हल्ली नृत्यवर्गामध्ये पालक जेव्हा चौकशी करायला येतात तेव्हा ‘तुमच्या नृत्यवर्गात कोणत्या प्रकारचे नृत्य शिकवले जाते असे न विचारता, तुम्ही टी.व्ही. शोज करता का?, आमची मुलगी टी.व्ही.वर कधी दिसेल, हा प्रश्न विचारतात. या प्रश्नाला काय उत्तर द्यावे, हे खरे तर कळत नाही. कारण त्यांनी विचारलेला प्रश्न कसा चुकीचा आहे हे त्यांना समजवायचे की एका वर्षांत तिला किंवा त्याला नक्की संधी मिळेल असे खोटे उत्तर द्यायचे? फास्ट फूडचा जमाना असल्यामुळे दुर्दैवाने कलेच्या क्षेत्रातही पालकांना फास्ट प्रसिद्धी हवी असते. त्या मिळालेल्या प्रसिद्धीचा त्यांना अभिमान वाटत असतो. आणि ती कोवळी मुलेही आई-वडिलांच्या भ्रामक कल्पनांना बळी पडतात. हे सगळे कोणत्या संदर्भात आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. गेल्या काही वर्षांत भरभराटीस आलेल्या ‘रिअ‍ॅलिटी शो’ नामक मायाजालाचा हा आढावा.

कुठे सुरुवात झाली या ‘रिअ‍ॅलिटी शो’ची? पूर्वी त्याचे स्वरूप कसे होते हे आत्ता तितके महत्त्वाचे नाही. कारण एकतर पूर्वी एवढी स्पर्धा नव्हती, निरनिराळे टी.व्ही. चॅनल नव्हते, मुलांना आपले कौशल्य दाखवायच्या एवढय़ा संधी उपलब्ध नव्हत्या. नृत्य किंवा गायन या कलांकडे छंद म्हणून पाहिले जायचे. परंतु गेल्या काही वर्षांत हेच चित्र पूर्णपणे बदलले आहे. याच रिअ‍ॅलिटी शोजमुळे मुलांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. केवळ व्यासपीठ मिळाले नाही तर दूरदर्शनसारख्या माध्यमामुळे लाखो प्रेक्षकापर्यंत पोहोचणे सोपे झाले. आजवर अशा कार्यक्रमामुळे अनेक नृत्यसंरचनाकार, उभारते कलाकार यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. या नृत्य अथवा गायनाच्या स्पर्धा घेण्याचा उद्देश खूप चांगला आहे. दोन स्पर्धकांमध्ये जिंकण्याची ईर्षां वाढते. समोरील स्पर्धकापेक्षा माझे सादरीकरण अधिक चांगले कसे होईल यामुळे मुलांमधील हुरूपही वाढतो. त्याचप्रमाणे याच कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होतात, ज्यांमुळे त्यांच्या करिअरला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यताही निर्माण होते. निरनिराळ्या व्यावसायिक संधी यामधून मिळतात. आत्ताच्या काळात (हिंदी व मराठी मिळून) प्रत्येक चॅनलवर हे रिअ‍ॅलिटी शोज आलटून पालटून सुरू असतात. एका वाहिनीवरील संपला की थोडय़ाच दिवसांत दुसऱ्या वाहिनीवर नवीन कार्यक्रम सुरू होतो. हे चक्र वर्षभर चालू राहते. कारण वाहिन्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेच आहे.
या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी जे परीक्षक नेमले जातात तेही त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ (?) असतात. त्यांना ‘गुरू’ असे संबोधले जाते. त्यावर फार भाष्य न करणेच बरे. परंतु काही वेळा खरेच चांगल्या परीक्षकांची नेमणूक केली जाते. या परीक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन या मुलांना लाभते, तसेच परीक्षकांशी संवाद साधण्याचे भाग्य या मुलांना मिळते, ज्यामुळे त्यांच्या सादरीकरणामध्ये होणारी प्रगती आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच कलेच्या क्षेत्रात ‘मार्गदर्शन’ योग्य मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे.
या रिअ‍ॅलिटी शोमुळे मुलांना खूप लवकर लोकप्रियता मिळते. पालकांनाही आपला पाल्य टी.व्ही.वर दिसला याचे कौतुक वाटते. परंतु ही जी लोकप्रियता मिळते त्यामागे प्रचंड मेहनत आहे हे विसरून चालणार नाही. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कष्ट त्यांना घ्यायचे असतात आणि हे पुरेसे अवघड काम आहे. या काळात या कार्यक्रमाशी संबंधित सगळ्यांनाच कंटाळा, थकवा, आजारपण या गोष्टींचा विचारही करायला वेळ मिळत नाही.
हे सगळे जरी अगदी सत्य असले तरी त्याला दुसरी बाजूसुद्धा आहे. रिअ‍ॅलिटी शो हे मनोरंजनाचे माध्यम असल्यामुळे ‘कला’ बाजूला राहून त्याकडे केवळ ‘व्यवसाय’ म्हणून पाहिले जाते. कलाकारांच्या कलेव्यतिरिक्त इतर गुणांना महत्त्व दिले जाते. त्यामुळे दुर्दैवाने ‘कला’ मारली जाते. कला शिकण्यासाठी, सर्वागाने अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारा वेळ यासाठी दिला जात नाही. कारण कमी वेळात मुलांना त्यांची कला सादर करायची असते. समोर तीन मिनिटांत जे दिसेल त्यावर परीक्षकांना परीक्षण करण्याची जबाबदारी पार पाडायची असते. या कार्यक्रमांमधून मिळणारी प्रसिद्धी ही तात्पुरती असते. जग खूप झपाटय़ाने पुढे चालले आहे. काल टी.व्ही.वर काय पाहिले हे प्रेक्षक दुसऱ्या दिवशी विसरूनही जातात. कलाकार आणि माणूस म्हणून मोठे होण्यासाठीचे जे संस्कार असतात ते मुलांवर होणे जरुरीचे असते. ते पालकांनी आणि त्यांच्या गुरूंनी करायला हवेत. पालकांनाही या अशा स्पर्धा कार्यक्रमांच्या आहारी जाता कामा नये. केवळ स्पर्धेपुरतेच त्याकडे पाहिले पाहिजे. काही वेळा पालकांकडून मुलांवर दबाव आणला जातो. अशा वेळी मुलांची मानसिकता जपणे गरजेचे असते. लहान वयात मुले निरागस असतात. परंतु अशा कार्यक्रमांमुळे अहंकार, मत्सर, असूया मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. नकळत्या वयात काही चुकीच्या गोष्टी त्यांच्या मनावर कोरल्या जातात. म्हणूनच यशाबरोबर अपयश पचवण्यासाठी लागणारी सकारात्मक दृष्टी मुलांवर बिंबवणे खूप महत्त्वाचे आहे.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे रिअ‍ॅलिटी शो’च्या दोन्ही बाजू आज आपण अभ्यासल्या. पालकांनी आणि शिक्षकांनी या स्पर्धामध्ये भाग घेताना त्याकडे केवळ एक निकोप स्पर्धा म्हणूनच पाहिले पाहिजे. त्या स्पर्धेकडे सकारात्मक नजरेने पाहिल्यास त्यामधून आनंद, ऊर्जा, आत्मविश्वास मिळण्यास निश्चितच मदत होऊ शकते.
शीतल कपोले