29 January 2020

News Flash

शिलाँगमधली भटकंती

नेहमीची लोकप्रिय ठिकाणं सोडून वेगळं काही अनुभवायचं असेल तर पूर्वेकडची राज्यं हा एकदम खासा पर्याय आहे. इथला निसर्ग वेगळा, इथली माणसं वेगळी आणि त्यामुळे इथले

| June 19, 2015 01:05 am

lp60नेहमीची लोकप्रिय ठिकाणं सोडून वेगळं काही अनुभवायचं असेल तर पूर्वेकडची राज्यं हा एकदम खासा पर्याय आहे. इथला निसर्ग वेगळा, इथली माणसं वेगळी आणि त्यामुळे इथले अनुभवही एकदम वेगळे!

दुपारी दीडच्या सुमारास आम्ही नऊ मित्र गुवाहाटी येथे पोहोचलो. टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचा ड्रायव्हर रूपक सिन्हा आमची वाटच पाहत होता. सामान लोड करून शिलॉँगला जाण्यासाठी आम्ही निघालो. जागोजागी रस्त्यांची कामे चाललेली असल्याने रस्ता खराब होता. वातावरणात थंडी होती, सूर्य जणू लुप्तच झाला होता. घाट रस्त्याने आमची गाडी संथ चालली होती. रस्त्याच्या दुतर्फा निव्वळ पांढरट-पिवळ्या मातीचे ओघळलेले डोंगर, त्यावर सुपारी व जंगली केळीची झाडे तसेच बांबूची बेटे बेसुमार वाढलेली दिसून येत होती. दुपारी चारचे सुमारास सगळीकडे अंधूकसा अंधार दिसायला लागला, जणू संध्याकाळचे सहा वाजले असावेत असा माहोल तयार झाला. पाच वाजण्याच्या सुमारास चक्क अंधारच पडायला लागला आणि साडेपाच वाजता संपूर्ण अंधार पडला. सारे वातावरण गारेगार झाले, रस्ते अंधारात लुप्त झाले आणि रस्त्यावरच्या मोटारींचे दिवे झगमगू लागले. वळणावळणाचा घाटरस्ता आणि त्यात मिट्ट काळोख. या रस्त्यावरून प्रवास करताना आम्हाला जागोजागी नुसती धूळच-धूळ दिसत होती. संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही चहासाठी नॉंगपे गावाजवळील एका धाब्यावर गाडी थांबवली. हॉटेलमध्ये संध्याकाळच्या जेवणाची लगबग सुरू होती. पूर्वाचलातील राज्यात रात्र लवकर होत असल्याने दुकाने व हॉटेलसुद्धा संध्याकाळी (सॉरी रात्री) सातचे आत बंद होतात. त्यामुळे लोक लवकरच रात्रीचे जेवण करताना दिसत होते. मस्तपकी चहा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.
कुडकुडत्या थंडीत रात्री साडेसातच्या सुमारास आम्ही पूर्वेकडील स्कॉटलंड समजल्या जाणाऱ्या व मेघालयची राजधानी असलेल्या शिलॉँगमध्ये प्रवेश केला. खरे तर गुवाहाटी ते शिलॉँग अंतर सुमारे १०५ कि.मी.चे, परंतु त्या घाटरस्त्याची अवस्था इतकी वाईट होती की दोन-अडीच तासांच्या अंतराला सुमारे साडेचार तासांचा कालावधी लागला. शिलॉँगमध्ये मात्र चौकात दुकाने उघडी दिसत होती. अगदी मुंबईतल्यासारखी दुकानांवर रोषणाई करण्यात आलेली होती. मॉल चालू होते, थिएटर सुरू होते. रस्त्यावर तरुणाईची गर्दी अगदी फुलून आलेली होती, सगळीकडे झगमगाट. पावणे आठच्या सुमारास आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि सामानसुमान ठेवून फ्रेश झालो. तोच रिसेप्शन काऊंटरवरून फोन खणखणला, ‘सरजी खाना खाना है तो जल्दी आ जावो, रेस्टॉरंट साडेआठ बजे बंद हो जायेगा!’ त्या कडाक्याच्या थंडीत पुन्हा सगळा जामानिमा करून आम्ही धावत पळत जेवणासाठी चौथ्या मजल्यावरचे रेस्टॉरंट गाठले. क्षुधाशांती झाल्यानंतर थंडीची तीव्रता थोडी कमी झाल्यासारखी वाटली. रात्री नऊच्या सुमारास थोडी शतपावली करावी म्हणून आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. एकही दुकान उघडे दिसले नाही. सारे शहर जणू थंडीने गारठले गेले होते. त्यामुळे फारसे पुढे न जाता आम्ही आमचा मोर्चा पुन्हा हॉटेलकडे वळविला.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता फटफटीत उजाडलेले दिसत होते. साडेआठच्या सुमारास न्याहारीसाठी गेलो, काचेच्या तावदानातून बाहेर पाहिले तर सगळीकडे जणू मुंबईच दिसत होती. टेकडय़ांवर वसलेले शिलॉँग शहर, इमारतींची प्रचंड गर्दी, अगदी दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारती, जणू सिमेंटचे जंगलच. शिलॉँग हे राजधानीचे शहर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे इथे माणसांची तसेच इमारतींचीही प्रचंड गर्दी आढळून येते. सकाळी साडेनऊच्या सुमारास आम्ही ‘शिलॉँग वू पॉइंट’ पाहण्यासाठी निघालो. वाटेत एअरफोर्स स्टेशन लाईटकोर पीक लागले. शिलॉँग वू पॉइंटचा रस्ता त्या लाईटकोर पीक एअरफोर्स स्टेशनमधूनच जात होता. या रस्त्याने जाताना एअर फोर्सची परवानगी आवश्यक असल्याने ड्रायव्हरने उतरून त्या रस्त्याने आत जाण्याची परवानगी घेतली आणि आम्ही एअरफोर्स स्टेशनमध्ये प्रवेश केला. प्रचंड स्वच्छता, आखीव-रेखीव इमारती, सगळे कसे अगदी शिस्तीत उभे. इतर वेळी ताशी ६० कि.मी.च्या पुढे गाडी पळविणारा आमचा ड्रायव्हर रस्त्यावर लागलेल्या सूचना फलकाप्रमाणे ताशी ३० कि.मी. च्या वर गाडी पळवत नव्हता. थोडय़ाच वेळात आम्ही ‘शिलॉँग वू पॉइंट’ या ठिकाणी आलो. या रस्त्यावर टोल द्यावा लागतो, अगदी लष्करी वाहनांनासुद्धा या ठिकाणी टोलमाफी नाही असे दिसून आले. इथून साऱ्या शिलॉँग शहराचे विहंगम दर्शन होते.
lp61समुद्रसपाटीपासून सुमारे १९६५ मीटर उंचीवर असणारा ‘शिलॉंग वू पाइंट’ हा शिलॉँगमधील सर्वात उंच भाग आहे. याबाबत एक आख्यायिका सांगण्यात येते की, मायलिम गावातील लिर नावाच्या एका कुमारी मातेने एका सुंदर परंतु जन्मतच मृत मुलाला जन्म दिला. या जन्मतच मृत असलेल्या बालकाचे दफन तिने आपल्या बागेत केले. खूप वर्षांनंतर जेव्हा एका मध्यरात्री काही लोकांच्या ओरडण्याच्या आवाजाने लिर जागी झाली आणि तिने जेव्हा दार उघडले तेव्हा एक उंच व सुंदर युवक तिच्याकडे येताना दिसला. तो तिला म्हणाला ‘माते मी तुझा मुलगा आहे, ज्याला तू तुझ्या बागेमध्ये दफन केले होतेस, तू घाबरू नकोस. तू माझी पृथ्वीवरली माता आहेस. तू त्यावेळी निसर्ग नियमाप्रमाणे वागलीस. यात तुझा कोणताही दोष नाही.’ तेव्हा तिच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले, ‘यु शिलॉँग’ (यू शिलॉँग म्हणजे नसíगकरीत्या वाढ होणारा) तेव्हापासून या शहराला शिलॉँग असे नाव पडले.
शिलॉँग शहराच्या निरीक्षणासाठी या ठिकाणी एक दोन मजली गोलाकार टॉवर बांधला आहे. त्यावर उभे राहून अगदी ३६० अंश कोनात फिरून आपणांस शिलॉँग शहर पाहता येते. सकाळचे दहा वाजले होते. थरमल वेअर, स्वेटर व जॅकेट असा जामानिमा असूनही थंडी आम्हाला दाद देत नव्हती. तिथून फोटो काढून खाली येऊन आम्ही निघालो ते चेरापुंजीकरिता. ते शिलॉँगपासून सुमारे ६० कि.मी.वर आहे.
