lp35मी बसायचो त्या बाकासमोर एक चाळ होती. त्या चाळीतली बाई लांबूनही माझ्याकडे टक लावून पाहायची. मग मीही तिच्याकडे टक लावून पाहायला सुरुवात केली.

मी तिथे बसलो होतो. त्या बाकावर.. रस्त्यावरच्या..कोणी तरी डोनरनं दिलेल्या.. तो बाक मला पूर्वीपासून आवडायचा. त्या बाकावर येऊन बसावं असं वाटायचं. पण वेळ मिळत नसे. आता वेळच वेळ.. निवृत्त झालोय. सकाळची सगळी कामं उरकून आंघोळबिंघोळ करून बाकावर येऊन बसायचो. तसा बसलो होतो.

रस्ता वाहतोय. माणसं, मोटारी, दुचाक्या, सायकली.. सगळे कुठून तरी आलेत आणि कुठे तरी चाललेत. असंख्य पाय या रस्त्यावर इकडेतिकडे जाताहेत. रस्ता तिथेच आहे. त्याला सोयरसुतक नाही. माणसं फिजिकली माझ्यासमोरून चालताहेत. पण मेंटली ती कुठे आहेत? कोणी ऑफिसमध्ये, शाळेत, कॉलेजात, दुकानात, बाजारात कोणी कामाच्या शोधात.

कुत्रे काही खायला मिळतं का ते शोधत आणि अधूनमधून निर्विकारपणे सगळ्यांकडे पाहात उभे आहेत.

मला कुठेच जायचं नाहीए. काहीही शोधायचं नाहीए. मला दोन वेळा खायला मिळेल आणि दोन-तीन वेळा चहा-बिस्किटं मिळतील एवढं पेन्शन माझ्या सरकारी नोकरीनं मला दिलंय.

मी बाकावर बसून आहे. जणु पृथ्वीच्या मध्यभागी आणि भोवती सगळी पृथ्वी फिरतेय.. मी मात्र स्थिर.

स्थैर्य हा शाप की वरदान..

विचारचक्र थांबत नाही..

मेंदूत जणू थैमान आहे.. कसलं माहीत नाही. पण काही तरी होतंय. कॉम्प्युटरच्या आतमध्ये काय उलथापालथ होत असेल? कसे दिसत असतील सगळे प्रोग्राम्स? या थैमानाला दिशा हवी. थैमानाला दिशा नसली तर वावटळ उठेल आणि मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील.

मी बाकावर बसून आहे. मला काही तरी जाणवतंय. कोणी तरी माझ्याकडे टक लावून बघतंय.. माझ्या सहाव्या ज्ञानबिंदूला कळतंय.. कोणी तरी बघतंय.. परस्पर माझ्याकडे.. मी शोध घेतोय..कोण बघतंय् माझ्याकडे?.

..सापडलं.

नक्की तीच.

ती बाई.

पन्नास-पंचावन्नची असेल..

पण तीच..,नक्की

समोर एक चाळ आहे. चाळीला कॉमन गॅलरी आहे. दुसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीत ती उभी आहे. जाडगेली.. गोरटेली.

चाळीच्या लाकडी कठडय़ावर आपले दोन्ही कोपर ठेवून माझ्याकडे एकटक पाहत ती उभी आहे.

ती का पाहतेय् माझ्याकडे?.. असं एखाद्या पुरुषाकडे एकटक पाहणं चांगलं नाही हे तिला कोण सांगेल? पण आपणही पाहू लागलोय् आता तिच्याकडे. रस्त्यावर असं बाकावर बसून समोरच्या चाळीत दुसऱ्या मजल्यावर उभ्या असलेल्या बाईकडे पाहणं चांगलं नाही हे मला मीच सांगतो. कळतंय पण वळत नाही.

खिशात हा मोबाइल का ठेवला मी? चांगला बघत होतो तिच्याकडे तर वाजला. नुसता वाजला नाही तर थरथरलासुद्धा.

‘‘बाबा.. कुठे आहात?’’ सून विचारत होती.

‘‘आणखी कुठे ? .बाकावर.’’

‘‘घरी या.. बोंबील तळलाय.’’

सून ममताळू आहे. बापासारखं सासऱ्याचं करते. आता जायलाच हवं.

ममताळू सून आणि तळलेला बोंबील.. जायलाच हवं.

मी आलोय.. रस्त्यानं माझ्याशी हस्तांदोलन केलं. बाकानं अ‍ॅडजस्ट करून स्वत:च्या मांडीवर मला सामावून घेतलं.

आता ओळख झालीय् नं आमची.

बसल्यावर समोर पाहिलं.

