01youthआपण सगळेच ट्रेनच्या सीटपासून ते घरापर्यंत सगळ्याच गोष्टी शेअर करत असतो. पण अशा गोष्टी शेअर करणं आणि आपली आवडती व्यक्ती शेअर करणं यात फरक असतो. तो मिनूला आता प्रकर्षांने जाणवत होता..

एकदाचा लाथ मारून मिनूने दरवाजा उघडला. हातात इतकं सामान होतं की कुलीलाही स्वत:चं शरीर पुरलं नसतं. मिनूच्या हाताची बोटंही लाल झाली होती. मनगटावरही लाल लाल वळ उठले होते, पण मिनूचा उत्साह दांडगा. सगळ्या पिशव्या तिलाच धरायच्या होत्या. शॉपिंग केल्याचं समाधान वाटतं म्हणून. सगळ्या पिशव्या एकदाच्या तिने घरात टाकल्या. मागून सगळा गोतावळा येतच होता. आत्या, मावश्या, माम्या, काकू आणि आई. मिनूने एकदा त्यांच्याकडे आणि मग एकदा आपल्या घराकडे पाहिलं. आता सगळे येऊन बसणार कुठे? बसायच्या जागा बॉक्सेस, पिशव्या यांनी ओथंबून वाहत होत्या. त्यांना स्वत:लाच जागा होत नसावी इतकी सामानाची गर्दी होती. तरीही मिनूने पटापटा सगळ्या पिशव्या एकावर एक रचल्या. तोवर सगळे घरात शिरले. त्यांच्याच धुंदीत. ‘तो साडीचा रंग जास्त छान होता, ते कलर कॉम्बिनेशन जास्त चांगलं होतं; पण तो दुकानदारच बरोबर दाखवत नव्हता.’ मिनूला दुकानदाराचीच दया आली. घरात एवढय़ा पिशव्या बघून दुकानदाराने काहीच दाखवलं नाही यावर कुणाचाच विश्वास बसला नसता. त्यांच्याच नादात त्या दोन सोफ्यांवर दाटीवाटीने बसल्या. हातात ज्या काही एक-दोन पिशव्या उरल्या होत्या त्यासुद्धा खाली ठेवायची त्यांना शुद्ध नव्हती. हॉलमध्ये ठेवायला जागाही नव्हती म्हणा. मिनूला एकंदर सगळ्या प्रकारची गंमत वाटली. किचनमधून पाणी आणून ती टिपॉयवर ठेवणार इतक्यात तिला टिपॉयही रिकामा उरला नाही याची जाणीव झाली. शेवटी तिने एकीचा खांदा हलवून मोठय़ांदा ‘‘पाणी घ्या आणि बॉटल पास करा’’ असं सांगितलं तेव्हा कुठे सगळ्या भानावर आल्या.
‘‘मिनू..थँक्यू..गरज गरज होती ग बाई.’’
काकू नि:श्वास टाकीत म्हणाली.
‘‘अरे! बाप रे! घरात केवढा पसारा झालाय नाही?’’
मिनूच्या आईला फारच लवकर जाणीव झाली. असो हेही नसे थोडके.
‘‘मिनू.. ताईला जरा फोन लाव. बघ कुठवर आली आहेत मंडळी? तिला म्हणावं सगळ्यांना चहापाण्यासाठी इथेच घेऊन ये.’’ इति आई.
‘‘घेऊन ये काय अगं? पसारा बघ की किती झालाय घरात. व्याही आहेत ते आपले. हे असं घर दाखवणार आहेस का त्यांना?’’ इति आत्या.
‘‘अहो वन्सं. लग्नघर म्हणजे असंच असणार नाही का? आणि मी सांगितलंय म्हणून ती मंडळी येणारेत थोडीच? ही आपली म्हणायची पद्धत.’’
आपण आणि आपल्या पद्धती! मिनूने ताईला गपगुमान फोन लावला. ताईचा फोन ‘बिझी’.