खरे तर खासी, गारो, जयन्तिया या तीन टेकडय़ांच्या बेचक्यात वसलेल्या चेरापुंजीचे मूळ नाव हे ‘सोरा’ आणि सोरा म्हणजे फळं. या चेरापुंजीत मुबलक फळं निर्माण होत असत आणि ती विकून येथील लोकांना भरपूर पसा म्हणजेच पुंजी प्राप्त होत असे म्हणून याचे नाव सोरापुंजी असे पडले आणि पुढे त्याचा अपभ्रंश होऊन चेरापुंजी हे नाव रूढ झाले. त्या रस्त्याने जाताना निसर्गाचे रूप क्षणा-क्षणाला बदलत होते. कधी एखाद्या ढगाचा पुंजका दरीत अलगद खाली उतरत होता तर कधी एखादा खटय़ाळ ढग आम्हाला स्पर्शून जाण्याचा प्रयत्न करत होता. छोटय़ा-छोटय़ा टेकडय़ांवर बांधण्यात आलेली टुमदार घरे/बंगले पाहून मन अगदी थुई-थुई नाचत होते. घाटातला वळणावळणाचा अगदी नजरेच्याही पुढे-पुढे धावणारा रस्ता, सभोवतालचा निसर्ग, पाहून मनाची अवस्था अगदी ‘मन डोले..तन डोले..’ अशीच होत होती. पुढे गेल्यानंतर एका घाटरस्त्यावर आम्हाला ‘दुवानसिंग व्ह्य़ू पॉइंट’ लागला. घाटरस्त्याच्या वळणावर असणारा हा पॉइंट समोर अनेक उंचच उंच डोंगर रांगा एकामागोमाग एक अशा पद्धतीने उभ्या आणि त्याच्या मध्यभागी असणारा हा पॉइंट या रस्त्याने जाणारे सारेच या ठिकाणी थांबतात, निसर्गाचा आस्वाद घेतात. या ठिकाणी उभे राहून दरीतला हिरवागार निसर्ग डोळ्यात साठवावा, पक्ष्याप्रमाणे हवेत तरंगावे, सुळकन् कानाशी येणाऱ्या पक्ष्यांशी हितगुज करावे, स्थानिक विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या टोप्या डोक्यावर घालून पाहाव्यात, आवडल्या तर विकत घेऊन रॉबीनहुडप्रमाणे ऐटीत डोक्यावर घालाव्यात, तलवारी व खंजीर हाताळावेत, येथल्या मधाची बाटली विकत घेऊन रानावनातला मध तळहातावर घेऊन चाखून पुढच्या प्रवासासाठी झोकदार वळण घेऊन निघावे. पुढच्याच वळणाच्या उतारावर आपणांस एक तलाव लागतो. एवढय़ा उंचीवरचा हा तलाव पाहून अचंबित व्हायला होते. आपण जसजसे पुढे-पुढे सरकतो तसतसे इथला निसर्ग अगदी संपन्न आहे, पण या संपन्न निसर्गाचा मारेकरी मानवच आहे, हे वाटेतल्या डोंगररांगामध्ये होत असलेल्या खोदाईवरून लक्षात येते. वळणदार रस्त्याने झोकदार वळणे घेत घेत पुढे आपण ‘वाह-कबा फॉल्स’ या ठिकाणी येतो. तिथल्या रेिलगला मस्तपकी रेलत समोरच्या दरीत पाहण्याचा प्रयत्न करतो. पण धुक्यामुळे काही दिसत नाही. पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. कारण, चेरापुंजी आपणांस खुणावत असते. तेथून निघतो तेव्हा जागोजागी रस्त्याच्या कडेने आपणांस दगडी कोळसाच्या खाणीतून उपसलेला दगडी कोळसा ढिगाऱ्याने मांडून ठेवलेला दिसतो. थोडय़ाच वेळात आपण चेरापुंजीत येऊन दाखल होतो. मोटारीमधून उतरल्या उतरल्या आपणांस थंडीची जाणीव अधिक तीव्रतेने व्हायला लागते. एव्हाना दुपारचे बारा वाजत आलेले असतात. चेरापुंजीतला ‘नोह-का-लिकाई फॉल्स’ हा धबधबा प्रसिद्ध आहे या ठिकाणी जाण्यासाठी प्रत्येकी २० रु. प्रवेश फी द्यावी लागते. तसेच सोबत कॅमेरा असेल तर त्याचेही २० रु. द्यावे लागतात.