समोर ती उभी आहे.. पाहतेय.. थांब.. मी काय घाबरतो काय?.. मीसुद्धा पाहतो. आज तिनं अंजिरी रंगाची साडी नेसलीय. आपल्याला अंजिरी रंग आवडतो हे तिला कसं कळलं? ..ना ओळखीची ना पाळखीची.

पण हे टय़ुनिंग छान आहे.

माझा या बाकडय़ावर जीव तर तिचा कठडय़ावर.

मी इथून धनुष्यबाण खेचलेला. तिनं तिथूनपण अजून बाण सोडलेला नाही.. दोघांनीही.. हा मजेदार खेळ आहे. बघ किती बघतेस तेवढी.

मीसुद्धा बघतो.

रिटायर्ड माणसांनी बाईकडे बघायचं नाही असा काही नियम नाही.. त्यातून विधुर असेल तर काय?

अरे पण ती आत का गेली? असा खेळ सोडून जाताना निदान ‘टाइम प्लीज’ची अ‍ॅक्शन तरी करायची. मीसुद्धा एकदा रस्त्याच्या खांद्यावर थोपटलं जाणारी-येणारी माणसं निर्विकारपणे बघून घेतली. बाकानंही तेवढय़ात मांडी बदलली. आणि मी पुन्हा धनुष्यबाण दुसऱ्या मजल्याकडे वळवला.

ती आता पुन्हा आलीय.. पण हात कठडय़ावर नाहीत. कारण तिच्या हातात काही तरी काळंकाळं आहे. ते तिनं आता डोळ्यावर लावलं आहे.

म्हणजे ती मला आता दुर्बिणीतून बघतेय.

ही तर कुमुद पारसनीस.. कॉलेजमधली.. किती लाइन मारायचो आपण हिच्यावर.. आपणच काय आपली गँगच.. आख्खं कॉलेजच.. आयटेम होती.. पण कोणाच्या ताकास तूर लागू दिला नाही.

धिस इज टू मच.. ती आपल्या एक स्टेप पुढे जातेय, भलतीच धीट आहे.

खिशातला मोबाइल थरथरतोय

हा मोबाइल साला दुष्मन आहे.

आणि ममताळू सून दुसरी दुष्मन. तिच्या ममतेसकट. मी मोबाइलचं थरथरणं मुठीत दाबलं. आज तिनं सुरमई तळली असणार.

आता निघायला हवं.. आणि घरात एका कोपऱ्यात कुठे तरी दुर्बीण आहे.. ती शोधायला हवी.

आज रस्ता मी आल्यावर जरा जास्तच सुखावला. आज बीएमसीनं त्याला आंघोळ घातली होती. बाकडय़ानं तर मला खेचूनच स्वत:च्या मांडीवर बसवलं.

ती समोर आहेच. वाटच बघत असते जणू. तिनं आजही दुर्बीण डोळ्याला लावलीय.

आपणही काढू या की आपली दुर्बीण.. रस्त्याला विचारलं तर म्हणाला, ‘बिनधास्त काढ. जवळ कोणी हवालदार नाही आणि माणसांना कुठे वेळ आहे तुझ्याकडे बघायला.’

चला.. शबनममधून दुर्बीण काढून डोळ्याला लावू या.

आता दोन माणसं एकमेकांना समोरासमोरून.. म्हणजे एक जण रस्त्यावरून तर दुसरी दुसऱ्या मजल्यावरून दुर्बिणीनं एकमेकांना बघताहेत.

रस्ता मिस्कील हसतोय. बाकडं तर टाळ्या वाजवतंय.

‘‘ए बाई, ती दुर्बीण जरा बाजूला करशील तर चेहरा दिसेल की तुझा?’’

तिनं आता दुर्बीण बाजूला केलीय? ..ऐकलं की काय?

‘ओह माय गॉड! चेहरा ओळखीचा वाटतोय.. पण लक्षात येत नाहीए.. ती तर आता चक्क हातानं बोलावतेय.. जाऊ या का?.. नको.. कानाखाली वाजवली तर?’

आज नको जाऊ या.. आज नुसता हात करू या आणि आठवायचा प्रयत्न करू या.

दुष्मन थरथरतोय् खिशात.. सूनबाईला म्हणावं, ‘पापलेट, सरंगा असला तरी नको बोलावूस.’

पण आता जायलाच हवं. नुसता हात हलवून निघावं.. आणि रात्रभर आठवायचा प्रयत्न करू या.

आज रस्त्यानं माझं धावत येऊन स्वागत केलं. बाकानं बसवलं खरं, पण काखेत हात घालून उठवतोय् कशाला हा?

रात्रभर आठवलं.. तरी आठवलं नाही.