‘सई’ मिनूची ताई. दोघींमध्ये वयाचं तसं बरंच अंतर होतं; पण त्यांच्या विचारात आणि आचारात फार कमी अंतर होतं. लहानपणी सगळ्यांसारख्या त्याही भांडत, पण जसा जसा समजूतदारपणा वाढीस लागला तशी तशी आई-बाबा आणि सई-मिनू अशा दोन टिम्स घरात होऊ लागल्या. अर्थात आई-बाबा मुद्दाम असे वातावरण घरात निर्माण करीत होते, की ज्यामुळे त्यांच्यातील बंध त्यांच्याच नकळत सांधले जातील. थोडक्यात छोटय़ातल्या छोटी गोष्टही त्या एकमेकींपासून लपवत नव्हत्या. घरात शिरल्या शिरल्या मिनूचा प्रश्न असायचा, ताई कुठेय आणि सईचाही मिनू कुठेय? सईचं लव-मॅरेज. अर्थात मिनूची फुल सेटिंग आणि मग पुढची बोलणी. त्यामुळे मिनूला आपला या लग्नात सिंहाचा वाटा आहे याचा अभिमान वाटत होता. सईचा होणारा नवरा निरंजन. डॉक्टर. त्याच्या घराचे सगळेच डॉक्टर आणि सई मानसोपचारतज्ज्ञ . सगळंच एकदम सेट. दोघांच्याही घरातून काहीच विरोध नव्हता. सगळं सरळ मार्गाने होत होतं. मिनूला अभिमान वाटण्याजोगं यात काहीच नव्हतं, पण तरीही मिनू लहान होती म्हणून सईसुद्धा ‘मिनू होती म्हणून हे शक्य झालं’ असं कौतुकाने सगळ्यांना सांगायची. आता सईची सासरची मंडळी सईला तिच्याच पसंतीच्या मानाच्या साडय़ा घ्यायला घेऊन गेली होती. खरे तर निरंजन पण येणार होता, पण त्याला इमर्जन्सी आली म्हणून तो नाही येऊ शकला. त्यामुळे सई आता त्यालाच सगळा ‘रिपोर्ट’ देत असणार याची मिनूला खात्री पटली. तिने आईला, ‘ताईचा फोन लागत नाहीये.बहुतेक ती ट्रेनमध्ये असेल’ असं सांगून वेळ मारून नेली. इतक्यात मिनूला काही तरी आठवलं.
‘‘मिनू.. अगं काय करतेयस?’’
मिनूच्या धडपडण्यामुळे आत्याला गप्पांत अडचण झाली.
‘‘आत्या, अगं माझा मोबाइल कुठे पाहिलास का?’’
मिनूने अगदी तळमळीने विचारलं.
ताईने नवीन घेतलेल्या साडय़ांचे फोटो तिला व्हॉट्सअॅप केले असतील असा विचार करून ती त्या सगळ्या पसाऱ्यात गजाआड झालेला मोबाइल शोधत होती. कसाबसा तिला तो कुठल्या तरी पिशवीत सापडला. तिने घाईघाईत वायफाय चालू केलं. बरेच मेसेजेस् आले होते, पण त्यात सईचा मेसेज नव्हता. खरं तर मिनूला ताईसोबत जायचं होतं, पण सगळ्या महिला मंडळींनी केलेल्या विरोधामुळे ती जाऊ शकली नाही. तिला सईचं आणि निरंजनचं निरीक्षण करायला खूप आवडायचं. ताई आपल्याशी जशी वागते तशीच ती निरंजनशी सुद्धा वागते का ते बघायला, पण आता तिच्यासोबत निरंजनसुद्धा आला नव्हता त्यामुळे तिला फार दु:ख झालं नाही. पण सध्या काय होतंय ते तिला कळत नव्हतं. अंगभर गरम वारा फिरत होता. हृदयाचे ठोकेही वाढले होते. पण कारण कळत नव्हतं. ती पुन:पुन्हा सईला फोन करीत होती, पण व्यर्थ. फोन बिझी. बरं फोन चालू असताना आपल्याला दुसऱ्याचा फोन येतोय हे कळतं. असं असतानाही ताईने त्याचा फोन दोन मिनिटांसाठी होल्डवर टाकू नये? आता आपण कुणीच नाही का? राग निरंजनचा की सईचा, हेही तिला कळत नव्हतं. तितक्यात आईची हाक आली.
‘‘मिनू, हा ड्रेस जरा घालून दाखव ना. बघू या तरी कसा दिसतोय ते.’’
आईला बहुतेक मिनूची घालमेल कळली असावी. तीही अशा गोंधळातून गेली असावी. मिनू जरा सावरली आणि तिने ड्रेस घातला. आईने मिनूला प्रेमाने जवळ घेतलं. उत्साहात तिने आरशाकडे धाव घेतली. ती स्वत:ला न्याहाळतच होती इतक्यात दारावरची बेल वाजली.
‘‘आई.. थांब.. मी उघडते दार. ताईच असेल.’’
मिनूने उत्साहात दरवाजा उघडला. मिनूला दरवाजात पाहून सईने फोन कानापासून जरा बाजूला घेतला आणि ‘मिनू, हे जरा आत ठेव गं’ असं सांगून फोनवर बोलत बोलत ती आत गेली. मिनूने आवंढा गिळला. त्या आवंढय़ासोबत आपल्या प्रत्येक सारी-डेला सईने कौतुकाने करून दिलेल्या तयारीची आठवण मिनूच्या मनाला चटका लावून गेली. तिने पिशव्या ठेवल्या आणि रागात ड्रेसही बदलून टाकाला. आपली ताई कुणासोबत तरी शेअर होतेय याचा तिला संताप येत होता. पण सांगणार कुणाला? कपडे बदलून ती शांत बसून राहिली. डोळ्यातल्या अश्रूंमुळे समोरचं सगळं तिला अंधूक दिसत होतं. ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूंसोबत एक-एक आठवण जोडलेली होती. शेअर केलेल्या कॅडबरीपासून ते बेडरूमपर्यंत सगळंच. भिंतीकडे एकटक बघत बसलेल्या मिनूच्या मनात विचारांची वावटळ उठली होती. घरातला पसारा आवरू शकतो; विचारांच्या पसाऱ्याचं काय करणार?
