त्यावेळी मी गुजरातमधील राजकोट शहरातील ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’ कार्यालयात अधिकारी पदावर होतो. दीडशेच्या आसपास कर्मचारी असलेले हे कार्यालय.
केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाने २००० साली राजकोटात एक भव्य औद्योगिक प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरवले. ‘हेवी मीट्स दी स्मॉल’ असं नाव. मोठय़ा (उद्योगांची) छोटय़ांशी भेट अशी संकल्पना होती. तो औद्योगिक मंदीचा काळ होता. राजकोट इंजिनीअरिंग असोसिएशन सहआयोजक या संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीणभाई गराला हे आमच्या प्रादेशिक समितीचे सदस्य. त्यांनी भविष्य निर्वाह निधी योजनांची माहिती देणारे एक दालन प्रदर्शनात असावे असा प्रस्ताव मांडला आणि तो उचलून धरण्यात आला. प्रस्ताव केंद्रीय कार्यालय, दिल्ली येथे पाठविण्यात आला. प्रदर्शन ११ ऑक्टोबर २००० ते १५ ऑक्टोबर २००० पर्यंत चालणार होतं. प्रदर्शनाला ४/५ दिवस उरले असताना दिल्लीची मंजुरी आली.
मुख्य आयुक्तांनी मला केबिनमध्ये बोलावले आणि प्रदर्शनातील नियोजित दालनाची कल्पना दिली व सूत्रे माझ्या हाती देऊन ते मोकळे झाले. रूपरेषेची चर्चा केली आणि भेट संपली. माझ्यासमोर एक आव्हान उभे राहिले.
दोन दिवसात अनेक कामे उरकायची होती. प्रथम मी असोसिएशनचे अध्यक्ष गराला यांच्याशी सविस्तर चर्चा केली, दालनाची पूर्ण माहिती घेतली. कारखान्यांच्या मालकांसाठी योजनांची माहिती व तरतुदी यांची विशेष मार्गदर्शिका हिंदी/गुजराती भाषेत तयार करून छापायला दिल्या. संगणकाची मदत घेतली. सॅटिन कापडावर बॅनर्स एका दिवसात तयार करून घेतले. कार्यालयात उपलब्ध असलेल्या छापील फॉर्म्सचे संच तयार करून ठेवले. पेन्शन योजनेसंबंधातील माहिती पुस्तिका (बुकलेटस) दालनात आणून ठेवल्या. दोन फुलदाण्यांची मांडणी केली. चार सजीव रोपवाटिका आणल्या. बॅनर्स दोन बाजूला लावले. या सजावटीमुळे दालनाला शोभा आली. दालनाला भेट देणाऱ्या प्रेक्षकांसाठी अभिप्राय, सूचना व तक्रारींसाठी स्वतंत्र वह्या ठेवल्या.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघनेच्या दृष्टीने हा नवा व एकमेव प्रयोग होता. प्रदर्शन सुरू व्हायला एक दिवस बाकी होता. मी शांतपणे ऑफिसमध्ये बसून प्रदर्शनाच्या आयोजनातील कामाचा आढावा घेत होतो. अकल्पित एक उणीव माझ्या लक्षात आली. प्रदर्शनातील दालनाला भेट देणाऱ्या प्रेक्षकांना माहिती कोण देणार? मार्गदर्शन कोण करणार? ती व्यक्ती कार्यालयातील हवी! ही एक मोठी समस्या होती.
या प्रदर्शनातील आमच्या दालनाला कर्मचारी युनियनचा (छुपा) विरोध होता. स्वच्छेने कोणी कर्मचारी स्वयंसेवक म्हणून काम करेल याची खात्री नव्हती. त्यांना ही नसती उठाठेव वाटत होती. काही कर्मचाऱ्यानां बोलावून याबाबतीत विचारलेही. पण काहीतरी कारणे सांगत त्यांनी माघार घेतली. ही एक कसोटी आता समोर उभी! कामगार वर्ग वा कामगारांच्या युनियन्स त्रास देतील वा हंगामा करतील अशी सुप्त भीती त्यांना वाटत होती. साहेबांना रिपोर्ट केला तर सक्तीने नेमणूक करतील, पण त्यामुळे तेढ निर्माण होईल. कदाचित आजारपणाची तो रजा टाकेल! न कर्त्यांला बहाण्यांची कमी नसते! तरी पण हा उपाय अंतिम पर्याय होता. तणाव वाढत होता. वेळ कमी उरला. कमीत कमी दोन स्वयंसेवक व दोन शिपाई यांची जरूर होती. विचारात गर्क झालो. इतक्यात आशेचा किरण दिसला.
महिला कर्मचारी!
पण येथील महिला सनातनी विचारांच्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी लोकांशी संवाद करणे त्यांना रुचणार नव्हते. तरीही प्रयत्न करायच ठरवलं. कारण या महिलांना कार्यालयातील कार्यक्रमात (१५ ऑगस्ट, २६ जानेवारी हिंदी दिवस इ.) सहभागी होण्यासाठी मी उत्तेजन देत असे. त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास होता. त्यांच्यापैकी एका तरुण सुशिक्षित, धीट महिलेला मी पाचारण केलं. कामाचं स्वरूप समजावून सांगितले. सुरक्षिततेची हमी दिली. या कामाचा अनुभव तुला उपयोगी पडेल असा सल्ला दिला. निर्णयासाठी तिने दहा मिनिटे मागितली. थोडय़ा वेळाने ती आली. तिने होकार दिला. ती मैत्रिणीला सोबत घेऊन आली होती आणि ती पण स्वयंसेवकाचे काम करायला उत्सुक होती. तिलाही आम्ही सामावून घेतलं. आमची टीम तयार झाली.
या भव्य प्रदर्शनाला ४-५ लाख लोकांनी भेट दिली. प्रमुख पाहुणे केंद्रीय उद्योग मंत्री मनोहर जोशी व उद्घाटक गुजरातचे मुख्यमंत्री केशुभाई पटेल उपस्थित होते. या प्रदर्शनात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, परिसंवाद, सुविद्य वक्त्यांची भाषणे, स्लाईड शो. इ. कार्यक्रम आयोजित केले होते. प्रदर्शनात आमचे दालन यशस्वी ठरले. अनेक मान्यवरांनी दालनाला भेट दिली. केंद्रीय उपमंत्री कथिरीया, केंद्रीय भ. नि. निधी आयुक्त भीमण्णा, गुजरातचे आयुक्त यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. इतर अधिकारी वर्ग यांची गर्दी झाली. एका बाजूला उभा राहून मी सर्व पाहत होतो आणि श्रमसाफल्याचा अनुभव घेत होतो. मी स्वत: रोज अर्धा दिवस या दालनात उपस्थित राहत असे. कुठलाही अनुचित प्रकार न घडता आमचे दालन यशाची पताका घेऊन उभे ठाकले. महिला कर्मचाऱ्यांनी नियमित उपस्थित राहून दर्शकांना योग्य मार्गदर्शन केले, याचा आवर्जून उल्लेख करतो. या कार्यात ज्यांनी हातभार लावला त्यांना कार्यालयातर्फे प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात आली.
रमेश द. गळंगे – response.lokprabha@expressindia.com