ती उभी आहे. जोरजोरात हात करून बोलावतेय?

मी निघालोय.. तिच्या दिशेनं.. आपण त्या चाळीत शिरतोय.. जिना वर जातोय.. पण मग आपण कुठे तरी भूतकाळात शिरतोय् असं का वाटतंय.

आपण कॉमन गॅलरीत आलोय. तिनं हसून स्वागत केलंय. ती चक्क आत बोलावतेय.

‘ओळखलंच नं शेवटी?.. मला वाटलंच होतं तूच असशील.’

मी कुठे ओळखलंय.. मी नीट पाहतोय

आणि मी ओळखलंय

साक्षात्कार म्हणतात तो हाच असावा.

‘कुमुद ना?’ मी चीत्कारलो.

‘बरोब्बर.. विसरला नाहीस हं.’

यस.. ही तर कुमुद पारसनीस.. कॉलेजमधली.. किती लाइन मारायचो आपण हिच्यावर.. आपणच काय आपली गँगच.. आख्खं कॉलेजच.. आयटेम होती.. पण कोणाच्या ताकास तूर लागू दिला नाही.

‘तू कसं ओळखलंस मला? ’

‘अरे, तो बाक रोज बेवारशी असायचा.. भिकारीबिकारी बसायचे तिथे.. एक दिवस बघितलं तर तू बसलेला.. म्हटलं हा बरा माणूस इथे कसा?.. मग टक लावून बघितलं.. म्हटलं केस उडलेत पण दिसतोय तर वसंतासारखाच.. मग शेजारच्याची दुर्बीण उधार घेतली. खात्री केली.. म्हटलं हा शंभर टक्के वसंताच.. मग बोलावलं.. कसा आहेस?’

‘मी चांगला आहे की.. रिटायर झालोय् सरकारी नोकरीतून.. टाइमपास म्हणून बाकावर बसतो.. रोज सकाळी.’

‘माहितीए.. रोज येतोस आणि माझ्याकडे बघत बसतोस.’

‘ते काय.. ओळख पटत नव्हती म्हणून.’

‘आता पटली ना.. मग झालं तर.. चहा घेतोस ना?’

‘नको.. अ‍ॅसिडिटी होते.’

‘मग लिंबू सरबत घे.’

आज रस्त्यानं धावत येऊन मला कवेतच घेतलं. बाकानं बसूच दिलं नाही. म्हणाला, ‘समोर जा. ती वाट बघतेय.’ निघालोय.. आज शर्टही ठेवणीतला घातलाय.. धावतच निघालोय. अजूनही एक सोडून एक पायरी चढू शकतो मी.

ती आत गेलीय.. दोनच खोल्या.. चाळीतल्या.. बाहेरच्या खोलीत एक ऐसपैस पलंग.. आपण त्या पलंगावरच बसलोय.. पलंगासमोर दोन खुच्र्या.. त्यापैकी एका खुर्चीवर ती मघाशी बसली होती.. घरात कोणा पुरुषाचे कपडे दिसत नाहीत.. नवरा आहे का तिचा? मंगळसूत्र तर आहे.. मुलं बहुतेक नसावीत.. म्हणजे ही एकटीच आहे?

कॉलेजमध्ये होती तेव्हा काय रुबाब होता हिचा.. गोरी, सडसडीत, चुणचुणीत, तरतरीत.. साली तेव्हा आमच्या गँगला खिजगणतीत ठेवत नसे. त्या श्रीराजच्या बाइकवरून यायची. श्रीराज बडय़ा बापाचा ना.. हिनं पटवलेला.. आमची गँग बिचारी हिला आपल्या कवितांमध्ये वगैरे पेरायची. चार र्वष मी फक्त हिचाच विचार करत होतो.. चाळीभोवती फेऱ्या मारायचो.. रात्ररात्र तळमळत होतो.. पण त्या नटरंग्या श्रीराजनं हिला काय भुरळ घातली होती कोणास ठाऊक?

ती आतमध्ये लिंबू शोधतेय.. फ्रिजमध्ये मिळालं नाही बहुतेक.. दरवाजाच्या मागच्या खुंटीवरच्या पिशवीत शोधतेय.. आपल्याला पाठमोरी दिसतेय.. जाडी.. अजागळ.. केसही पिकलेत.. लिंबू मिळालेलं दिसतंय.. ती विळीवर उकिडवी बसून आता लिंबू चिरतेय.. ग्लासमध्ये पिळतेय.. सरबत तयार होतंय.. ती ग्लासमध्ये ओतून ग्लास घेऊन बाहेर येतेय.

