scorecardresearch

हिरवाई : स्वीट हार्ट होया…

होया ही एक विचित्र नावाची वेल असून तिचे सोपे, साधारण नाव आहे ‘वॅक्स क्रिपर.’ ही वेल साधारण ५ ते ६ इंच मापाच्या कुंडीत सहज वाढवता येते. ही फार मोठी वाढणारी वेल नसल्याने खिडकीच्या ग्रिलवरही सुंदर…

lp36होया ही एक विचित्र नावाची वेल असून तिचे सोपे, साधारण नाव आहे ‘वॅक्स क्रिपर.’ ही वेल साधारण ५ ते ६ इंच मापाच्या कुंडीत सहज वाढवता येते. ही फार मोठी वाढणारी वेल नसल्याने खिडकीच्या ग्रिलवरही सुंदर वाढते. हिची पाने मांसल व मेण लावल्यासारखी तुकतुकीत असल्यानेच हिला ‘वॅक्स क्रिपर’ असे सुयोग्य नाव आहे. ही एक बहुवर्षांयू वेल असून तिला जवळजवळ वर्षभर फुले येतात. छोटी, लांब देठाची फुले गुच्छात असतात. Hoya australis, Hoya carnosa, Hoya fusca, Hoya kerrii, Hoya lacunosa अशा अनेक जाती उपलब्ध आहेत. बहुतेक सर्व होया जातींची फुले सुवासिक असतात. आपल्या भारतातही होयाच्या काही जाती नसíगक प्रकारे वाढताना आढळतात. कालिम्पाँग, दार्जििलंग असल्या थंड प्रदेशात होयाच्या काही जाती जंगलात, दुसऱ्या झाडांच्या आधाराने वाढताना मी पाहिल्या आहेत. अशा या बहुगुणी वेलीची ओळख करून घेऊ.

ही वेल अत्यंत कणखर असून तिला जवळजवळ कसल्याही किडी किंवा रोग सहसा लागत नाहीत. आपण बाहेरगावी जायचे असल्यास घरातील झाडांना कोण पाणी घालणार, ही काळजी आपल्यास असते; परंतु या वेलीविषयी ती काळजी पडण्याचे कारण नाही. दहा-पंधरा दिवसही जरी हिला पाणी मिळाले नाही तर ती सुकून जाणार नाही. थोडीशी मरगळेल; परंतु पाणी मिळताच परत एक-दोन दिवसांत तरारून जाते. होयाची वेल मातीशिवायही वाढवता येते, हा एक मोठा फायदा आहे. वृक्षाच्या बुंध्यावर, लाकडाच्या ओंडक्यावर किंवा नारळाच्या सोढणावरही तरारते. होया वेलीच्या मुळांवर मॉस गच्च बांधून मोठा गोळा करावा. हा गोळा नारळाच्या सोढणातील पोकळीत भरून किंवा ओंडक्यावर, झाडाच्या बुंध्यावर गच्च बांधावा. वेल जशी वाढत जाईल तशी ती सोढणावर वळवून बांधत जावी. एक वर्षांत सोढण वेलीने व्यापून जाईल. झाडाच्या बुंध्यावर ती आपोआप चढत जाते. ही सावकाश वाढणारी वेल आहे. हिची फुले नव्या वाढणाऱ्या फुटव्यांवरच येत असल्याने हिच्या फुटव्यांना जपावे. नाजूक फुटवा तुटल्यास नवा फुटवा येईपर्यंत फुले मिळणार नाहीत. आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे, एकदा फुले येऊन गेलेल्या देठावर जवळजवळ दहा ते पंधरा वेळा परत परत फुले येतात; म्हणून फुले येऊन गेलेला देठ कापून टाकू नये.
तरारलेल्या एका वेलीवर एकाच वेळी दहा-बारा गुच्छ धरतात. होयाच्या फुलांचा सुगंध रात्रीच दरवळतो. वेलीवर फुले सहा ते सात दिवस टिकून राहतात. फुलांतून स्रवणारा रंगहीन मध सेवन करण्यास दर सकाळी माझ्या घरी एक छोटुकला शिंजीर पक्षी भेट देई. Hoya kerrii या वेलीला फारशी सुरेख फुले नसली तरी तिची पाने हृदयाकृती असल्याने मोहक वाटतात. पानांच्या हृदयाकृती पानांवरून हिला ‘स्वीट हार्ट होया’ असे नाव पडले आहे. होयाची अभिवृद्धी छाटकलमाने करता येते.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2015 at 01:14 IST

संबंधित बातम्या