lp62या ठिकाणचा ‘नोह-का-लिकाई’ हा धबधबा रेलून पाहता यावा यासाठी एक शेड बांधण्यात आलेली असून त्याला रेिलग आहे. पावसाळ्यात जेव्हा हा धबधबा प्रचंड क्षमतेने कोसळत असतो तेव्हा तो कोसळणारा प्रपात पाहणे एक रोमांचकारी अनुभव असतो, असे येथील दुकानदाराने सांगितले. आम्ही या ठिकाणी गेलो तेव्हा पाण्याची एक पांढरीशुभ्र धार हजारो फुटावरून खाली झेपावताना दिसत होती आणि खाली असलेल्या डोहात ते पाणी साठत होते. या डोहाच्या ठिकाणी जाण्यासाठी शेडच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताच्या अंगाने खाली जाण्यासाठी पायऱ्या आपणांस खुणावू लागतात. मग त्या पायऱ्यावरून रेिलगच्या साहाय्याने आपण हळू-हळू खाली उतरत जातो. तेव्हा, निसर्गाचे विलोभनीय दृश्य आपल्या नजरेच्या टप्प्यात यायला लागते. आपण जसजसे खाली उतरत जातो, तसतसे जंगली केळीची झाडे, बेसुमार वाढलेले बांबू व इतर नसíगक वनसंपदा आपणांकडे कुतूहलाने पाहू लागते. थंडगार वाऱ्याची झुळुक आपल्या अंगावरून वाहायला लागते, एखादे केळीचे पान हळूच आपल्याला गोंजारण्याचा प्रयत्न करते, हळूहळू आपण शेकडो फूट खोल दरीत आलेलो असतो. वेळेअभावी आम्हाला जास्त खाली जाणे जमले नाही, म्हणून आम्ही मागे वळून हळूहळू वरच्या दिशेने सरकायला लागलो.
आम्ही येतोय हे पाहून तेथील स्थानिक विक्रेतीने आम्हाला लांबूनच आवाज द्यायला सुरुवात केली. आवो-आवो बाबुजी, गरमा-गरम चाय पिओ, कॉफी पिओ, अननसका मजा लेलो, मलाईदार पपई खावो. आम्ही साऱ्यांनी अननसाला पसंती दिली. तिने अननसाच्या बारीक-बारीक फोडी करून त्यावर मसाला टाकून एका भांडय़ात अननसाच्या फोडींना स्टिक लावून ते भांडे आमच्यासमोर धरले. त्यानंतर पपईचाही फडशा पाडून झाल्यानंतर गरमागरम चहा मागविला आणि मौसमाई गुहेकडे प्रयाण केले. वाटेत जागोजागी कोळशाच्या खाणी लागल्या. एका छोटय़ाशा डोंगराला एक लहानसे भगदाड पाडून आत-आत जात त्या डोंगराच्या पोटातून दगडी कोळशाचा उपसा करण्याची येथली पद्धत आहे, असे दिसून आले. सुमारे तासाभरानंतर आम्ही मौसमाई गुहेजवळ येऊन पोहोचलो. थंडीची तीव्रता वाढत होती. भारतीय उपखंडातली सर्वात मोठी आणि नसíगकरीत्या तयार झालेली लाईमस्टोमची डिपॉझिट असलेली ही गुहा पाहण्यासाठी मन देखील आतूर झालेले होते.
खरे तर ही गुहा म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले एक सुंदर वास्तुशिल्प आहे. जागोजागी वेगवेगळे आकार, कृती, प्रतिकृती, गुहेच्या आतील बाजूला तसेच छतावरदेखील सुंदर सुंदर शिल्प नसíगकरीत्या निर्माण झालेले पाहताना डोळ्याचे अक्षरश पारणे फिटते. नसíगक अवस्थेत असलेली ही गुहा प्रचंड लांबीची आहे. त्या गुहेतून जातना बऱ्याचवेळा कमरेतून वाकूनच जाणे भाग पडते. गुहेच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो तेव्हा आमचे डोळे विस्फारले गेले. कारण हे प्रवेशव्दार पाहाताच एखाद्या अक्राळविक्राळ प्राण्याने आपला जबडा पसरल्याचा आपणास भास होतो. या गुहेत वरून पाणी झिरपत असल्याने काही ठिकाणी निसरडा झालेला रस्तादेखील आपली वाट अडवितो. अडथळ्यांची शर्यत पार करत करत जेव्हा आपण जसजसे पुढे सरकत जातो तसतसे आपल्या श्वासाची गती वाढायला लागते. आकाशाची कमान असल्यागत असलेल्या या गुहेतील छतावर शेवाळ, कठीण कवच असलेले जलचर प्राणी, कोशातील किडे, कोळी, पाकोळी इतकेच काय, तर काही ठिकाणी खेकडेसुद्धा आढळून येतात. छतातली निर्माण झालेली शिल्पे पाहत-पाहत चालताना समोरच्या उंचवटय़ामुळे आपण कधी अडखळतो ते आपणास कळतसुद्धा नाही. अशा प्रकारे गुहेत मार्गक्रमण करताना आपणास अनेक ठिकाणी असलेले अडथळे पार करूनच पुढे-पुढे सरकावे लागते. त्याचवेळी आपला कपाळमोक्षही होणार नाही याची दक्षता घेत सावधगिरी बाळगावी लागते.
आत शिरताच गुहेच्या डाव्या बाजूला पाहिले तर एखाद्या िहस्र प्राण्याने जणू आम्हाला गिळंकृत करण्यासाठी जबडा पसरला असावा असे दृश्य दिसले, तसेच पुढे सरकत उजव्या बाजूवर नजर स्थिरावली तर शंखाचे आकार तसेच कमलपुष्प पाकळ्या दिसल्या. समोरच्याच छोटय़ा टेकाडावर कासव बसले असावे असेही दृश्य दृष्टीस पडले. कधी कमरेत वाकून तर कधी हळूच खाली उतरत त्या गुहेतील शिल्पे पाहत पाहत आम्ही पुढे पुढे सरकत होतो, तोच डाव्या बाजूच्या एका शिल्पामध्ये आम्हाला भारताचा अशोकस्तंभ असावा अशी एक सुंदर कलाकृती नजरेस आली. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या रंगांच्या, अनेकविध ढंगांच्या आकृत्या पाहत पाहत पुढे-पुढे जाताना आपणांस डाव्या हाताला एक उंचवटा तसेच त्याच्यापुढे एक चिंचोळा रस्ता दिसतो. तो रस्ता आपणांस गुहेच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्याकडे नेतो. तसा फलकही तिथे लावण्यात आलेला आहे. गुहेतील सगळी शिल्पे पाहत-पाहत आम्ही ज्या वेळी तेथे पोहोचलो, त्या वेळी आम्हालाही असे वाटले की यापुढे गुहा नसावी, परंतु आमचे लक्ष उजव्या बाजूला गेल्यावर आमच्या लक्षात असे आले की, यापुढेही अजून एक गुहा शिल्लक आहे. खरे तर तिकडे जाण्यासाठी कोणताही फलक आम्हाला त्या ठिकाणी दिसत नव्हता, परंतु पुढे गुहा मात्र दिसत होती. त्यामुळे ही पुढची गुहा पाहायचीच असा निर्धार करून आमच्या नऊ मित्रांपकी फक्त तीन जणांनी म्हणजेच मी, सुधीर व गोपीनाथ उजव्या बाजूने कसरत करत-करत पुढे निघालो. चिंचोळा मार्ग, खडतर रस्ता. रस्त्यात कधी उंचवटे, तर कधी खोलगट भाग. एकमेकाच्या आधाराने आम्ही पुढे-पुढे सरकत होतो. पुढे जाण्यास आम्हाला भयही वाटत होते. कारण, आमच्याबरोबर असलेल्या आमच्या इतर मित्रांपकी तसेच पर्यटकांपकी कोणीही आमच्यासोबत वरच्या गुहेकडे येण्याचे धाडस केले नाही. परंतु आम्ही फक्त तिघेच धाडसाने त्या चिंचोळ्या भागातून प्रवेश करत वरच्या गुहेकडे निघालो होतो. पाठीमागे कोणीही नाही, समोरच्या चिंचोळ्या भागातून फक्त काही प्रकाशकिरण त्या गुहेत पाझरत होते तोच एक काय तो पुढे जाण्याचा आधार. आता आम्ही आमच्या मोबाइलच्या बॅटरीच्या प्रकाशाच्या आधाराने आम्ही पुढे-पुढे सरकत होतो. खरे तर या चिंचोळ्या गुहेत रस्ता असा नाहीच, उंचसखल भागातून आम्ही पुढे पुढे सरकत होतो. सुमारे २०० फूट अंतर पार केल्यावर असे दिसून आले की या गुहेचा रस्ता पुन्हा एका समोरच्या पाच-सहा फूट उंचीवर असणाऱ्या गुहेत जातो. त्या वरच्या गुहेत जाण्यासाठी एक चिंचोळे प्रवेशद्वार आम्हाला दिसले, त्याच वेळी त्याच्या वरच्या बाजूने प्रकाशाचे किरणही येताना दिसले. आम्ही मनाशी विचार केला की येथून पुन्हा मागे फिरण्याऐवजी असेच पुढे जाऊन वरच्या गुहेतील रस्त्याने आम्हाला बाहेर पडता येईल. म्हणून त्या चिंचोळ्या प्रवेशद्वारातून गोपीनाथने आधी डोके घातले व वरची परिस्थिती न्याहाळून त्याने आम्हाला खालून आधार द्यायला सांगितले. आम्ही त्याला आधार दिल्यानंतर गोपीनाथ कसाबसा वरच्या गुहेत जाऊन पोहोचला. त्याने वर जाताच पाहिले त्या ठिकाणी चिंचोळ्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला एक शिविलग तयार झालेले होते आणि वरच्या छतातून त्यावर पाण्याचे थेंब ठिबकताना दिसत होते. आम्ही दोघेही वरच्या गुहेत पोहोचलो. जिथून पाणी ठिबकत होते तिथे पाहिले तर त्या शिविलगाच्या बरोबर वर उंचावर एक गाईसारखा आकार तयार झालेला होता. त्या गाईचे आचळही स्पष्टपणे दिसत होते आणि त्या आचळातूनच पाण्याच्या थेंबाचा अभिषेक त्या शिविलगावर होत असल्याचे दृश्य दिसले. तिथूनच पुढे उजव्या हाताला पुन्हा एक वाट खाली जात होती, पण पुढे अंधार दिसत असल्याने आम्ही तिकडे जाण्याचे धाडस केले नाही. त्या गुहेत आम्ही जास्त वेळ थांबू शकत नव्हतो. कारण, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. आम्ही वर चढून आल्यामुळे आम्हाला थोडी धाप लागली होती, आता पुढे जाण्याचा मार्गही खुंटला होता, आलेल्या मार्गानेच कसरत करत खाली उतरून पुन्हा परत जाणे भाग होते. गोपीनाथने त्या चिंचोळ्या मार्गात बसून स्वत:चे पाय अगोदर खाली सोडले. वरच्या छतातून बाहेर आलेल्या सुळक्याच्या साहाय्याने स्वत:ला सावरले, आम्ही त्याला मदत केली आणि एकदाचा तो खाली उतरला. त्याच्यापाठोपाठ सुधीर आणि शेवटी मी. अशा प्रकारे एका उंच गुहेत शिरण्याचा आणि सहीसलामत परतण्याचा पराक्रम करून आम्ही हळूहळू पुन्हा मागे फिरलो.
खाली आल्यानंतर आम्ही सरळ तसेच पुढे आलो आणि बाहेर जाण्याच्या चिंचोळ्या मार्गाने स्वत:ला कमरेत वाकवत खाली उतरलो. ही गुहा पाहण्यासाठी जाताना ज्याला दमा आहे, जे जास्त चढू वा उतरू शकत नाहीत, कमरेत वाकून चालू शकत नाहीत, जे स्थूल आहेत, अशा लोकांनी ही गुहा पाहण्याचा मोह टाळलेलाच बरा. गुहेत फिरताना मात्र हवेचा दाब व ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने थकायला होते. अंगातून घामाच्या धारा निथळू लागतात, श्वास जोरजोराने चालायला लागतो. तेथून बाहेर पडण्याच्या वाटेवर पुन्हा आपल्या कसोटीचा क्षण येतो आणि पुन्हा एकदा चिंचोळ्या मार्गाच्या भगदाडातून आपण बाहेर पडतो. त्या वेळी मात्र बरीच कसरत करावी लागते. बाहेर येताच मोकळ्या हवेचा श्वास आमच्या छातीच्या भात्यात भरून घेतला. थोडा वेळ तिथेच उभे राहिलो आणि मग पुन्हा खाली येण्यास सुरुवात केली.
आता दुपारचे तीन वाजत आलेले होते. बाहेर अंधारून आले होते. वातावरणातील थंडीने आम्हाला हुडहुडी भरली होती आणि पोटात कावळेही ओरडत होते. त्यामुळे जवळच्याच हॉटेलमध्ये जेवण केले.
खरे तर मेघालयामधील हा प्रदेश म्हणजे खासी, जैंतिया, गारो या टेकडय़ांचा प्रदेश होय. या भागात मातृसत्ताक पद्धती असल्याने सर्व व्यवहार स्त्रीच्या हातात एकवटलेले असतात. त्यामुळे या भागातून प्रवास करताना आपणांस जागोजागी स्त्रियाच दृष्टीस पडतात. मग या स्त्रिया रस्त्यावर काम करणाऱ्या असोत, दुकानातल्या विक्रेत्या असोत, आपली मुले पाठीवर बांधून कामधंद्यासाठी जाणाऱ्या असोत, शेतात काम करणाऱ्या असोत, लाकूडफाटा गोळा करून पाठीवरल्या टोपलीतून नेणाऱ्या असोत, इथली मातृसत्ताक पद्धती आपणांस पावलोपावली दृष्टीस पडत राहते. या भागातील जैंतिया जमातीचे धनाढय़ लोक आपले बंगले टेकडय़ांवर बांधतात. अगदी चित्रातल्या घरांसारखे हे बंगले आपणांस गावाच्या शेजारील टेकडय़ांवर दिसून येतात. विशेष म्हणजे येथील पांढरी माती, पांढरा दगड आणि वातावरणात असणारी पांढरी धूळ तसेच इथल्या वृक्षराजीवर असणारा धुळीचा प्रचंड थर हे या प्रदेशाचे वैशिष्टय़ आहे.
या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणीही आहेत. विशेष म्हणजे या कोळसा खाणीत जाण्यासाठी टेकडीला छोटेसे भगदाड पाडण्यात येते आणि मग त्या भगदाडातून आत शिरत-शिरत दगडी कोळशाचा शोध घेतला जातो. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास येथील सारे जनजीवन अंधारात पूर्णपणे बुडून जाते आणि वर थंडीचा कडाका सुरू होतो.
मौसमाई गुहेतील निसर्गाचे अचंबित करणारे दृश्य पाहून आम्ही एलिफंट वॉटरफॉल बघण्यासाठी निघालो. वाटेत आम्हाला एके ठिकाणी काही दगडी शिळा उभ्या असलेल्या दिसल्या. कुतूहल म्हणून गाडी थांबविली. त्या ठिकाणच्या फलकावरची माहिती वाचली तर असे समजले की या शिळा युद्धात कामी आलेल्या शूरवीरांचे स्मरण म्हणून हे कीíतस्तंभ उभे करण्याची प्रथा या भागात सर्रास दिसून येते. उभ्या शिळा पुरुष योद्धय़ाच्या स्मरणार्थ तर आडव्या शिळा या स्त्री योद्धय़ाच्या स्मरणार्थ रोवल्या जातात. त्या ठिकाणचे छायाचित्र घेऊन आम्ही गाडीत बसत होतो इतक्यात तेथे छोटय़ा-छोटय़ा पाच-सहा मुली धावत आल्या आणि आम्हाला फोटोसाठी त्यांनी पोझ दिली. त्यांचे सुंदरसे छायाचित्र घेऊन आम्ही तेथून एलिफंटा वाटरफॉलसाठी निघालो.
