शिवदर्शन साबळे या युवा लेखक-दिग्दर्शकाने ‘परंपरा डॉट कॉम’ हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे. शाहीर साबळे यांचा त्याला मिळालेला वारसा, या नाटकामागची त्याची भूमिका, नाटक व्यवसाय आणि एकंदरीत मराठी रंगभूमीबद्दल त्याच्याशी बातचीत.

‘परंपरा डॉट कॉम’ हे नाटक रंगभूमीवर आणावं असं तुला का वाटलं?
आजोबांनंतर ठोस अशी कलाकृती आली नव्हती. त्यामुळे रसिकांना एक चांगलं नाटक द्यावं आणि आपलं स्वत:चं एक प्रॉडक्शन हाऊस असावं, हे डोक्यात होतं. त्यांचा वारसा पुढे जपावा, हा उद्देश होताच. हे नाटक दोन वर्षांपूर्वी येणार होतं, पण ते काही कारणांमुळे येऊ शकलं नाही. त्यानंतर हे नाटक स्वत:च करायचं असं मी ठरवलं आणि ते रंगभूमीवर आलं.
या नाटकाच्या विषयाबाबत काय सांगाल?
‘परंपरा डॉट कॉम’ हे भावनाप्रधान नाटक आहे. ते लोकांना विचार करायला लावतं. विनोदी अंगाने आपल्या काही परंपरांवर नाटक भाष्य करतं. काही परंपरा अनादी काळापासून चालत आलेल्या आहेत. त्या परंपरा आपण का, कशासाठी पाळतो, याची माहिती मात्र अनेकांना नसते. त्यामुळे माहीत नसलेल्या परंपरा पुढे नेण्यात काय अर्थ आहे, हा नाटकाचा विषय आहे. हे नाटक सर्व वर्गातील प्रेक्षकांसाठी आहे. नाटक बघताना प्रेक्षक स्वत:ला त्या नाटकात बघेल आणि विचार करु लागेल. समाजाने काही गोष्टींचा विचार करायला हवा आणि आपल्या विवेकबुद्धीला जे पटतं ते करायला हवं, असं नाटक सांगतं.
या नाटकामध्ये संगीतही मोठय़ा प्रमाणात आहे. संगीत नाटकांचा ट्रेंड नसतानाही सहा गाणी असलेलं नाटक चालेल असं वाटलं होतं का?
माझी गोष्ट सांगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. लिखाण करताना ठरवून गाणी आली नाहीत, मी लिहीत गेलो. जसं ‘लोकधारा’ उभं राहात गेलं, तसं हे नाटक उभं राहिलं आहे. नाटक चालेल की नाही, याचा विचार मी करत नाही. गोष्ट चांगली असेल आणि तुम्ही ती योग्य पद्धतीने मांडली असेल तर ती लोकांना नक्कीच आवडते.
नाटकांमधल्या गाण्यांना कसा प्रतिसाद आहे?
उत्तम!! ही गाणी लोकांच्या मनात रुंजी घालणारी आहेत. मुळात आम्ही नाटकासाठी गाणी करायची, असं ठरवून ती केलेली नाहीत. चित्रपटातल्या गाणी लिहिण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच या नाटकाचीही प्रक्रिया होती. अभिनेते सुमीत राघवन यांनी एक गाणं गायलंय. देवदत्त साबळेंनी (बाबा) मी आणि माझ्या भावानेही गाणी गायली आहेत. बाबांनीच या गाण्यांना चालीही दिल्या आहेत.
लेखन आणि दिग्दर्शन करताना तुझ्यावर कोणाचा प्रभाव आहे असं वाटतं?
आजोबांचा नक्कीच प्रभाव आहे. आत्मविश्वास, हजरजबाबीपणा आणि भिडस्तपणा या तिन्ही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. कोणत्याही धाटणीचं लिखाण करताना मी घाबरत नाही. यापूर्वी मी जे तीन सिनेमे केले ते वेगळ्या धाटणीचेच होते. बाबा चांगलं लिहितात, त्यांचा विनोदाचा सेन्स अप्रतिम आहे. त्याचबरोबर ‘डोंबिवली फास्ट’ सिनेमासाठी मी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे, त्यामुळे निशिकांत कामतचाही माझ्यावर प्रभाव आहे. एखादी गोष्ट व्यवस्थित चौकटीत बसवणं, हे मी त्याच्याकडून शिकलो.
एखादी कलाकृतीतून आपल्याला मांडायचा आहे तो विषय मांडताना आर्थिक गणिताचा विचार कसा करतोस?
निर्मितीचा विचार सुरुवातीला नसतो. लिखाण पूर्ण झालं की अंदाज येतो. पण लिखाण करताना मी आर्थिक गणितांचा विचार करत नाही. सिनेमा करताना आर्थिक गणितांचा जास्त विचार करावा लागतो, पण नाटक करताना विचार करत नाही.
सध्याची मराठी रंगभूमी कुठे आहे असं वाटतं?
सध्याच्या घडीला मराठी रंगभूमी प्रयोगशीलतेच्या वळणार आहे. मराठी सिनेमांमध्ये २००६-७ या काळात विविधांगी विषय येत होते, नवीन प्रयोग होत होते. मराठी रंगभूमीवर सध्या तसंच होताना दिसतंय. काही वर्षांपूर्वी नाटकं व्यक्तीकेंद्रित होती, त्यांचा साचा ठरलेला होता. कौटुंबिक, विनोदी तसंच चाकोरीबद्ध नाटकं जास्त येत होती. त्यावेळीही प्रयोग होत होते, पण त्यांचं प्रमाण अल्प होतं. तीन ते पाच पात्रांमध्येच नाटक बसवलं जायचं. आता मात्र प्रयोग होताहेत आणि त्यामुळे खूप वैविध्य येतंय.
