मी शेंडेनक्षत्रासारखा एकटाच घुमत असायचो. त्या भ्रमणाचा एक मुक्काम ‘अनुपम’, ‘सम्राट’ किंवा ‘टोपीवाला’ असं जवळचं एखादी थिएटर असायचं. ‘राम-श्याम’ असं एक जाळं थिएटरही त्या काळात उपनगरात होतं. बकाल मनाची कंगाल माणसं अनेकदा आसपास बसलेली असत. ती स्वप्नं विकत घ्यायला स्वस्तात मस्त रंजनाला तिथं आलेली असत. पडद्यावरच्या यातना पाहून त्यांची मनंही मोकळी व्हायची. म्हणजे आसवं वाहू लागायची. आपलीच सुखदु:खं पडदा दाखवतो अशी भावना व्हायची. पैसेवाल्या पोरीबाळीही काळ्या बाजारात तिकिटं घेऊन राजेश किंवा अमिताभसाठी थिएटरचा काळोख जवळ करायच्या. आमच्या वाडीतल्या पपीला मात्र ‘शशी’ आवडायचा. मला पपी आवडायची. त्यामुळे मी ‘शशी’सारखं दिसायचा, तसा बेलबॉटम वापराचा प्रयत्न करायचो, पण जमायचं नाही. पपीला मी ‘बेबी नंदा’ समजू लागलो. तिच्या बापसाने एकदोनदा मला भयंकर दम भरला. मी गणितात कायम नापास होतो हे त्याला पपीनेच सांगितलं असावं. पण मला सांगा, हृदयापासून प्रेम करण्याचा गणितात फेल जाण्याशी संबंध काय? पण हे विचारायला पपीच्या अगडबंब बापासमोर मी इतका वेळ टिकत नसे. धूम ठोकत असे. त्याला टरकत असे. धूम ठोकण्याचे प्रकार दोनतीनदा झाले. धूम भाग १, धूम २, धूम ३ असे चित्रपट हल्लीही येऊन गेले म्हणे. त्या काळी प्रेमिकांचं वाहन ‘सायकल’ हे होतं. मला एका स्लोगन कवितेवर सायकल बक्षीस मिळाली होती, हे पपीचा बाप जमेत धरत नव्हता. ‘अनाडी तो अनाडी!’ असं मी म्हणायचो. अचलपूरच्या बारबुद्धे नावाच्या होऊ घातलेल्या तरुण शिक्षकाला अगणित पत्रं ‘पेन फ्रेंड’ म्हणून मी त्याकाळी पाठवायचो, पण हे पपी प्रकरण त्याच्यापासूनही मी लपवून ठेवलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅलेंडरं बदलत गेली आणि शशी, शम्मी मागे पडले. राजेश खन्नाचं सुपरस्टारपद ढासळलं. राज कपूरचा ‘जोकर’ इतका सरस आणि संगीतरचनांच्या दृष्टीने उजवा असूनही कोसळला. ‘लिबर्टी’सारख्या पॉश चित्रपटगृहाकडे जाऊन इंग्रजी बोलल्यासारखं करून इंग्लिश चित्रपट बघण्याची माझी आणि शाळासोबती पक्या प्रभूची हौस न्यूनगंडातूनच आलेली असावी. इंग्रजीला आपण कधी थेट भिडू शकत नाही. नडूही शकत नाही. एक ‘कॉम्प्लेक्स’ घेऊनच आपण सगळे भिडू, काम करतो.

मराठीतील सर्व वाचक लेखक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article by reader padyaadcha chandana
First published on: 04-11-2016 at 13:37 IST