आपण सगळेच ट्रेनच्या सीटपासून ते घरापर्यंत सगळ्याच गोष्टी शेअर करीत असतो. पण गोष्टी शेअर करणं आणि व्यक्ती शेअर करणं यातला फरक तिला आता प्रकर्षांने जाणवत होता. दोन-तीन दिवसांआधी आता ‘अख्खं कपाट माझं होणार’, ‘अख्खी रूम माझी होणार’ याचा आनंद होत होता, पण आपली ताई पूर्णपणे आपली नसणार याची तिला हळहळ वाटत होती.
पुन्हा शरीरभर गरम गरम वारा फिरत होता. खूप ताप येणार की काय, असं तिला वाटत होतं. आता राग शाळेपासून आपल्याला शेअरिंग का शिकवलं गेलं याचा येत होता; पण एका बाजूने ते शिकवलं नसतं तर एकटेपणा खायला उठला असता असंही तिला वाटत होतं. आपण गेल्यावर तर ही रूम अख्खी रिकामी होईल, पण मग तेव्हा आई-बाबांना होईल का मिनूसारखा आनंद? निरंजनची बेडरूमही आता शेअर होणारे, पण त्याच्या भावना आणि मिनूच्या भावना यात किती फरक आहे. निरंजनचे आई-वडील आणि मिनू यांच्या भावनांत साधम्र्य असण्याची शक्यता आहे. मग काय करावं? लग्न करूच नये का ताईने? पण याने कुणीच सुखी होणार नाही. ही वेळ तर प्रत्येकावरच येणार आणि येते. मिनूवरही येणार आहे.
तिचंच मन तिच्याशीच भांडत होतं. पण तरीही आपल्या ताईला जे हवं आहे ते मिळतंय याने आत कुठे तरी ते सुखावत होतं. मिनूच्या मनातलं काहूर मात्र शांत होत नव्हतं. तितक्यात ताईची हाक मिनूने ऐकली.
‘‘मिनू.. लवकर ये.. बघ मी काय काय घेतलंय..’’
मिनूने डोळे पुसले आणि ती ताईजवळ गेली. सई भरभरून बोलत होती. प्रत्येक साडी घेताना काय काय झालं ते सगळं सांगत होती; पण मिनू मात्र तिच्याचकडे एकटक पाहत होती. ताईचा प्राधान्यक्रम बदललाय फक्त. मी तिच्या लिस्टच्या बाहेर कधीच जाणार नाही या जाणिवेने ती सुखावली. पण तिच्या मनातला कोलाहल तसाच होता. सईलाही बहुतेक जाणवलं मिनूच्या मनातलं वादळ. तिने सगळ्या साडय़ा बाजूला ठेवल्या आणि मिनूला जवळ घेतलं.
‘‘मिनू.. शांत हो..!’’
ताईच्या खूप दिवसांनी झालेल्या स्पर्शाने मिनूच्या मनावर हलकेच फुंकर घातली. सई बोलत होती,
‘‘मिनू, अगं असं कोणताही माणूस कोणाचीही जागा नाही घेऊ शकत. असं कसं मी तुम्हाला विसरेन. जितकी माणसं आपल्या आयुष्यात येतात ती आपल्या मनात त्यांच्यासाठी एक नवीन कोपरा तयार करतात आणि बघ, असे कोपरे जोडून जोडून आपलं मन किती मोठं होतं. निरंजन तुझी जागा कधीच नाही घेऊ शकणार. आता त्याच्यासाठी एक नवीन कोपरा तयार झालाय माझ्या मनात इतकंच. मग आता मला सांग, तो कोपरा असा रिकामाच ठेवायचा का? तुझा कोपरा पुरेसा भरलेला आहे; पण निरंजनच्या कोपऱ्यात बरीच जागा शिल्लक आहे. ती भरायला वेळ तर लागणारच ना! आणि आता थोडय़ाच दिवसात माझं नवीन आयुष्य सुरू होईल. मग त्या आठवणींसाठी तुमच्यासाठी असलेल्या कोपऱ्यात जागा नको का? आणि जर कोपरा शेअर नाही केला तर नवीन माणसांसाठी जागा कशी होणार मनात? मग या सगळ्यासाठी वेळ तर लागणारच ना? देशील मला तेवढा वेळ?’’
मिनू नि:शब्द झाली होती. तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. तिच्या मनातलं वादळही शांत झालं होतं.