पदार्थ तेच पण त्यांना वेगळी नावं दिली की कसा भारदस्तपणाा येतो. वांग्याचं भरीत म्हटलं की डोळ्यासमोर येणारा, जिभेला आठवणारा पदार्थ गोल्डन रेलिश हे नाव दिलं की डोळ्यासमोर येणार आहे का?

सकाळचे अकरा/ साडेअकरा.. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग- मैत्रिणीचा फोन.
रिसिव्हर उचलला- पलीकडून ‘‘अगं, मी उम्मी.’’
‘‘कळलं गं- आज सकाळी सकाळीच माझी आठवण!’’
‘‘अगं मम्मी, आज आमच्या महिला मंडळातर्फे आम्ही चेंज हा कार्यक्रम राबवतोय.’’
‘‘म्हणजे काय गं- प्रशासकीय भाषेत बोलत्येस अगदी.’’
‘‘आज अगं चूलबाईला रजा. आज लेक आणि त्याचा बाबा यांचाही चेंज कार्यक्रम आहे. सकाळी सिनेमा, दुपारी लेक व्ह्य़ूमध्ये खाना, संध्याकाळी मॉल आणि रात्री घराचं तोंड पाहणार.’’
‘‘वा, मग तुझी मज्जा. आज सगळय़ा फॅमिली लिमिटेडचाच चेंज कार्यक्रम आहे म्हणायचं- तुझा फेरा कुठे मग!’’
‘‘अगं एकपर्यंत भोजनम्पाशी जमायचं- मग तिथलं उरकलं की मग रमतगमत शॉपिंग.’’
‘‘म्हणजे तो नवीन उघडलेला डायनिंग हॉल ना गं!’’
‘‘अगं हो – पण तू काय करत्येस आज!
‘‘नेहमीचंच.’’
‘‘तरी पण!’’
‘‘दांबूगिरीची तयारी- सुरुवात तर केलीय!’’
‘‘काय बाई बोलणं! इतके दिवस दादागिरी, भाईगिरी माहीत होतं. आता हे काय नवीन?’’
‘‘नवीन नाही गं- हे एक यज्ञकर्म आहे.’’
‘‘म्हणजे तू अगदी पहँुची हुई झालीस गं- पुण्यातल्या बायकांसारखं पौरोहित्य करत्येस वाटतं- आज कुठे फेरा!’’
‘‘नाही गं! आणि त्या पुण्यातल्या बायकांचं काहीही तू मला सांगू नकोस- सगळय़ा बायकांना सगळं येत असतं. पण आज आपला तो विषयच नाहीय..-मुद्दय़ाचं बोलू या- विठोबाच्या आधी काय येतं?’’
‘‘आता हा विठोबा आधी कोण!’’
‘‘कमाल करत्येस! अगं तो विटेवर उभा राहून, कटीवर हात ठेवणारा! जगन्मान्य- भक्तवत्सल-पंढरीचा राणा!’’
‘‘ओ- आय सी – हात जोडू या, पण मग त्याच्या आधी काय येतं! अगं पोटोबा – युनिव्हर्सल ट्रथ!’’
‘‘आलं लक्षात – किती फिरवलंस गरगर! म्हणजे पोटपुजेची तयारी!’’
‘‘काय बाई सांगण्याची रीत-चमीच आहेस-पण बेत काय आजचा-मेनू गं!’’
‘‘नेहमीचाच – पो.भा.व.को. – आणि आज एक स्पेशल ठेवलाय.’’
‘‘मग तेच सांग ना.पो.भा.ची बाराखडी तोंडपाठ आहे. स्पेशल काय ते सांग. वळसे वळसे करीत प्रदक्षिणा कशाला!’’
‘‘अगं बाई, ते स्पेशल वळशा वळशांनी सिद्ध होणारं आहे.’’
‘‘एकदाचं सांग बाई, किती वेळ फोन कानाशी लावून ठेवायचा.’’
‘‘सांगते हं – खासियत अशी धडाक्कन सांगतात का!- आज का स्पेशल ना गोल्डन रेलीश ए टेिम्प्टग साइड डिश!’’
‘‘हो गं बाई, पण ते रेलीश का फेलीश कोणत्या पदार्थापासून करतात ते सांग ना!’’
‘‘अगं पदार्थ नेहमीचाच – अगदी परिचयातला!’’
‘‘असेल बाई तुझ्या परिचयातला- मग मला बोध होईल अशी फोड करून सांग.’’
‘‘येस- आज किनई सोनं घालून वांग्याचं भरीत करत्ये.’’
‘‘वा गं तुझी, ग्रेट आहेस – म्हणजे एवढं सोनं आहे म्हणायचं तुझ्याकडे! ’’
‘‘छे गं बाई – जीव जीव करून बाजूला ठेवलं होतं.’’
‘‘मग काय, ते फोडणीला कां टाकायचं!’’
‘‘नाही गं माझे आई. खूप फोडणी देऊनच ते घरात आणलं होतं.’’
‘‘ओ ये बात है! म्हणजे भाजून मग कत्तल केलेल्या वांग्याच्या लगद्यांत टाकायचं – काय गं- तसंच आख्खच्या आख्खं!’’
‘‘नाही गं बाई- चिरायचं आधी.’’
‘‘म्हणजे एवढं कडक-टणक सोनं, ते तू चिरणारेस! भक्कम बाई आहेस म्हणायचं. सोप्पं नाही आहे ते. डोळय़ांतून पाण्याची धार लागते. शिवाय खच्चाक्कन बोट कापायची पण धास्ती असते. मग एवढे भगीरथ प्रयत्न करून हाच पदार्थ करायची तुला तरी कसली आग गं!’’