आणि प्रेक्षकांना हे प्रयोग आवडताहेत ?
सध्याचा युवा वर्ग या नाटकांकडे कसा वळेल, हे पाहायला हवं. नवा प्रेक्षकवर्ग कसा तयार होणार, याकडे लक्ष द्यायला हवं. त्यांना रुचणारी किंवा त्यांना त्यांच्या कलेनं विषय मांडणारी नाटकं नसतील तर ते याकडे का वळतील? त्यांना अपील करणारी नाटकं व्हायला हवीत. नवीन लेखक, दिग्दर्शक विविधांगी विषय घेऊन येतायत, त्यामुळे विविध प्रयोगांनी सुरुवात झाली आहे. येत्या पाच वर्षांमध्ये आपल्याला नक्कीच विविध प्रयोग पाहायला मिळतील. पण या नवीन लेखक, दिग्दर्शकांच्या मागे निर्मात्यांनी ठामपणे उभं राहायला हवं.
मराठी शाळांची संख्या कमी होते आहे याचा नाटय़सृष्टीवर परिणाम होईल का?
असं मला वाटत नाही. कारण मराठी माध्यमाच्या शाळा चांगल्या चालत होत्या त्यावेळी देखील काही नाटकं, सिनेमे चालले नाही. मुंबईत ‘भारतामाता’ वगळता ‘प्लाझा’ला फारसे सिनेमे चालले नाहीत. ‘भारतमाता’ला जास्त दादा कोंडकेंचे सिनेमे पुन्हा दाखवले जायचे. मला असं वाटतं की, कलाकृतीला भाषेचं बंधन नसतं. जर तुम्ही कलाकृती चांगली सादर केली तर ती पाहायला नक्कीच प्रेक्षक येणार. मुळात मराठीला प्रतिष्ठा देणं आपल्यावरच आहे. मी कितीही इंग्रजाळलेल्या ठिकाणी गेलो तरी आधी मराठीत सुरुवात करतो, पण समोरच्या माणसाला मराठी येत नाही असं लक्षात आलं तरच मग त्याला समजणारी भाषा वापरतो. पण आपण नेहमीच प्राधान्य आपल्याच मातृभाषेला द्यायला हवं. त्यासाठी आंदोलनं वगैरे करायची गरज नाही.
नाटक करताना तुझं प्राधान्य प्रयोगशीलतेला असतं की निर्मितीमूल्यांना?
या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण दिग्दर्शक म्हणून एक सुवर्णमध्य काढायचा तर गोष्ट मांडण्याची इच्छा, ईर्षां, ऊर्जा असायला हवी. या गोष्टी असतील तर या दोन्ही गोष्टी जुळून येतात. काही जण जास्त प्रयोगशील, तर काही जण जास्त व्यावसायिक असतात. पण शाहीर साबळेंपासून आतापर्यंत आम्ही जे केलं, ते फक्त निखळ आनंद देण्यासाठी केलं. मुळात तुमच्याकडे गोष्ट सांगायची मनापासून इच्छा असायला हवी.
सर्वसाधारणपणे व्यावसायिक रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमी असे गट पाडले जातात, याबद्दल तुला काय वाटतं?
माझ्या मते नाटकाचे दोन प्रकार आहेत. एक नाटक जे मनाला भिडतं आणि दुसरं जे भिडत नाही. मी अशी बरीच प्रयोगिक नाटकं पाहिली जी मनाला भिडली आणि काही व्यावसायिक नाटकं मनाला भिडली नाहीत. नाटकाचा प्रयोग असं म्हटलं जातं कारण तो पोडतिडिकीने केलेला एक प्रयत्न असतो.
तुझ्या मते नाटकातलं ‘नाटय़’ नेमकं कशात असतं?
जिथे कोणताही विषय परिपक्वतेने आणण्याचा प्रयत्न केला जातो तिथे नाटय़ निर्माण होतं, असं मला वाटतं, मग ते गंभीर असो, विनोदी किंवा कोणत्याही काळातलं. जिथे एखादी कलाकृती, विषय, मांडणी भिडते तिथे नाटय़ सुरू होतं.
सध्या अनुदानासाठी नाटक केलं जातं.. नाटकाला याचा फटका बसतो का?
काही वेळा काही जण फक्त अनुदानासाठी नाटकं करतात, पण एखादा माणूस दोनशे रुपयांचं तिकीट काढून नाटकाला आला आणि ते नाटक फक्त अनुदानासाठी केलेलं असेल, त्यामध्ये गोष्ट सांगण्याची इच्छा, ईर्षां नसेल, ते नाटक त्या प्रेक्षकाला आवडलं नाही तर तो परत नाटकाकडे वळणार नाही. या भ्रमनिरास करणाऱ्या माणसांना फक्त अनुदानच हवं असतं. त्यांच्यामुळे नाटकाकडे पाहण्याचा सामान्य माणसाचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि हेच रंगभूमीसाठी घातक ठरू शकतं.
‘परंपरा डॉट कॉम’ नंतर पुढे काय?
‘परंपरा डॉट कॉम’ या नाटकामध्ये कौटुंबिक, विनोदी, गंभीर अशा विविध छटा आहेत. आता साधारण एप्रिलच्या दरम्यान आमचं आणखी एक नाटक येईल. ते पूर्णपणे रोमँटिक असेल. मराठी रंगभूमीवर फार रोमँटिक नाटकं आलेली मला आठवत नाहीत. त्यामुळे आमचा हा एक वेगळा प्रयोग असेल. प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार