03 June 2020

News Flash

रिमोट आपल्या हातात!

अनेकांना टीव्हीवरच्या काही मालिका आवडतात, काही नाही आवडत. प्रत्येकाच्या आवडी निवडी भिन्न असतात. आपले संगोपन ज्या पद्धतीने, हेतूने झालेले असते त्यानुसारही आवडनिवड ठरते!

| April 3, 2015 01:16 am

अनेकांना टीव्हीवरच्या काही मालिका आवडतात, काही नाही आवडत. प्रत्येकाच्या आवडी निवडी भिन्न असतात. आपले संगोपन ज्या पद्धतीने, हेतूने झालेले असते त्यानुसारही आवडनिवड ठरते! काही कुटुंबे परंपरा-भक्त असतात तर काही परंपरा-मुक्त असतात. त्यानुसार काहींना परंपरा मोडवतच नाही वा हिम्मत होत नाही, अगदी त्यातील कालबा अर्थहीन व टाकाऊ भाग देखील! तशाच प्रेक्षक वर्गाच्या मानसिक गरजा आर्थिक स्तरानुसार वेगवेगळ्या असतात. 

कौटुंबिक मालिका पाहताना काहीवेळा तर वाटून जाते की दागदागिन्यांच्या व भरजरी साडय़ा यांच्या जाहिरातीच आहेत की काय ? पण त्याच वैभवाचं स्वप्न पाहायला कित्येक जणी आसुसलेल्याअसतात उदा. ‘होणार सून’. तरी पण या मालिका विशिष्ट समूहालाच जास्त आवडतात. कारण त्यात असलेल्या एक प्रकारच्या शक्तिप्रदर्शनामुळे वर्चस्व प्रेरणेलाही खतपाणी मिळते. तरीही चालू जीवनाशी काही मालिकांची नाळ जोडलेली आहे. उदा. घरकामात पुरुषांचा सहज सहभाग, कुटुंबातील प्रेम व नाती जपणं तसेच स्त्रियांनी स्वतंत्रपणे घराबाहेर करिअर करणे, व्यवसायात विभिन्न जातींचा विशिष्ट गुणवत्तेनुसार सहज समावेश, व्यक्तीस्वातंत्र्याला वाव देणे, स्त्री—पुरुष समता, कुटुंबप्रमुख स्त्री असणे, इ. आधुनिक मूल्ये यात छान मांडली आहेत. या सर्व जुळवाजुळवीमध्ये नूतन जोडप्यांमधील रोमान्स मात्र काहीसा अनरोमँटिक वाटतो. पण चालायचंच.
‘रुंजी’ नामक मालिकेतील रुंजी हे आजच्या तरुण स्त्रीचे उत्तम उदाहरण आहे. ती एक मनस्वीनी दाखवली आहे. मात्र हा ठसा नीट उमटवण्यासाठी मीनाक्षी (चुलत सासू) सारखी कांगावखोर व्यक्ती बॅकग्राऊंडला कारस्थानासह वरचेवर यावी लागते. ते आपण समजून घ्यायचे.
‘लगोरी’ ही मालिका विशेष उल्लेखनीय वाटते. त्यातील पाचही तरुणींमधील नाते जीवाभावाचे व घट्ट आहे. ही मालिका चालू जीवनातील प्रश्न हाताळते. अत्यंत वास्तवदर्शी पेहराव, वागणे सारे स्वाभाविक वाटते. भावनिक सूक्ष्म तरंग पण तरलतेने स्पष्ट होतात.
‘दुर्वा’ मालिकेत राजकीय व कौटुंबिक जीवनाचा मेळ दाखवला आहे. त्यातले संघर्ष, ताणतणाव, डावपेच, आव्हानं इत्यादी गोष्टी प्रदर्शनीय वाटतात. असे चाकोरीबाहेरचे करिअर करणाऱ्या स्त्रियांना अशा मालिका मार्गदर्शक व दिलासा देणाऱ्या वाटू शकतात.
‘जयोस्तुते’ ही मालिका न्यायप्रबोधक आहे. वेगवेगळे अनेक प्रश्न त्याची दुसरी बाजू व त्याची विविध पुराव्या द्वारे कायदेशीर सोडवणूक असा तिचा गाभा आहे.
‘कारे दुरावा’मध्ये लग्न झालेल्यांना त्या ऑफिसमध्ये स्थान नाही. या मालिकेत हल्लीचं व्यावसायिक जीवन, तरूणांचं निर्णय—स्वातंत्र्य व कौटुंबिक जीवन यामधले ताणतणाव व विविध तरंग दाखवलेत. मालिकेला ऑफिसची पाश्र्वभूमी व सारे व्यक्तीविशेषांचं नाटय़ मात्र खाजगी स्वरूपाचं या विरोधाभासातून रंजकते बरोबरच प्रश्नांचं गांभीर्यही खुबीदार जोडणीमुळे हायलाईट होते.
‘जय मल्हार’ मालिकेला पौराणिक संदर्भ आहे. पण तो चालू काळातील वाटावा असा पेश केला आहे. यात असलेले धनगर संस्कृतीचं विलोभनीय दर्शन वाटते.
‘कन्यादान’ मालिकेत बाप—लेक नाते केंद्रस्थानी आहे. मुलीची कदर करणाऱ्या घरातील काहीशा लोकशाही वातावरणाची झलक मिळत राहते. सामाजिक भ्रष्टाचाराचे आव्हान हाताळणे हेही छान मांडलाय.
‘रुंजी’ मालिकेतील मीनाक्षीचा खलनायकीपणा पुन्हापुन्हा दाखवला जातो. ऋषी इत्यादींना त्याची पारख अनेक वर्षांनंतरही कशी होत नाही, असे प्रश्न मनात येत राहतात. पण लगेच वाटून जाते की असेही वास्तव आढळतेच की! आपल्याच आसपासच्या एखाद्या कुटुंबात एखादी व्यक्ती स्वत:चे स्तोम वाढवून कुटुंबातील सर्व व्यक्तींवर गारुड पसरवून स्वत:च्या प्रभावाखाली गुरफटून टाकीत असलेले नजरेस पडते. म्हणजे टीव्ही मालिकांमध्ये दाखवतात त्याची मुळं आपल्या समाजातच आहेत.
याशिवाय डिस्कवरीसारखी दर्जेदार चॅनल्स आहेत. बातम्यांची चॅनल्स आहेत. पोलीस, कायदा, गुन्हेगारी यावरील चॅनल्स आहेत. खाद्य संस्कृतीशी संबंधित चॅनल्स आहेत. सहिष्णुता, दुसऱ्या समुहांबद्दल आदर ठेवणे, इतरांचे जीवन समजून घेणे, पूर्वग्रह कमी करणे, कूपमंडक वृत्ती कमी करीत आकलन क्षमता वाढवणे, अशा प्रकारे सततच्या परिवर्तनाचा वेध घेता येतो. रुंजीमध्ये दाखवल्याप्रमाणे ऐतखाऊ लोकही कुटुंबात आढळतात. म्हणून मुलांवर आर्थिक संस्कार, स्वत: कमावणे इत्यादी गरजेचे.
सारांश आजकाल मोठ मोठे प्रशस्त मॉल्स सप्तरंगातील सर्व छटांसह, सर्व रेंजमधील मालासहीत सजलेले दिसतात, तसेच हे चॅनल्सचे जग. पण रिमोट आपल्या हातात आहेच ना!
वृन्दाश्री दाभोलकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2015 1:16 am

Web Title: tv serials 3
Next Stories
1 ठाण्यातली रिक्षा संस्कृती
2 स्वप्नातील भारत २०७५
3 दिएगोचा संघर्ष
Just Now!
X