‘‘अगं, कधी तरी वाटणारच. गरिबांनासुद्धा चॉईस असतो म्हटलं. म्हणजे एवढा सोहोळा करून, तू गरिबांचा पदार्थ रांधणारेस! अजब आहेस. अजब म्हण नाही तर गहजब म्हण – याला म्हणतात जिव्हालौल्य!’’
‘‘भलतंच कठीण म्हणतात गं! इतके दिवस स्थौल्य माहीत होतं – आता जोडीला जिव्हालौल्य!’’
‘‘नाही गं बाई! नेहमीच्या भाषेत याला जिभलीबाईची चटक म्हणतात.’’
‘‘ती चटक मलाही माहीत आहे-इत्यर्थ काय तर तू चटकदार करून मटक मटक खाणारेस!’’
‘‘मग वाटलं काय तुला!’’
‘‘मग मला त्या भरताची कृती सांग बाई – कितीला किती प्रमाण घालायचं!’’
‘‘अगं मुख्य पदार्थ – भाजलेलं वांग! त्यांत भर आणि खमंगपणा म्हणून आपल्याला परवडेल तसं जेवढय़ास तेवढं घालायचं – माफक! अगं तसं सोस म्हणून करायचं ना तर सोन्याची जोडमाळ घरात हवी – ती तर फार फर्मास डिश आहे. जरा जरा चिरा द्यायच्या नि मसाला भरायचा. की आख्खं भरलं सोनंसुद्धा करता येतं – पण भरताला मात्र भर आणि स्वाद म्हणून घालायचं!’’
‘‘म्हणजे वालभर, गुंजभर म्हणतात त्या प्रमाणात का!’’
‘‘जवळजवळ तसंच – भसाडभर घालायची ऐपत आहे का आपली! अगं बाजारात त्या उद्देशाने गेले आणि शंभर रुपयांची नोट काढली तर त्यावरचं चित्र टवकारून म्हणतं – माझी किम्मतच उरली नाहीये तुला.’’
‘‘आणि येऊन येऊन माल किती हातांत येणार – तर ओंजळभर.’’
‘‘किती बाई तपशीलवार रसभरीत सांगत्येस गं तू – आता कोडं उलगडून सांग – इकडे माझं बिल वाढतंय-टो टो टो टो करून बोलत सुटलोय आपलं – रामाची सीता अजून गुलदस्त्यांतच! ’’
‘‘अगं विषयच झणझणीत – बोलणं लांबत जाणारच! आणि काय गं पब्लिक फोनवरून का बोलत्येस! बिलाचं म्हणत्येस म्हणून! त्या बूथवाल्यानं बरं बाई तुला थांबवलंन नाही.’’
‘‘कुठून कुठे नेत्येस गं विषय- बूथवाल्याला मरू दे असेल तिथे – मी घरच्या फोनवरूनच बोलत्ये – म्हटलं, जरा वेळ आहे तर मोकळं ठाकळं बोलू या – तर तू अगदी गिरगिर माता, सोन्याचा पाता केलंस – माझ्या हाताला झिणझिण्या आल्यात गं!’’
‘‘रागावू नकोस. वळशा वळशांनी सांगितलं तर खिळा ठोकल्यासारखं डोक्यात राहातं – अगदी बावन कशी होऊन.’’
‘‘बसला गं बाई खिळा-आता त्यात स्पेशल ते काय सांगून टाक आणि सोडव मला’’
‘‘सांगितलं ना आज गोल्डन रेलीश ही टेिम्प्टग साइड डिश करतेय’’
‘‘म्हणजे त्याला मराठीत नावच नाही आहे का!’’
‘‘आहे ना – पण ते नाव गिळगिळीत वाटतं, त्यापेक्षा हिंदी नाव अगदी जिभेवर नाचताय’’
‘‘मग ते सांग – किती भाव खाशील.’’
‘‘अगं वेडे, आज किनई मी बैंगन का भरता करतेय, प्याज डाल के – समझी!’’
‘‘ग्रेट आहेस बाई, कांद्याचे केवढे वांधे झाल्येत ना हल्ली.’’
‘‘कसं बोललीस – म्हणून तर स्पेशल पदार्थ म्हटलं ना! भाववाढ, भाववाढ म्हणजे किती! त्याला काही सुमार! कुणाच्या नाकाला लावायला कांदा मिळणार नाही असा काळ आलाय- कृत्रिम टंचाई करून पैसे उकळतायत.’’
‘‘पण मी म्हणते – नाकाला कांदा लावायचाच कशाला तो!’’
‘‘ते वेळ आल्यावर कळतं बरं! असा झणझणून जागा होतो ना माणूस, अगदी शुद्धीवर येतो.’’
‘‘ओ आय सी – आला सगळा गोषवारा लक्षात. खिळा फिट्ट बसला. फोन ठेवण्याआधी एक मनात येतंय – सांगून टाकते. मला काय वाटतं- हे ओनियनचे भाव निश्चित करायला ओपिनियन पोल घेतलं पाहिजे.’’ ‘‘येस्स.. करेक्ट. परफेक्टली राइट’’
‘‘मग थांबलीयस कुणासाठी – तूच घे पुढाकार!’’
‘‘हो गं. म्हणूनच दुपारीच निघालेय.’’
‘‘कुठे गं!’’
‘‘अगं लासलगावला थेट. आल्यावर बोलू या.. बाय.’’
‘‘बाय.. बाय आणि बेस्ट लक’’