‘घे.. झालं पण सरबत’

आम्ही दोघंही सरबत पितोय

आपण खासगी प्रश्न विचारूया का?.. नको.. तिनं कुठं विचारलेत अजून.

दुश्मन वाजला.. थरथरला.. ममताळू सुनेनं नेमकं आज चिकन आणलं असणार.

आता जायला हवं.. कुमुद.. उद्या भेटू याच ठिकाणी.. याच वेळी..

मोबाइल आणि ममताळू सून.. उद्या दोन्ही दुश्मनांना घरीच विसरून यायचं.

आज रस्त्यानं धावत येऊन मला कवेतच घेतलं. बाकानं बसूच दिलं नाही. म्हणाला, ‘समोर जा. ती वाट बघतेय.’

निघालोय.. आज शर्टही ठेवणीतला घातलाय.. धावतच निघालोय. अजूनही एक सोडून एक पायरी चढू शकतो मी.

आज विचारूनच टाकूया.. खासगी प्रश्न.

कुमुद स्वागत करतेय. आज पोहे करूनच ठेवलेत.

‘चांगले झालेत पोहे’ खाता खाता आपण म्हणतोय.. कुमुद सुखावतेय.

‘तुझा नवरा दिसत नाही गं कधी.’ आपण विचारतोय.. ती धक्का बसल्यासारखी सुन्न होतेय.

‘श्रीराज ना?’ ती विषण्णपणे म्हणते.

‘हो.. श्रीराजशीच केलंस् ना तू लग्न? आम्ही ऐकलं होतं.’

‘हो.. पण पार फसगत झाली रे माझी’

‘काय झालं?’

‘सगळा पोकळ वासा होता. त्याचा बाप कर्जबाजारी.. तो उडाणटप्पू.. मी सोडलं त्याला.. आम्हाला इश्यूसुद्धा झाला नाही रे.’

‘माय गॉड! घटस्फोट झालाय् तुझा?’

‘नाही.. तसा घटस्फोट वगैरे नाही घेतला मी.. येतो कधीतरी.. पैसे मागायला.. माझ्या आयुष्याची साफ वाट लावली रे त्यानं वसंता. यापेक्षा मी तुझ्याशी.. किंवा तुमच्या गँगमधल्या कोणाशीही लग्न केलं असतं ना.. तर..’

‘कुमुद.. कुमेऽऽऽऽऽ’ मी ओरडतोय.. हे काय होतंय् मला? मला श्रीराजचा भयंकर संताप येतो आहे. माझे डोळे विस्फारले जात आहेत.. ‘माझ्यातलं रक्त पेटत आहे. स्साला माझ्या लाडक्या कुमुची वाट लावतोस काय रे …’

मला बाकानं आपल्या खांद्यावर घेतलंय.. रस्ता मला सगळ्या बाजूंनी कवटाळतोय. चालणारे पाय थबकून अदृश्य होताहेत. मला बाइकवरून येणारा श्रीराज दिसतोय.. गोरापान.. कायम छद्मी हसणारा.. मला हिणवणारा.. त्याचा खून करावा अशी मला तीव्र इच्छा होतेय.

गोरापान श्रीराज.. तो माझ्याच दिशेनं येतोय.

मीसुद्धा त्याच्यावर धावून जातोय?.. हरामखोर..

मी केवढय़ा गाढ झोपेतून जागा झालोय.. हे पांढरं पांढरं काय आहे?.. सिलिंग?.. मी कॉटवर आहे.. मी डोळे उघडतोय.. शेजारी ममताळू सून आणि मुलगा उभे आहेत.

‘बाबा.. जागे झालात्?.. असं काय झालं तुम्हाला एकदम?’

‘का?.. काय केलं मी?’

‘रस्त्यावर त्या बाकडय़ावर जाऊन बसायचे ना तुम्ही.. तिथे बाकावरच उभे राहून एकदम व्हायोलेंट झालात. चक्कर येऊन पडलात. आजूबाजूच्या लोकांनी इथे आणलं..मोबाइलही घरी विसरून आला होतात. खिशात ह्य़ांचं कार्ड होतं म्हणून कळलं तरी.. म्हणे समोरच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सकडे तुम्ही एकटक पाहात होता गेले कित्येक दिवस.’ ममताळू म्हणत होती.

‘समोर कमर्शिअल कॉम्प्लेक्स कुठे आहे?.. चाळ आहे.. कुमुद पारसनीस राहायची तिथे.’

‘तुम्हाला भ्रम होतोय् बाबा.. शांत पडा बघू तुम्ही..’

मला कोणी तरी इंजेक्शन देतंय.. पण मला तो हरामखोर श्रीराज दिसतोय.

तो माझ्याचकडे येतोय.. बाईकवरून..