या ठिकाणाला येथील खासी जमातीचे लोक KA  KSHAID LAI PATENG KHOHOSIEW (तीन टप्प्यातील धबधबा) असे म्हणतात. ब्रिटिशांनी या ठिकाणी येऊन हा धबधबा शोधून काढला, त्यावेळी त्यांनी त्याचे नामकरण एलिफंटा फॉल्स असे केले. कारण तिथला एक खडक हत्तीच्या आकाराचा होता. हे ठिकाण जमिनीच्या पातळीच्या सुमारे शेकडो फूट खाली असून या ठिकाणी असणाऱ्या खडकात कधीकाळी हत्तीच्या पायाचा आकार तयार झालेला होता. परंतु सन १८९७ मध्ये झालेल्या भूकंपात याचा विध्वंस झाला. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असणारा हा धबधबा पाहताना डोळ्याचे अक्षरश पारणे फिटते. या ठिकाणी जाण्यासाठी पक्क्या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. परंतु पायऱ्या उतरताना-चढताना मात्र चांगलीच दमछाक होते. आम्ही संध्याकाळी सुमारे साडेचारच्या सुमारास या ठिकाणी आलो. अंधूकसा अंधार पडत आलेला होता. पटापट पायऱ्या उतरून आम्ही खाली गेलो. तेव्हा मात्र खोल डोहात पडणारा पाण्याचा प्रपात पाहून आमची नजर विस्फारली गेली. अंधार पडत आल्याने आम्हाला लवकरात लवकर पुन्हा वर जाणे गरजेचे होते. भरभर पायऱ्या चढून आम्ही वर आलो. वर आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या जवळच असणाऱ्या दुकानातून इथला पारंपरिक लढवय्याचा वेष फोटो काढण्यासाठी घेतला. तो घालून, हातात तलवार व ढाल घेऊन लढवय्या सनिकाच्या वेषात फोटो काढण्यात एक वेगळीच मजा येते.
शिलाँगमध्ये आलो त्या वेळी संध्याकाळचे सात वाजून गेलेले होते. गर्दीमुळे हॉटेलपर्यंत आमची गाडी जाऊ शकत नसल्याने ड्रायव्हरने आम्हाला चौकातच उतरवले. शिलाँगच्या या चौकात उतरल्यानंतर त्या चौकातला मॉल तरुणाईच्या गर्दीने फुललेला दिसत होता. आम्ही चालत चालत निघालो वाटेत खाण्यासाठी ‘बदाम मसाला’ घेतला. शिलाँगमध्ये तळलेल्या शेंगदाण्यावर मसाला टाकून देतात त्याला बदाम मसाला म्हणतात. हे ऐकून आमची चांगलीच करमणूक झाली. शाळेत असताना वाचले होते की शेंगदाण्याला गरिबांचे बदाम म्हणतात. परंतु या ठिकाणी शेगदाणे चक्क बदाम म्हणूनच विकले जातात. त्या हुरहुरत्या थंडीत गरमागरम बदाम मसाला खात आम्ही रस्त्यावरचे दुकाने न्याहाळत िवडो शॉिपग करत रमत-गमत हॉटेलमध्ये आलो.
खरे तर शिलाँगमध्ये अनेक छोटी-मोठी पर्यटनस्थ़ळे आहेत. ती सगळी एका दिवसात पाहून होत नाहीत. परंतु शिलाँगमधली महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी एक दिवस पुरा होतो. पण त्यासाठी तुम्हाला सकाळी नऊच्या आत ती स्थळे पाहण्यासाठी निघणे आवश्यक असते. कारण इथला दिवस सकाळी लवकर सुरू होतो आणि संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अंधार व्हायला लागतो. त्यामुळे सकाळी लवकर निघाल्यास सारी ठिकाणे एका दिवसात कव्हर करता येतात. शिलॉँगमध्ये किंवा या पूर्वाचलातील राज्यात फिरताना मात्र एक दक्षता कटाक्षाने घ्यावी लागते, ती म्हणजे संध्याकाळी सातचे नंतर एकटे-दुकटे कुठेही फिरू नये.
धनराज खरटमल – response.lokprabha@expressindia.com

First Published on June 19, 2015 1:05 am

Web Title: shillong
Next Stories
1 केल्याने देशाटन… फजिती होतसे फार
2 एक स्वप्न सफर
3 औटघटकेचं लव्ह अफेअर!
Just Now!
X