रभु अंस।।
महावीर ता बंस मे भयौ एक अवनीस।
लियौ बिरद सीसौदियौ दियौ ईस को सीस।।
ता कुलमे नृपवृंद सब उपजे बखत बिलंद।
भूमिपाल तिनमें भयौ बडौ माल मकरंद।।
सदा दान करवान में जाके आनन अंभ।
साहि निजाम सखा भयौ दुग्ग देवगिरि खंभ।।
जाते सरजा विरद भौ सोहत सिंघ समान।
रन-भ्वैसिला सु भ्वैसिला आयुषमान खुमान।।
(४-८)
या कुळाचं श्रेष्ठत्व वर्णन करताना कवी भूषण म्हणतो, ईश्वरावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या वंशातल्या कुण्या एका महान पुरुषाने आपले शिरकमल ईश्वराला अर्पण केल्यामुळे हे घराणे ‘सिस दिया’ ‘सिसोदिया’ असे नावारूपाला आले. घराण्यातील सर्वच राजे श्रेष्ठ होते, दानी होते आणि पराक्रमीही होते. त्यांच्या पराक्रमामुळेच ते देवगिरी आणि निजामाचेही आधारस्तंभ झाले होते. या साऱ्या गुणांबरोबर ते युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम गाजवत होते. ते रन-भ्वैसिला, रणात एखाद्या शिलेप्रमाणे युद्धभूमीवर ठाम उभे राहात होते म्हणून ते भोसले या नावाने विख्यात झाले.
सुंदरता गुरूता प्रभुता भनि भूषन
होती है आदरजा में
सज्जनता ओ दयालुता दीनता
कोमलता झलकै परजा में।
दान कृपानहु कों करिबो करिबो
अभै दीनन को बर जामें
साहिनसों रनटेक विवेक इते गुन
एक सिवा सरजा मे।। (३७७)
तर वरील छंदात शिवाजी महाराजांकडील सौंदर्य, गुरुत्व व प्रभुत्व या गुणांमुळे शिवाजी महाराजांना आदर प्राप्त होतो. त्यांच्याकडे प्रजेविषयी सौजन्य आणि सज्जनता, दयाळुता आणि विनम्रपणा आहे. शत्रूला ते तलवारीचे दान देतात आणि दीनांना अभयदान देतात. शाहाशी प्राणपणाने युद्ध आणि विवेक असे सर्व गुण त्यांच्यात एकवटले आहेत, असे कवी भूषण म्हणतो.
बार्तेलमी कारे हा फ्रान्सच्या राजाचा मुख्य कारभारी कोल्बेर याचा प्रतिनिधी शिवकाळात भारतात फिरत होता. जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या शिवाजी महाराजांविषयी त्याच्या नोंदी-
कारेला चौलवरून गोव्याला जायचे होते. या मार्गात शिवाजी महाराज व सिद्दीच्या सैनिकांच्यात झटापटी सुरू असल्याने तो मार्ग सुरक्षित नव्हता. म्हणून त्याने जुन्या ऊर्फ वरच्या चौलमध्ये शिवाजी महाराजांच्या अंमलदाराची भेट घेऊन परवाना मागितला. या भेटीत त्याने या अंमलदाराकडे शिवाजी महाराजांची माहिती विचारली. त्या अंमलदाराचे नाव कारेने दिलेले नाही. पण त्या अंमलदाराने जी माहिती दिली ती संपूर्णपणे विजिगीषू राजाला शोभणारी आहे. त्याच्या सांगण्यानुसार, ‘‘खंबायतच्या राज्याची सीमा असलेल्या सिंधू नदीपासून बंगालच्या मुलखाच्या खूप पलीकडे असलेल्या गंगा नदीपर्यंतचा मुलूख जिंकण्याचा शिवाजी महाराजांचा बेत आहे. त्यांची महत्त्वाकांक्षा अमर्याद आहे आणि क्षमता महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी आहे. ते थोर योद्धा व मुत्सद्दी आहेत. त्यांनी सेनापतीच्या कर्तव्यांचा विशेषत: किल्लेबांधणीचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. अतिशय कुशल अशा स्थापत्य विशारदांपेक्षाही त्यांना किल्लय़ांच्या बांधणीचे अधिक ज्ञान आहे. भूगोलाचाही त्यांनी विशेष अभ्यास केला आहे. देशातील सर्व शहरांची इतकेच नव्हे तर भूप्रदेशांची आणि वनस्पतींची त्यांना माहिती आहे. आणि त्यांनी त्यांचे अचूक नकाशे तयार केले आहेत’’ (उधृत – श्री राजा शिवछत्रपती, भाग १, ग. भा. मेहेंदळे, पृ. २०२).
निश्चयाचा महामेरू, अखंडस्थितीचा निर्धारू, यशवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, नीतिवंत किंवा आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील या विशेषणांबरोबर नरपती, हयपती, गजपती आणि गडपती अशा समर्थ रामदासस्वामींनी वापरलेल्या अनेक विशेषणांतून शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते.
ह्य वेगवेगळ्या वर्णनांवरून अर्थशास्त्रातील विजिगीषू राजाचे गुण आणि शिवाजी महाराजांचे गुण पडताळून पाहता येतात. यातील काही गुण जन्मसिद्ध असले तरी काही शिक्षण व संस्कारांतून प्राप्त झालेले होते. आणि शिवाजी महाराजांना असे शिक्षण आणि संस्कार नक्कीच मिळाले होते…
आसावरी बापट

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qualities of rulers
First published on: 06-02-2015 at 01:29 IST